कवयित्री अरुणा मुल्हेरकर यांनी त्यांच्या “वंदन सैनिकास” या कवितेतून सैनिकाची थोरवी सांगितली आहे. तर स्वतः सैनिक व कवीही असलेले रा वि पवार उर्फ रामदास आण्णा यांनी त्यांच्या “मी सैनिक” या कवितेतून त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
पाहू या, या दोन्ही कविता….
वंदन सैनिकास
~~~~~~~~~
त्रिवार वंदन तुला सैनिका त्रिवार वंदन तुला।।धृ।।
वादळ वारा थंडी गारा
नसे तुला क्षणमात्र विसावा
एकच लक्ष्य तुझ्याचसाठी
शत्रूवर गोळ्यांचा मारा
कसे वर्णू तव बला
वीरा त्रिवार वंदन तुला ।।१।।
नाही कधी तव शीण जाहला
नाही का तू ज्वरे त्रासला
कशा साहसी सांग मला तू
देहावरल्या व्रणा
कसे वर्णू तव बला
वीरा त्रिवार वंदन तुला ।।२।।
छातीवरती घाव झेलिले
किती रिपू तू गारद केले
मातृभूमीच्या रक्षणार्थ तू
अर्पण केले प्राण
कसे वर्णू तव बला
वीरा त्रिवार वंदन तुला ।।४।।
लढत राहसी सीमेपाशी
नतमस्तक मी तव चरणांशी
रुधिर सांडसी या भूमीवर
फडके तिरंगा मग राष्ट्रावर
तुजसी माझे त्रिवार वंदन ।।५।।

– रचना : अरूणा मुल्हेरकर. अमेरिका
मी सैनिक
————
सैनिक माझी जात
माझं सैनिकाचं रक्त ।
आम्ही लेकरं या मातीचे आम्ही देशभक्त ।।
सत्यमेव जयघोष आमचा
भारत भाग्य विधाता ।
सुख लाभते आम्हाला चरणी ठेवून माथा ।।
उत्तुंग हिमालय मुकुट सागरात रोवून पाय।
जाती, धर्म अनेक तरीही भारत आमची माय ।।
क्रांतिकारी थोर जन्मले ज्यांनी सांडले रक्त ।
हसत फासावर चढले कितीतरी देशभक्त ।।
शिवाजी, आझाद, भगतसिंग, वीर क्रांतिकारी झाले ।
थोर हुतात्म्यांनी उत्कृष्ट, प्राणाचे बलिदान दिले ।।
त्यांच्या बलिदानाने पावन झाली भारत भू ।
भारतमातेचा जयघोष सगळे करतो आम्ही ।।
मी सैनिक देशाचा
करतो देशाला वंदन ।
मातृभूमीची काळीमाती माझ्या भाळाचे चंदन ।।
– रचना : रामदास आण्णा.
सलाम वीरा तुला
अण्णा सलाम वीरा तुला
अरुणा मुल्हेरकर यांची वंदन सैनिकास ही कविता सैनिकाप्रती मनस्वी कृतज्ञता भाव व्यक्त करते…
तसेच रामदास आण्णा यांच्या रचनेतलं सैनिकाचं मनोगत
मनाला फार भिडलं..सलाम त्यांच्या कर्तव्य परायणतेला…
सलाम त्यांच्या देशभक्तीला…