युनीवार्ता : हिंदी वृत्तसेवा
युनीवार्ता या वृत्तसंस्थेशी माझा तिच्या प्रारंभीच्या काळात थोडासा संबंध आला. त्याविषयी लिहावंसं वाटतं. पण तत्पूर्वी थोडा इतिहास.
एकेकाळी हिंदुस्थान समाचार आणि समाचार भारती या दोन हिंदी वृत्तसंस्था भारतात एकसष्टी च्या दशकात कार्यरत होत्या. आणीबाणी च्या काळात फेब्रुवारी १९७६ मध्ये तत्कालीन इंदिरा गांधी सरकारने या दोन हिंदी आणि युनायटेड न्युज ऑफ इंडिया आणि प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया या अन्य दोन इंग्रजी वृत्तसंस्था यांचे विलीनीकरण करण्यास भाग पाडले. ‘समाचार’ नावाची एकच वृत्तसंस्था शासनाने सुरु केली. नंतरच्या निवडणुकीत १९७७ मध्ये इंदिरा गांधींचे सरकार पडलं. जनता पक्षाच्या सरकारने ‘समाचार’ वृत्तसंस्थे ऐवजी मूळच्या चारही वृत्तसंस्था पुन्हा सुरु कराव्या असा निर्णय १९७८ मध्ये घेतला. आर्थिक मदत देण्याचेही जाहीर केले. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया आणि यु एन आय यांचे कामकाज स्वतंत्रपणे सुरू झाले.
या पाठोपाठ युनायटेड न्युज ऑफ इंडिया मध्ये भारतीय वृत्तसंस्थे च्या इतिहासातील एक महत्त्वाची घटना १ मे, १९८२ रोजी घडली. तो पर्यंत यु एन आय कडून वर्तमानपत्र ग्राहकांसाठी फक्त इंग्रजीतून बातम्या दिल्या जात असत. विविध पातळ्यांवर अनेकदा चर्चा मात्र झाली होती की भारत विशाल देश आहे, अनेक भाषांतून वर्तमानपत्र प्रसिद्ध होतात, त्या त्या भाषेतील वृत्तपत्रांसाठी वृत्तसंस्थेने त्या भाषेतच सेवा दिली पाहिजे, इंग्रजीतच दिले जाऊ नये.
हिंदी भाषेतील सेवेला अर्थसहाय्य
परंतु हे म्हणणे सोपे असते. यासाठी मोठा आर्थिक भार सोसावा लागतो. त्यासाठी त्या भाषेमध्ये निष्णात पत्रकार उपलब्ध असणे आवश्यक असते. या पत्रकारांना पत्रकारितेखेरीज प्रशासनातील ज्ञान आणि कौशल्य असणे आवश्यक असते. तसे ते कौशल्य सर्व ठिकाणच्या पत्रकारांना असत नाही. अशा कारणांमुळे विविध भाषांमधील वृत्तसेवा ही फक्त चर्चाच राहिली होती.
पण केंद्रीय शासनाने मुख्यतः आकाशवाणीच्या सेवेसाठी आपण हिंदी भाषेतील सेवेला अर्थसहाय्य करू असे जाहीर केले होते. त्यामुळे यु एन आय व्यवस्थापनाने हिंदी भाषा वृत्तसेवा सुरू करू असे जाहीर केले. या वृत्तसेवेचे चे नाव “युनीवार्ता” असे ठरले. हिंदी भाषेतून लिहिणारे पत्रकार संस्थेने नेमले.
मुख्य इंग्रजी बातम्याच्या भाषांतरावर सुरुवातीला
युनीवार्ता ची सेवा अवलंबून राहील. हळूहळू या वृत्त संस्थेने स्वतःचे बातमीदार महत्त्वाच्या शहरात नेमून आपले स्वतंत्र अस्तित्व सिद्ध करावे असे जाहीर झाले होते.
विशेषत: उत्तर भारतातील आणि मध्य भारतातील हिंदी बेल्ट मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या दैनिकांच्या भरोशावर नव्या संस्थेचे अर्थकारण अवलंबून होते. म्हणजे उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, पंजाब, हरियाणा, मध्यप्रदेश, आणि राजस्थान या राज्यांतील हिंदी वर्तमानपत्राकडून आवश्यक ती वर्गणी म्हणजे फी किंवा सबस्क्रीप्शन मिळाली पाहिजे म्हणजे युनिवार्ता स्वतःच्या पायावर उभी राहील आणि नंतर शासनाच्या मदतीची आवश्यकता राहणार नाही असे ते गणित होते.
हिंदी प्रदेशातील इंग्रजी यु एन आय च्या ब्युरो मॅनेजर यांच्या मदतीने हिंदी वर्तमानपत्र ग्राहक म्हणून मिळवावे. त्या त्या राज्यासाठी उपयुक्त अशा मूळ हिंदी बातम्या मुद्दाम प्रयत्न करून मिळवाव्या, त्या इंग्रजी सेवेसाठी भाषांतर करून द्याव्या अशी खूप आदर्श व्यवस्था तयार करावी प्रयत्न सुरू झाला.
परंतु आपल्या हिशोबाप्रमाणे ग्राहक भराभर मिळणार नाहीत हे व्यवस्थापनाच्या लवकरच लक्षात आले. हिंदी प्रदेशातील सर्व ब्युरो मॅनेजर्सना असे ग्राहक मिळावा असा आग्रह व्यवस्थापन धरू लागले. वर्तमानपत्रांच्या संपादकांना आणि मालकांना युनीवार्ता चे महत्व आणि उपयुक्तता हे पटवण्यासाठी सारखे प्रयत्न करा असा तगादा त्यांनी लावला.
वृत्तपत्रांचे चालक बधत नव्हते. त्याचे मुख्य कारण इंग्रजी आणि हिंदी अशा दोन वृत्तसंस्थांचे भाडे परवडणार नव्हते. तुमच्या बातम्या प्रसिद्ण्यसाठी आमच्या वृत्तपत्रात जागा नसते, आम्हाला ज्यादा पैसे खर्च करणे परवडणारे नाही असे निक्षून सर्व वर्तमानपत्रांच्या कार्यालयात सांगत असत.
मी तेव्हा १९८२ मध्ये ग्वाल्हेर ला ब्युरो युरो मॅनेजर म्हणून कार्यरत होतो. यु एन आय च्या दृष्टीने मध्यप्रदेश मध्ये हे महत्त्वाचे केंद्र होते. दीड तासाच्या अंतरावर रेल्वेने प्रवास केल्यास झांसी हे तेवढेच महत्त्वाचे पण उत्तर प्रदेश मधील केंद्र होते. विरुद्ध बाजूला आग्रा हे उत्तर प्रदेशचे दुसरे महत्त्वाचे केंद्र. त्या मुळे बातम्यांच्या कव्हरेजच्या दृष्टीने म्हणजे ग्वाल्हेरच्या बातमीदाराला अशा तीन ठिकाणच्या बातम्यांकडे लक्ष ठेवणे अपेक्षित होते.
माझ्या संपादकीय वरिष्ठांच्या दृष्टीने मी हे पाहणे अपेक्षित होते. पण ग्वाल्हेरला तेव्हा सहा-सात वर्तमानपत्र ग्राहक म्हणून मिळविणे शक्य आहे. त्याचा मी पाठपुरावा करावा अशी देखील व्यवस्थापनाची अपेक्षा होती.
या कामाचा एक महत्त्वाचा प्राथमिक टप्पा म्हणजे स्थानिक सर्व संपादकांना आणि मालकांना भेटून युनीवार्ता सेवेविषयी विषयी सांगायचे आणि आमची सेवा घ्या म्हणून पटवण्याचा प्रयत्न करायचा. यातील सर्वच मालकांनी “नाही” म्हणून मला दोन-तीन वेळा सांगितले होते.
त्यातील दोन ते तीन वर्तमानपत्रांचे मालक सुस्थितीतील होते पण आमची हिंदी सेवा घ्यायला अजिबात तयार नव्हते.
यशस्वी प्रयोग
अशा निराशेच्या काळात केलेला प्रयोग कसा यशस्वी झाला त्याची ही कहाणी आहे.
मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेशात मिळून तीन – चार ठिकाणी हिंदी वृत्तपत्रे असलेली एक संस्था होती. त्यांच्या मालक संपादकांकडे भेटायला मी गेलो. हात अतिशय आखडता असणारे, पत्रकारांना वेज बोर्डाप्रमाणे पगार न देणारे, अशी त्यांची ख्याती वृत्तपत्र क्षेत्रात होती. मी गेलो तेव्हा त्यांचे हिंदीतले एक प्रसिद्ध साहित्यिक आणि प्राध्यापक असलेले गृहस्थ राजकीय गप्पा मारत बसले होते.
आम्हा दोघांसाठी मालकांनी कोका कोला मागिवला. एकात दोन (वन बाय टू) असे ग्लास आले. यावेळी प्राध्यापकांनी इंदिरा गांधी यांच्या त्या वेळच्या कुठल्यातरी राजकीय निर्णयाबद्दल टीकात्मक टिप्पण्णी केली. मालक नाराज झाले. समोरचा कोका कोला चा ग्लास त्यांनी ओढून घेतला. “आप जाईये भाई साब. आपने हमे दुखी कर किया” असे रागाने म्हणत त्यांना जणू हाकलून दिलं. मी माझा ग्लास झटकन रिकामा केला ! थोडा वेळ अवांतर गप्पा केल्या.
मग युनिवार्ता चा विषय काढला. युनिवार्ता च्या हिंदी मध्ये आलेल्या बातम्या तुमच्या दैनिकाला कशा उपयुक्त आहे हे सांगताना मी त्यांना सांगितलं की “आता तुमच्या सारखे हिंदी वर प्रभुत्व असणारे पत्रकार मिळतात कुठे ! आमच्या युनिवार्ता मध्ये तुम्हाला तयार चांगल्या हिंदी त लिहिलेल्या बातम्या मिळतील.”
आश्चर्य म्हणजे माझी ही मात्रा लागू पडली. थोड्या वेळात त्यांनी आमचे दर आणि इतर माहिती माझ्याकडून घेतली. अकाउंटंट ला बोलावून पहिल्या महिन्याचा ऍडव्हान्स चा चेकही लिहायला सांगून मला थक्क करून टाकलं.
मग मात्र क्षणभर देखील ना थांबता सरळ माझ्या कार्यालयात गेलो. टेलिप्रिंटर वरून आमच्या सरव्यवस्थापकांना ही सुवार्ता कळवली. दिल्ली ऑफिस मध्ये जल्लोष झाला.
सुरुवात अशी झाली
काही महिन्यातच आमच्या हिंदी सेवेचे ग्राहकांची संख्या वाढत गेली. ग्वालियर, झांसी, ग्वालियर, आग्रा, या खेरीज भोपाल, आणि जबलपूर या शहरामध्ये आमची सर्व्हिस वृत्तपत्रांनी घ्यायला सुरुवात केली. याच कालखंडात प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया ने देखील “भाषा” या नावाची हिंदी वृत्तसंस्था सुरू केली. पी टी आय आणि यु एन आय मध्ये इंग्रजी बातम्या मध्ये स्पर्धा होतीच. आता हिंदी वृत्त सेवांमध्ये मध्ये देखील स्पर्धा असलेली सेवा उपलब्ध झाली.
यु एन आय आणि युनीवार्ता यांच्याशी संबंधित होतो तेव्हा झालेल्या प्रगतीची ही कहाणी. युनिवार्ता ची उर्दू आणि कन्नड वृत्तसेवा सुरु झाली आहे. अद्याप मराठी, गुजराती आणि अन्य भाषांमध्ये मात्र अद्याप सेवा सुरु होऊ शकली नाही. हिंदुस्तान समाचार ने बहुभाषी वृत्तसेवा सुरु केली आहे. आता देशात आशिया न्यूज इंटरनॅशनल (ANI) and इंडो-आशियाई न्युज सर्विस (IANS) या इतर वृत्त संस्था देखील कार्यरत आहेत.

– लेखन : प्रा डॉ किरण ठाकूर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800