उद्यापासून नवं वर्ष सुरू होत आहे. त्यानिम्मिताने आप्तेष्टांसाठी, टीम एनएसटी व आपल्या सर्व वाचकांसाठी युनायटेड किंगडमच्या आपल्या लेखिका, कवयित्री सौ लीना फाटक यांनी पाठविलेल्या या मनस्वी शुभेच्छा…..
निशादेवींनी धरतीराणीच्या अंगावर प्रेमाने आपली काळीभोर, मऊ, उबदार शाल पांघरली होती. रवीराजांच्या आगमनासाठी धरतीराणीला जागे करायला उषादेवींनी ती शाल आपल्या हातांनी हलकेच बाजूला केली. पक्षीगण पण आपल्या सुरेल आवांजात तिला भुपाळी गाऊ लागले. भ्रमरांच्या गुंजारवाने जाई, जुई, चाफ्याला जाग आली. त्यांचा सुगंध आसमंतात पसरला. वृक्षवेली धरतीराणीला जागे करायला आपल्या पानांनी हळुवारपणे वारा घालू लागले.
धरतीराणीला आपल्या सुशांत निद्रेतून हळूहळू जाग येऊ लागली. सर्वांगाला आळोखे देत धरतीराणीनी डोळे किलकिले करून क्षितीजाकडे बघितले. अर्धोन्मलीत डोळ्यांनी ती रवीराजाच्या आगमनाची अधीरतेने वाट पाहू लागली. रवीराजानीसुद्धां क्षितीजावर हळुच मान उंचावून धरतीराणीकडे पाहिले. त्यांना त्या रूपगर्वितेचे विलोभनीय सौंदर्य पाहून तिला आपल्या किरण शलाकांनी बाहूत लपेटून घ्यायचा मोह अनावर झाला.
पण धरतीराणी कसली खट्याळ ! ती रवीराज क्षितीजावर येण्याची, मिस्किलपणे हंसत वाट पाहू लागली. रोमांचित झालेल्या रविराजाची गुलाबीलाली सगळ्या आकाशभर पसरली. ती पाहून लाजून हंसत धरतीराणी क्षितीजापर्यंत केंव्हा पोचली ते तिला कळलेच नाही. आणि रवीराजाच्या सोनेरी बाहूंनी धरतीराणीला केंव्हा लपेटले ते त्यांना समजलेच नाही.
क्षितीजावरच्या त्या स्वर्गीय मिलनांतून नवी पहाट, नवा दिवस उगवला आणि नविन आशा, आकांक्षा, नवी स्वप्ने, ध्येयांच्या सोनेरी क्षणांचा वर्षाव धरतीच्या लेकरांवर झाला. ते मोलाचे क्षण वेचून सर्वांनी आपले २०२२ चे उज्वल भवितव्य घडवले.
तुमच्या सर्वांच्या जीवनांत ह्या सोनेरी क्षणांमुळे सुख, आनंद, सुआरोग्य, शांती व संप्पन्नतता लाभो ह्या शुभेच्छा आणि या शुभेच्छांसोबत एक कविता !
कालचक्र
नविन वर्षाचा
नवा दिवस
नविन महिना
मानवाची असे
ही कालगणना
खरं म्हणजे
पडतो कांही फरक ?
कालचक्र मात्र
असेल हसत
रोजच दिवस उगवतो आजच्या सारखाच
तो ही मावळतो रोजच्या सारखांच
मानव मात्र मोजतो दिवस-रात्रीचे तांस
अविचल असतो स्थितप्रज्ञ काल तो
शालिवाहनाची आपण, मोजतो शके
विक्रमादित्याची मानतो संवत्सरे
ख्रिष्चनांची असती
सर्व प्रचलित वर्षे
स्थितप्रज्ञाची कशी मोजावी शतके ?
कालगणनेवर
नियंत्रण मानवाचे
धरतीवर मात्र
वर्चस्व निसर्गाचे
भूकंप, ज्वालामुखी,
कुठे “सुनामीचे” तडाखे
उद्धस्त करी जीवन
पराधीन मानवाचे
संकटी दिसे
मानवाची एकजुटी
खेद् होतो बघुनी, काहींची भ्रष्ट वृत्ती
स्वार्थ, धर्मांधता,
माजवी अराजक
भाऊबंधास मारती
होई होळी मानवतेची
सावध हो रे मानवा
करशील कालगणना
नसे तुझी कदर
त्या स्थितप्रज्ञाला
कर रे, बा मानवा निसर्गाशी संगती
सर्व जिवी असो सहानुभुती
जोवरी राहील
संतुलन धरती
मानवी अस्तित्व
टिकेल जगती

– लेखन : सौ. लीना फाटक, वाॅरिंग्टन, यु.के.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800
मन:पूर्वक आभार सुनंदा व सुभाष. सौ. लीना फाटक
Ditto
लीनाताई, नववर्षाच्या शुभेच्छा अतिशय सुंदर शब्दात गुंघल्या आहेत तुम्ही, अभिनंदन आणि तुम्हालाही नवीन वर्ष आनंदाचे जावो , सुखसमृद्धी चे जावो.