Tuesday, September 16, 2025
Homeलेखहिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे

शिवसेना संस्थापक, हिंदूहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची २३ जानेवारी रोजी जयंती आहे. त्यानिमित्ताने हा विशेष लेख…

वंदनीय बाळासाहेब ठाकरे म्हणजे महाराष्ट्राचा पुरुषार्थ ! बाळासाहेब म्हणजे स्वाभिमानाचं दुसरं नाव ! बाळासाहेब म्हणजे मराठी माणसाचा बुलंद आवाज ! उसळलेल्या राजकीय तुफानाला रोकण्याची किमया त्यांच्या अंगी होती. म्हणूनच ते भगव्या तुफानाचे सारथी होऊ शकले. शिवसेनाप्रमुख आज जरी आमच्यात नसले, तरी त्यांचे परखड व जहाल विचार आमच्या रक्तात भिनले आहेत अन् तेच आम्हा शिवसैनिकांसाठी प्रेरणादायी आहेत. त्यामुळे त्यांचे स्थान आमच्या हृदयात ध्रुवतारा सारखे अढळ आहे.

बाळासाहेबांनी शिवसैनिकांची जात, धर्म, पंथ, भाषा न पहाता, त्यांच्या कर्तबगारीवर, निष्ठा व कार्यकर्तुत्वावर अधिक भर दिला.

वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म, सामाजिक कार्याचा वसा घेतलेल्या प्रबोधनकार ठाकरे यांच्या घराण्यात २३ जानेवारी १९२६ रोजी झाला, अन् जणू काही हिंदुत्वाचा आधारवड उदयास आला. वंदनीय प्रबोधनकार ठाकरे यांच्या समाज प्रबोधनाच्या विचारांची कास धरून बाळासाहेबांनी अंधश्रद्धा व जातीभेदाला प्रखर विरोध केला. महाराष्ट्रातील मागास जाती-जमातीतील युवकांना शिवसेनेकडे आकृष्ट करून बाळासाहेबांनी त्यांच्या नेतृत्वगुणांना वाव दिला. बाळासाहेबांनी शिवसैनिकांची योग्यता व निष्ठा परखून त्यांना नगरसेवक, महापौर, संघटनेतील महत्वाची पदे, मंत्री, मुख्यमंत्री आदी महत्वपूर्ण पदे बहाल केलीत. यावरून ते पुरोगामी व मानवतावादी विचारसरणीचे लोकनेते होते, हे निष्पन्न होते.

बाळासाहेबांनी सर्वधर्मसमभावाचा अंगिकार करून सर्वधर्मियांना शिवसेनेत मानाचं स्थान दिलं. शिवसेना नेते शाबीर शेख तर त्यांचे सर्वाधिक आवडते शिवसैनिक होते. सिनेअभिनेता दिलीपकुमार यांचे जिवलग मित्र तर, प्रख्यात गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना ते भगिनी मानत. महानायक अमिताभ बच्चन तर त्यांना पितासमान मानत. याशिवाय विविध पक्षांचे नेते उदा. इंदिरा गांधी, वसंतराव नाईक, शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, विलासराव देशमुख आदी नेत्यांशी त्यांचे स्नेहाचे संबंध होते. “राजकारण अन् मैत्री ह्या दोन भिन्न गोष्टी आहेत”, हे त्यांनी कृतीने सिद्ध केलं.

आचार्य अत्रे, पु.ल.देशपांडे या साहित्यिकांशी त्यांचे तात्विक मतभेद होते, पण त्यांनी मित्रत्वाचं नातही जपलं. पक्षाभिनिवेश बाजूला सारून बाळासाहेबांनी सौ. प्रतिभाताई पाटील आणि मा. प्रणब मुखर्जी यांना शिवसेनेतर्फे राष्ट्रपती पदासाठी पाठिंबा दिला.

भारतातील लोकांना शिस्त लागावी अन् देशाची एकता व अखंडता अबाधित रहावी, या उद्देशाने माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांनी घोषित केलेल्या आणीबाणीचे बाळासाहेबांनी थेट समर्थन केलं. ह्या सर्व बाबी विचारात घेतल्या तर, बाळासाहेबांची विचारधारा ही सर्वसमावेशक होती, हे दृष्टोत्पत्तीस येते.

काही माणसं ताडामाडा प्रमाणे उंच वाढून स्वतःचं अस्तित्व निर्माण करतात. पण बोटावर मोजण्याइतकीच माणसं वटवृक्षाप्रमाणे वाढून दुसऱ्यांना सावली देतात. ते वटवृक्ष म्हणजे बाळासाहेब ठाकरे होत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या करारी बाण्यामुळे महाराष्ट्राकडे कोणी वाकड्या नजरेनं पाहण्याची हिम्मत केली नाही. आतंकवादी संघटना देखील त्यांना घाबरत असत, एवढा त्यांचा दरारा होता.

मंत्रालयात सत्ता असो वा नसो, बाळासाहेबांचा शब्द तेथे प्रमाण मानला जात असे. संयुक्त महाराष्ट्र लढा असो वा महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न असो,
त्यांनी सदैव मराठी भूमीपुत्रांचा बुलंद आवाज बनून, शिवसेनेच्या माध्यमातून मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी प्रखर लढा दिला. आजही त्यांच्या पावलावर पाऊल टाकून हा लढा अविरत सुरू आहे. मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत मोरारजी देसाई यांचा महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करण्याचा कुटील डाव बाळासाहेब अन् मराठीप्रेमी सहकाऱ्यांनी हाणून पाडला. अशाप्रकारे त्यांनी महाराष्ट्र-मुंबईची नाळ अटूट ठेवली. कृतज्ञतेच्या भावनेतून बाळासाहेबांनी संयुक्त महाराष्ट्र लढ्यात धारातिर्थी पडलेल्या १०६ हुतात्म्यांचे स्मारक मुंबईच्या फ्लोरा फाऊंटन येथे उभारून त्यांना खरी मानवंदना दिली. आम्ही मराठी भूमीपुत्र देखील या हुतात्म्यांना शतश: वंदन करतो.

राजकारण, संगीत, कला, नाट्य, चित्रपट, लेखक, संपादक, जहाल वक्ता अन् व्यंगचित्रकार असं बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणून बाळासाहेबांची जनमानसात ख्याती होती अन् आजही आहे. कारण शिवरायांच्या महाराष्ट्रावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात त्यांना मानाचं स्थान आहे. पण या मागे एक तेजस्वी प्रेरणा होती, ती म्हणजे स्व.मिनाताई ठाकरे. आयुष्यभर त्या त्यांच्या पाठीशी सावलीसारख्या उभ्या राहिल्या.

थोरले सुपुत्र बिंदूमाधव यांचे दुर्दैवाने अपघाती निधन झाल्यावर ठाकरे परिवारावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला होता. त्यावेळी मिनाताईंनी स्वतःला सावरत बाळासाहेबांना धीर देऊन मानसिक आधार दिला. त्यांना तसूभरही खचू दिलं नाही. त्यांचे मनोबल ढळू दिले नाही. कारण शिवसैनिकांच्या जडणघडणीची जबाबदारीही त्यांच्यावर होती. कारण बाळासाहेब हे शिवसैनिकांना आपल्या मुलांसारखे वागवायचे. तात्पर्य, वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि वंदनीय मांसाहेब मिनाताई ठाकरे हे दाम्पत्य खऱ्या अर्थानं शिवसैनिकांचे माता-पिता होते, असे म्हणणे संयुक्तिक ठरेल.

प्रत्येक गोष्टीचं सूक्ष्म निरीक्षण करणं, पक्षी-प्राण्यांवर अतूट प्रेम करणं, निसर्गाचा आस्वाद घेणं, गडकिल्ले भ्रमण करणं, नेते-अभिनेते यांच्या हुबेहूब नकला करणं अन् मुख्यतः राजकीय नेत्यांची व्यंगचित्रे रेखाटणं हे बाळासाहेबांचे आवडते छंद होते. राष्ट्रीय पातळीवर त्यांची ख्यातनाम व्यंगचित्रकार म्हणून ओळख होती. इतकेच नव्हे तर, बाळासाहेब उत्कृष्ट नकलाकार देखील होते. आणखी एक जमेची बाजू म्हणजे त्यांना स्मरणशक्तीची जणू दैवी देणगीच होती.त्यांचे विविध भाषांवर प्रभुत्व होते अन् त्याला अभ्यासाची जोड होती.पत्रकारिता हे एक व्रत आहे, अशी त्यांची धारणा होती.

उल्लेखनीय गोष्ट म्हणजे दरवर्षी त्यांचे विजयादशमीला होणारे शिवाजी पार्क येथील जहालवादी भाषण ऐकण्यासाठी लाखो शिवभक्त न चुकता तेथे येत असतं.कारण ते ऐकल्याशिवाय चाहत्यांना विजयादशमी साजरी केल्यासारखं वाटायचं नाही.

पत्रकारांना उद्देशून बाळासाहेब म्हणतात, आपले नाव व्हावे, या हेतूने कृपया कोणी पत्रकारिता करू नये. सामाजिक बांधिलकीच्या नात्याने आपापली लेखणी सामान्य माणसाचे प्रश्न सोडविण्यासाठी चालवा. जनजागृती व लोकशिक्षण हेच खरे पत्रकारितेचे दोन स्तंभ आहेत, असा संदेश त्यांनी वृत्तपत्र क्षेत्रातील सदस्यांना दिला.

व्यंगचित्रकार म्हणून पत्रकारिता क्षेत्रात त्यांचे स्थान अनन्यसाधारण होते. बाळासाहेब हे उच्च कोटीचे “मार्मिक” व्यंगचित्रकार होते. त्यांचे “फटकारे” हे व्यंगचित्रांचे पुस्तक पाहून तर वाचक थक्कच होतात. सर्वसामान्य लोकांच्या ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडून, सरकारला ते प्रश्न सोडविण्यास भाग पाडण्यासाठी “सामना” या मुखपत्रात त्यांची लेखणी तलवारीसारखी चालली. अन् त्याच लाईनवर ती आजही चालत आहे. याशिवाय पुस्तकांप्रमाणेच माणसं वाचणं हा त्यांचा छंद होता. तात्पर्य, बाळासाहेब ठाकरे हे पत्रकारितेचे चालते बोलते विद्यापीठच होते.

मराठी माणसाच्या अस्मितेचे जतन, संवर्धन व रक्षण करण्याच्या उद्देशाने बाळासाहेबांनी १९ जून १९६६ रोजी “शिवसेना” या मराठमोळ्या संघटनेची स्थापना केली. तेव्हापासून मराठी माणसाला न्याय मिळत आला आहे, याचा आम्हाला मनस्वी आनंद होतो अन् अभिमानही वाटतो.

ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा. एकनाथ शिंदे हे मा. शिवसेनाप्रमुखांच्या महानतेविषयी म्हणतात, “वंदनीय बाळासाहेब ठाकरे हे सर्वांचे होते, त्यांनी लहान-मोठ्या सर्वच कार्यकर्त्यांवर प्रेम केलं. महाराष्ट्रातील तमाम मराठी जनांना अन् देशातील हिंदूंना ताठ मानेनं जगण्याची शिकवण दिली. आमच्यासारख्या सामान्य माणसांना देखील त्यांनी जबाबदाऱ्या देऊन घडविलं. राजकारणातून समाजकारण करण्याचा धडा दिला. महत्वाचे म्हणजे बाळासाहेबांच्या आशिर्वादानेच आम्ही घडलो. तर त्यांच्या कुंचल्यां-व्यंगचित्रातून, लेखनातून अन् हिंदुत्वाच्या जहाल विचारातून शिवसेना ताट मानेनं उभी ठाकली, कारण ती ठाकरेंनी घडविली !”

नात्यागोत्यासंबंधात बाळासाहेब म्हणत “जे गोत्यात आणतात, ते नाते. असले नाते मला अजिबात नको. शिवसैनिक अन् माझे हृदयबंध आहेत.तेच खरे नाते !” बाळासाहेबांनी सत्तेची कदापि लालसा न करता, प्रबोधनकारांच्या शिकवणीचा अंगिकार करून समाजातील गोरगरीब निराधार व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे रोटी, कपडा, मकान, शिक्षण, रोजगार हे मूलभूत प्रश्न सोडविण्यात आपले जीवन व्यतित केलं. समाजातील शेवटचा माणूस, मग तो कोणत्याही जाती-धर्माचा असो, त्याच्या पर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचला पाहिजे, हे त्यांचे आद्य धोरण होतं. बाळासाहेबांचा एकच धर्म होता, तो म्हणजे मानवता धर्म !

राज्यातील दुर्लक्षित जाती-जमातीतील युवकांना शिवसेनेकडे आकृष्ट करून त्यांना घडविले. अन् त्यांच्यात योग्यता निर्माण करून त्यांना महत्वाची पदे बहाल केली. पुढे याच शिवसैनिकांनी निष्ठापूर्वक व हिमतीने मुंबईत ज्या ज्या वेळी अतिवृष्टी, बॉम्बस्फोट सारखी संकटे आलीत, त्या त्या वेळी मदतीला भक्कम हात देत लोकांना संकटमुक्त करून दिलासा दिला. शिवसैनिक आधी करून दाखवितो, नंतर बोलतो हा बाळासाहेबांचा विचार प्रत्येक शिवसैनिकाने आत्मसात करून त्या अनुषंगाने ते कृती करीत आहेत. त्यामुळेच शिवसेना गेल्या पाच दशकांहून अधिक काळ स्वबळावर आगेकूच करत आहे. किती आलेत अन् किती गेलेत, पण शिवसेना ही शिवरायांच्या महाराष्ट्रात वटवृक्षासारखी ताठ मानेनं उभी आहे.

बाळासाहेबांचे पत्रकारांशी नेहमी स्नेहाचे व खेळीमेळीचे संबंध राहिले. ते कधी कधी पत्रकारांना रागवायचे. पण मनात दुरावा न ठेवता, लगेच त्यांना बोलवून त्यांच्याशी हसत खेळत, विनोद करत असत. पत्रकार असो वा शिवसैनिक यांना बाळासाहेब जर एखाद्या कारणासाठी रागवले, तर त्यास ते आशिर्वाद समजून स्विकारायचे. बाळासाहेबांनी एक पाऊल पुढे जाऊन ज्येष्ठ पत्रकार विद्याधर गोखले, भारतकुमार राऊत, नारायण आठवले जे शिवसेनेवर टिकेचे आसूड ओढायचे, त्यांना खिलाडी वृत्तीने शिवसेनेतर्फे थेट राज्यसभेत खासदार बनवून पाठविले. बाळासाहेबांचे हृदय हे हिमालयासारखे विशाल होते, ज्यात सर्वजण सामावून जायचे. महत्वाचे म्हणजे बाळासाहेबांना कोणाबद्दलही राग-लोभ नसायचा, मग तो कुठल्याही राजकीय पक्षाचा असो वा वृत्तपत्राचा प्रतिनिधी. सर्वच जण त्यांना आपलेसे मानायचे, तर सर्वांना बाळासाहेब देखील हवे हवेसे वाटायचे. म्हणून सर्वांच्या मुखात एकच वाक्य, “एकच साहेब, बाळासाहेब !”

दरम्यान वंदनीय मीनाताई मां साहेब यांचे आकस्मिक निधन झाल्याने बाळासाहेब ठाकरे थोडे खचले होते. अशा वेळी बाळासाहेबांना मानसिक आधार देणं सोडून, शिवसेनेतील काही तथाकथित नेते ज्यांना बाळासाहेबांनी मोठं केलं अन् मोठी पदे बहाल केली, त्यांनीच बेइमानी करून शिवसेना सोडली. त्यामुळे बाळासाहेबांचे मन उद्विग्न झालं.तथापि स्वतःला सावरत त्यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.

वंदनीय बाळासाहेबांनी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर शिवसैनिकांना शुभेच्छा देत उद्धवजी अन् आदित्य यांना सांभाळण्याचे कळकळीचे आवाहन केलं. तसेच त्यांनी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचा व्हावा, ही इच्छा व्यक्त केली. अन् शिवसैनिकांनी दृढसंकल्पाने बाळासाहेबांची अंतिम इच्छा अखेर पूर्ण करून दाखविली.

सन्माननीय उद्धवजी ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, तर आदित्यजी हे राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री झाले. बाळासाहेबांचे मित्र, ज्येष्ठ नेते मा. शरदचंद्रजी पवारसाहेब, काँग्रेसच्या अध्यक्षा मा. सोनियाजी गांधी आणि शिवसेनेचे खासदार मा. संजयजी राऊतसाहेब यांच्या संयुक्त प्रयत्नातून राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. तसेच ना. बच्चु कडू यांच्या प्रहार पक्षाने सरकारला पाठिंबा जाहीर केला.

मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी कोरोना महामारीत राज्यात उल्लेखनीय कामगिरी करून राज्यातील सर्वधर्मीय नागरिकांचा व मायाबहिणींचा कोरोनापासून बचाव केला. त्यामुळे त्यांना देशातील सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून सन्मान मिळाला. इतकेच नव्हे तर, जागतिकपातळीवर देखील कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचे मोठं कौतुक झालं. आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीमध्ये कोरोनाचं निर्मूलन केल्याने ते जगासाठी रोल मॉडेल ठरले.

पिताश्री बाळासाहेब अन् मातोश्री मिनाताई यांचे आशिर्वाद सदैव ठाकरे परिवार अन् शिवसैनिकांच्या पाठीशी आहेत. त्यामुळे शिवसेनेला नेहमी सुयश प्राप्त होत राहील, हे निश्चित. सौ.रश्मीताई उद्धवजी ठाकरे ह्या वंदनीय मीनाताई ठाकरे यांच्या पाऊलखुणा ओळखून शिवसेनेच्या महिला आघाडीला सक्षम करण्यात सक्रिय असून, सामनाचे संपादक पद सांभाळत आहेत. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या कारकीर्दीत बेरोजगारी कमी झाली अन् शेतकरी, शेतमजूर, कामगार मागास जनजाती, दिव्यांग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचा सर्वांगीण विकास झाला, म्हणजे हीच वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना खरी आदरांजली ठरेल.
जय 🚩महाराष्ट्र !

– लेखन : रणवीर राजपूत
प्रसिद्धी विभाग, बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, ठाणे.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांस भावपूर्ण आदरांजली ! वंदनीय बाळासाहेब ठाकरे म्हणजे शिवसेना संघटनेची प्रखर ज्योत आहे. ही अखंडीत तेवत ठेवली पाहिजे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments