इतिहासाचार्य वि. का. राजवाडे ह्यांची आज ९५ वी पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने त्यांना वाहिलेली आदरांजली…
इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांची धुळे एक कर्मभुमी होती. राजवाडे यांच्या प्रेरणेने मराठी आणि मराठे यांच्या संशोधनाची बीजे धुळ्यात रुजली आणि वाढली.
वि.का. राजवाडे यांचा जन्म शके १७८६ आषाढ शु.८. सन १८६४ दिनांक १२ जुलै रोजी पुणे येथे झाला. (राजवाडे चरित्र भा. वा. भट) त्यांनी पुणे येथील भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना दिनांक ७ जुलै १९१० रोजी केली. मराठ्यांच्या इतिहासाची साधने या संबंधी एकुण २२ खंड त्यांनी स्वतःच प्रसिध्द करून ठेवले होते. त्या शिवाय राजवाडे समग्र साहित्य 1 Vo 13 खंड उलगडा, राघामाघव विलासचंपू, महिकावतीची बखर, धातुकोश, ज्ञानेश्वर नितीकथा, अमृतानुभव, योग चिंतामणी आणि संशोधक अशी दुर्मिळ ऐतिहासिक पुस्तके आजही अभ्यासकांना, इ.वि.का. राजवाडे संशोधन मंडळात अभ्यासता येतात.
इ.वि.का. राजवाडे यांच्याजवळ अचाट परिश्रम, अपार शब्द संपन्नता, भेदक बुध्दिमत्ता होती. तसेच अफाट धारणाशक्ती, प्रशंसनीय स्वाभीमान आणि अवर्णनीय निःस्पृहपणा आदी गुण होते. त्यांची बुध्दिमत्ता अत्यंत तीक्ष्ण असल्याने कोणताही विषय ते लिलया ग्रहण करीत असत .
त्यावेळी, इतिहास लेखनाचे प्रयत्न विशेषतः बखरीच्या आधारावरच झालेले होते. पण काव्येतिहास संग्रहात अस्सल पत्रे प्रसिध्द होताच विद्वानांचे लक्ष या नुतन उपक्रमाकडेस एकदम आकर्षिले गेले. त्यांची भाषा जोरदार, तिखट पण स्पष्ट असे. निरलसपणा, जबर कल्पनाशक्ती देशाभिमान आणि कार्यदृष्टी इत्यादी गुणांचे संमीलन त्यांच्या ठिकाणी झाले असल्यामुळे महाराष्ट्राच्या इतिहास क्षेत्रात त्यांना कायमच्या स्वरुपाची कामगिरी करता आली.
राजवाडे यांचा उदय होण्यापूर्वी ग्रँटडफ विषयी थोडीबहुत तक्रार सुरु होती व प्रतिक्रियारूपाने आमच्या पूर्वजांची निंदा करण्यापेक्षा बखरकारांचा इतिहास खरा धरला पाहिजे असे मत रुढ होत चालले होते. परंतू हे दोघेही अविश्वसनीय असुन खरी कागदपत्रे शोधुन काढून त्या आधारावर आपल्या इतिहासाची मांडणी केली पाहिजे ही गोष्ट
कै. राजवाडे यांनी तपशीलवार विवेचन करुन सिद्ध केली.
विष्णूशास्त्री चिपळूणकरांच्या पश्चात महाराष्ट्रातले चैतन्य कायम राखण्यास ज्या थोडया विभुती साधनभुत झाल्या त्यांत राजवाडे यांची गणना केली पाहिजे. महाराष्ट्राच्या इतिहासात राजवाडे यांना तीनच कर्ते पुरुष वंदनीय असे वाटले. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, श्री.समर्थ रामदास, आणि थोरले माधवराव पेशवे. यावरुन राष्ट्रोधारक पुरुष निवडण्याची राजवाडे यांची कसोटी किती कडक होती ते लक्षात येते.
राजवाडे यांच्या कल्पनाशक्तीचे उड्डाण सामान्य वाचकांना झेपत नसे. त्यामुळे त्यांचे लेख छापण्यास सामान्य प्रकाशक तयार नसत. पण कै. प्रो. विजापुरकर यांनी राजवाड्यांची योग्यता जाणुन त्यांच्या लेखांस प्रथमच ग्रंथमालेत स्थान दिले आणि तेव्हा पासुन राजवाडे हे इतिहासाच्या अभ्यासकांना अवश्य अभ्यसनीय असे ग्रंथकार म्हणून मान्य झाले. “मानभाव” यांच्या ग्रंथाचे गुढ उकलण्यात त्यांची कल्पकशक्ति प्रत्ययांस आली. आपल्या मराठी भाषेच्या योग्यतेस अनुरुप असे स्थान तिला जगाच्या वाड:मयात दिले जात नाही याबद्दल राजवाडे यांना चीड येत असे.

आपल्या राष्ट्राचा इतिहास खऱ्या ऐतिहासिक व विश्वसनीय अशा तत्कालीन कागदपत्रातुन कसा शोधुन काढावा हे जसे राजवाडे यांनी आपल्या कृतीने महाराष्ट्रीयांस शिकविले त्याचप्रमाणे जी इतिहासाची साधने आपणांमुळे येतील त्यातुन अचुक अनुमान कसे काढावे आणि ते जनतेपुढे कसे साधार मांडावे याचीही इतिहासाच्या अभ्यासकांस राजवाडे यांनीच दीक्षा दिली आणि सुदैवाने पुणे येथे भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना झाली. असीरियातीत असुर लोकांचा हिंदूस्थानाशी संबंध कधी, कसा आला व प्राचीन काळी हिंदुस्थानाचा परराष्ट्राशी निकट संबंध या विषयीचे त्यांचे शोध व लेख वाचण्यासारखे आहेत.
राजवाडे यांच्या सारख्या प्रतिभा संपन्न, स्वतंत्र विचाराचा बिनदिक्कत कल्पनेची भरारी मारुन अज्ञात भागाचा ठाव घेणारा निरलस व निरपेक्ष वाड:मयसेवक महाराष्ट्रातच काय पण कोणत्याही राष्ट्रात दुर्मिळ असतो. त्यांच्या सगळ्या कार्याची उभारणी स्वयंप्रेरणेने स्वतःच्या प्रगल्भबुध्दीच्या जोरावर आणि आत्मप्रत्ययाच्या पायावर झालेली होती.
राजवाडे यांनी जे जे लेखनविषय आपल्या हाती घेतले त्यांत ते सर्वश्रेष्ठ किंबहुना विचार सम्राट होऊन झळकले. वेदकालीन भाषेपासुन मराठी पर्यंत ज्या भाषा प्रचारात होत्या त्या सर्व भाषांवर महाविद्यालयीन शिक्षणासाठी म्हणुन पुण्याच्या डेक्कन महाविद्यालयात नांव नोंदविले. पण त्यांनी स्वतःच स्वतंत्ररित्या अभ्यास केला, आणि शिक्षण पुर्ण केले. अर्थशास्त्र, नितीशास्त्र, राज्यशास्त्र, तत्वज्ञान, मानववंशशास्त्र, धर्मशास्त्र या विषयांचा त्यांनी चांगलाच अभ्यास केला होता. १८९१ साली ते बी.ए. पास झाले. पदव्युत्तर शिक्षणही त्यांना घ्यावयाचे होते. पण ते घेऊ शकले नाही. काही तरी कमवावे म्हणुन शिक्षकी पेशात ते जरुर आले. पण फक्त ३ वर्षातच त्यांनी ती नोकरी सोडली.
त्यांचे खाजगी जीवन (कौटुंबिक) दुःखमय झाल्याने त्यांनी आपले उर्वरित आयुष्य हे पूर्णपणे संशोधनासाठीच वाहुन घेतले होते. त्यांच्या तरुण वयातच विष्णुशास्त्री चिपळूणकर (निबंधमालाकार) काव्यइतिहासांचे काशिनाथ साने, परशुरामपंत गोडबोले यांच्या ग्रंथाचा त्यांच्यवर विलक्षण प्रभाव पडला आणि येथुनच देशप्रेम, साहित्य, संस्कृती आणि मराठी भाषेचा जाज्वल्य अभिमान याकडे ते वळले.
डेक्कन महाविद्यालयात असतांना राजवाडे यांनी इंग्रजी भाषेतील अनेक अभिजात ग्रंथाचे वाचन केले होते. त्या ग्रंथातील समृध्द ज्ञानाने ते दिपुन गेले होते. विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या प्रभावामुळेच ते मराठी भाषेचे कैवारी झाले. पाणिनीस अमुक रुप बरोबर समजले नाही इतके सांगणेपर्यंत त्यांची तयारी होती. इंग्रजी, फ्रेंच, फारसी, संस्कृत, मराठी या भाषात व व्युत्पति लावण्याचे शास्त्रांत त्यांच्या हात धरणारा कोणी नव्हता.राजवाडे पुणे येथे डेक्कन महाविद्यालयात शिकतांना इतिहास हा तर त्यांचा ऐच्छिक विषय होता. त्यांनी स्वतंत्र रितीने आपले बुध्दिबलावर अभ्यास करुन तो त्यांनी तयार केला. कारण इतिहास घेतलेले ते एकच विद्यार्थी होते. त्या विषयाचे कॉलेजात कोणी प्रोफेसरच नव्हते. समाजशास्त्र, मानववंशशास्त्र, शिलालेखशास्त्र, व्युत्पतिशास्त्र, भाषा, इतिहास लेखकालशास्त्र अशी अनेक शास्त्रे त्यांना पूर्ण अवगत होती.
राजवाडे यांनी मराठ्यांच्या इतिहासावर सुसंगत असा स्वतंत्र ग्रंथ लिहीला नाही किंवा तत्वज्ञानावरही स्वतंत्र ग्रंथ लिहिला नाही. त्यांचे स्फुट लेख आणि प्रस्तावना हीच त्यांची महाराष्ट्राला महत्वाची देणगी आहे. पण या प्रस्तावना म्हणजे स्वतंत्र ग्रंथ आहेत आणि या ग्रंथात मराठ्यांच्या इतिहासाची बहुतेक समग्र रुपरेषा आहे. व ती एका विशिष्ट तत्वज्ञानाच्या दृष्टीने लिहिलेली आहे.
ऐतिहासीक कागदपत्र शोधता शोधता राजवाडे यांना काही मराठी काव्यही सापडले. त्यांत दासोपंताची कविता आणि सुप्रसिध्द ज्ञानेश्वरीची जुनी प्रत सापडली. हे दोन्ही ग्रंथ सापडल्यानंतर त्यांनी मराठीचे त्यावेळचे शुध्दलेखन कसे असले पाहिजे याबद्दल काही नियम ठरविले होते.
या उज्वल व श्रेष्ठ अशा सरस्वती भक्ताची राहाणी अत्यंत साधी अशी होती. परदेशी कपड्यांचा त्यांच्या शरीरास केव्हांही स्पर्श झाला नाही.
राजवाडे आपल्या पूर्व संस्कृतीचे अभिमानी होते. पण त्याहून ते सत्याचे अधिक अभिमानी होते. त्यामुळे आपल्या संस्कृतीत त्यांना जे जे दोष आहेत असे वाटले ते ते त्यांनी स्पष्टपणे मांडले आहेत. राजवाडे यांचे मराठी भाषेवर अत्यंत प्रेम होते आणि त्या भाषेची योग्यता वाढावी म्हणुन त्यांनी अतिशय कसोशीने जन्मभर प्रयत्न केला. तथापि त्यांचे इंग्रजी भाषेशी वाकडे नव्हते. इंग्रजी भाषेचे वैभव ते ओळखुन होते. इंग्रजी भाषेतील सर्वोत्तम विचार आपल्या भाषेत यावेत असे त्यांना वाटे. त्यासाठीच त्यांनी “भाषांतर” नावाचे एक मासिकही कांही दिवस चालविले होते. राजवाडे यांची स्वतःची योग्यता पाश्चात्यातील विचारकांच्या तोडीची होती.
त्यांचा स्वार्थत्याग, आत्यंतिक तीव्र बुध्दिमता एकाच कार्यास वाहुन घेण्याची पात्रता, राष्ट्रीय स्फूर्ती, संशोधनाची जबर आवड, इतिहास आणि मातृभाषेची प्रखर आवड, पूर्वजांची ख्याती पुढे आणण्याची उत्कृष्ट लालसा इतके सारे गुण त्यांच्या ठायी होते. अस्सल कागदपत्र जमवुन त्यांच्याबद्दल योग्य अनुमाने बांधणे यांत त्यांचा हात धरणारा कोणी मिळणार नाही. थोर रियासतकार गोविंद सखाराम सरदेसाई म्हणतात,” राजवाडे यांचे लिखाण समजायला थोडा अवधि लागतो. राजवाडे यांनी पानिपताचा खंड प्रसिध्द केला. त्यावरील प्रस्तावना ७ वेळा वाचली तेव्हा समजली.” ती प्रस्तावना अत्यंत विचारपूर्ण आणि सुचक होती. राजवाडे यांचे लिखाण वाचत असतांना मनुष्य उत्साहीत होतो. कारण त्यांनी नवीन साधने पुढे आणली. जुन्याचे नवीन अर्थही लावुन दाखविले. राजवाडे यांचे गुण थोर होते. त्यांचे कार्यही तसेच होते. त्यांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न आपण यथाशक्ति करु या.
॥राजवाडे संशोधन मंडळ॥
इ.वि. का. राजवाडे यांचे धुळे येथे दिनांक ३१ डिसेंबर १९२६ रोजी निधन झाले. लगेचच ९ जानेवारी १९२७ रोजी राजवाडे संशोधन मंडळाची स्थापना करण्यात आली. दिनांक ५ जानेवारी १९३२ रोजी राजवाडे मंदिराचे Her highness सौ. महाराणी इंदिराबाई मासाहेब होळकर यांचे हस्ते उद्घाटन झाले. १ एप्रिल १९३२ रोजी, संशोधक त्रैमासिकाचा प्रकाशन समारंभ झाला. दिनांक २७ मार्च १९३३ रोजी राजवाडे मंडळ पिपल्स को-ऑपरेटीव बँकेची स्थापना झाली. राजवाडे यांनी लिहीलेल्या धातुकोश या ग्रंथाचे प्रकाशन ३० जानेवारी १९३८ रोजी झाले. सन १९४६ मध्ये भास्कर वामन भट यांनी लिहीलेल्या राजवाडे चरित्र या ग्रंथाचे प्रकाशन ७ डिसेंबर रोजी झाले.
राजवाडे वस्तुसंग्रहालय
मंडळाचे वस्तुसंग्रहालय, अभिलेखागार आहे. यामध्ये खानदेशची घराणी, शिंदखेडकर राऊळांचे कागद, सुलतान परगण्यांचे कागद, खानदेशातील होळकरी सत्ता-पत्रे-पोथ्या, फारसी दप्तर, सम्राज्ञी बेगम मुमताज महल यांचा हुकुमनामा, बादशाही फर्मान, हस्तलिखिते, पोथ्या, कागदपत्रे, विवेकसार ऊर्फ मनन ग्रंथ पंथीकृत विवेक, वेडिया नागेश भावार्थ ग्रंथ, योग चिंतामणी, मराठी, हिंदी, संस्कृत, फारसी, मोडी, शिवकालीन, पेशवाकालीन दुर्मिळ कागदपत्रे, शिलालेख, मुर्ती, ताम्रपट, दुर्मिळग्रंथ, पाषाण शिल्प, शस्त्रागार, धातुमुर्ती भांडे, नाणी संग्रह, – चित्रे, कनुदेसाई यांची रंगचित्रे, अन्यकाही कलाकृती, आदि बघावयास मिळतात. मंडळाची घोडदौड करण्यास अनेकांचे हातभार लागले आहेत. त्यात भट घराण्यातील कै. भास्कर वामन भट, दत्तु काका भट, बाळुकाका भट, याजबरोबर कै. बाळासाहेब मुंदडा, डॉ. प्र.न. देशपांडे अनेकांचे योगदान आहे.
मंडळाचे अध्यक्ष मदनलाल मिश्रा, उपाध्यक्ष
मंडळाचे कार्याध्यक्ष श्री. संजय मुंदडा तसेच विद्यमान पदाधिकारी, मुख्य चिटणीस, डॉ. सर्जेराव भामरे, कर्मचारी मंडळ आदिच्या मार्गदर्शनाने मंडळ कार्याची घोडदौड करीत आहे.
इ वि का राजवाडे यांचे गुण थोर होते. त्यांचे कार्यही तसेच होते. त्यांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न आपण यथाशक्ति करु या.
त्यांना भावपूर्ण आदरांजली.

– लेखन : श्रीपाद नांदेडकर
निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी तथा क्युरेटर
राजवाडे वस्तुसंग्रहालय ,धुळे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800
खुप माहितीपूर्ण सविस्तर, सुंदर लेख. धुळ्याच्या सर्व contact वर पाठवला. अभिमान वाढला. खुप खुप धन्यवाद.