‘सहनाववतु…
सहनौभुनक्तु..
सहवीर्यम् करवावहै..’ यातील सहजीवनाचा आनंद आणि माणसाला माणसाबद्दल वाटणारी कृतज्ञता याचे मनोरम दर्शन घडवीत काल, रविवारी 2 जानेवारी रोजी मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद, बीड जिल्ह्यातील लातूरलगतचा धर्मापुरीपर्य॔तचा भाग आणि कर्नाटकातील गुलबर्गा-बीदर जिल्ह्य़ातील सीमावर्ती पट्ट्यात, शिवारा-शिवारात शेतकऱ्यांचे ‘लक्ष्मीपूजन’ मोठ्या श्रद्धेने साजरे झाले.
हे कालच्या ‘वेळा अमावस्ये‘ चे औचित्य. बोली भाषेत ‘येळवस’ ! या दिवशी कलेक्टर डिक्लेअर्ड सुट्टी !!
ऊर्वरित महाराष्ट्राला हा अनोखा सण माहिती नाही.
खरे तर, गेली शेकडो वर्षे या भागात पिढ्यान् पिढ्या ही प्रथा सुरु आहे. हा केवळ वनभोजनाचा, जिभेचे लाड पुरविणारा कार्यक्रम नाही. व्यक्ती, समष्टी आणि सृष्टी यांच्या महासमन्वयाचा हा मोठा आनंदसोहळाच !
या पट्ट्यातील आबालवृद्ध रंगीबेरंगी ठेवणीतील कपडे घालून अगदी अमाप उत्साहाने नटून थटून, पण विलक्षण श्रद्धेने, येळवस साजरी करायला शेता- शेतात एकत्रित येतात. शेतातल्या झाडाखाली मांडलेल्या पांडवांच्या साक्षीने आंबिल- बाजरीचे ऊंडे आणि भज्ज्यांचा खमंग बेत शिजविला जातो.
वर्षभर या सणाची फार आतुर प्रतिक्षा ! कुटुंबीय, मित्रपरिवार, शेतातली गडीमाणसं, पाव्हणे रावळे, ज्यांना शेतीच नाही असे शेजारीपाजारी आनंदाने एकत्रित येत असतात आणि शेता- शेतांमध्ये इकडं माणसांचा मेळा फुलत असताना, तिकडं शहरांसकट एकूणएक गावंही कर्फ्यू लागल्यासारखी निर्मनुष्य पडलेली असतात. अगदी चिटपाखरुही गावात नसतं. हा म्हणजे, आपल्या भारतीय संस्कृतीतील ‘अतिथी देवो भव’ चा अत्युच्च नमुना !
या संपूर्ण पट्ट्याच्या पंचक्रोशीत एकाच दिवशी आणि एकाच वेळी हा आगळावेगळा वनमहोत्सव चालू असतो. शेतकऱ्यांच्या जगण्याच्या वाटेवरील ‘तुळशीमळा’ म्हणजे ही येळवस !
धरतीच्या नवनिर्मितीचा आनंद आणि स्वागत करणारा हा सोहळा खरे म्हणजे डोळा भरुन पाहिल्याशिवाय आपल्याला राहवणारच नाही. शेतात येणारा प्रत्येकजण- मग तो ओळखीचा असो वा नसो- शेतातून वाट काढत जाणाऱ्या वाटसरुलाही अगदी आग्रहाने जेवायला बोलावले जाते. काळ्या आईबद्दलची कृतज्ञता, सहजीवन, सहभोजन यांचा हा अनोखा मिलाफ वेळा अमावस्येच्या दिवशीच बघायला मिळतो.
बळीराजाचे ‘लक्ष्मीपूजन’ म्हणून साजरी होणारी ही येळवस. खुमासदार भज्जी आणि आंबटसर चवीचं लज्जतदार आंबिल यांची चव जिभेवर घोळवतच माणसं दिवसभर रानांत हंसी- मजाक करताना दिसतात. शिवारपूजेचा हा सोहळा साजरा करताना सगळी शेतं माणसांनी फुलून गेलेली असतात. सरकारनं संचारबंदी पुकारल्यागत गावन् गाव ओस ! गावागावात निर्जन रस्ते, कुलुपबंद घरं आणि दुकानांच्या शटर्स वा दारांचे बुरखे ओढून घेतलेले असं दृश्य या भागात सर्वेशाम दिसतं.
प्रत्येक गावातून जीप, कार, ट्रॅक्टर, ट्रक्स, मोटारसायकली, स्कूटर्स, सायकली, टेम्पो आणि बैलगाड्या अशी मिळेल ती वाहनं भरभरुन माणसं शेतांकडं धाव घेताना पाहण्यातलं ‘थ्रिल’ जगावेगळंच !
हातातील टोपल्यांमध्ये बाजरीच्या उंड्यांचे ढीग नि ताकासारख्या आंबटसर आंबिलाची गच्च भरलेली गाडगी आणि सर्व पालेभाज्या एकत्र करुन केलेली खमंग भज्जी घेऊन शेतकरी आज लक्ष्मीपूजन पुजायला शेताकडं निघतात.
विशेष म्हणजे, लातूर,उस्मानाबाद जिल्हे, बीड, नांदेडचा काही भाग वगळता संपूर्ण महाराष्ट्रात कोठेही हा येळवस अथवा ‘येळमाशी‘ चा सण साजरा होत नाही. उस्मानाबाद जिल्ह्यातल्याही भूम, वाशी, परंडा भागात सहसा हा सण दिसत नाही.
मुळात ‘येळमाशी‘ हा कानडी शब्द. येळ म्हणजे सात. पेरणीनंतरची सातवी अमावस्या. आपल्याकडं येळअमुशा, येळ अमावस्या, येळ अवस, येळवस, आणि वेळा अमावस्या असे तिचे अपभ्रंश झालेले आहेत.
लातूरला तर शेत नसणारे अनेकजण शेजार्यांच्या, मित्रांच्या शेतात किंवा अगदीच नाही, जमलं, तर शहरातील टाऊन हाॅल, डाॅ. आंबेडकर पार्क, विराट हनुमान, नाना- नानी पार्क, अष्टविनायक मंदिर किंवा चाकूरच्या साईनंदनवनम् येथेही येळवस साजरी करायला जातात.
या दिवशी शेतातल्या झाडाच्या बुंध्याशी पाषाणांना चुन्याचा रंग लावून ‘पांडव’ तयार केले जातात. त्या भोवती कडब्याचा पाचुंदा उभा रचून या पांडवांची नि शेतात डोलणार्या रबी पिकांची शेतकरी मनोभावे सपत्नीक पूजा करतात. कडब्याच्या पाचुंद्यामध्ये मांडलेल्या लक्ष्मीला सपत्नीक पाच प्रदक्षिणा घालतात. त्या घालताना लक्ष्मीआईवर पाण्याचं शिंपण केलं जातं. मातीचं छोटं गाडगं – त्याला ‘सांज मोरवा’ म्हणतात- पूजलं जातं. शेतातल्या पांडवांना बाजरीच्या उंड्यांचा नि आंबिलाचा नैवेद्य दाखविला जातो. नंतर सगळेजण झाडाखाली मस्तपैकी बसून उंडे- आंबिल आणि भज्जी अशी खमंग मेजवानी झोडतात.
सकाळपासून सूर्यास्तापर्यंत या पंगती उठत राहतात. शेता- शेतात गप्पांचे फड रंगतात. गाण्यांच्या भेंड्या, पोरंठोरं नि तरुण पोरा- पोरींची नाचगाणी, कबड्डी- हुतूतूचे खेळ, असा सांस्कृतिक माहौल सायंकाळपर्यंत रंगत जातो. हौशी मंडळी गाणी- बजावणीही सुरु करतात. भूमिपुत्रांना मांडलेला हा हिरवाकंच कृषिसोहळा डोळ्यांत असा साठत राहतो.
सायंकाळी माणसं गावाची वाट धरतात. येताना शेतकरी एका टोपलीवर नवंकोरं लुगडं नि खण पांघरुन टोपलीला ज्वारीची धाटं लावून शेतातली लक्ष्मी प्रसन्न चित्तानं घरी आणतो.
अनेक ठिकाणी हे परतणं सवाद्यही असतं. घराकडं निघण्याआधी ज्वारीच्या धाटांचा हेंडगा करुन शेतात फिरवतात व घरी येऊन गावातल्या मारुती, मंदिराला प्रदक्षिणा घालतात. वाटेत त्यांचा घोषही कानांवर पडतो… ‘ ओलगे.. ओलगे …सालेम पोलगे… ‘ काही ठिकाणी असाही प्रघात आहे, की ज्यांच्या घरी एखादी स्त्री गरोदर असेल, ते शेतकरी टोपलीत आडवी धाटं मांडतात. अस्मानी- सुलतानी कसलंही संकट कोसळो, इथला शेतकरी येळवसला नाट लावत नाही.
दिवंगत लोकनेते आणि राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख तर जगाच्या पाठीवर कुठेही असोत, येळवस साठी हमखास बाभळगावला येत असत. हिरव्यागार शिवारात चक्क मंडप ठोकलेला असे. त्यात मग दिवसभर त्यांच्या शेतात शेकडो लोकांचा राबता, हास्यविनोद, राजकारणातले किस्से असा रंगलेला धमाल माहौल मी स्वतः कित्येकदा अनुभवला आहे.
जाती-पातींच्या भिंतीतर ढासळूनच गेलेल्या असतात. गरीबी- श्रीमंतीची दरी नसतेच.
निसर्गानं मांडलेल्या या आनंदोत्सवात मग शेतकरी आपल्या जगण्याची हरवत चाललेली गणितं शोधत राहतात…येळवसच्या आठवणी उराशी जागवत रोजमर्रा जिंदगीला सामोरं जाण्यासाठी सिद्ध होतात… पुढल्या वर्षीच्या येळवसची वाट बघत…

– लेखन : जयप्रकाश दगडे. ज्येष्ठ पत्रकार, लातूर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800
सामाजिक चाली रीती मागं काय सामाजिक विज्ञान आहे हे माहीतगार व जिज्ञासूंच अभासकरून लोकांपर्यंत पोहोंचवू शकतात.अज्ञानामूळे आज सुशिक्षीत अशा परंपराना थोतांड समजतात ती अशा अभ्यासूं लिखाणाने सुज्ञ होतात.लिखीत असल्यामुळे इतिहास लिहिल्या जाते, आज चा संदर्भ लिखाणात दिसतो व त्यामुळे उद्यासाठीं ते पथदर्शक ठरते.म्हणून हा लेख काल,आज आणि उद्या करितां पोषक वाटतो.जर रेकाॅर्ड केल्या नाहीत तर अलिखित गोष्टीवर काळ घात करून पुसून टाकतो.