Saturday, July 5, 2025
Homeलेखयेसूदास @ 81

येसूदास @ 81

गानगंधर्व येसूदास‘ यांची महत्ता समजण्यासाठी खरं तर मी केरळ मधेच जन्म घ्यायला पाहिजे होता किंवा मल्याळम भाषा आणि संगीत यांचा अभ्यास तरी करायला हवा होता.

केरळ मधे या माणसाला अक्षरशः देव मानतात. त्याचा उल्लेख ‘Dasettan’ आणि ‘गानगंधर्व’ या दोन प्रेमाच्या व मानाच्या उपाधींनीच केला जातो.              (Dasettan चा अर्थ दासदादा)
अर्थात येसूदासचं कर्तृत्वच तसं आहे.

दोन महिन्यांपूर्वीचा एक दिवस.. 14 नोव्हेंबर 2021… केरळमधल्या लक्षावधी संगीतप्रेमींसाठी अतीव आनंदाचा होता..
कारण या दिवशी त्यांच्या लाडक्या ‘येसू’नं पार्श्वगायनाची तब्बल ‘साठ वर्षं’ पूर्ण केली.
ही एक अभूतपूर्व स्वरयात्रा होती.. आणि ती अजूनही चालूच आहे…

2017 साली येसूदासना ‘बेस्ट सिंगरचं
‘नॅशनल ॲवार्ड’ मिळालं… आठव्यांदा..
त्यांचा असिस्टंट विजय यानं ही आनंदाची बातमी येऊन सांगितली…
तेव्हा देखील येसूदास एका गाण्याची रिहर्सल करत होते..
वय होतं फक्त 78 !

पहिलं नॅशनल ॲवॅार्ड मिळालं 1972 साली.. आणि आठवं मिळालं 2017 साली..
म्हणजे तब्बल 45 वर्षं या गृहस्थाची स्वरांवरची अद्वितीय हुकूमत अबाधित आहे.

केरळ राज्यातर्फे दिलं जाणारं सर्वोत्तम गायकाचं पारितोषिक येसूदासना (फक्त) 25 वेळा मिळालं आहे.
शेवटी ‘माझ्या नावाचा यापुढे विचार करु नका’ अशी सूचना येसूजींनी केली.

तामिळ मधे 5 वेळा, तेलगू मधे 4 वेळा, बंगाली मध्ये एकदा त्यांना असाच सन्मान मिळाला आहे.

1976 साली ‘गोरी तेरा गांव बडा प्यारा’ साठीसुद्धा त्यांना ‘नॅशनल ॲवॉर्ड’ मिळालं होतं.

संपूर्ण दक्षिण भारत त्यांनी आपल्या आवाजानं व्यापून आणि भारुन टाकला आहे. मल्याळम मधल्या एका नामांकित संगीतकारानं सांगितलेली आठवण खूपच बोलकी आहे.
हा संगीतकार तरुण असताना मद्रासच्या सिनेसृष्टीत व्हायोलनिस्ट होता.
त्यानं लिहिलंय..
”1970-80 च्या दशकांतले ते दिवस आठवतात..
मद्रासच्या स्टुडिओत महाभयानक उकाडा असायचा..
दमट आणि उष्ण हवा.. घामाची आंघोळ..
गायकांचे एकापाठोपाठ एक ‘टेक’ चालू असायचे.
आम्हां वादकांची अक्षरशः घुसमट व्हायची..
पण जेव्हा कानावर यायचं की, ‘पुढचं गाणं येसूदास म्हणणार आहे’..
तेव्हा त्या उकाड्यात एक शीतल, मंद झुळूक आल्यागत वाटायचं..
कारण येसूदास घरातूनच रिहर्सल करुन येत आणि पहिलाच टेक ‘ओके’ करत !
शिस्तप्रियता आणि स्वरांवरील हुकूमत यामुळे येसूदास सर्वांना हवेहवेसे वाटत.

दाक्षिणात्य भाषांतील गाण्यांच्या तुलनेत हिंदीमधे येसूदासनी खूपच अल्प संख्येनं गाणी म्हटली आहेत. पण जी म्हटली आहेत ती ‘बंद्या रुपयासारखी’ खणखणीत आहेत.
त्यांनी म्हटलेली किमान 80% गाणी तरी गाजलेली असावीत.
ज्या कालखंडामधे त्यांनी ही गाणी गायली त्यात वाद्यांचा ढणढणाट आणि गोंगाट यांचं वर्चस्व होतं. पण येसूदासची गाणी या सर्वात उठून दिसतात.
रवींद्र जैन यांची गाणी तर येसूदासनी अजरामर करुन ठेवली आहेत.
‘संगीतकाराला जे सांगायचं असतं ते 100% प्रत्यक्षात उतरवणारे गायक विरळाच असतात..
येसूदास बहुतांश वेळा संगीतकाराला अभिप्रेत असलेल्या परिणामाच्या अगदी नजीक जायचे.. आणि काही वेळा तर संगीतकाराच्या अपेक्षांना पारही करुन जायचे’ हे रवींद्र जैन यांचं वाक्य अगदी मनापासून आलेलं आहे.
“देवाने मला जर कधी डोळे दिलेच तर सर्वात प्रथम मला येसूदासचा चेहरा पहायचाय” असे भावोत्कट उदगार रवींद्र जैन यांनी काढले ते उगाचच नव्हे.

लहानपणी शाळेत जाताना रस्त्यावरील हॉटेलातून ‘लतास्वर’ कानी यायचा तेव्हा हा मुलगा बराच वेळ गाणी ऐकत तिथंच उभा रहायचा.
लताचा आवाज सुरुवातीला काही निर्मात्यांनी नाकारला होता..
तसाच येसूदासचा आवाजही आकाशवाणीनं ‘रिजेक्ट’ केला होता.

येसूदासनी संगीत क्षेत्रातली ‘डिजीटल क्रांती’ पाहिली.. अनुभवली.. आणि पूर्णपणे आत्मसातही केली. ‘मल्टीट्रॕक रेकॉर्डिंग’ असो वा अद्ययावत ‘गॕजेट्स’ असोत, सारं काही ते लीलया हाताळतात. त्यामुळेच आधुनिक काळातही ते कालबाह्य झाले नाहीत.

येसूदासचा आवाज काहीसा ढाला, जबरदस्त खोली असलेला, शास्त्रीय संगीतात निष्णात.. उत्तम ‘तयारी’ असलेला, त्यामुळे त्याचं गाणं ऐकायला लागलं की आपण काहीतरी ‘अभिजात आणि भारदस्त’ ऐकतोय हे त्वरीत जाणवतं.
बप्पी लहरीसारखा ‘व्रात्य’ संगीतकारही येसूदासला गाणी देताना वेगळ्याच वाटेनं जातो.. ‘माना हो तुम बेहद हंसी’ असो ‘जिद ना करो अब तो रुको’ असो वा ‘धीरे धीरे सुबह हुई’ असो.. येसूदासच्या आवाजात बप्पी लहरी वेगळाच वाटू लागतो.
‘सुरमयी अखियोंमें’,
‘का करुँ सजनी’,
‘कहाँसे आए बदरा’,
‘जब दीप जले आना’, ‘जानेमन जानेमन’,
‘तू जो मेरे सुरमें’,
‘दिलके टुकडे टुकडे करके’, ‘ऐ मेरे उदास मन’,
चाँद जैसे मुखडेंपे’,
‘आजसे पहले आजसे ज्यादा’
अशी येसूदासकृत अनेक गाणी आवडीनं आणि चवीनं न ऐकणारा रसिक कुठेही आढळणार नाही.

दक्षिणेस त्यांनी आपल्या गीतांचे असंख्य बहारदार मळे फुलवले असले तरी त्यांच्या हिंदी गीतांचं ‘मधुबन’ ही तितकंच सुरम्य आणि सुगंधी आहे. संगीताचे चोखंदळ रसिक कायमच या मधुबनातली खुशबु लुटत राहतील.

गानगंधर्व 81 व्या वर्षात पदार्पण करत असताना, ‘आजही गाता असलेला त्यांचा गळा’ आणखी बरीच वर्षं असाच सक्षम राहो, ही सदिच्छा व्यक्त करु या.

– लेखन : धनंजय कुरणे.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800

RELATED ARTICLES

3 COMMENTS

  1. येसुदास, हा विषय माझ्या कृषि प्रांतातला नाही। पण इतका छान वठलाय; वाचायला सुरुवात केली आणि थांबू शकलो नाही। आयुष्यात कितीतरी राहून गेल्याचे जाणवले।

  2. येशूदास यांच्याबद्दल अधिकची माहिती मिळाली, लेख चांगला आहे, धन्यवाद – हिरालाल पगडाल

  3. येसूदास यांची जन्म तारीख 10 जानेवारी 1940 आहे. तसं पाहिलं तर ते 82 वर्षाचे झाले. मग 81 कसे काय लिहिले आहे? कदाचित हा लेख गेल्या वर्षी चा जसाच्या तसा पुन्हा एकदा प्रसिद्ध केला आहे का?
    शंका आली म्हणून लिहिले आहे.
    … साहेबराव माने. पुणे.
    9028261973.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments