Wednesday, September 17, 2025
Homeसाहित्यमनातील कविता : निरोप

मनातील कविता : निरोप

आपल्या पोर्टलवर गेले ६ महिने सुरू असलेले “मनातील कविता” हे सदर आज आपला निरोप घेत आहे. या निमित्ताने लेखिका सौ गौरी जोशी कंसारा यांचं समारोप करणारं मनोगत. सौ गौरी जोशी कंसारा यांनी अत्यन्त अभ्यासपूर्वक, तन्मयतेने, नियमितपणे लेखन करून एक नवा साहित्यिक प्रयोग यशस्वी केला, या बद्दल आपण सर्व त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या पुढील  लेखनासाठी हार्दिक शुभेच्छा देऊ या..
– टीम एनएसटी

सर्व रसिक वाचकांना माझा सप्रेम नमस्कार. 🙏🏻
माझा कविता वाचनाचा आणि काही काळाने लेखनाचा प्रवास सुरू झाला तो नाशिक मधील
‘मातोश्री रामप्यारीबाई सारडा कन्या विद्या मंदीर’ या माझ्या परमप्रिय शाळेपासून !
वक्तृत्व, निबंध अशा स्पर्धांसाठी आम्हाला पाठवतांना आमच्या पूज्य शिक्षकांनी, आम्हाला स्वतःलाही जे ठाऊक नव्हते असे आमच्यातले गुण हेरले आणि त्यांना जोपासण्यास मदत केली.

आजही लिहिताना लेखणी अडकत नाही ती त्यांच्याच कृपेने. सुंदर पुस्तके, भव्यदिव्य प्रतिभेचे लेखक आणि कवी यांच्या भेटी झाल्या त्या याच वयात.
‘कसदार’ ची ओळख आणि आवड दोन्ही रुजवली ती या शाळेनंच !

ऐतिहासिक, सामाजिक, वैज्ञानिक, विनोदी, रहस्यमय, ललित, वास्तववादी, काल्पनिक… खूप काही वाचलं… जे लक्षात राहिलं त्यानं आजवर साथही दिली…पण
‘का ?’ कोण जाणे, कवितेशी एक वेगळंच नातं जुळलं. ही माझी कुणीतरी सखी आहे, असं वाटू लागलं. उचंबळून आलेल्या जीवाला शांत करण्याचा, व्यक्त होण्याचा हा इतका लाघवी, लडिवाळ मार्ग… नातं जोडलं जायला मग आणखी काही वेगळी गरज उरलीच नाही !

आधी बाल कविता, त्यानंतर शालेय बालभारतीतील कविता, त्यानंतर मग एकेक कवी आणि त्यांच्या कवितांचे वाचन असा हा प्रवास आजवर सुरू आहे.

शाळा कॉलेजमध्ये असताना आणि त्यानंतरही मी लिहीत होते पण ते माझ्यासाठी…
माझ्यापुरतं…कुठे काही छापावं, प्रसिद्ध करावं असं कधी वाटलंही नाही.

अगदी अलिकडे, काही जिव्हाळ्याच्या नात्यांनी आग्रह केल्याने, पुढाकार घेतल्याने ‘मुक्तरंग‘ नावाचे एक फेसबुक पेज मी सुरू केले. अर्थात त्यातुनही काही खूप साध्य व्हावं किंवा कवयित्री म्हणून सिद्ध व्हावं असा कोणताही उद्देश नव्हता…आजही नाही.

कवितेच्या प्रांतात माझा देव म्हणजे ‘गझल सम्राट सुरेश भट’ ! त्यांच्या गझलांनी, त्यात असलेल्या खयालांनी, त्या रचनांमधल्या भावविभोरतेने वेड लावलं. ह्या माझ्या देवाला त्यांच्या स्मृती दिनाप्रित्यर्थ आदरांजली अर्पण करावी म्हणून मी माझ्या रचने बरोबरच माझ्या मनातल्या भावना व्यक्त करणारं एक छोटंसं लेखन केलं. त्याला खूप प्रतिसाद मिळाला. असं आणखी लेखन करा अशी गोड मागणी करणारे मेसेजेस ही आले. मग गझल सम्राटांच्या चरणी वंदन केलं, त्यांच्याकडे आशीर्वादाची याचना केली आणि हे लेखन पुढे न्यायचं ठरवलं.

माझी प्रार्थना सच्ची होती, ती पोहोचली होती आणि माझ्या देवाने मला आशीर्वाद दिला होता म्हणून एके दिवशी श्री. देवेंद्र भुजबळ सरांनी, ‘अश्या प्रकारचे लेखन आपल्या पोर्टल वर सदर स्वरूपात कराल का ?’ अशी विचारणा केली. त्यांनी दिलेली संधी आणि सदिच्छा यामुळे ‘मनातली कविता‘ हा प्रवास सुरू झाला. भावलेले एकेक कवी, त्यांची माहिती म्हणजे त्यांचे प्रकाशित, अप्रकाशित साहित्य, त्यांची लेखन शैली, त्यांच्या मला आवडणाऱ्या काही कविता, त्यातलीच मनात रुजलेली एक लाडकी कविता, माझ्या बौद्धिक कुवतीप्रमाणे या कवितांचे रसग्रहण आणि सरतेशेवटी आदरांजली म्हणून माझ्या मनाने जन्माला घातलेली एक कविता असं ह्या लेखनाचं स्वरूप होतं.

खरं म्हणजे ‘कवितेचे रसग्रहण’ ही एक संकल्पना आहे. मी माझ्या लेखनात ह्याचा वारंवार उल्लेख केलेला आहे की कवितेला नक्की काय सांगायचं आहे, ह्याचे आपण केवळ अंदाज बांधायचे…क्षितिजाच्या पार जाणाऱ्या तेजाची कल्पना चौकटीत उभं राहून कशी करायची ?… आणि म्हणून केवळ कवितेचे रसग्रहण इतका संकुचित आवाका न ठेवता माझ्या लेखनातून त्या कवीचे भावविश्व आणि शैली ओळखण्याचा आणि ‘कविता’ ह्या शब्दाचा खऱ्या अर्थाने परिचय करून घेण्याचा आणि देण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न होता.

ह्यात, माझ्यावर ज्यांच्या कवितांचे संस्कार झाले अश्या मला भावलेल्या कविवर्यांवर मी लिहीत गेले आणि बोलता बोलता ही संख्या कधी २४ वर पोहोचली कळलंच नाही.

१. कवयित्री शांता शेळके
२. कवी माणिक गोडघाटे (कवी ग्रेस)
३. कवी सुरेश भट
४. कवी बा.भ. बोरकर
५. कवयित्री इंदिरा संत
६. कवी वि. वा. शिरवाडकर. (कवी कुसुमाग्रज)
७. कवी वसंत बापट
८. कवी त्रिंबक बापुजी ठोमरे (बालकवी)
९. कवयित्री बहिणाबाई चौधरी
१०. कवी विंदा करंदीकर
११. कवी आत्माराम रावजी देशपांडे. (कवी अनिल)
१२. कवी वा. रा. कांत
१३. कवी कृष्णाजी केशव दामले
१४. कवी राम गणेश गडकरी. (कवी गोविंदाग्रज)
१५. कवी ग. दि. माडगूळकर
१६. कवयित्री पद्मावती गोळे
१७. कवी चिंतामणी त्रिंबक खानोलकर (कवी आरती प्रभू )
१८. कवी भा. रा. तांबे
१९. कवी माधव पटवर्धन. (कवी माधव ज्युलियन)
२०. कवी सुधीर मोघे
२१.कवी बा. सी. मर्ढेकर
२२. कवी नारायण सुर्वे
२३. कवी मंगेश पाडगांवकर
२४. कवी प्रल्हाद केशव अत्रे. (कवी केशव कुमार)

ह्या २४ कवींचा ह्या सदरात समावेश आहे. अर्थात, मराठी काव्य विश्वात केवळ ह्यांचेच अस्तित्त्व होते असे मला मुळीच म्हणायचे नाही. कित्येक अनमोल रत्ने माझ्याकडून राहिली आहेत. त्याबद्दल मी वाचकांची क्षमा ही मागते, परंतू हे लेखन म्हणजे केवळ जे रुचलं, जे रुजलं त्याला पालवी फुटून उमललेली फुले आहेत.
ह्याच फुलांची माला ‘ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके’ यांच्या पासून ‘कंठहार’ रूपाने गुंफायला सुरुवात केली होती. मागील सप्ताहात ‘कवीवर्य केशव कुमार’ अर्थात आचार्य अत्रे यांचे २४ वे पुष्प त्यात गुंफून तो ‘आनंद’ उरी घेऊन आज ‘मनातली कविता‘ ह्या सदराचा समारोप करते आहे.

मी खरोखर अतिशय भाग्यवान आहे की मला ही संधी मिळाली. ही संधी दिल्याबद्दल श्री. देवेंद्र भुजबळ सरांचे मनापासून आभार ! आपण सर्व वाचकांनी अगदी मनापासून माझं लेखन वाचलं, त्याचं कौतुक केलं, भरभरून शुभेच्छा आणि आशीर्वाद दिलेत त्याबद्दल आपणा सर्वांचेही खूप खूप आभार !

ह्या प्रवासात सगळ्यात मोठा आनंद खरं तर माझ्याच वाट्याला आला आहे…कसा ते सांगू ?..
मनातली कविता‘ या निमित्ताने ह्या कविवर्यांशी माझ्या पुन्हा भेटी झाल्या. त्यांच्या कविता पुन्हा एकदा भेटल्या आणि प्रत्येकीने स्वतःचा नव्याने परिचय करून दिला !

या नव्या परिचयाचे कारण, मी पूर्वीपेक्षा जरा बुद्धीने, विचाराने अधिक परिपक्व झाले आहे की मनाने, संवेदनेने अधिक हळवी झाले आहे, हे मला निश्चिपणे नाही सांगता येणार पण मला कवितांचा मोह, त्यांचे प्रेम आणि त्यांच्याबद्दल अनामिक ओढ वाटण्याचे हेच कारण असावे…
‘संपूर्ण जाणून घेतल्यानंतरही उरणारी एक हुरहुर लावणारी अनभिज्ञता !’

डॉ गौरी जोशी – कंसारा

– लेखन : डॉ. गौरी जोशी-कंसारा
–  संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800

RELATED ARTICLES

7 COMMENTS

  1. आपण माझे लेखन जीव लावून वाचले, इतकी सुंदर निरोपाची कविता लिहिलीत…मी भरुन पावले 🙏🏻
    आपल्या सारख्या रसिक वाचकांचे प्रेम असेच मिळत राहो हीच प्रार्थना.
    आपले खूप खूप आभार 🙏🏻

  2. मनातील कविता
    किती छान सदर
    आठवणीत राहील सदैव
    गौरीताईंच्या शब्दांचं झुंबर

    खूप जड जातंय
    निरोप देताना
    गौरी ताईंना
    आणि रसिक वाचकांना

    कशी व्यक्त करणार
    कधी न संपणारी हुरहुर
    या मौल्यवान सदरातून भेटले
    माय मराठीचे कोहिनूर

    प्रत्येक कविसाठी गुंफला
    गौरी ताईंनी सुरेख शब्दांचा हार
    सर्व वाचकांतर्फे मानतो मी
    कवयित्री गौरी ताईचे आभार

    राजेंद्र वाणी
    दहिसर मुंबई 🙏🌹

  3. गौरी, तुझे लेख अत्यंत माहितीपूर्ण तर होतेच पण तू ते अतिशय रंजकही केलेस. तुझ्या पुढच्या लेखनासाठी खूप शुभेच्छा.

  4. मनातली कविता हे सदर फारच वाचनीय होते…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Manisha Shekhar Tamhane on झेप : ३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा
सुबोध शशिकांत महाबळे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं