थरारक अनुभव
नमस्कार, मंडळी. मागच्या दोन लेखात आपण पाहिले कि, पोलीस दलातील नोकरीमुळे निरनिराळ्या क्षेत्रातील मान्यवर मंडळीना जवळून पहाण्याची संधी मला मिळाली.
आता आणखी एक बाजू पाहु या. डिसेंबर १९८९-९० मधील ही गोष्ट आहे. विमानतळावर माझी दिवसाची ड्युटी होती. सकाळी कर्तव्यावर गेल्यानंतर मला जोगेश्वरी जनशक्ती चौकीला जाण्याचा आदेश मिळाला. जोगेश्वरी येथे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. मी विमानतळावरून निघून जनशक्ती चौकीला मिळेल ते प्रवासाचे साधन घेवून पोहचले.
दंगली मुळे परिस्थिती खूप संवेदनशील होती. सगळीकडे वातावरणात ताण होता. चौकीत जावुन रिपोर्ट केला. माझ्या पोलिस नोकरीत असा प्रसंग मी प्रथमच जवळून पहात होते. एरियातील तसा बैठ्या घराच्या एका बाजूला एका धर्माच्या, तर दुसऱ्या बाजूला दुसऱ्या धर्माच्या लोकांची घरे होती. मधे अरुंद रस्ता होता. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात स्थानिक पोलिसांना यश आले होते. पण परिस्थिती तणावाची होती. सर्व दुकाने, हाॅटेल, घरांचे दरवाजे बंद होते. बघता बघता दिवस सरत होता. जवळ पाण्याची बाटली देखिल नव्हती. बंद मुळे विकतही घेता येत नव्हती.
संध्याकाळ झाली. आश्चर्य वाटेल, पण मुंबईत कधी नव्हे ती कडाक्याची थंडी पडली होती. माझी सडपातळ अंगकाठी असल्याने मला थंडी सहन होत नव्हती. दातावर दात आपटत होते. चहा प्यावा तर तोही उपलब्ध नव्हता. अत्यावश्यक नैसर्गिक विधीसाठी कोणत्या तरी घराचा दरवाजा ठोठावून वेळ चालवून नेली. रात्रीचे २ वाजले होते. थंडी वाढतच होती. कुडकुडत कर्तव्य चालू होते. जेवणाचा तर पत्ताच नव्हता.
त्याच दरम्यान सगळे अलर्ट झाले. मुंबईचे आदरणीय पोलीस आयुक्त सर परिस्थिती पाहण्यासाठी आले होते. सरांनी सर्व परिस्थितीचा आढावा घेतला. आमच्या महिला स्टाफकडे पाहून, ह्या कधी आल्यात ? म्हणून विचारणा केली. आम्ही सकाळ पासून आल्याचे सांगितले असता सरांनी आदेश दिला, यांना गाडीने रेल्वे स्टेशनला सोडा व सकाळी ६ वाजता परत बोलवा. अशा प्रकारे आम्हाला सरांमुळे मध्यरात्री २ वाजता का असेना घरी जाता आले.
अशीच परिस्थिती १९९२ डिसेंबरच्या दरम्यान होती. आम्ही नागपूरला हिवाळी अधिवेशनादरम्यान बंदोबस्तसाठी गेलो होतो. ६ डिसेंबरला अयोध्या घटना घडली. आम्हाला ताबडतोब आपापल्या हेडकाॅर्टरला नेमणूकीच्या ठिकाणी जावून हजर होण्याचा आदेश झाला. मिळेल त्या गाडीने आम्ही मुंबईत आलो. दादर स्टेशनवर उतरलो. बाहेर येवुन पहातो तो आगीचे धकधकणारे व धुरांचे लोट असे दृश्य पाहून थबकून गेलो.
क्रमशः

– लेखन : सुनिता नाशिककर.
निवृत्त पोलिस उपअधीक्षक. मुंबई
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800
Nashik kar madam is my best friend .And I feel proud for my frnd.She was best officer.,also she is best human being