माणुसकी जपा जरा ।
आता तरी नीट वागा ।
एक शुभ्र वस्त्र फक्त ।
साडे तीन हात जागा ।।
अरे सोड जमाखोरी ।
किती घालणार घरी ।
टीचभर पोटासाठी ।
नको फिरू दारोदारी ।।
नको लोभ आणि माज ।
नको भविष्याची खंत ।
सोड गरीबी पैश्याची ।
राहा मनाने श्रीमंत ।।
जेंव्हा बदलते वेळ ।
माती मोल होतं सारं ।
मग आठवण येते ।
आज बोलतो मी खरं ।।
एक दिवस आपली ।
मातीच होईल वेड्या ।
आपला होऊन जग ।
तोड मी पणाच्या बेड्या ।।
तुझं माझं माझं तुझं ।
टाक मोडुन हा बंड ।
माणसाने माणसाला ।
कशासाठी द्यावा दंड ।।
एक क्षण सुखासाठी ।
नको धरू मनी हट्ट ।
आपलेपणाचे नाते ।
सांभाळून ठेव घट्ट ।।
तुझी आणि माझी वेड्या ।
होऊन जाईल माती ।
मरण्याच्या आधी जरा ।
जपून ठेवावी नाती ।।
– रचना : रा. वि. पवार (रामदास आण्णा)