Tuesday, September 16, 2025
Homeयशकथापंडित बिरजू महाराज

पंडित बिरजू महाराज

देशातील प्रसिद्ध कथ्थक नर्तक आणि पद्मविभूषण पुरस्कार विजेते पंडित बिरजू महाराज यांचे हृदयविकाराच्या झटक्याने काल निधन झाले, ते ८३ वर्षांचे होते. महाराजांच्या निधनाची माहिती त्यांचे नातू स्वरांश मिश्रा यांनी दिली.

योगदान
कथक नृत्य हे दोन शब्द उच्चारले तरी पं. बिरजू महाराज हे नाव समोर यावे, इतके या दोहोंत घट्ट नाते आहे. नृत्याला अभिजात कला न मानता, अंगविक्षेप म्हणून हेटाळणीयुक्त नजरेने त्याकडे पाहण्याच्या काळात बिरजू महाराजांनी नृत्याला केवळ प्रतिष्ठा मिळवून दिली नाही तर या कलेतील अस्सल अभिजातता जपली.

नृत्य हा स्त्रियांनी करण्याचा प्रकार आहे. पुरुषाच्या जातीला हे बरे नव्हे, अशा मध्ययुगीन मानसिकतेला बिरजू महाराजांचे नृत्यमय आयुष्य हेही तितकेच सनदशीर आणि प्रभावी उत्तर आहे. गायन, वादन व नृत्य यांचा एकत्रित आविष्कार म्हणजे संगीत. इतकी सहज, सोपी आणि सुटसुटीत व्याख्या संगीताची करण्यात आली आहे; पण गायन व वादन या कलेकडे ज्या आदराने पाहिले जाते, ते नृत्याच्या वाट्याला फार उशिरा आले.

४ फेब्रुवारी १९३८ रोजी उत्तरप्रदेशातील लखनौ येथे कालका बिन्दादीन घराण्यात जन्म झाला. जन्मतःच नाव ठेवण्यात आले दुखहरण, नंतर हे नाव बदलून बृजमोहन ठेवण्यात आले. वडील जगन्नाथ महाराज लखनौ घराण्याचे होते आणि अच्छन महाराज म्हणून ओळखले जात. अच्छन महाराज आपल्या शिष्यांना शिकवित असताना तीन वर्षाचे बिरजू त्यांच्या मांडीवर बसून पहात असत. तीन वर्षाच्या बालकाचे थिरकणारे पाय पाहून अच्छन महाराजांनी त्यांना नृत्याचे शिक्षण देण्यास सुरुवात केली.

पण बिरजू नऊ वर्षाचा असताना पितृछत्र हरवले. वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांचे काका लच्छू महाराज व शंभू महाराज यांनी त्यांना नृत्याचे शिक्षण दिले. लच्छू महाराज लास्यांगात मुरलेले तर शंभू महाराजांचा अभिनयात हातखंडा. बिरजू महाराज यांनी हे सगळे टीपकागदाप्रमाणे आत्मसात केले. थोर गुरूंकडून मिळालेली विद्या, असामान्य प्रतिभा आणि अंत:प्रेरणा या त्रयींवर पुढे महाराजजींनी कथक नृत्यात नवनवीन प्रयोग केले. त्यांचे पूर्वज दरबारात नृत्य करत होते. ते नृत्य आता रंगमंचावर आले आहे याचे भान ठेवून बिरजू महाराज यांनी ते अधिकाधिक लोकाभिमुख केले.

वयाच्या 13 व्या त्यांनी नवी दिल्लीतील संगीत भारती या संस्थेत कथक नृत्य शिकविणे सुरु केले होते. त्यानंतर त्यांनी दिल्लीतील भारतीय कला केंद्रात शिकविण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांना संगीत नाटक अकादमीच्या कथक कला केंद्रात शिकविण्यासाठी बोलावणे आले.

केंद्रप्रमुख पदावरून 1998 मध्ये त्यांनी निवृत्ती घेतली व कलाश्रय या नृत्यनाट्य विद्यालयाची स्थापना केली. कालका बिंदादीन घराण्याचे प्रमुख नर्तक असलेल्या बिरजू महाराज यांना 3 मुली व 2 मुले असून, त्यातील ममता महाराज, दीपक महाराज आणि जय किशन महाराज कथक नृत्याच्या क्षेत्रातच कार्यरत आहेत.

बिरजू महाराजांचे अवघे आयुष्य शास्त्रीय नृत्याच्या ध्यासाने झपाटलेले आहे. कथक नृत्याविषयी त्यांनी समाजभान जागृत केले. ही कला लोकांपर्यंत पोहचवली. या दरम्यान किती शिष्य घडवले याची तर गणना होऊ शकत नाही. ८१ वर्षांच्या वयातदेखील बिरजू महाराजांचा नृत्याविष्कार कोणाही तरुण कलाकाराला लाजवेल असाच असायचा.

त्यांनी अनेक नृत्यनाट्यांची रचना केली. ’फाग-लीला’, ’मालती-माधव’, ’कुमार संभव’ ही काही नावे. या नृत्यनाट्यांमधे त्यांनी स्वत: प्रमुख भूमिकाही साकारल्या. त्यांनी ’रोमिओ-ज्युलिएट’ या महान नाटककार शेक्सपियरच्या अजरामर कलाकृतीवर सर्वांगसुंदर असे नृत्य-नाट्य सादर केले. संपूर्ण देशभरात आणि विदेशात बिरजू महाराज यांच्या नृत्याने रसिकांना मंत्रमुग्ध केले आहे. बिरजू महाराज यांचे नृत्य पहाणे हा एक स्वर्गीय अनुभव असे. त्यांच्या सहज-सुंदर रेषा, अप्रतिम पवित्रे, जणू एक जिवंत चित्रशिल्पच ! मोराच्या गतीत जेव्हा बिरजू महाराज मोराची चाल करत तेव्हा खरोखरच लखलखीत पिसाऱ्याचा, डौलदार मानेचा मोर आपल्यासमोर नाचतोय असे वाटे.

हिंदी चित्रपटसृष्टीलाही पं.बिरजू महाराज यांचे योगदान लाभले आहे. सत्यजीत रे यांच्या “शतरंज के खिलाडी” या चित्रपटासाठी त्यांनी दोन गाणी गायली असून, त्यावर नृत्य दिग्दर्शन देखील केले आहे. 2002 मध्ये आलेल्या संजय लीला भन्साळी यांच्या देवदास चित्रपटातील ‘काहे छेड छेड मोहे’ या माधुरी दीक्षित यांच्यावर चित्रीत झालेल्या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन केले आहे. याशिवाय देढ इश्किया, उमराव जान, बाजीराव मस्तानी या चित्रपटातील कथक नृत्यांचे नृत्य दिग्दर्शनही त्यांनी केले आहे.

बिरजू महाराज यांना अनेक मोठमोठे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. देशाचा सर्वोच्च पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करून भारत सरकारने त्यांचा गौरव केला आहे. बनारस आणि खैरागड या विद्यापिठांनी त्यांना डॉक्टरेट प्रदान केली आहे. याशिवाय कालिदास सन्मान, ’नृत्य चुडामणी’, आंध्र रत्न, सोविएत लँड नेहरू पुरस्कार असे विविध पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.

पंडीत बिरजू महाराज यांना भावपूर्ण श्रद्धांजली

– लेखन : योगेश शुक्ला
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा
सुबोध शशिकांत महाबळे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं