कवी केशवकुमार, अर्थात आचार्य अत्रे मराठी साहित्य सृष्टीचे नावाजलेले लेखक, कवी, नाटककार, संपादक, चित्रपट निर्माते, शिक्षणतज्ज्ञ, राजकारणी व वक्ते होते. ते महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी उभ्या राहिलेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील प्रमुख नेते होते.
अशी बायको हवी, उद्याचा संसार, एकच प्याला-विडंबन, कवडीचुंबक, गुरुदक्षिणा, घराबाहेर, जग काय म्हणेल ?, डॉक्टर लागू, तो मी नव्हेच, पराचा कावळा, पाणिग्रहण, प्रल्हाद, प्रीतिसंगम, बुवा तेथे बाया, ब्रम्हचारी, भ्रमाचा भोपळा, मी उभा आहे, मी मंत्री झालो, मोरूची मावशी, लग्नाची बेडी, वंदे भारतम, वीरवचन, शिवसमर्थ, सम्राट सिंह, साष्टांग नमस्कार ही सर्व नाटके, गीतगंगा, झेंडूची फुले हे काव्यसंग्रह, अशा गोष्टी अशा गंमती, कशी आहे गम्मत, कावळ्यांची शाळा, फुले आणि मुले, बत्ताशी आणि इतर कथा हे कथा संग्रह, ‘ कऱ्हेचे पाणी ‘ हे आत्मचरित्र, चांगुणा, मोहित्यांचा शाप, ह्या कादंबऱ्या आणि याशिवाय
आषाढस्य प्रथम दिवसे, इतका लहान एवढा महान, केल्याने देशाटन, क्रांतिकारकांचे कुलपुरुष, चित्रकथा भाग-१, चित्रकथा भाग- २, दलितांचे बाबा, दूर्वा आणि फुले मराठी माणसे, मराठी मने, महापूर, महाराष्ट्र कालचा आणि आजचा असे इतर प्रचंड लेखन आहे.
१३ ऑगस्ट १८९८ रोजी जन्मलेल्या आचार्य अत्रे यांना लोक प्रामुख्याने लेखक म्हणून जरी ओळखत असले तरी त्यांनी ‘केशवकुमार’ नावाने काव्य निर्मिती केली. त्यांच्या ‘झेंडूची फुले’ ह्या काव्य संग्रहाने विडंबन काव्याचे द्वार खुले केले.
परमेश्वराने ज्यांना ज्यांना एखादा गुण, एखादी कला घेऊन पाठवले आहे त्यांच्यासाठी आयुष्य सुंदर परंतु जरा सुलभ होत असेल. त्याच कलेच्या साधनेत आणि आविष्कारात जीवन घालवायचं हे अगदी पाण्याइतकं आरपार, शुद्ध आणि स्वच्छ दिसत असेल त्यांना. परंतु काही व्यक्तिमत्वे इतके गुण घेऊन आलेली असतात की, अश्या व्यक्तींसाठी आयुष्य म्हणजे तारेवरची कसरत असेल. प्रत्येक क्षणाला निर्मितीच्या ओढीने रक्त उसळत असेल. व्यक्त होण्याचे सगळे मार्ग खुणावत असतील आणि दिवस रात्रीच्या काळाच्या गणिताला न जुमानणारी निर्मिती होत असेल.
आज ज्यांच्याबद्दल लिहीते आहे त्यांचे व्यक्तिमत्त्व असेच आहे. त्यांचे नाव कोणत्याही एकाच पदवीपुढे लिहिता येणार नाही. कोणत्याही पदवीत न मावणारे ज्ञान आणि साहित्यिक क्षमता असणारे हे नाव आहे. व्यक्ती पुढे पदवी लागली की त्या व्यक्तीचा मान वाढतो. इथे ह्या नावाने पदव्यांचा मान वाढावा अशी परिस्थिती आहे. अनेक गुणांच्या राशी घेवून जन्माला आलेले, लेखक, नाटककार, कथाकार, संपादक, पत्रकार, शिक्षक, नेते, वक्ते, राजकारणी, ह्या न संपणाऱ्या यादीचे मानकरी असणारे आणि केशवकुमार नावाने काव्य रचना करणारे कवी म्हणजे आचार्य प्रल्हाद केशव अत्रे !
कविता उमलण्यासाठी भावनाशील, संवेदनशील मन असावं लागतं हे मी आजपर्यंत अनेक कवींच्या कवितांमधून आणि अल्पांशाने का होईना परंतु स्वानुभवावरून मान्य केलं. कविवर्य अत्रे यांच्या संवेदनशीलतेच्या काव्याविष्काराने मात्र जरा वेगळी वाट निवडली. ही कविता नेहमीची कवींची हळवेपणाची वाट चुकवून विनोदाच्या आणि विडंबनाच्या मळ्यात शिरली आणि त्या मळ्यात ‘झेंडूची फुलें’ फुलली.
ह्या संग्रहाच्या प्रस्तावनेत स्वतः अत्र्यांनीच म्हटले आहे, “प्रेमाची आणि निसर्गाची हळुवार गाणी स्वतःशीच गुणगुणणारा माझ्यासारखा एक लाजरा माणूस एके दिवशी आपली चालचलणूक आणि चर्या बदलून खुशाल विडंबन काव्याच्या खुंटावर येवून बसलेला होता.”
आचार्य अत्र्यांनी ह्या संग्रहात ठायी ठायी कवींच्या काव्याचे विडंबन जरी योजलेले असले तरी त्यांना ह्या कविंबद्दल नितांत आदर होता. त्यांच्यापासून घेतलेल्या प्रेरणेतूनच लागलेल्या काव्य रचनेच्या ध्यासाने कधी मराठी कवितेचे एक वेगळे रूप साकारले, एक नवे दालन समृद्ध पणे खुले केले, हे कदाचित त्यांना स्वतःलाही कळले नसावे. त्याचाही उल्लेख त्यांनी केलेला आहे. “वास्तविक, मला जायचे होते दुसऱ्याच मुक्कामाला. मला ‘ बालकवि ‘ व्हायचे होते, मला ‘गोविंदाग्रज’ व्हायचे होते. त्यासाठी माझी खटपट चालू होती. पण ते सगळे राहिले बाजूला आणि ‘देवा’ च्या आळंदीला पोहोचायच्या ऐवजी मी ‘ चोरा ‘ च्या आळंदीला जाऊन पोहोचलो !”
मुळात सकस विडंबन काव्य सक्षम पद्धतीने लिहिणे त्यालाच साध्य होते ज्याने मूळ कवितेचा गाभा गाठला आहे. त्या काव्यातल्या जागा, बारकावे ज्यास माहित आहेत. म्हणजे विडंबन काव्य लेखनासाठी स्वतः एक उत्कृष्ठ कवी असणे महत्वाचे असते.
‘ विडंबन ‘ सुचणे, चपखल शब्द योजणे आणि मूळ काव्याचा रूपभ्रंश न करणे यासाठी महान प्रतिभा लागते. एक प्रकारचे अदृश्य स्फुरणच ते !
उदाहरणादाखल… केशवसुतांची मूळ कविता ‘ दवाचे थेंब ‘
“कोठुनी हे आले येथे ?
काल संध्याकाळी नव्हते,”
हिमकण पाहुनि ते वेली-
वरि पडले आज सकाळी-
आईला बाळ्या वदला
कुतुकाने उत्सुकलेला-
“दिसती हे गोजिरवाणे
मोत्यांचे जैसे दाणे !…’
असे दवबिंदुंच्या सौंदर्याचे वर्णन करणारी सुंदर कविता…त्यावर आचार्य अत्रे यांनी केलेले विडंबन असे…कवितेचे नाव ‘पाहुणे’
” कोठुनी हे आले येथे ?
काल संध्याकाळी नव्हते !! ”
पाहुणे पसरले ओटी-
वरि बघुनी आज प्रभाती
आईला बाळ्या वदला
कुतुकाने उत्सुकलेला-
“दिसती हे कोणी आले
अपुल्याच नात्यामधले !…”
ह्यात मूळ रचनेला धक्का न लावता निर्माण केलेला विनोद, मूळ रचनेत असणारे हेरलेले बारकावे, काही ठिकाणी आढळणारे तत्कालीन भाषेच्या डौलदार पद्धतीतून जन्माला आलेले रचना दोष, ह्या सगळ्याचा प्रचंड अभ्यास असल्यानेच विडंबन घडवता येते. जसे वरील ओळीत मूळ काव्यात ‘ वेली – वरि ‘ असे विभाजन आहे. विडंबनात्मक काव्यात ते विभाजन तसेच आहे ‘ओटी – वरि ‘.
याप्रमाणेच
‘आम्ही कोण ? ‘ ह्या केशवसुतांच्या अजरामर काव्याचे केलेले विडंबन ज्यात ‘ कवी ‘ ह्या संप्रदायालाच शालजोडीतले अर्पण केलेले आहेत.
आचार्य अत्र्यांनी एक सुरेख समर्पण पर लेखन केले आहे…
“बोलून चालून ‘ झेंडूची फुले ‘ यांना वास तरी कसला आणि रंग तरी कसला ? मोहक फुलांच्या सुवासासाठी हपापलेली रसिकता या बिन वासाच्या आणि भडक रंगाच्या दरिद्री आहेराचा कसा स्वीकार करणार ? उलट तिच्या भावनेची कोमलता दुखावल्याचा उद्धटपणा केल्याचे पाप मात्र पदरी यावयाचें !….”
मुळात उपहास दृष्टीने रचल्या गेलेल्या ह्या काव्याचे प्रयोजन परस्परांच्या स्तुतीच्या मैफिली न जमवता मराठी काव्याच्या उद्धाराचा यज्ञ आरंभणे, स्वतःतले आणि काव्यातले दोष ओळखून त्याचे निराकरण करणे हा होता आणि हे आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांचेवाचून आणखी कुणाला शक्य होतं ?
प्रामाणिकपणासाठी एक वेगळी निधडी छाती घेवून जन्मावं लागतं.
विडंबनात्मक काव्याशिवाय इतर अनेक कविता आणि गीते त्यांनी लिहिली आहेत. त्यातले रस आणि हळवेपणा पहाता, हे लिहिणारे आणि ते विडंबन करणारे कवी एकच आहेत का ?
असा प्रश्न पडतो.
‘ उगवला चंद्र पुनवेचा !
मम हृदयी दरिया उसळला प्रीतिचा !
दाही दिशा कशा खुलल्या
वनिवनी कुमुदिनी फुलल्या
नववधु अधीर मनी जाहल्या!
प्रणयरस हा चहुंकडे वितळला स्वर्गीचा ! ‘
ह्यात पौर्णिमेचे निसर्गरम्य वर्णन आणि शृंगार रसाची अभिव्यक्ति कवीच्या कल्पना सामर्थ्याची आणि काव्य प्रतिभेची जाणीव करून देते.
एका प्रियकराच्या प्रथमदर्शनी प्रेमात पडण्याच्या क्षणाचे रांगडे वर्णन करणारी कविता…
‘ ती पाहताच बाला कलिजा खलास झाला
छातीत इष्क भाला की आरपार गेला
स्वर्गातल्या पऱ्यांना की वस्त्रगाळ करुनी
कमनीय देह विधीने रचिला तिचा छबेला
लावण्य काय सारे उकळोनि वा पिळोनी
त्या मस्त अत्तराचा भरला गमेचि बुधला…’
‘ आजीचे घड्याळ ‘ नावाची त्यांची एक अतिशय आगळी वेगळी कविता…
‘ आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक,
देई ठेवुनि तें कुठे अजुनि हे नाही कुना ठाऊक;
त्याची टिक टिक चालते न कधिही, आहे मुके वाटते
किल्ली देई न त्यास ती कधि, तरी ते सारखे चालते
“अभ्यासास उठीव आज मजला आजी पहाटे तरी,”
जेव्हा मी तिज सांगुनी निजतसे रात्री बिछान्यावर
साडेपाचही वाजतात न कुठे तो हाक ये नेमकी
“बाळा झांजर जाहले, अरवला तो कोंबडा, उठ की!”…
सांगे वेळ, तशाच वार-तिथीही आजी घड्याळातुनी
थंडी पाऊस ऊनही कळतसे सारे तिला त्यातूनि
मौजेचे असले घड्याळ दडुनी कोठे तिने ठेविले ?
गाठोडे फडताळ शोधूनि तिचे आलो ! तरी ना मिळे ! ‘
साधे शब्द, त्या काळात दिवस जसा सरत होता त्याचे साधे वर्णन आणि जुन्या पिढीच्या साध्या, भोळ्या-भाबड्या वागण्या बोलण्यातून त्यांच्याच अनुभव संपन्नतेचे आणि संसार कुशलतेचे केलेले वर्णन. खरोखर, कोणतेही संसाधने नसताना इतक्या चतुराईने आणि नैपुण्याने आयुष्य जगलेल्या त्या पिढीला काय म्हणायचे ?
‘ प्रेम हे वंचिता मोह न मज जीवनाचा !
द्या कुणि आणून द्या, प्याला विषाचा !
प्रीतिचा फसवा पसारा
भरली इथे नुसती भुते
कोणि नाही जगि कुणाचा ! ‘
मुळात कवितेचा जन्मच होतो खरेपणातून ! अश्या खऱ्या मनाला जर खरे प्रेम मिळाले नाही तर जगायचा वीट येणं साहजिकच आहे. दुर्दैवाने जग असाच फसवा पसारा आहे.
याशिवाय ‘ देह देवाचे मंदिर ‘, ‘ भरजरी ग पितांबर ‘ , ‘ यमुना जळी खेळू खेळ कन्हैया ‘, ‘ नाजुक ऐश्या या जखमेला ‘ अशी अनेक गीते त्यांनी लिहिली आहेत.
आणि आता, ती एक कविता जी प्रसिद्ध होण्याचे कारण कदाचित सद्यकालीन परिस्थिती असेलही परंतू मला त्यात एक खूप वेगळी वैचारिक जागा दिसते. आधी ती कविता लिहीते आणि मग त्या जागेबाबत सांगते.
कविता ‘प्रेमाचा गुलकंद’
‘ बागेतुनी व बाजारातुनी कुठुनी तरी ‘त्याने’
गुलाबपुष्पे आणून द्यावीत ‘तिज’ला नियमाने
कशास सांगू प्रेम तयाचे तिजवरती होते ?
तुम्हीच उकला बिंग यातले काय असावे ते !
गुलाब कसले प्रेम पत्रिका लाल गुलाबी त्या
लाल अक्षरे जणू लिहलेल्या पाठोपाठ नुसत्या
प्रेमदेवता प्रसन्न हो! या नैवेद्याने
प्रेमाचे हे मार्ग गुलाबी जाणती नवतरणे
कधी न त्याचा ती अवमानी फ़ुलता नजरणा
परी न सोडला तिने आपुला कधीही मुग्धपणा
या मौनातच त्यास वाटले अर्थ असावे खोल
तोही कशाला प्रगट करी मग मनातले बोल….
हे बोलूनी त्याच पावली आत जाय रमणी
क्षणात घेउन ये बाहेरी कसलीशी बरणी
म्हणे “पहा मी यात टाकले तुमचे ते गेंद
आणि बनवला तुमच्या साठी इतुका गुलकंद
का डोळे असे फ़िरवता का आली भोवंड
बोट यातले जरा चाखुनी गोड करा तोंड ”
क्षणैक दिसले तारांगण त्या परी शांत झाला
तसाच बरणी आणि घेवुनी खान्द्यावरी आला
“प्रेमापायी भरला” बोले “भुर्दन्ड न थोडा
प्रेमलाभ नच, गुलकन्द तरी कशास हा दवडा?”
याच औषधावरी पुढे तो कसातरी जगला
‘हृदय थांबूनी कधीच ना तरी असता तो’ खपला!
तोंड आबंले असेल ज्यांचे प्रेम निराशेने
प्रेमाचा गुलकन्द तयानी चाखूनी हा बघणे.. ‘
वरवर पाहता विनोद निर्मितीच्या उद्देशाने केलेली ही कविता.
प्रेमभंग झालेल्याना थोडा आराम द्यावा, त्यांचे झुरणे जरा हलके व्हावे इतका साधा विचार. मात्र शोधला तर सापडतो तो किती मोठा विचार…नाते कोणतेही असो आपण संवाद टाळायला बघतो, आपल्या मनातल्या भावना व्यक्त करणं म्हणजे कमकुवपणा वाटतो आपल्याला. मग ह्या अश्या अर्धवट घातलेल्या सादेला प्रतिसाद तसाच मिळणार! मुळात आधी कुणाच्या भावना, वेदना समजून घेण्याची मानसिकता, तितकी भावनिक परिपक्वता इथे आहे कुणात? मैत्री असो की प्रेम, भावनिक अनुपलब्धता ( म्हणजे आजच्या भाषेत ‘ emotionally unavailable ‘ असणं ) हेच सर्रास बघायला मिळतं आणि नातं तुटतं ते ह्याच कारणाने. भावबंधाच्या गाठी इतक्या सैल बांधायच्या तर मग बांधायच्याच कशाला ? ‘ वेदना परकेपणाने ऐकणारी आणि त्या जखमेचा स्पर्श चुकूनही आपल्याला होवू नये ह्याची काळजी घेणारी आजकालची नाती. अश्या कित्तेक नात्यांच्या नशिबी असा गुलकंद येत असेल.
म्हणून मग ह्याच कवितेत सापडतो तो पुढचा विचार… उपाय…
‘ गुंतून पडलो की अपेक्षाभंग ठरलेला. म्हणून फार जीव न अडकवता व्यावहारिकता जपावी म्हणजे आयुष्य निदान आपल्यापुरतं तरी मजेत जगता येतं ‘
एक मात्र नक्की…अगदी नक्की…हे उपहासात्मक विधान करणं जितकं सोपं आहे तितकं आचरणं मात्र हळव्या मनासाठी सोपं नसतं.
आचार्य प्रल्हाद केशव अत्रे ह्या व्यक्तीला कोणताही लेख, कविता, अगदी निबंध, प्रबंध कश्या कश्यात बांधता येत नाही. आचार्य अत्रे, आपण तेजस्वी सूर्य आहात. आम्ही केवळ आपली आरती गायची. आपलं परलोक गमन जरी १३ जून १९६९ रोजी झालं तरी, आपण अमर आहात. आपल्याला माझा प्रणाम 🙏🏻
आपल्या काव्याद्वारे, एकमेकांवर कुरघोडी करणाऱ्या, प्रसिद्धीसाठी आणि श्रेष्ठतेसाठी काव्य रचना करणाऱ्या काही कवींच्या मनोवृत्तीवर आपण निक्षुन टीका केलीत.
आपण मात्र मानवी जीवनात क्षणोक्षणी वाट्याला येणाऱ्या दुःखाचा क्षणभर विसर पाडण्यासाठी, आनंद निर्मिती साठी अविरत निर्मिती केलीत. ह्या आनंदाची प्रत्येकाची व्याख्या स्वतःची असते. आज माझा ‘आनंद’ आपले चरणी अर्पण करते.
आनंद
कवितेच्या सुकुमार कळ्या
मनी उमलाव्या,
तिथेच फुलाव्या,
गुंफुनी धुंद गजऱ्यांच्या माला
कृष्ण सख्याला सुखे अर्पाव्या
का त्यांना बाजार घडावे ?
का उगा पायी तुडवावे ?
निर्माल्यी जगाने सारायापरि
अंतरी त्यांना देवत्व जडावे.
मनसागरी अथांग लहरी उठती,
खोल शिंपल्यात कविता मोती,
ओबड-धोबड
तेजोहीन जरी,
श्रेयस त्यांच्याच असती जाती.
का प्रेयसात त्यांना लोटावे ?
भाग्याचे त्यांच्या गळे घोटावे ?
गुंफुनी सुंदर अनुपम झुपके
कृष्ण सख्याच्या वेणूस सजवावे.
काव्य सुमनांचा सुवास अंतरी
कविता मोती साज अंतरी
का जनांसी हे रूप दावावे ?
का हे असले नाट्य चालावे ?
एक तू अन् कृष्ण एक तो,
हा शृंगार त्यांनाच ठावूक असतो
अमूल्य असे जे तुझिया साठी
कृष्ण सखा तुझिया पाठी
मुक्त उधळतील काव्य रंग अन्
आनंदाच्या होतील भेटी !

– लेखन : डॉ. गौरी जोशी – कंसारा
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800
राधिका ताई, आपले मनापासून आभार 🙏🏻
वा! वा!
गौरीआज तर एक मनातला काव्य खजीनाच ऊघडलास..
प्र के अत्रे म्हणजे महान चतुरस्त्र व्यक्तीमत्व…
त्यांच्या साहित्याची गोडीच अवीट…आणि या सार्या आठवणीतल्या कविता वाचताना मन कसं मोहरलं..
सुरेख अभ्यास पूर्ण आणि रसयुक्त लेख…..