Saturday, July 5, 2025
Homeसाहित्यओठावरलं गाणं...

ओठावरलं गाणं…

नमस्कार 🙏 “ओठावरलं गाणं” या सदरात रेडिओ वर गाणी ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांचं पुन्हा एकदा दमदार स्वागत.

आज मला आमच्या लहानपणी रेडिओवर लागणारं एक गाणं आठवलं. लहानपणी या गाण्याचे कवी वगैरे गोष्टी कळत नव्हतं. फक्त गाण्याची चाल आवडली कि ते गाणं लगेचच तोंडपाठ व्हायचं.

मित्रांनो, हे गाणं लिहिणारी, गाणारी आणि संगीत देणारी व्यक्ती एकच आहे बरं का…हे गाणं लिहिणाऱ्या, गाणाऱ्या आणि संगीत देणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे “शरद मुठे” ! या बालगीताचे शब्द आहेत –

छान छान छान मनीमाऊचं बाळ कसं गोरं गोरं पान

मनीमाऊचं छोटसं पिल्लू किती गोंडस दिसतं हे अनुभवण्यासाठी आपल्याला या मुलांच्या मधे मूल होऊन वावरावं लागेल तेंव्हाच माऊच्या पिल्लाचा गोंडसपणा आपल्या लक्षात येईल. मनीमाऊचं छोटसं पिल्लू म्हणजे मुलांच्या खेळातला पार्टनर असं म्हटलं तरी चालेल. या मनीमाऊच्या गोंडस पिल्लापाशी ही मुलं तासनतास खेळत असतात, त्याला दूध पाजतात, त्याच्यासाठी घर पण बनवतात. मनीमाऊचं छोटसं पिल्लू म्हणजे या मुलांचं सर्वस्व असतं.

इवलीशी जिवणी अन् इवलेसे दात
चुटूचुटू खाते कसा दूध आणि भात
इवले इवले डोळे इवले इवले कान

या मनीमाऊच्या पिल्लाचं सगळं छोटं छोटं आहे जे या मुलांना खूप आवडतं. कविनं याचं खूपच छान वर्णन केलं आहे. माऊच्या पिल्लाची जिवणी जशी लहान आहे तसंच तोंडामधले दात देखील अगदी छोटे छोटे आहेत. पण छोट्याशा ताटलीत जर थोडासा दूधभात तुम्ही कालवून दिलात तर ते पिल्लू अगदी आवडीने तो दूधभात मटकावतं. “चुटुचुटू” हा अतिशय सुंदर शब्द या गाण्यात आहे ज्यातून दूधभात खाणाऱ्या मनीमाऊच्या पिल्लाचं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं रहातं आणि त्याच्या भोवती कोंडाळं केलेली लहान मुलंही दिसायला लागतात.

इवल्याश्या पायामधे इवलासा चेंडू
फेकता मी घ्याया धावे दुडूदुडू दुडू
इवल्याश्या शेपटीची झाली कमान

मी जेंव्हा माझ्या हातातला छोटासा चेंडू लांब फेकतो तेंव्हा हे छोटंसं पिल्लू लगेच दुडूदुडू धावत जाऊन तो चेंडू घेऊन पुन्हा माझ्याकडे घेऊन येतं आणि त्याला धावताना पाहून आम्हा मुलांना खूप खूप मजा वाटते. कधीकधी चेंडू फेकल्यावर तो आम्हाला परत आणून न देता एकटंच त्या चेंडूबरोबर खेळत रहातं. कधीकधी मात्र त्याचं काय बिनसतं कळतं नाही. आमच्यापासून लांब जाऊन, आमच्याकडे रागाने बघत ते शेपटी फुगवतं आणि मग त्याच शेपटीची त्याच्याही नकळत छान कमान होते. ती कमान पहात असताना त गोंडस माऊचं पिल्लू आणखीनच सुंदर दिसतं.

आली आली मनीमाऊ दूर जरा जाऊ
बाळाची मजा सारी दुरूनीया पाहू
आईशी बाळ खेळे विसरून भान

आता त्या लहान मुलांच्यामधे थोडासा मोठा असणारा एक मुलगा सगळ्या मुलांना सांगतोय कि “ती पहा मनीमाऊ येतेय तिच्या पिल्लाला घ्यायला तेंव्हा आपण जरा या पिल्लपासून थोडंसं लांब जाऊ म्हणजे आपल्याला बाळाची मजा दुरूनही पहाता येईल. मनीमाऊनं त्या पिल्लाचं अंग चाटून चाटून स्वच्छ केलं पहा‌. आपल्याबरोबर चेंडू खेळणारं हे मनीमाऊचं बाळ आता तिच्या अंगावरुन उड्या मारतंय, मनीमाऊ जरा लांब गेली कि, ती येत नाही असं पाहून धावत जाऊन तिला बिलगतंय आणि तिच्या कुशीत शिरतंय. या गोंडस दिसणाऱ्या मनीमाऊच्या बाळाचा आपल्या आईबरोबर चालणारा हा खेळ लांबून पहाताना तर आणखीनच मजा येते आहे.

रेडिओवर आमच्या लहानपणी रेडिओवर लागणारं हे गाणं आजही लागलं तर अजूनही आम्हाला गाणं ऐकताना लहान झाल्यासारखं वाटतं.

विकास मधुसूदन भावे

– लेखन : विकास मधुसूदन भावे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800

RELATED ARTICLES

20 COMMENTS

  1. मनी माऊचं बाळ अगदी तंतोतंत डोळ्यासमोर उभं केलंस, विकास.
    असंच रसग्रहण करणं जा, गीतांचं. खूप छान अनुभूती देऊन जातं.

  2. विकासजी, या गाण्याचे काव्य तर छान आहेच, कवीने चालही छान दिली आहे. आणि त्याचं रसग्रहण तुम्ही अगदी यथार्थपणे केलं आहे .
    मनीमाऊच्या बाळाशी हळुवारपणे व मजेत खेळणा-या गोंडस मुलांचं चित्र बरोब्बर रेखाटलं आहेत. वा.

  3. माझं खूपच आवडतं गाणं. लहान मूल दिसलं की मीही लहान होते आणि हे गाणं म्हणते. लहान बाळ अगदी खुष होतं आणि हाताच्या दोन बोटांनी छान छान असं म्हणून हसतं. मग तर आपली गट्टी जमलीच समजायची. असो गाणं म्हणताना ती माऊ डोळ्यासमोर उभी राहते ते रसग्रहण काकांनी अगदी हुबेहूब वर्णन केले आहे. खूप छान.

  4. खरंच,लहानपणीचं आवडलेलं हे गाणं अजूनही पाठ आहे.
    गाण्याचे बोल,चाल छान आणि डोळ्यासमोर चित्र साकारते.
    आपण केलेले रसग्रहण छानच.
    सध्या आमच्याकडे हे गाणे चालूच असते.

  5. लहान मनीमाऊच्या बाळाच्या लीला तंतोतंत अनुभवल्या.भावे सर सुरेख नेहमीप्रमाणे गाण्याचे/कवितेचे अंतरंग उलगडवलेत.
    -शुभा खांबेकर पाणसरे

  6. एका सुंदरशा बालगिताचे सुंदरसे वर्णन वरील गाण्यात केलेले आहे.आणि. अशा ह्या गोड बालगिताचे रसग्रहण अर्थात अर्थ उलगडून सांगणे म्हणजे बालपणाचा काळ डोळ्यापुढे उभा राहतो.आणि श्री.विकास.सर आपण ह्या भावनांशी समरसून सदर गाणे खूप छान उलगडून सांगितले आहे.

  7. पुन्हा एकदा बालपणातल्या आठवणी जाग्या झाल्या, ‘मनीमाऊचं बाळ गोरं गोरं पान’ छान बालगीत..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments