Saturday, July 5, 2025
Homeबातम्यासन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा

सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा

राजमाता जिजाऊ माँ साहेब यांची जयंती आणि पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त राज्यातील सर्व शाळांमध्ये ‘जिजाऊ ते सावित्री-सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा’ अभियानांतर्गत विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी विविध शैक्षणिक कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.

या अभियानामध्ये सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी केले आहे. या अभियानादरम्यान कोविड संदर्भातील मार्गदर्शक तत्वांचे आणि नियमांचे काटेकोर पालन करावे, असेही त्यांनी म्हटले आहे.

असंख्य अडचणींवर मात करून स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती ०३ जानेवारी रोजी साजरी करण्यात येते. तसेच त्यांचा जन्मदिवस महिला शिक्षणदिन म्हणून साजरा करण्यात येतो. शिवरायांना शूर, पराक्रमी, धाडसी योद्धा म्हणून घडविणाऱ्या राजमाता जिजाऊ यांच्या जीवनचरित्रातील प्रसंग समाजासमोर सुजाण पालकत्वाचे आदर्श निर्माण करण्यासाठी प्रेरणादायी आहेत. यशस्वी जीवनासाठी आवश्यक मूल्ये शालेय विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबविणे या उद्देशाने राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या प्राथमिक ते उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी दि. ०३ ते १२ जानेवारी, २०२२ या कालावधीत विविध शैक्षणिक कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.

यामध्ये शाळा, विद्यार्थी, पालक, लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवर व समाज यांचा सक्रीय सहभाग घेण्यात येणार आहे.

या अभियानाच्या कालावधीत शाळाबाह्य मुलींच्या शिक्षणासाठी सुद्धा विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

या अनुषंगाने शालेय स्तरावर दि. ०३ ते १२ जानेवारी, २०२२ या कालावधीत विविध इयत्तांच्या विद्यार्थ्यांसाठी पुढील शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. दि. ३ आणि १२ जानेवारी रोजी अनुक्रमे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे तसेच राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन,

३ जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले आणि १२ जानेवारी रोजी वेशभूषा,
४ जानेवारी रोजी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी तसेच किशोरवयीन मुलींसाठी मासिकपाळी व्यवस्थापन उद्बोधनसत्र,
५ जानेवारी रोजी विविध विषयांवर निबंधलेखन,
६ जानेवारी रोजी यशस्वी महिलांच्या यशोगाथा/ मुलाखती,
७ जानेवारी रोजी आनंदनगरी प्रदर्शन,
८ जानेवारी रोजी चित्रकला आणि किल्ले शिल्प,
१० जानेवारी रोजी पोवाडागायन तसेच समूहगायन उपक्रम,
११ जानेवारी रोजी व्याख्याने व परिसंवादाचे आयोजन,
तर १२ जानेवारी रोजी एकांकिका/ एकपात्री नाटिकांचे आयोजन करण्यात येणार आहे.

विद्यार्थी आणि शिक्षकांनी कार्यक्रमांचे आयोजन करून आपल्या उपक्रमाचा/ कार्यक्रमाचा २ ते ३ मिनिटांपर्यंतचा सुस्पष्ट व्हिडीओ, फोटो व इतर साहित्य समाज-संपर्क माध्यमांवर (फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम) #balikadivas2022, #mahilashikshandin2022, #misavitri2022, #mijijau2022 या हॅशटॅग (#) चा वापर करून अपलोड करण्यात यावा, असे या संदर्भातील शासन निर्णयात म्हटले आहे.

– टीम एनएसटी. 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments