अरे ! दूध, दूध ! अस ऐकल की कोणीतरी धावत जाऊन गॅस बंद करत. पण छे ! व्हायच ते होतच. तोपर्यंत फूस…. आवाज करत, वर येऊन दूध पार गेलेल असत. ही घराघरातली रोजचीच कथा ! नाही का ? दोनच मिनिटे आधी आपण दूध बघून गेलेलो असतो.
शांत, नितळ असा त्याचा थर असतो. आतली काही एक हालचाल जाणवत नाही. काही क्षणातच हे वर येणार हे ही नाही. अजून वेळ आहे .. अस म्हणत आपण दुसऱ्या कामाला वळतो आणि आपली पाठ वळली रे वळली की दूध फसकन् वर येत. अरेच्चा ! आत्ता तर मी बघून आले. वर यायला अवकाश होता. शी ! तेव्हाच बंद केल असत तर बर झाल असत. आता परत पुढच्या वेळी अस होऊ द्यायच नाही अस आपण मनाशी ठरवतो पण …. ये रे माझ्या मागल्या. क्वचित काळी नशीब बलवत्तर असेल तर वेळीच तापल्या दुधाचा वास येतो आणि ते वाचत सुद्धा. मग अगदी हुशः अस वाटत.
हा रोजच्या जीवनातला अगदी साधा क्रम पण याच घटनेचा मी थोडा वेगळ्या अंगाने विचार केला. आजकाल माणसे आपल्या आयुष्यात येणाऱ्या समस्या अशी मनातचच आतल्या आत खदखदत ठेवतात. इतकी की एक दिवस तो दूध उतू जाण्याचा कडेलोट पॅाईंट येतो आणि होत्याच नव्हत होऊन जात. कित्येकदा आपल्या जवळच्या व्यक्तीबाबतीत अस काहीतरी होत आणि मग आपल्यावर पश्च्चात्ताप करण्याची वेळ येते. घडून गेलेल्या घटनेबद्दल आपण काहीही करू शकत नाही. तो जसा दूध वर येण्या आधीचा बफर टाईम आहे ना तसा आपल्या आयुष्यातही आपल्याला नक्कीच मिळत असतो. पण त्यावेळेला त्याकडे विनाश थांबवण्याची योग्य वेळ अशा दृष्टीने पाहिल जात नाही. परिस्थिती पार हाताबाहेर गेल्यावरच आपल्याला जाग येते. हे खरच क्लेशदायक आहे.
आजकाल सहृदयता, विश्वासाने एखादी गोष्ट आपल्या माणसांजवळ उघड करावी अस कोणास वाटत नाही. माणसामाणसातील सपोर्ट सिस्टीमवरचा विश्वास जणू उडालाच आहे. एखादा असाध्य रोग कुणाला झाला तर ते पूर्णपणे लपवल जात. काहीवेळा वैयक्तिक कारण असु शकतात पण निदान ती व्यक्ती असेपर्यंत थोडासा भावनिक आधार तरी इतर माणस देऊ शकतात. एक जण असा वागला की दुसराही आपोआपच फटकून वागतो. मग ही तेढ वाढतच जाते.. त्याला अंतच नाही.
कधी कधी ही गोष्ट चार भिंतीच्या आत एकत्र राहणाऱ्या सख्ख्या कुटुंबियांत सुद्धा घडते. ते तर अत्यंत दुर्दैवी. माणसे फक्त आम्हाला काही प्रॅाब्लेम नाही असे भासवत फिरत असतात. बोलल्याने जो निचरा होतो तो न होता वरुन एक सुंदर मुखवटा आणि आतून खळबळ अगदी दूध वर येण्यापूर्वीची स्थिती. या द्वंद्वात स्वतःच स्वतःचे नुकसान करून घेतात.
पूर्वीची माणसे म्हणायची ते कधी कधी बरोबर वाटत. जे असेल ते घडाघडा बोलून मोकळे व्हा ! मनात ठेवू नका. पूर्वी खरोखरच एकमेकांना एकमेकांची चांगली वाईट दोन्ही बाजू माहित असायच्या. आजकाल सर्वत्र आपली इमेज राखताना माणसांची दमछाक होतेय. ते ही विनाकारण.
माणसाच आयुष्य म्हणजे एक कसरत आहे. चांगले वाईट दोन्ही घडत असते. मी अस म्हणत नाही की तुमच्या आयुष्यातले प्रॅाब्लेम सर्वत्र सांगत फिरा ! पण निदान प्रत्येकाने आपली जीवाभावाची चार माणसे तरी अशी जोडली पाहीजेत की तिथे तो मोकळेपणाने बोलु शकेल.
समाजातला मुखवटा बाजूला ठेवून खरा चेहरा मोकळेपणाने दाखवू शकेल. खटकणाऱ्या खुपणाऱ्या गोष्टी सांगू शकेल. रडावस वाटल तर मनमुराद रडू शकेल. अश्रू अनावर होऊन ते एखाद्याच्या संगतीत गाळण आणि खोट रडगाण गाण यात फार फरक आहे.
आपल्या जीवनात हा बफर टाईम कुठे आहे ? आपली अशी सपोर्ट सिस्टीम कोण आहे हे प्रत्येकाने जाणीवपूर्वक ओळखले पाहीजे. आनंद शेअर सगळेच करतात पण ज्याच्याजवळ दुःखही शेअर करू शकता तोच खरा जीवाभावाचा सुहृद. आणि हे फक्त आपल्यासाठीच नाही तर आपणही कोणालातरी असा भावनिक आधार देऊ शकतो असे कायम लक्षात असावयास हवे.
तेव्हा मित्रांनो आपल्या आजुबाजूच्या लोकांकडे जरा डोळसपणे बघा. काहीवेळेला न बोलताही बरच काही कळत. मानमरातबाच्या फुटकळ कल्पना बाजूला ठेवून जरा बघा .. एखाद्याच उतू जाण आपण वाचवू शकलो तर परमेश्वराकडे त्याची नोंद नक्कीच ठेवली जाईल.

– लेखन : शिल्पा कुलकर्णी
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800
अतिशय सुंदर लेख…मोकळे व्हा ..ही संकल्पना आयुष्याचा पोत सुधारु शकते..
धन्यवाद राधिकाताई !
धन्यवाद राधिकाताई! उशिराने पोचपावती देतेय, क्षमस्व.
शिल्पा कुलकर्णी, दूध उतू जाणे ह्या एका साध्या गोष्टीतून तुम्ही किती सुंदर आणि प्रभावी विचार तुमच्या लेखणीतून व्यक्त केले आहेत.चार लोक इतक्या जवळचे हवेत की ज्यांच्याशी तुम्ही मन मोकळ्या गप्पा करू शकाल , अगदी मनाच्या गाभ्यातल बोलून मुक्त होऊ शकला तर त्या सारखा आनंद दुसरा नाही. फार आवडल. अशाच लिहित्या रहा, खूप शुभेच्छा…
घन्यवाद सुनंदाताई ! 🙏🏻
वाह् शिल्पा, आणखी एक छान लेख. जवळचे असे कोणीतरी प्रत्येकालाच असावे व आपणही कोणाचेतरी “जवळचे” व्हावे. अगदी बरोबर.
धन्यवाद लिनाताई ! 🙏🏻