अक्षरवेल साहित्य मंडळ, उस्मानाबाद, येथे गतवर्षी दिवाळी अंक प्रकाशनाचा कार्यक्रम होता. तो कार्यक्रम
आ. बालाजी इंगळे सर, उमरगा यांच्या हस्ते संपन्न झाला. त्या कार्यक्रमात प्रकर्षाने जाणवलेली बाब ही की, त्यांनी स्वरचित कवितेऐवजी इतरांनी लिहिलेल्या कवितांचे सादरीकरण केले व सांगितले की फक्त आणि फक्त स्वतःसाठी लिहा. केवळ लाईक मिळविण्यासाठी नको ! कुठेतरी आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असं मला वाटलं.
कवी “गुलजार” म्हणतात, हर एक शक्स उतना नही कहे पाता जितना समज सकता है. खरंच आपल्याला तरी हवं त्या वेळेला हवं त्या पद्धतीने कुठे होता येतं व्यक्त ?
त्याच संमेलनात लेखकाने रा.रं .बोराडे यांना आपलं पुस्तक दिल्यावर ते म्हणाले, लिहिण्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त तुमचे वाचन हवे.
माझी आई नेहमी म्हणायची, कलाकार यक्षगणांचे अवतार असतात. खरंच भाषा तीच, पण प्रत्येक लेखकाचा लिहिण्याचा पिंड, तो जात्याच घेऊन आलेला असतो. भाषा व शब्द संग्रह याचा मिलाफ व स्वतःची एक स्वरचित परिभाषा हा प्रत्येकाच्या लेखनाचा आत्मा असतो. तो स्वपिंड म्हणजे त्या कुपीतलं ते अत्तर सुवास देतंच पण त्याची तुलना दुसऱ्या कुपितल्या सुगंधाशी कशी मिळती जुळती असणार ?
कविता अंतरात्म्याची साद असते. भावनेला मोकळी करून दिलेली वाट असते. कधी इतरांना समजेल अथवा समजणारही नाही अशी नव विचारांची पहाट असते. माझ्याच विचारांशी मी तादात्म्य पावण्याची एक आंतरिक लाट असते. जग रुपी काटेरी अरण्यात माझ्या पावलांना सुखद स्पर्श देणारी एक रेशमी पाऊलवाट असते.
कुठे आली मग इतरांशी तुलना आणि कसले लाईक्स, दुसऱ्याच्या लिखाणाचा आधार घेऊन लेखन करणे सोप्प आहे, परंतू निरपेक्ष लेखन हा माझा जीवन क्रम आहे. मला आनंद देण्यासाठी तसेच परमेश्वराने मला जी उपजत प्रतिभा दिलेली आहे तिचा वापर करून मला माझ्या जगण्याचे इप्सित साध्य करून घ्यायचे आहे. यासाठी मी लिहिणारच हा आनंद शब्दात व्यक्त करता येत नाही.
शब्दसंग्रह तोच, पण प्रत्येक कवितेत शब्द चपखलपणे बसवण्याची कसब प्रत्येक कविची वेगळीच……
इयत्ता पाचवीत असतानाची आठवण….. पाठाचे सर आलेले व त्यांनी महानोरांची कविता सर्वांना झेरॉक्स स्वरूपात दिली होती व त्यातील ओळ ….
“अशी कोणती पुण्याई यावी फळाला, जोंधळयाला चांदणे लखडून जावे”.
ही कविता मी वारंवार वाचली. एवढेच नाही तर ती डिंक लावून भिंतीला चिकटवली. तेव्हा बाल मनाला वाटायचे अरे चांदणे कसे काय जमिनीवर ? म्हणून सरांनाच प्रश्न केला ? त्यांनी जे उत्तर दिले ते ऐकून कविता जीवंत वाटली नव्हे झाली.
स्थळ जि. प.कन्या प्रशाला, उस्मानाबाद …वाटते कोण असतील ते पाठ घेण्यासाठी आलेले सर ज्यांनी माझ्यात भाषेची आवड निर्माण केली ?…..परत इयत्ता आठवीत माझ्या जांभळे सरांनी, ‘जल वलयी रव मिसळे, मीन चमकूनी उसळे’ ही ओळ बहुतेक कवी अनिलांच्या कवितेतील असावी असे म्हणण्याचे धाडस करते आठवत नाही… पण, भाषेचा शिक्षक कसा असावा तर आत्म्या पर्यंत पोहोचणारा न्हवे तर दगडातून पाझरणारा झरा ज्याच्या पाझरण्यामुळे कितीतरी विशाल नद्यांची निर्मिती होऊन साहित्य रुपी धरित्रीचा काना कोपरा सुजलाम सुफलाम झाला पाहिजे. ज्यातून हरितक्रांतीची बीजं पिढ्यान् पिढ्या जोपासली गेली पाहिजेत. ज्यामध्ये जीवंत माणूस निर्माण करण्याची ताकद असली पाहिजे.
आणखी एक मोह इथे होतोय की, “मराठीतील स्त्रियांची कविता”, प्रभा गणोरकर लिखित हे जे पुस्तक आहे त्यात संत कवयित्री पासून आधुनिक कविता पर्यंतचा आढावा जो घेतला गेलेला आहे तो खूप काही सांगून जातो.
या निमित्ताने महाराष्ट्र सखी मंचच्या स्पर्धेसाठी पाठविलेली माझी अष्टाक्षरी कविता
“माझी माय” येथे सादर करते आणि माझ्या लेखनाला विराम देते.
माझी माय
माय सुगंधाच लेणं
ब्रह्म मुहूर्ताची वेळ
उमगली कुणाला ना
अशी अंतरीची कळ
माय तुझ्याच कुशीत
आहे जगण्याचा श्वास
तू माता सरस्वतीच्या
वाणीवरचा अभ्यास
जगी नांदता नांदता
किती सरले उन्हाळे
सरता सरेना भोग
तुझे वाकते लव्हाळे
माय तुझे ते संस्कार
असे कुंभाराचा आवा
ओल्या तुझ्या मातीतून
जन्म घ्यावा पुन्हा नवा
माय तुझ्या गं कुशीत
घेते श्वास मी मोकळा
देव हासतो बघुनी
तुझ्या मायेचा सोहळा
आले शालू जरतारी
तुझ्या लुगड्याचा दंड
सर येईना कशाला
तुझी वाकळ ब्रम्हांड
धन्यवाद…

– लेखन : संगीता कासार.
श्री गोदावरीदेवी लाहोटी कन्या विद्यालय लातूर.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800
संगीता कासार मॅडम तुमच्या लेखनाला खूप खूप शुभेच्छा!