काश्मीर…धरतीवरचा स्वर्ग..खर तर अविनाशला हनिमूनसाठी परदेशात जायची खूप इच्छा होती… रोमीला काश्मीर पाहण्याची.. आपल्या देशातला स्वर्ग पाहू या आधी..अस म्हणत काश्मीर ला झुकतं माप मिळालं आणि बऱ्याच वर्षात असलेली मनातली इच्छा पुर्ण झाली..
रोमीला तर सगळं स्वप्नवत वाटत होतं.. हिमालयाच्या पर्वतरांगा आणि त्यात मुक्तपणे बागडणाऱ्या नद्या.. चिनाब, झेलम, स्लोक, सिंध … म्हणजे जणू पित्याच्या छत्र छायेत, निर्धास्तपणे बागडणारी अल्लड बालिका, तर कधी नवथर तरुणी.. त्याचा शुभ्र खळाळता प्रवाह, कधी इवलासा, कधी तारुण्याने भरलेला..उत्साही, अवखळ.. कधी वृद्धत्वाकडे झुकलेला… बाजूला हिरव्या, पोपटी रंगांनी भरलेले डोंगरमाथे…चिनार, अक्रोड, चेरी नी बहरलेली झाड..जिथे नजर जाईल तिथे हिरवाई..
निसर्गाने मुक्त हस्ताने केलेली उधळण..
दाल लेक जवळ हॉटेल च बुकिंग होत..निसर्गानी वेढलेला परिसर..त्यात अविनाशची साथ..अस वाटत होतं की हे क्षण इथेच थांबावे..पुढे जाऊच नये..रोमी गुणगुणायला लागली, “कोरा कागज था ये मन मेरा” आणि “थम जा ए थंडी हवा”, “हे निले गगन के तले धरती का प्यार पले..” अश्या गाण्यांनी मनात फेर धरला होता..आणि काश्मिरी माणसाचं सौंदर्य.. पुरुष, स्त्रिया सर्वच देखणे.. चेहऱ्यावर नैसर्गिक लाली आणि गोरेपान रूप..बघण्यासारख..
दिवसभर भटकंती आणि सात पर्यंत रूमवर अस रुटीन होत..सोनमार्ग, गुलबर्ग, पेहलगाम, आरु सर्व पाहिलं.. आरु ला गेल्यावर काश्मीर ला जन्नत का म्हणतात ते कळलं.. घाटाचा रस्ता, नदीच निळसर पाणी, हिरवागार निसर्ग अगदी बहार..जेवणही खूप छान.. वेगवेगळ्या पदार्थांची वेगवेगळी चव..रसना अगदी तृप्त झाली होती..
अविला तर सारखा रोमान्स सुचत होता..
“बहारो फुल बरसाओ, मेरा मेहबूब आया है” अशी गाणी गात होता आणि भोवती वेडावणारा निसर्ग..
रात्री तर त्याच्या मिठीत विरघळून गेलेल्या.. स्पर्शास्पर्शातून प्रेम..जे मला कधीच मिळालं नाही माझ्या आयुष्यात..
एक दिवस खरेदीत गेला..सर्वांसाठी आणि स्वतःसाठी ही खरेदी केली..
एका रात्री रोमी त्याला म्हणाली, “तुला काही सांगायचं आहे..जे नाही सांगितलंय..मी प्रयत्न केला तर तू ऐकतच नाहीस..तुला सगळं माहितेय अस वाटतंय, पण एक गोष्ट मी सांगितली नाहीए”
सगळं तर सांगितलंस ग तू..तुझे व्यसनी वडील, सावत्र आई, अंगावर दिलेले डाग, तूझ करपलेलं बाल्य आणि तरुणपणी पैसे कमावण्याचं मशीन म्हणून तुझा वापर.. किती भयानक आयुष्य जगलीस तू..त्यावर मात करून घेतलेल हे उच्च शिक्षण..”
“नाही..अजून एक सत्य..माझी खरी आई जिवंत आहे आणि ती मेंटल हॉस्पिटलमध्ये आहे..”
अविनाश जवळ येऊन, तिचा हात हातात घेऊन म्हणाला, “ते ही माहीत आहे.’
“कस ? ” कोणी सांगितलं ?”
सांगतो अस म्हणत तो बोलायला लागला..कोणाकडून कळलं असेल त्याला ?
क्रमशः

– लेखन : प्रतिभा चांदूरकर.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800