Wednesday, March 12, 2025
Homeलेखजीवन गाणे...

जीवन गाणे…

गाडीत चढून रिझर्वेशन सीट शोधल्या. “बापरे ! दोन्ही अप्पर बर्थ !” बहीण म्हणाली.
“बघूया, लोअर बर्थच्या लोकांना रिक्वेस्ट करून आपण आपल्या सीट्स चेंज करून घेऊ शकतो. लोअर वाले कोण येतात ते बघुया.” तितकाच दिलासा मिळाला.

सामानसुमान ठेवून सध्यातरी इथेच बसुया म्हणत दोघी खालच्या सीटवर टेकलो. अजून गाडी सुटायला काही अवधी होता प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची धावपळ सुरू होती. इतक्यात एक साठीचे गृहस्थ व्हीलचेअरवरून आमच्या डब्याकडे येताना दिसले. सोबत पत्नी आणि मुलगी सामान घेऊन चालत होत्या. बोगीच्या दाराशी व्हीलचेअर थांबवुन त्या दोघींनी त्या गृहस्थांना गाडीत बसवले.

वरून धडधाकट दिसणारा तो देह अक्षरशा घसरत घसरत आमच्या सीट जवळ आला. दोघींनी त्यांना उचलून सीटवर बसवलं. मुलगी सर्व सूचना देऊन, “मी दादाला फोन करते, तो सकाळी दादरला येईल आणि तुम्हाला घरी घेऊन जाईल. काही अडचण आली तर जरा मदत करा हं.” असे आम्हाला म्हणत माघारी निघाली.

आता जुजबी बोलणं सुरू झालं. इकडचं तिकडचं बोलत असतानाच मनात विचार आला, ‘आता समोरच्या लोअर बर्थचे प्रवासी येतील. त्यांना अप्पर बर्थला पाठवू आणि आपण त्यांची सीट घेऊ. इट्स ओके.’ आता गाडी सुटण्याची वेळ झाली होती. अनाउन्समेंट झाली. एवढ्यातच एक पिता-पुत्र जोडी गाडीत चढली. पुत्र बॅग घेऊन पुढे आणि पिताश्री त्याच्यामागे जवळ येताच त्याने सीट कडे निर्देश करीत ‘रिझर्वेशन’ म्हटले. मी त्याला अप्पर बर्थवर जाण्याची विनंती करणार इतक्यात पिताश्री पुढे आले. त्यांच्या हातातल्या कुबड्या आणि अधांतरी लटकणारा पॅन्टचा एक पाय पाहताच माझी विनंती ती मूग गिळून गप्प बसली. ते सीटवर स्थिरस्थावर झाले.

आम्ही दोघींनी एकमेकींकडे अर्थपूर्ण कटाक्ष टाकले.  “ओके, नो प्रॉब्लेम ! अप्पर बर्थवर जाण्यासाठी लागणारे आमचे दोन्ही पाय तर चांगले आहेत ना ?” मनोमन परमेश्वराचे आभार मानले आणि आत्मविश्वासाने अप्पर बर्थ सर केले. लक्ष मात्र दोन्ही वरच्या लोअर बर्थ वरच्या सह प्रवाशांवर होते. काही मदत लागली तर करायची मनाची तयारी होती. मिडल बर्थवर काकू आणि समोर पित्याला आधार देणारा पुत्र निवांत विसावले होते. आता आता लोअर बर्थवरच्या समदुःखी काकांचा संवाद कानावर पडू लागला.
व्हीलचेअरवरून आलेले काका व्यवस्थित बसलेले असल्याने ते धडधाकट वाटत होते. मात्र काकूंनी त्यांचे पाय उचलून सीटवर ठेवले आणि त्यांना अलगद झोपवलेले पहाताना कुबड्यावाले काका अवाक झाले. तेच म्हणाले, “एक्सीडेंट का ?” होकारार्थी मान हलविली. उलट प्रश्न आला, “तुमचा पण ?”
“होय, काय सांगणार हो. वय वर्ष 61. पाच वर्षापूर्वी ऑफिस मधून घरी येत असताना गाडीने उडवले. जीवावर बेतले होते, ते पायावर निभावले.”, हलकेच नसलेल्या पायाला हात लावत म्हणाले, “पूर्ण पाय काढावा लागला. दुर्देव ! दुसरं काय ?”
व्हीलचेअरवाले काका चटकन म्हणाले, “अहो तुमचं तरी बरं म्हणा. कुबड्यांच्या आधाराने चालता तरी येतं. माझं बघा, वय वर्ष 65. गेली आठ वर्षे ही अवस्था आहे. दुसऱ्यांच्या आधाराशिवाय हलता सुद्धा येत नाही!” “पण तुमचा कुठे एक्सीडेंट झाला ? लोकल ट्रेन की आणखी काही ?” कुबड्या वाले काका आता सहानुभूतीने विचारू लागले”

“म्हटलं तर अपघात, म्हटलं तर नाही …”दीर्घ सुस्कारा सोडत व्हीलचेअरवाले काका सांगू लागले, “माझ्या मित्रानेच बाईक चढवली अंगावर. मित्र कसला ? छे छे .. माझी चूक होती. मी वाईट संगतीत होतो, हेच खरं ! नशेत असताना किरकोळ वाद झाले आणि मी रागाने निघून जात होतो. तो बाईक घेऊन आला आणि आणि डाव साधला. नशीब बलवत्तर म्हणून मी वाचलो. बायको मुले सेवा करतात म्हणून चाललंय.”

“होय, अगदी खरे आहे. घरची मंडळी काळजी घेतात म्हणून आपलं जिणं. नाहीतर जगण्याची इच्छाच संपून गेली आहे.” कुबडीवाले काका म्हणाले मन मोकळे करीत म्हणाले.
“खूप निराश वाटतं. कधीकधी चिडचिड होते, असे जायबंदी होऊन जगण्यापेक्षा देवाने तेव्हाच सुटका करायला हवी होती, असं वाटतं. आपल्यामुळे सर्वांना त्रास होतोच ना !” व्हीलचेअरवाले काका उद्विग्न झाले होते. आता मात्र काकू बोलत्या झाल्या.
“हे पहा, कसंही झालं तरी तुम्ही दोघेही खूप चांगले आहात. काही माणसं अंथरुणाला खिळलेली असतात. काही कोमात गेलेले असतात, तर काही फक्त श्वासोश्वास सुरू आहे, म्हणून जिवंत असतात. मग या सगळ्यांनी काय म्हणावं ? त्यांचेही नातेवाईक त्यांच्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतातच ना ? शेवटी काय ठेविले अनंते तैसेचि रहावे, चित्ती असू द्यावे समाधान ! हेच खरे.”

काकूंच्या बोलण्यातून सर्वांनाच धडा मिळाला. आपण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये किती अडकून पडले पडलेले असतो, याची जाणीव मला झाली. इतरांपेक्षा माझं दुःख मोठं म्हणत, आपण त्यालाच कुरवाळत बसतो. मात्र बाहेर नजर फिरवली तर आपल्यापेक्षा कितीतरी मोठे दुःखाचे डोंगर लीलया पेलणारी मंडळी आपल्याला दिसते. कदाचित ते हाच मंत्र जपत असतील, ‘ठेविले अनंते तैसेंचि रहावे, चित्ती असू द्यावे समाधान !’
आता आमचा लोअर बर्थचा हट्ट कापरासारखा जळून गेला होता.

नूतन बांदेकर

– लेखन : नूतन बांदेकर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800

RELATED ARTICLES

12 COMMENTS

  1. लेख उत्तम आहे.खरोखर आपण छोट्या छोट्या गोष्टींचं बावू करतो.

  2. छान लेख नूतन बांदेकर. आपण आपल छोटंस दु:ख्ख कुरवाळत बसतो. इतरांची शतपटीने मोठ्ठी असलेली दु:ख्खे आपल्याला दिसतहि नाहीत. सर्वांनी हि जाणीव ठेवायला हवी.

  3. अतिशय सकारात्मक विचार देणारी आणि जीवनाकडे सजगपणे बघण्याची दृष्टी देणारी कथा.
    हि सत्य कथाही असू शकते. फक्त ‘आपले लक्ष चौफेर हवे,’ हा संदेश यातून मिळतो.
    लिहित राहा लिहित राहा.
    शुभेच्छा 👍

  4. नूतन मॅडम, खूप छान लेख….. जगण्याची आशा चिवट असते ….आपण किती क्षुल्लक गोष्टींसाठी नाराज होत असतो…. छान शिकवण मिळाली तुमच्या लेखातून

  5. शरीर अनमोल आहे. काळजी तर घ्यायलाच हवी. परंतु दुर्दैवाने आपघात होतात. तेव्हा खचून न जाता एक अपंग व्यक्ती
    धडधाकट व्यक्ती पेक्षा कौतुकास्पद काम करु शकतो. खेळ उद्योग या क्षेत्रात अनेक असे लोक आहेत कि त्यांनी अपंगत्वावर मात करुन समाजाला दाखवून दिले आहे कि आम्ही कुठे कमी नाही.मानसिक खच्चीकरन होता कामा नये.

  6. खुप वेळा असं होतं कि आपल्याला आपलंच दु:ख मोठं वाटत असतं.. पण एक क्षण येतोच जेव्हा आपले डोळे उघडतात..
    खुप सुंदर लिखाण. तुमच्या लिखाणाला आता वेगळाच ग्रेस येउ लागलाय..!!

  7. आपण आपलच दुःख कुरवाळत बसतो पण आपल्या आजूबाजूला बघितलं तर आपल्या पेक्षा जास्त दुःखी लोक असतात पण तरी धीराने आपलं आयुष्य जगतात

  8. खरंय ! आपल्याला मिळालेलं धडधाकट शरीर हे बहुमोल आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिल्पा कुलकर्णी on स्नेहाची रेसिपी ५
शितल अहेर on कविता
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on महिला गाडीग्रुप : अनोखे संमेलन
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on जिचे तिचे आकाश… १
गोविंद पाटील on महिला दिन : काही कविता
प्रोफेसर डॉ सुवर्णा गुंड-चव्हाण on “सुवर्णधन” सन्मानित