भारताच्या लोकशाहीसाठी २५ जून १९७५ हा दिवस
‘काळा दिवस’ असणारा आहे याची कोणालाही कल्पना नव्हती. त्या मध्यरात्री पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी जाहीर केली होती. दिल्लीमध्ये फार मोठ्या राजकीय घडामोडी झाल्या होत्या. देशात ठिकठिकाणी जयप्रकाश नारायण, अटल बिहारी वाजपेयी, मोरारजी देसाई आणि चरण सिंग अशा अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांना अटक झाली होती.
दिल्लीमधील वर्तमानपत्रांच्या कार्यालयांची वीज तोडली होती. इंदिरा गांधी सरकारच्या मंत्र्यांना आणि अधिकाऱ्यांना देखील आणीबाणी लागू करण्याचा पूर्वानुभव नव्हता. त्यामुळे एकापाठोपाठ एक आदेश देत आणीबाणीची कलमे लागू करण्यात आली होती.
त्याकाळी टेलिव्हिजन नव्हते. त्यामुळे आता सारख्या ब्रेकिंग न्यूज च्या बातम्या मिळत नव्हत्या. प्रसिद्धी पूर्व बंधनांचा (सेन्सॉरशिपचा) तपशील हळूहळू नंतर जाहीर झाला. आकाशवाणी आणि दूरदर्शन यांचे प्रसारण बंद झाले की देशात कुणालाही कोणत्याही बातम्या कळणार नाही, त्यामुळे मध्यरात्री लागू झालेल्या आणीबाणी च्या बातम्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध होणार नाही असे ते धोरण होते.
कार्यक्रम रद्द
पुण्यातील पत्रकारांच्या दृष्टीने २६ जून ची सकाळ थोडी महत्त्वाची आणि धांदलीची होती. त्यादिवशी सकाळी दहा वाजता पुणे पत्रकार संघाचे कार्यालय नव्या जागेत सुरू होणार होते. आधी त्याची थोडी पार्श्वभूमी…
आता पुणे श्रमिक पत्रकार संघ या नावाने ओळखली जाणारी ही शहरातली महत्त्वाची संस्था आधी पुणे पत्रकार संघ या नावाने ओळखली जायची. ही संस्था १९४० मध्ये सुरू झाली. या संस्थेचा १९७०-७१ पर्यंतचा इतिहास फारसा उपलब्ध नाही. त्यांचे किती सभासद असतील याचा अंदाज करता येत नाही. एकूणच पुणे शहरातील वर्तमानपत्रांची संख्या मर्यादित होती. त्यामुळे वीस पंचवीस पेक्षा जास्त सभासद असतील असे वाटते. वर्तमान पत्रांची संख्या वाढत गेली तसे या संघाचे सदस्य देखील वाढले.
लोकमान्यांच्या केसरी या दैनिकाच्या कार्यालयात पत्रकार संघाचे काम सुरू झाले. पण १९४० ते १९७० पर्यंत फारसे कामकाज झाले नसावे.
त्यामुळे केसरीचे विश्वस्त संपादक श्री जयंतराव टिळक यांच्या कृपेमुळे याच दैनिकाच्या कार्यालयात पत्रकार संघ आपले छोटे मोठे कार्यक्रम तेथेच आयोजित करायचा. वर्षातून दोन-तीन मिटिंग व्हायच्या. त्यामुळे कार्यालयाची वेगळी गरज पण लागायची नाही. केसरीच्या ग्रंथालयात अशा बैठका सहज घेता यायच्या.
केसरीचे सहसंपादक मा. वि साने पुढे इंडियन फेडरेशन ऑफ वर्किंग जर्नलिस्ट (आय एफ डब्ल्यूजे) या अखिल भारतीय स्तरावरील पत्रकारांच्या संघटनेचे प्रमुख झाले. ही संस्था मुख्यत: दिल्ली आणि चेन्नई या ठिकाणी कार्यरत होती.
या संघटनेचा विस्तार करण्याच्या प्रयत्नांमध्ये तिचे एक वार्षिक अधिवेशन पुण्यात घ्यावे असे ठरले. तेव्हा माधराव साने आणि केसरीचे य. वि नामजोशी, रामभाऊ जोशी आणि (आता बंद पडलेल्या) विशाल सह्याद्रीचे गोपाळ कृष्ण पटवर्धन आदी पत्रकारांनी आय एफ डब्ल्यू जे चे १७ वे वार्षिक अधिवेशन १९७४ मध्ये पुण्यात आयोजित करायची जबाबदारी उचलली.
ती खूप यशस्वीरित्या पार पाडली. देशभरातील ६०० च्या आसपास पत्रकार या तीन दिवसाच्या अधिवेशनाला उपस्थित होते. पत्रकारांच्या विविध प्रश्नांची सांगोपांग चर्चा झाली. पुणे पत्रकार संघ मजबूत करावा आणि राज्यातील इतर प्रमुख शहरात पत्रकारांच्या संघटना बांधाव्या असे निर्णय झाले.
पुण्यात सभासद वाढले. पटवर्धन अध्यक्ष झाले. त्यांनी कार्यालयाची जागा आता स्वतंत्रपणे केसरी बाहेर असली पाहिजे यावर लक्ष केंद्रित केले.
शनिपार जवळ पुणे महापालिकेच्या कमर्शियल बिल्डींग मध्ये जिन्याखाली निमुळत्या अरुंद जागेत आपले कार्यालय थाटायचे ठरले. कामाच्या नसलेल्या तेथील अडगळीच्या गोष्टी काढून तेथे टेबल खुर्च्या टाकून स्वतंत्र छोटे का होईना आपले कार्यालय उभे करण्याचा घाट गोपाळरावांनी घातला. त्यावेळचे महापौर भाई वैद्य यांनी आपले वजन खर्च करून मंजुरी मिळवून घेतली. त्यावेळी मी पत्रकार संघाचा कार्यवाह होतो.
सव्वीस २६ जून ला सकाळी दहा वाजता महापौरांची वेळ ठरवून उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित केला. कार्यकारिणीतील चार चौघे आणि गोपालराव यांच्यासोबत मी सकाळपासून कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये गुंतलो होतो. दिल्लीत काय घडते आहे याची तोपर्यंत काहीही कल्पना नव्हती. जरा वेळाने त्रोटक बातम्या आकाशवाणीवरून कळल्या. एवढ्यावरून देशात प्रचंड महत्त्वाच्या राजकीय बातम्या घडल्या आहेत याची कल्पना आली.
आपल्या कार्यालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम रद्द करण्या वाचून काहीही मार्ग नाही हे ठरवले आणि आम्ही आपापल्या कार्यालयाकडे वेगाने सायकलीने निघालो.
माझे यु एन आय चे ऑफिस नारायण पेठेत दैनिक प्रभात च्या वरच्या मजल्यावर होते. तेथे धावतच आमच्या टेलिप्रिंटर वरच्या बातम्या वाचायला सुरुवात केली.
आमच्या दिल्लीतील पत्रकार सहकाऱ्यांना सुद्धा काम करणे अशक्य झाले होते. जमेल तसे जमेल त्या पद्धतीने त्यांनी दिल्लीतल्या घडामोडीच्या बातम्या तुकड्या-तुकड्याने का होईना द्यायला सुरुवात केली होती.
आमचे मुख्य संपादक जी जी मीरचंदानी यांनी स्वतः सर्व प्रमुख शहरातल्या आमच्या कार्यालयांना फोन करून आपापल्या शहरातील घडामोडींच्या बातम्या देत रहा, कदाचित या बातम्या रिलीज होणार नाहीत असे चिन्ह आहे याची कल्पना आम्हाला तोंडी दिली.
मी आणि गोपाळराव पटवर्धन यांनी इतर वर्तमानपत्रातलया बातम्या फोनवर एकमेकांना द्यायला सुरुवात केली. आपल्याला माहित असलेल्या घटना कळविल्या. आम्ही सर्वच सुन्न झालो होतो.
दिवस उलटत गेले तसे हुकूमशाही किती भयानक स्वरूपाची असते याचा अनुभव देशात सर्वाना यायला लागला. विरोधी पक्षांची मुस्कटदाबी आणि पत्रकारांवरील प्रसिद्धी-पूर्व नियंत्रण म्हणजे सेन्सॉरशिप याचा तर बातमीदारांना नित्याचा अनुभव येणे चालू झाले. विरोधकांना अटक करणे सर्रास सुरु झाले.
पुण्यातही इंदिरा गांधी यांच्या मंत्रीमंडळातील सहकारी मोहन धारिया, महापौर भाई वैद्य, जनसंघाचे प्रकाश जावडेकर अशा अनेक राजकीय नेत्यांना देशात विविध ठिकाणी अटक झाली. पण या सगळ्या बातम्या वर्तमानपत्रात आणि आकाशवाणीवर प्रकाशित होत नव्हत्या. लोकांना बातमी करण्याचा अधिकृत सोर्स उरला नव्हता. त्यामुळे अफवांचे प्रचंड पेव फुटले. नुकसान शेवटी इंदिरा गांधी आणि त्यांचा पक्ष यांचेच झाले. मात्र त्याबद्दल सत्ताधाऱ्यांना आणीबाणी उठल्यानंतर, निवडणूक जाहीर झाल्यानंतर, किंवा निकाल लागल्यानंतरच लक्षात आले.
क्रमशः

– लेखन : प्रा डॉ किरण ठाकूर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800
एक वेदना देणारा इतिहास…