Tuesday, September 16, 2025
Homeयशकथादिनकर रायकर : पत्रकारितेतील दीपस्तंभ

दिनकर रायकर : पत्रकारितेतील दीपस्तंभ

आपल्या फोनमधे असे काही नंबर सेव्ह असतात, ज्यांना आपण कधीतरीच फोन लावत असतो, पण ते आपल्या फोन मधे आहेत ही भावनाच आपल्याला श्रीमंत करणारी असते. काल पहाटे दिनकर रायकर सर यांचे दुःखद निधन झाले या बातमीनेच माझ्या मोबाईलवरच्या बातम्यांची सकाळ झाली. दोन तीन ग्रुपवर पुन्हा चेक केले. बातमी खरी आणि मन विषन्न करणारी होती.

रायकर सरांचा नंबर माझ्या मोबाईलमधे सेव्ह होता तो कामकाजाशी संबंधित बोलण्यासाठी. एखादी बातमी लावायची असेल किंवा खुलासा पाठवायचा असेल तर सरळ समुह संपादकांना फोन करण्याचे धाडस करावे एवढा मोकळेपण सरांनी दाखवलेला होता. मी प्रत्यक्ष त्यांच्या सोबत काम केलेले नसले तरी पत्रकारितेशी संबधीत प्रत्येकाचेच ते प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष मार्गदर्शक होते. पत्रकारितेच्या क्षेत्रातील दीपस्तंभ होते.

राज्यशासनाने त्यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केले होते त्याचवेळी मला त्यांना भेटण्याची संधी मला मिळाली होती.

इंग्रजी, मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करताना रायकर सरांनी जुन्या आणि नव्या पिढ्यांना सांधणारी मार्गदर्शकाची भूमिका बजावली. नवनवीन आशय, संकल्पना, विषयांची मांडणी यासाठी त्यांनी होतकरू तरुणांना संधी दिली. आज पत्रकारितेत एक नवी पिढी त्यांच्या हाताखाली तयार झाली आहे. जेव्हा रायकर सरांसारख्या जेष्ठ पत्रकाराचे निधन होते तेव्हा तिन पिढ्यांच्या इतिहासाच्या साक्षीदाराला हे जग मुकत असतं. पन्नास वर्ष पत्रकारिता करणारे रायकर सर हे स्वःताच एक विद्यापीठ होते.

जीवन गौरव
रायकर सरांनी इंडियन एक्स्प्रेसमधून पत्रकारितेला सुरुवात केली होती. मुंबईत राहण्यासाठी घर नसल्याने ते इंडियन एक्स्प्रेसच्याच कार्यालयात राहायचे आणि तिथेच काम करायचे. टीपी ऑपरेटर, रिपोर्टर ते संपादक असा यशस्वी प्रवास त्यांनी एक्स्प्रेस समूहात केला. ते लोकसत्ताचे डेप्युटी एडिटर झाले.

लोकसत्तामधून निवृत्त झाल्यावर त्यांनी लोकमत समूहामध्ये संपादकपदाची जबाबदारी सांभाळली. सुरुवातीला ते औरंगाबादचे संपादक होते. त्यांनी गेली काही वर्षे लोकमतमध्ये समूह संपादक म्हणून जबाबदारी सांभाळली.

दांडगा जनसंपर्क, राज्यभरातील पत्रकारांशी जवळचे संबंध, कसलीही मदत लागो, मदतीला धावून जाणे असा त्यांचा स्वभाव होता. मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या कृ. पां. सामक जीवनगौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते.

महाराष्ट्र शासनाचा जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कारही त्यांना मिळाला होता. या बरोबरच पुढारीकार ग.गो.जाधव पुरस्कार, सुशीलादेवी देशमुख पत्रकारिता पुरस्कार, रोटर इंटरनॅशनल पत्रकारिता पुरस्कार, कृषीवलकार प्रभाकर पाटील पत्रकारिता पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. ते मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे, मुंबई प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष होते.

रायकर सरांना भावपूर्ण श्रद्धांजली

अर्चना शंभरकर.

– लेखन : अर्चना शंभरकर
वरिष्ठ सहाय्यक संचालक, माहिती विभाग
मंत्रालय, मुंबई
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments