डॉ. अनिल अवचट यांचं काल निधन झालं. त्यांच्या आणि अहमदनगरच्या अनोख्या नात्याबद्दल स्नेहालयचे डॉ गिरीश कुलकर्णी यांनी सांगितलेल्या या हृद आठवणी….
1993 साली सदाशिव अमरापुरकर (तात्या) हे डॉ. अनिल अवचट यांना स्नेहालय संस्थेत घेऊन आले.
आम्हाला भेटवल्यावर तात्या म्हणाले — “अरे अनिल,
हे बघ आमच्या गावातील पोरं कसा मूर्खपणा करतात ते. तुला वेडे आवडतात ना, म्हणून यांना भेटवले….”
निर्मळ हसत बाबा म्हणाला, “वाह वाह ….तू तर मला बिरादरीत आणलस की.
या पोरांनो या.
पारावर बसू आणि मस्त गप्पा मारू. तुम्हाला ऐकायचय मला….”
मग आमचे निरुद्योग ऐकून बाबा खळखळून हसत होता …
“याला म्हणतात जगणे….” असे म्हणत प्रत्येकाच्या पाठीवर आणि डोक्यावर बाबाने हात ठेवला.
त्याचा प्रेमळ आणि निर्व्याज स्पर्श अंगावर रोमांच उठवून गेला.
स्नेहालय
संस्थेतील मुलांसाठी रुमालाचे पक्षी, कागदाचे प्राणी – ओरिगामी असे करीत बाबाने सर्वांना हरखून टाकले. तो त्या लहानग्यांच्या जगात त्यांचा निरागस मित्र बनला.
नगर येथील चित्रा आणि भगत गल्लीतील कुंटणखान्यात बाबा सोबत आला. येथील सर्व महिला बाबाशी बोलताना मोठया भावाची अनुभूती घेत होत्या.
आपण कोणी लेखक इत्यादी विशेष व्यक्ती आहोत, याचा लवलेश देखील बाबात नव्हता.
असा निरहंकार विरळाच….
या नगर भेटीपूर्वी बाबाची पुस्तकं मी वाचलेली होती.
साप्ताहिक साधना मध्ये प्रसिद्ध होणारे त्याचे लेखनही.
जीवनाभिमुख पत्रकारिता करणारा बाबा महाराष्ट्रातील स्वतंत्र शैलीचा अद्वितीय फ्री लान्सर होता. माणसं, पूर्णिया अशी पुस्तके वाचताना आपल्याच समाजाचा आपल्याला आजवर न दिसलेला तळ दिसला. तो हादरवून टाकणारा होता..

बाबाने स्नेहालय,
नगरचे लालबत्ती विभाग, झोपडपट्ट्या,
तृतीय पंथीयांचे दय्यार (ठाणे) सर्व जवळून पाहिले.
येथेवल आम्हा सर्वांशी मनसोक्त गप्पा मारल्या. त्यानंतर बाबासोबत आमच्या अशा अनेक मैफली रंगल्या
छंदांविषयी,
हे पुस्तक प्रसिद्ध होण्यापूर्वी बाबाने त्याचे वाचन स्नेहालय परिवारातील वाचक कार्यकर्ते जमवून केले होते.
येथील प्रख्यात गायक कविता आणि धनंजय खरवंडीकर यांचे गाण्यामुळे बाबांशी मैत्र होते.
त्यामुळे गाण्याची मैफल, त्यात बाबा चे बासरी वादन, त्याची वाह वाह….. हे सर्वच आज तो गेला तेव्हा स्मरते आहे.
मनोबल, हे व्यसनमुक्ती केंद्र स्नेहालय तर्फे सुरू करताना बाबाशी आमच्या टीमने गप्पा मारल्या. बाबा आजारी असल्याने फोनवरच …
मुक्तांगणची भावधारा आणि अनुभूतीबद्दल बाबाने कितीतरी सांगितले. ते डोळे उघडणारे होते.
बाबाचे “धागे उभे-आडवे”, हे पुस्तक पुण्यातल्या बुधवार पेठेतल्या महिलांच्या जीवन कथांवर आधारलेले.
बाबाला लाल बत्ती भागामधील विषयांची सखोल माहिती होती.
येथील अन्याय-अत्याचार सहन करताना होणारे
महिला आणि मुलांचे मनाचे गुंते बाबाने सहजतेने आम्हाला उलगडून सांगितले.
स्नेहालयच्या “परिवर्तनाची पहाट”, या पुस्तकाचे प्रकाशन पुण्यात बाबानीच केले. लेखिका शुभांगी कोपरकर हिला बाबाने अनेक अनुभव सांगितले.
सर्व काही मनसोक्त करणारा बाबा मनाने मात्र कशातही गुंतला नाही.
गुंतुनी गुंत्यात साऱ्या…
पाय माझा मोकळा,
रंगुनी रंगात साऱ्या ,
रंग माझा वेगळा…
असा होता तो.
अखेरच्या श्वासापर्यंत आपले माणूसपण जपणारा आणि अहंकाराचा वारा मनाला स्पर्श करू न देणारा एक जिवलग जीवलग आपल्यातून शरीराने गेला.
परंतु त्याचा परीसस्पर्श झालेल्यांच्या मनात नेहमीच रुंजी घालत राहील….

– लेखन : डॉ गिरीश कुलकर्णी.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800