सुजन हो……..
आज दि.१२ जानेवारी, विश्वबंधु स्वामी विवेकानंद यांची तारखेने जयंती……
ठाकूर श्री रामकृष्ण परमहंसांचा मंगलमय आशीर्वाद व जन्म जन्मांतरीच्या साधनेची पूर्ण दिव्य कृपा ज्या महापुरुषा वर सर्वार्थाने झाली, ज्याने आपल्या परम पुरुषार्थाने, अलौकिक प्रतिभेने, परम कारुणिक जीवन व्यवहाराने, अद्वैताच्या अलौकिक सिद्धांत मांडणीने, सनातन धर्माचा पुन्हा प्रचार केला व विश्व शारदेच्या प्रांगणात तेजस्वी सूर्यासारखे तळपून आपल्या अविश्रांत मेहनतीने भारतीय समाजजीवन व वैचारिक विश्वात आपली अमीट व कालातीत छाप उमटवली, अशा एका महापुरुषाचा जन्म आजच्याच दिवशी आपल्या देवभूमी भारतात झाला. त्या महापुरुषाचे पवित्र नाम श्रीमत् स्वामी विवेकानंद होय…..!
स्वामीजींचे अवतरण व स्वामीजींची महासमाधी या दोन्ही घटनांनी भारतीय लोकजीवन, समाजजीवन, राष्ट्र जीवन व सांस्कृतिक चिंतनाला एक नवीन दिशा व आयाम दिला. अशा विश्वविजयी दिव्य महापुरुषाच्या जन्मदिनी त्यांच्या चरित्रातील काही तेजस्वी तेजोशलाकां चे दर्शन घेण्याचा हा अल्पसा प्रयत्न……
कलकत्ता येथील श्री विश्वनाथ बाबू दत्त व सौ. भुवनेश्वरी देवी या शुचिष्मंत, संस्कार संपन्न व बुद्धीसागर दांपत्याच्या पोटी या महामानवाने पौष वद्य ७, (सप्तमी ), दिनांक १२ जाने १८६३ रोजी अवतार घेतला. यांच्या जन्मापूर्वीच त्यांच्या आईला त्यांच्या या
“अ-मानुष” अवतारीत्वा बद्दल संकेत मिळाला होता. काशी च्या भगवान वीरेश्वराच्या उपासनेतून माता भुवनेश्वरींनी भगवान शंकरांना –भगवान शंकरांनीच आपल्या उदरी जन्माला यावे — असे वरदान मागून घेतले होते. या दिव्य बालकाचे जन्म नाव “वीरेश्वर” असे ठेवण्यात आले. प्रेमाने भुवनेश्वरी माता यास “विले” “म्हणून हाक मारीत असे. परंतु नरेंद्र या नावानेच तो अधिक प्रसिद्ध होता.
ऋतंभरा प्रज्ञा लाभलेला हा बालक बालपणा पासूनच तेजस्वी, निडर, निर्णयक्षम, धाडसी पण अतिशय अतिशय निर्मळ अंतःकरणाचा व भाव सुकोमल होता. बालपणातच त्याच्या अलौकिकत्त्वाची साक्ष देणाऱ्या अनेक घटना त्यांच्या चरित्रात आपणास बघावयास मिळतात. आईकडून सश्रद्ध अंत:करण व वडिलांकडून चिकित्सक धारदार बुद्धिमत्तेचे लेणं नोरेनला मिळालं होतं. सर्व प्रकारच्या सुख संपन्नतेने समृद्ध असलेल्या घरात नरेंद्र चे शैषव व तारुण्य बहरू लागले. रामायण महाभारत व संस्कृतातील अनेक श्रेष्ठ काव्यांचे मोठे मोठे सर्ग त्याला अगदी सहजगत्या कंठस्थ होत असत. त्याची स्मरणशक्ती केवळ अद्भुत व विस्मय वाटावा अशी अलौकिक होती. बरेचदा परीक्षेच्या आदल्या रात्री तो रात्रभर वाचन करी व दुसऱ्या दिवशी ती परीक्षा देऊन त्यात विशेष प्राविण्य प्राप्त करीत असे.
“हिस्ट्री ऑफ इंग्लिश पीपल” हा ग्रीन ने लिहिलेला ग्रंथ त्याने केवळ तीन दिवसात वाचून आत्मसात केल्याचे आपणास चरित्रात बघावयास मिळते. क्रिकेट, फुटबॉल, बॉक्सिंग, गाणे, घोडदौड, व्यायाम, वाद-विवाद अशा अनेक विषयात असाधारण प्रतिभा असलेला हा तेजस्वी तरुण आपल्या कर्तृत्वाची व व्यक्तित्वाची छाप उमटवत कलकत्त्यात शिकत होता. तशा अर्थाने नरेंद्रनाथ कधीच शांत, सभ्य व नाकाच्या सरळ रेषेत चालणारा नव्हता.
प्रखर बुद्धिमत्तेच्या जोरावर ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल अनेक मूलभूत प्रश्न निर्माण करून त्याने तत्कालिन बंगालातील अनेक मूर्धन्य विद्वानांना जेरीस आणले होते.
तथापि ज्यांच्या केवळ स्पर्शाने नरेंद्रचे जीवन अंतर्बाह्य बदलून गेले, त्या परमहंस ठाकूर रामकृष्णांची व नरेंद्रची भेट ही निव्वळ योगायोगानेच झाली असे म्हणावे लागेल किंवा नियतीचा तसा संकेत होता म्हणून तशी ती भेट झाली असे मान्य करावे लागेल. दक्षिणेश्वरी असलेल्या अतिशय सरळ, निगर्वी, ऋजु व भगवतीच्या उपासनेमध्ये अंतर्बाह्य रंगून गेलेल्या या महापुरुषाचे नाव होते श्री गदाधर मुखोपाध्याय जे पुढे संपूर्ण विश्वात स्वामी रामकृष्ण परमहंस म्हणून परिचित झाले. झाले असे, की कलकत्त्यातील सिमुलिया भागात राहणारे श्रीयुत नरेंद्रनाथ मित्र नावाच्या गृहस्थांनी — राणी रासमणी नि दक्षिणेश्वरी बांधलेल्या भगवतीच्या मंदिरातील एक अलौकिक देवी भक्त व नावालाच पुजारी असलेल्या — श्री रामकृष्ण परमहंस यांना आपल्या घरी निमंत्रित केले होते.
रामकृष्ण परमहंस यांना गाणे ऐकविण्यासाठी त्यांनी एका चांगल्या गायकाची योजनाही केली होती. तथापि ऐनवेळी तो गायक न आल्यामुळे — शेजारीच राहणाऱ्या विश्वनाथ बाबुंचा मुलगा नोरेन तानपुरा लावून गाणं गातो हे माहित असल्यामुळे त्यांनी विनंती करून नरेंद्रला बोलावून घेतले. हा प्रसंग साधारण नोव्हेंबर 1881 मधला बर का…
नरेंद्र आला. त्याने अंतःकरणपूर्वक व मनापासून रामकृष्ण परमहंस यांच्या समोर छान गाणे गाईले. त्याच्या निर्मळ व (नाभी कमलातून येणाऱ्या ) आर्त स्वरांनी श्री रामकृष्ण परमहंस भावावस्थेत गेले. ते खूप संतुष्टहि झाले. त्यांनी अतिशय प्रेमाने आणि तपशीलवारपणे नरेंद्राची विचारपूस केली आणि त्याला एकदा दक्षिणेश्वरी येण्याबद्दल आग्रह केला. पण बरेच दिवस नोरेन तिकडे फिरकला सुध्दा नाही. एकदा अचानक तो दक्षिणेश्वरी गेला असताना रामकृष्ण परमहंसांनी त्याचे खूप अकृत्रिमपणे व प्रेमपूर्वक स्वागत केले. त्याला कुरुवाळले व वारंवार येथे येत जा असे त्याला आग्रहपूर्वक सांगितले. बी.ए.च्या शेवटच्या वर्षात असताना वडिलांच्या अचानक मृत्यू आघाताने हा संवेदनशील तरुण नोरेन अंतर्बाह्य करचळला. सुदैवाने दक्षिणेश्वरी असलेल्या या अलौकिक अवलियाच्या सानिध्यात तो यापूर्वीच आला होता.
याच रामक्रुष्ण परमहंसांना नरेंद्राने प्रश्न विचारला, आपण देव बघितला आहे काय ? आणि तो मला दाखवू शकाल काय ?
…….आणि आणि काय आश्चर्य, अगदी प्रथमच
या वरकरणी अशिक्षित वाटणाऱ्या अलौकिक महापुरुषाने नरेंद्रला अपेक्षित असलेले उत्तर दिले. म्हणाले होय मी देव बघितला आहे, जेवढ्या स्पष्टपणाने मी तुला पाहतो आहे त्याहीपेक्षा स्पष्टपणाने मी देवाला बघत असतो. या एकाच वाक्याने नरेंद्र चे भावजीवन अंतर्बाह्य बदलून गेले. पुढे तो ठाकूरांच्या सहवासात सातत्याने येऊ लागला व आपल्या आंतरिक तळमळीतून अगम्य, अचिंत्य, अगोचर अशा भगवंताच्या प्राप्तीचा मार्ग त्याला ठाकुरांच्या कृपेने गवसला.
“शिवभावे जीव सेवा” हा ठाकुरांनी दिलेला महामंत्र नरेंद्र अक्षरशः जगला व त्याने ठाकूराच्या कृपेने विश्वबंधुत्वाचे एक नवे पर्व साकार केले.
एकदा नेहमी प्रमाणेच एका रात्री ठाकूर दक्षिणेश्वर च्या आपल्या झोपडीत ध्यानमग्न बसले होते व नरेंद्र नगारखान्या जवळच्या एका खोलीमध्ये अतिशय अस्वस्थ पणाने ईश्वर प्राप्ति साठी व्याकुळ झाला होता. ही व्याकूळता शिगेला पोचल्याने तो साधारणत: मध्यरात्रीच्या सुमारास ठाकुरांच्या झोपडी समोर येऊन उभा राहिला आणि हळूच त्याने बाहेरून ठाकूरांना आवाज दिला. ठाकूरांनी आतुन प्रश्न केला, कोण आहे ? आणि बाहेरून या शिष्योत्तमाने उत्तर दिले ” महाराज “मी” कोण आहे हे समजून घेण्यासाठीच आपल्या दाराशी याचक म्हणून आलो आहे.
“नरेंद्राच्या जीवनात त्या मध्यरात्री गुरु कृपेची नवी पहाट झाली. रामकृष्णांनी आपले सर्व अध्यात्मिक संचित नोरेनला देऊन एक नवा इतिहासच लिहायला सुरुवात केली. अवघ्या साडे पाच वर्षांच्या या गुरू-शिष्य संबंधातून विश्वाला भगवान श्रीकृष्ण व अर्जुन यांच्यानंतर नरनारायणांचे नवदर्शन या उभयतांच्या गुरुशिष्य योगातून झाले. श्रीरामकृष्ण परमहंसांच्या महा समाधीनंतर (आँगस्ट १८८६) त्यांच्या सर्व शिष्य परिवाराला नरेंद्रानेच सांभाळले.
आपल्या परिव्राजक अवस्थेतील चार वर्षाच्या भारत भ्रमणात विवेकानंदांनी अवघा भारतवर्ष पायाखालून घातला. दक्षिणेत कन्याकुमारीस आल्यानंतर समोर फेसाळणाऱ्या अफाट लाटांच्या सागराला बघून त्यांच्या मनातही एक प्रचंड अमृत मंथन सुरू झाले. निर्धास्त पणाने त्यांनी या सागरामध्ये स्वतःचे शरीर झोकून दिले. समोर असलेल्या एका निर्जन शिलेवर ते जाऊन बसले. तीन दिवसांच्या प्रदीर्घ ध्यानावस्थेत त्यांना आपल्या गुरूंकडून दिव्य संदेश प्राप्त झाला. या घटनेतून उद्याच्या भारताच्या “नवभारताचे मंत्र गुरु” म्हणून या “श्रीपाद शिलेवरुन” परिव्राजकाचार्य स्वामी विवेकानंद आता विश्व विजयासाठी सिद्ध झाले……!
परिव्राजक अवस्थेमध्ये “विविदिशानंद” या नावाने भारत भ्रमण करणाऱ्या या योद्धा संन्याश्यास “विवेकानंद” हे नामाभिधानहि त्यांच्या शिष्याकडून (खेतडीचे राजे अजितसिंह) प्राप्त झाले. याच खेतडीच्या राजे अजित सिंह यांनी स्वामीजींची शिकागो येथे जाण्यासाठी एका जहाजात “प्रथम श्रेणी” ची केबिन रिझर्व करून त्यांच्या प्रवासाची व्यवस्था केली. अशाप्रकारे दिनांक 31 मे 1893 या दिवशी स्वामीजी आपल्या सद्गुरूंच्या– ठाकूर राम कृष्ण परमहंस यांच्या — अचिंत्य, गूढ व मंगल इच्छे ने संचलित होऊन त्यांच्या हाती चे खेळणे होऊन शिकागोच्या दिशेने प्रस्थान करते झाले.
13 सप्टेंबर 1893 या दिवशी शिकागो येथे भरलेल्या जागतिक सर्वधर्म परिषदे साठी पोचले खरे पण तेथे दाखविण्या साठी आवश्यक असलेले ओळखपत्र किंवा परिचय पत्र मात्र त्यांच्या कडे नव्हते. आपल्या असामान्य प्रतिभेने व करुणा पूर्ण धीर गंभीर वाणीने संपूर्ण अमेरिकेला जिंकून वेड लावणारा हा नरशार्दुल चारच दिवसांपूर्वी शिकागो येथील रेल्वेच्या गोदामा समोर पडलेल्या एका “पॅकिंग केस” मध्ये म्हणजे “माल पाठविण्याच्या पेटार्यामध्ये” उपाशीपोटी स्वतःला कोंबून, बाहेर पडणाऱ्या बर्फापासून व थंडीपासून स्वतःचे संरक्षण करीत होता, हे सांगूनही खरे वाटणार नाही. इतक्या लोकविलक्षण व जगावेगळ्या महात्यास परिचय पत्र मागणी म्हणजे “सूर्यालाच तुला प्रकाशण्याचा काय अधिकार आहे ? असे विचारण्यासारखे होय” असे हावर्ड विश्वविद्यालयातील ग्रीक भाषेचे सुविख्यात विद्वान श्रीयुत जे. एच. राईट यांनी स्वामीजीं बद्दल म्हटले ते किती यथार्थ होते हे स्वामीजींनी केलेल्या दिग्विजयावरून आपणास ध्यानी येईल.
ठाकूरांच्या या शिष्योत्तमाने आपल्या श्रीगुरूंच्या कृपेने जो अध्यात्माचा मंगल नंदादीप त्या सर्व धर्म परीषदेत प्रज्वलित केला त्याच्या आभेने संपूर्ण पाश्चिमात्य जग उजळून निघाले, प्रभावित झाले.सलग साडेतीन वर्ष स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेमध्ये सनातन धर्माचे मूलभूत सिद्धांत व विशेषत्वाने वेदान्त समजावून सांगितला. तुम्ही आहात तिथून, तुम्ही करित आहात त्याच उपासनेतून, तुम्हाला जमेल त्या भाषेत तुम्ही भगवंताला साद घाला, भगवंत तुमच्या उद्धारासाठी निश्चित पणे प्रकट होईल असा विश्वास त्यांनी संपूर्ण अध्यात्मिक भाव जगताला दिला.
I want to preach A MAN MAKING religion असे ते अभिमानाने व दुर्दम्य आत्मविश्वासाने उद्घोषित करत.
स्वामीजी भारतात परत येत असताना त्यांचे समवेत त्यांचे गुरुबंधू व त्यांचे शिष्य श्री नीरजानंद हे देखील होते. स्वामीजींच्या आगमनाची शुभवार्ता आधीच कळली असल्यामुळे रामनद संस्थानचे संस्थानाधिपती
“राजा भास्कर वर्मा सेतुपति” हे आपल्या लव्या जम्यानिशी पांबन येथे उपस्थित होते. स्वामीजींनी शिकागो येथे जाऊन सनातन धर्माच्या संदर्भात आपले विचार मांडावे ही कल्पनादेखील रामनद चे महाराज श्री भास्कर वर्मा सेतुपति यांचीच होती. त्यांनी स्वामीजींचे अतिशय श्रद्धापूर्वक स्वागत करुन त्यांस साष्टांग प्रणाम केला. एवढेच नव्हे तर स्वामीजींच्या निवासस्थानी त्यास घेऊन जाण्यासाठी सजवलेल्या रथाचे घोडे जनतेने सोडले व स्वतःच तो रथ ओढून स्वामीजींच्या प्रती असलेला आपला आदरभाव व्यक्त केला.
रामनद संस्थांनचे महाराजांनी सुद्धा स्वतःहून आचार्य देवांचे वाहन ओढून त्यांच्याप्रती असलेली आपली सक्रीय श्रद्धा प्रकट केली. तथापि याकडे बिल्कुलही आकर्षित न होता हा विश्वविजयी महात्मा पंबनच्या सागर किनार्यावर एखाद्या अबोध व निरागस बालका सारखा गडबडा लोळला व त्याने आपल्या मातृभूमीला अभिवादन केले. या संदर्भात त्यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले “मी अमेरिकेत जाण्यापूर्वी माझा हा भारत देश अतिशय पवित्र आहे असा माझा अभ्यास होता. पण आज जगाचा प्रवास व सर्व प्रकारच्या धर्मांच्या चिंतनाचा अभ्यास केल्यानंतर व जगातील अनेक देश बघीतल्यावर माझी “भारत माता ही देवभूमी” असून ती जगद्वंदनीय आहे अशी माझी अनुभूती पूर्ण श्रद्धा झाली आहे” असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
स्वामीजींचे हे राष्ट्रप्रेम व अंतर्बाह्य निरागस भाव बघून रामनगर चे संस्थान अधिपती अंतर्बाह्य भारावले. आपल्या गुरुवर्यांच्या स्वागता प्रित्यर्थ त्या दिवशीच्या पूजनीय स्वामी विवेकानंदांच्या शुभ आगमना प्रित्यर्थ रामनदच्या महाराजांनी हजारो दरिद्री नारायणांना आकंठ भोजन प्रसादाची व्यवस्था केली. त्याचबरोबर सर्वांना कपडे आणि दक्षिणाही देण्यात आली.
भारताच्या भूमीवर ज्या ठिकाणी स्वामीजींनी सर्वप्रथम पदन्यास केला होता त्या पवित्र ठिकाणी स्वामीजींच्या सर्वस्व समर्पित शिष्य असलेल्या रामानद संस्थानिकांनी चाळीस फूट उंचीचा एक स्मृतीस्तंभ उभारून ठेवला आहे. आणि त्यावर………..
“सत्यमेव जयते…..! पूज्यपाद श्रीमत् स्वामी विवेकानंदांनी पाश्चिमात्य जगतात वेदांत धर्माची विजय पताका फडकवत अद्वितीय दिग्विजय करून आल्यानंतर आपल्या इंग्रज शिष्यांसह भारताच्या पुण्यभूमीवर प्रथम पदन्यास केला ते पुण्य स्थान चिन्हित करण्याच्या उद्देशाने हा स्मृतीस्तंभ राजा भास्कर सेतुपति यांनी 1897 या वर्षी जानेवारीतील 27 तारखेस उभारला आहे ”
…….असा मजकूर तेथे कोरण्यात आलेला आहे.
पुढे 6 फेब्रुवारी या दिवशी मद्रासच्या स्टेशनवरही हजारोंचा जन समुदाय त्यांचा जयजयकार व उस्फुर्त स्वागत करीत होता. दुसरे दिवशी मद्रास च्या सुप्रसिद्ध
“व्हिक्टोरिया हॉल” मध्ये सुमारे 5000 श्रोत्यांसमोर स्वामीजींनी आपले सुप्रसिद्ध व्याख्यान “माझ्या मोहिमेची योजना” हे दिले. त्यांचा जवळपास नऊ दिवस मद्रासमध्ये मुक्काम होता. या नऊ दिवसाच्या मुक्कामात त्यांनी “भारतीय जीवनाच्या उभारणीत वेदांताचे स्थान ” ” 👍👍 महापुरुष”, “आपल्या पुढील कार्य” व “भारताचा भावी काळ” ही जगात गाजलेली चार व्याख्याने तेथे दिली. पुढे श्री.रामक्रुष्ण मिशन ची स्थापना करून जगाला प्रॅक्टिकल वेदांत व भारतीयांना सेवाधर्म शिकवण्याचे महत्कार्य या महात्म्याने केले.
“माझ्या मरणाची काळजी करू नका मी मेल्यानंतर माझ्या अस्थि सुद्धा चमत्कार करतील” असे आत्मविश्वासपूर्ण उद्गार त्यांनी काढले. “या जन्मात मी नेमके काय कार्य केले आहे समजण्या साठी एक नवा विवेकानंद जन्माला यावा लागेल” असेही ते एकदा म्हटले होते.
संपूर्ण जगाला शांती आणि सहजीवनाचा संदेश देणारा हा “योद्धा संन्यासी” आपल्या वक्तृत्वाने, कर्तुत्वाने, व संपन्न चरित्राने संपूर्ण विश्वाचा “विश्वबंधू” म्हणून सुविख्यात झाला. गुरुदेव ठाकुर रामकृष्ण परमहंसांनी सोपविलेली जबाबदारी पूर्ण करून कृतकृत्य तेने जेष्ठ वद्य १४, दिनांक ४ जुलै १९०२ यादिवशी भारत मातेच्या या थोर सुपुत्राने भारत मातेच्या चरणी आपला देह समर्पित केला.
या महामानवाने संपूर्ण मानव समुहास दिव्यत्वाच्या परिसस्पर्शाने देवत्वाच्या जाणीवे पर्यंत नेऊन सोडण्याचे अलौकिक कार्य करून मानवी जीवनातला शेवटचा श्वास रात्री नऊ वाजेच्या सुमारास घेतला. पूज्य प्रभुपाद आद्य शंकराचार्यांच्या नंतर एवढ्या कमी मानवी आयुष्यात इतके अलौकिक धर्मकार्य करणारा हा नरशार्दुल आपल्या भारत वर्षांमध्ये व सनातन वैदिक हिंदू धर्मामध्ये जन्माला आला हे आपले परमभाग्यच होय.
अवघ्या ३९ वर्षाच्या अल्पायु मध्ये या महामानवाने सनातन धर्म, मानवता, विश्वबंधुता व सेवाधर्म, या क्षेत्रात जे अलौकिक व अतुलनीय कार्य केले त्याला जगाच्या इतिहासात कुठेही तोड नाही.
पूजनीय स्वामीजींचे चरणी अनंत
श्रद्धानत दंडवत…….

– लेखन : ह.भ.प.योगेश्वर उपासनी महाराज
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800