Wednesday, March 12, 2025
Homeयशकथाकृषितज्ञ डॉ ज्ञानदेव कासार

कृषितज्ञ डॉ ज्ञानदेव कासार

ग्रामीण भागात जन्माला येऊनही आंतरराष्ट्रीय स्तरावर कृषी क्षेत्रात नाव लौकिक संपादन केलेले कृषितज्ञ डॉ. ज्ञानदेव कासार (अष्टेकर) या आदर्श व्यक्तिमत्वाचा प्रेरणादायी जीवन प्रवास

कृषी क्षेत्रात ज्यांचे शिक्षण, संशोधन आणि कृषी विस्तारामध्ये भरीव कार्य आहे असे डॉ. ज्ञानदेव कासार (अष्टेकर) यांचा जन्म पुणे जिल्याच्या इंदापूर तालुक्यातील निम्बोर्डी या त्यांच्या आजोळी
५ फेब्रुवारी १९४५ रोजी सर्व सामान्य कुटुंबात झाला.

डॉ कासार खरे तर ग्रामीण भागातले, खेडयातले. त्यांचे वडील स्वर्गीय विठ्ठल गोविंदराव कासार हे वारकरी संप्रदायाचे असल्याने पंढरपूर आळंदी वारी पायी करत. त्यामुळे त्यांना लहानपणापासून अध्यात्मिक शिक्षण व आवड होती. वडील पहाटे उठून हरिपाठ व ओव्या म्हणत व मुलांना अभ्यासालाही उठवत. त्यांच्याकडून पाढे म्हणून घेत.

डॉ कासार यांच्या आई स्वर्गीय चंपावती या खूप कडक शिस्तीच्या होत्या. त्यामुळे मुलांवर चांगले संस्कार झाले. त्यांना दोन भाऊ व एक बहीण आहे.

गावी वडिलोपार्जित शेती असल्यामुळे शेती विषयी आवड निर्माण झाली. शेतीमध्ये ज्वारी, बाजरी, गहू, हरबरा व काही प्रमाणात ऊस अशी पिके घेत असल्यामुळे या पिकांची त्यांना निरीक्षणे घेता आली.

डॉ. कासार यांचे प्राथमिक शिक्षण मूळ गावी म्हणजे इंदापूर तालुक्यातील कळस येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. एक हुशार विद्यार्थी म्हणून शिक्षक वर्ग त्यांना ओळखत.

त्यावेळी कळस येथे हायस्कूल नसल्यामुळे त्यांनी त्यांचे माध्यमिक शिक्षण गावापासून १५ किलोमीटर दूर असलेल्या श्री छत्रपती हायस्कूल भावानीनगर येथे सायकल वर जाऊन येऊन पूर्ण केले.

पुढे कॉलेज शिक्षण पुण्याच्या कृषी महाविद्यालयामध्ये घेऊन त्यांनी बी एससी व एम एससी (कृषी अर्थशास्त्र) या पदव्या गुणवत्तेसह प्राप्त केल्या.

विशेष म्हणजे त्यांना पदवीपूर्व शिक्षणासाठी कॉलेज मेरिट स्कॉलरशिप तर एम एससी कृषी अर्थशास्त्र या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी भारतीय कृषी अनुसंधान परिषदेची ज्युनियर फेलोशिप मिळाली होती.

डॉ. कासारांनी एमएससीच्या प्रबंधासाठी “सन १९५५ च्या मुंबई शेतजमीन पुरवणी कुळ कायद्याची अंमल बजावणी व त्याचा पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यावर झालेला परिणाम : एक सूक्ष्म अभ्यास” हा विषय घेऊन संशोधन केले आणि निष्कर्ष प्रकाशित केले. भारतीय कृषी अनुसंधान संस्था, नवी दिल्ली येथून कृषी अर्थशास्त्र विषयात पी एचडी संपादन केली.

पी एचडीच्या प्रबंधासाठी त्यांनी “बीड जिल्ह्यातील ऊस तोड मजुरांच्या पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यावर झालेल्या हंगामी स्थलांतराचा आर्थिक अभ्यास” हा विषय घेऊन प्रबंध सादर केला. यासाठी देखील त्यांची भारतीय कृषी अनुसंधान संस्थेच्या
सिनियर संशोधन फेलोशिप साठी निवड झाली होती. पुढे या प्रबंधाच्या आधारे त्यांनी ‘महाराष्ट्रातील शेतमजुरांच्या हंगामी स्थलांतराचा आर्थिक अभ्यास’ हे पुस्तक प्रकाशित केले.

राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापिठाने त्यांना  ‘शेतावरील पाणी व्यवस्थापन’ या विषयावरील ६ आठवड्याच्या प्रशिक्षणासाठी अमेरिकेतील युटाह स्टेट युनिव्हर्सिटी, लोगन येथे पाठवले होते. या प्रशिक्षणामध्ये त्यांनी युटाह कोलोरॅडो राज्यातील शेतीच्या जलसिंचनाचा अभ्यास करून त्याबाबतची माहिती वर्तमानपत्रात व मासिकात प्रकाशित केली. त्यामुळे अनेकांना मार्गदर्शन लाभले.

डॉ. कासार यांच्या अध्यापनाची सुरवात सहाय्यक प्राध्यापक (कृषी अर्थशात्र) कृषी महाविद्यालय, धुळे येथे नोव्हेंबर १९७० पासून झाली. पुढे त्यांना पदोन्नती मिळून त्यांनी सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक व महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील कृषी अर्थशात्र विभागाचे प्रमुख म्हणून काम पाहिले.

डॉ. कासार यांनी काही काळ संचालक, कृषि विस्तार शिक्षण व सहयोगी अधिष्ठाता पदव्युत्तर महाविद्यालय राहुरी, या पदावरही काम केले आहे.

कृषि विद्यापीठामध्ये शिक्षणाबरोबर संशोधन व विस्तार शिक्षण या कार्यासही तेवढेच महत्व दिले जाते. डॉ. कासारांनी कृषि अर्थशात्र विषयात अनेक संशोधन प्रकल्पावर काम करून त्यांचे निष्कर्ष विविध संशोधन मासिकातून तसेच अतिशय प्रतिष्ठित मानलेल्या इकॉनॉमिक टाइम्स व इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झाले आहे.

डॉ कासार यांनी अनेक संशोधन अहवाल तयार करून ते कृषि संशोधन समितीला सादर केले आहेत, विशेषतः कृषि उत्पादनातील वेगवेगळ्या पिकांचे अर्थशास्त्र, पणन व किमतीचे पृथ्थकरण, जमीन सुधारणा कायदे व त्यांचे मूल्यमापन, शेतमजुरांचा रोजगार, उत्पन्न व उपभोग, आदिवासी शेतीचे अर्थशास्त्र, महाराष्ट्रातील जिल्हा सहकारी बँकांचा आर्थिक अभ्यास, कृषि पत पुरवठा इ. प्रकल्पावर त्यांनी काम केले आहे.

डॉ. कासार यांचे एक पुस्तक, ६९ शोधनिबंध, ४३ तांत्रिक निबंध, ३२ लेख लिहून प्रसिद्ध झाले आहेत. प्राध्यापक व विभाग प्रमुख म्हणून काम करत असताना कृषि अर्थशास्त्र विषयातील एम एससी च्या २० आणि पी एचडी च्या ६ विद्यार्थ्यांना, कृषि व्यवसाय व्यवस्थापनातील ८ विद्यार्थ्यांना त्यांनी संशोधनासाठी मार्गदर्शन केले आहे.

म.फु.कु.वि. राहुरी येथे ऑक्टोबर २००५ मध्ये आयोजित केलेल्या कृषि तंत्रज्ञान सप्ताहात संचालक, कृषि विस्तार शिक्षक म्हणून महत्त्वाची भूमिका पार
पाडल्यामुळे त्यांचा त्यावेळचे मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख व कुलगुरू डॉ. राजाराम देशमुख यांनी सन्मान केला.

डॉ कासार यांनी कृषि अर्थशास्त्र विभाग प्रमुख म्हणून राज्य शासनाच्या शेतमाल भाव समितीवर व महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या पीक कर्ज धोरण समितीवर निमंत्रित सदस्य म्हणून काम पाहिले आहे.

डॉ कासार कृषि विद्यापीठाच्या सेवेतून फेब्रुवारी २००६ मध्ये निवृत्त झाल्यानंतर त्यांनी सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल बिझनेस, हिंजवडी, पुणे व कृषि जैविक तंत्रज्ञान महाविद्यालय बारामती येथे ३-४ वर्षे कृषिव्यवसाय, व्यवस्थापन व पणन या विषयाचे निमंत्रित प्राध्यापक म्हणूनही काम केले आहे. त्यानंतर मात्र त्यांनी त्यांच्या वडिलोपार्जित शेतीत लक्ष घातले.

पुणे येथे कृषि महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत असताना पुणे जिल्हा विकास समिती व श्री कालिकादेवी संस्था पुणे यांच्या कार्यामध्ये त्यांनी सहभाग घेतला आहे. विशेषतः पुणे येथे घेतलेल्या वधुवर मेळाव्याच्या स्मरणिकेच्या प्रकाशनामध्ये
महत्वाची भूमिका पार पाडली. नोकरीच्या जबाबदारीमुळे म्हणा किंवा नोकरीतील बदलींमुळे समाजाच्या कार्यामध्ये मोठया प्रमाणात सहभाग घेता आला नाही याची त्यांना खंत वाटते.

डॉ.कासार यांना लता मंगेशकर, अनुराधा पौडवाल
यांची गाणी ऐकायला आवडतात. त्यांना वाचनाची देखील आवड आहे. माननीय अटलबिहारी वाजपेयी व
शरद पवार यांची भाषणे त्यांच्या मनाला भावतात.

डॉ. कासार यांच्या पत्नी सौ इंदुमती ज्ञानदेव कासार या बी एससी, बी एड असून त्या जुन्नर येथील न्यू इंग्लिश स्कूल मध्ये गणित व विज्ञान हा विषय शिकवत. लग्न झाल्यावर त्या अनेक वर्षे दहावीच्या विद्यार्थ्यांना घरीच गणित विषय शिकवत.

त्यांची मोठी मुलगी सौ सुप्रिया अष्टेकर सगारे, या बी. एससी (संख्याशास्त्र) असून नोकरी करत आहेत. त्यांची दुसरी मुलगी सौ सुपर्णा आशिष चिंचलीकर, बी. ए, एमपीएम असून खाजगी कंपनीत कार्यरत आहे. तर मुलगा कौस्तुभ हा एमएस असून विदेशात गेली दहा वर्षांपासून उच्च पदावर कार्यरत आहे.

असे हे सर्व कुटुंब उच्च शिक्षित असून सर्वांशी प्रेमाने जोडलेले आहे. या कुटुंबाकडे पाहिल्यावर शिक्षणाला संस्काराची जोड आहे, हे जाणवते.

डॉ. कासार तरुणांना असा संदेश देऊ इच्छितात की, “तुम्ही कोणतेही क्षेत्र निवडा, मात्र त्याचा पूर्ण अभ्यास करा, चिंतन करा, त्या क्षेत्रात प्राविण्य मिळवा, प्रामाणिक कष्ट व प्रयन्त करा मग यश तुमचेच आहे. कितीही मोठे झाला तरी आपल्यातील नम्रपणा जपा व मोठयाचा आदर करा कारण हा सर्वात मोठा दागिना आहे. शिक्षणाला संस्काराची जोड असली की चमत्कार होतात” असा लाख मोलाचा सल्ला ते देतात.

कृषि क्षेत्र खूप विस्तारलेले आहे. या क्षेत्रात देखील करियर करण्याच्या अनेक संधी आहेत याचा आज तरुणांनी विचार केला पाहिजे. कृषि क्षेत्राकडे पाहण्याचा तरुणांचा दृष्टीकोन बदलला पाहिजे.

असे हे अतिशय उच्चशिक्षित डॉ कासार सदैव सर्वांना मदत करतात. कृषि क्षेत्रातील सोनेरी ताज आपल्या मस्तकावर परिधान केलेले डॉ. कासार यांचा अनुभव, शिक्षण नक्कीच सर्वांना प्रेरणादायी असेच आहे.

डॉ. कासार यांना उदंड आयुष्य लाभो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना.

रश्मी हेडे.

– लेखन : रश्मी हेडे.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on महिला गाडीग्रुप : अनोखे संमेलन
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on जिचे तिचे आकाश… १
गोविंद पाटील on महिला दिन : काही कविता
प्रोफेसर डॉ सुवर्णा गुंड-चव्हाण on “सुवर्णधन” सन्मानित
सौ.मिनल शशिकांत शिंदे, on चित्र भाषा संमेलन : अभिनव उपक्रम