Wednesday, March 12, 2025
Homeलेखआम्ही नगरकर

आम्ही नगरकर

नगर माझे माहेर,
पुणे माझे सासर….

मित्रांनो,
“माझे माहेरं पंढरी”
हा भिमसेनजीचा अभंग सदासर्वकाळ प्रसिद्ध आहे.
तसेच माझे माहेरं !
माझे नगsssर !
हा सुद्धा अभंग मी गेली चाळीस पंचेचाळीस वर्षे माझ्या मनाच्या एका कोपऱ्यात जपून ठेवला आहे…..

या माहेराची नुसती आठवण जरी आली तरी पंख लावल्या सारखा उडतउडत मी माझ्या माहेरी पोहोचतो. तेथील रम्य आठवणी मधे रमून जातो.

काय दिले नाही मला माझ्या नगरच्या माहेराने ?
जन्म नगरचा
शिक्षण नगरचे
वाढलो नगरमधे
नगरच्या गल्ल्यांमधून मनसोक्त फिरलो.
प्रत्येक गल्लीतील जिवंत वाडे बघितले.
हो जिंवतच !
आता वाडे राहिलेच नाहीत ! जीवाला जीव देणारी माणसे बघितली.
मित्र मिळाले. गळ्यात हात टाकून बिनधास्त फिरणारे मित्र बघितले….

नगर म्हणजे राकटपणा !
नगर म्हणजे बेडरपणा !
नगर म्हणजे बेधडकपणा !

काय दिवस होते ते !
असे वाटायचे नगर सारखे दुसरे गाव नाही !
इतका आनंद उत्साह आत्मविश्वास या नगरने मला दिला आहे…

असे म्हणतात की, नगरमधे गाडी चालवणारा माणूस जगात कुठेही गाडी चालवू शकतो….!
तसेच, नगरचा माणूस जगात कुठेही गेला तरी,
तो अगदी आरामात राहू शकतो, हे आता सिद्ध झाले आहे…..!

आमच्या नगरला काही जण, मोठे खेडे म्हणून हिणवतात……! असू द्या, आमचे नगर मोठे खेडे !
मग मी त्यांना विचारतो, नगर सारखी सहनशिलता आहे का तुमच्याकडे ?

नगरचा कापडबाजार, गंजबाजार बँकरोड, नवीपेठ,
सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे आमचा चितळेरोड, दिल्लीगेट बागडपट्टी, सर्जेपुरा, झेंडीगेट, हतमपुरा, तेलीखुंट, डाळमंडई दाणे डबरा, नालेगाव, माळी वाडा, आनंदी बाजार, लक्ष्मी बाई कारंजा, एसटी स्टँड, रेल्वे स्टेशन, अशी रम्य ठिकाणे, आहेत का तुमच्या कडे ?
सारडा कोहीनूर सारखी दुकाने आहेत का तुमच्याकडे ?इमारतची कंपनी ही फक्त नगरमधेच आहे…!
नगरचे बाॕम्बे किचन महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे..!

मंदिराच्यावर शाळा म्हणजे, “मार्कंडेय विद्यालय” हे शिक्षणाचे महत्त्व सांगते…
दुधाचा बाजार म्हणजे गांधी मैदान,
हे सगळं नगरचे वेगळेपण आहे…

महत्त्वाची मिलटरी केन्द्र म्हणजे नगर भिंगार !
इथं भारतातील कुठली फोर व्हिलर पास झाल्या शिवाय आपल्या रस्त्यावर चालू शकत नाही !

नगरचे रेल्वे स्टेशन स्वच्छ स्टेशनमधे गणले गेले आहे… बाकी नगरमधे काहीही असो,
नगर स्टेशन मात्र स्वच्छ व सुंदर आहे…!
अजूनही आपले नगर इतर शहरांच्या तुलनेत स्वस्तच आहे…
नगरचं कापडचोपड महाराष्ट्रात स्वस्त !

नगरला संत परंपरा, धार्मिकपणा ओतप्रोत भरला आहे.
इथं दर्शनासाठी देशा परदेशातून लोकं येतात.
नगरच्या हिवरेबाजार, राळेगण सिद्धी या गावांनी देश विदेशात ख्याती मिळवली आहे.
नगरच्या स्नेहात स्नेहालय ही संस्था आहे.

नगरचे नाटकवेड, कलाकार, संगीत, गायक, सिनेमे हे सर्व आठवले की परत त्या वातावरणात गेल्याचा भास होतो. नगरमधे बघितलेले सिनेमे, मोने कला मंदिर, रंगभवनची नाटके कोण विसरेल ?

नगरचे नगर काॕलेज, सीएसआरडी, सारडा काॕलेज, न्यु आर्टस् या काॕलेजने नगरला भरभरून दिले आहे.
नगरच्या आयटीआयने जगण्याचे बळ दिले !
नगरच्या सर्वच शाळा आमच्या साठी आदर्श आहेत. तेथील शिक्षण, आदरणिय शिक्षक,
हे सर्व न विसरण्या सारखे आहे.

सारडा कॉलेज

मला परवा एकाने विचारले,
अरे तु नगरचा भुईकोट किल्ला बघितला का रे ?
मी त्याला वरुन खाल पर्यत पाहिले !
व हळूच म्हणालो,
बघितला !
अssरे !
हा किल्ला नुसता बघितला नाही तर,
आम्ही तो जगलो आहोत ! जगलो !
समजले का ?

नगरची बातच लई भारी ! माळीवाड्यातील महागणपती, सर्जेपुराचा मारुती, शमीचे गणेश मंदिर, दिल्ली गेट जवळचे शनि मंदिर अजुनही जसेच्या तसे आठवते. महागणपती, केडगावची रेणुकामाता, बुर्हाणनगरची तुळजाभवानी या स्थळांनी नगरच्या मनात भक्तीभाव निर्माण केला.

गांधी मैदान, सोसायटी हायस्कूलचे मैदान, वाडिया पार्क, नगर काॕलेजचे मैदान, कोठला या ठिकाणांना कोण विसरेल ?
या मैदानावरचे अटीतटीने खेळलेले क्रिकेट सामने कोण विसरेल ? हे आठवले तरी आजही अंगावर काटा येतो….!

एखाद्या पदार्थाला प्रसिद्धी द्यायची असेल,
तर तो नगरमधेच तयार झाला पाहिजे !
अरे !
रातको तुने कप्पडबजार में रबडी खायी क्या ?
अरे !
ऐसी रबडी दुनियामें नहीं मिलती ! झाले,
रातोरात रबडी सगळीकडे फेमस !
असे रसभरीत वर्णन तुम्हाला दुसरीकडे ऐकायला मिळणार नाही. मग ती कचोरी असो, पाणीपुरी असो की भेळ ! नाही तर,
जिलेबी असो वा बांसुदी, की लस्सी असो की आईसक्रीम, किंवा वडापाव, मिसळ !
नगरमधील खव्वयांनी खाल्ले की या पदार्थांना प्रसिद्धी मिळणारच !

पन्नास वर्षापूर्वी नगर कसं मोकळं ढाकळं होतं. नगरमधे फिरायला खूप मजा यायची…..!
हे सर्व वातावरण एंजाय करीत असताना माझे शिक्षण कधी पूर्ण झाले हे समजले सुद्धा नाही !

मनात वेगळे काही करण्याचा माझा विचार होता. त्यामुळे नगर सोडण्याचा विचार सारखा मनामधे येत असे. परंतु हा विचार प्रत्यक्षात येत नव्हता.
घरचा उद्योग, मित्र मंडळी, नगरचे मुक्त वातावरण सोडवत नव्हते. परंतु त्या काळात एक संधी आली.
माझ्या एका अगदी जवळच्या मित्राने मला अक्षरशः धक्का मारला….तू आता नगरमधून बाहेर पड….आणि त्या धक्क्यानेच माझे आयुष्य बदलून गेले !
मी पुण्यात वास्तव्याला आलो खरा पण मनात अजून आमचं नगरच वास्तव्य करून आहे !

विश्वास सोहोनी

– लेखन : विश्वास सोहोनी
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. नगर शहराचे वर्णन मस्त, सुंदर शब्दात केल आहे. धन्यवाद विश्वास सोहोनी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिल्पा कुलकर्णी on स्नेहाची रेसिपी ५
शितल अहेर on कविता
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on महिला गाडीग्रुप : अनोखे संमेलन
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on जिचे तिचे आकाश… १
गोविंद पाटील on महिला दिन : काही कविता
प्रोफेसर डॉ सुवर्णा गुंड-चव्हाण on “सुवर्णधन” सन्मानित