डाॅ.अनिल अवचट हे, पुण्यातील अत्यंत नामांकीत, साहित्यिक, बहुआयामी व्यक्तीमत्व…!
एक पत्रकार, सामाजिक कार्यकर्ता, प्रतिभावंत कलावंत काळाच्या पडद्याआड गेला….
त्यांची कितीतरी पुस्तकं ..!!
त्यांची पुस्तकं वाचत असताना, आपल्या मध्यम वर्गीय जगण्याच्या पलीकडे एक जग आहे, याची जाणीव होते… आपल्या सुरक्षित कोषातून बाहेर पडण्याची ऊर्मी त्यातून मिळते…
पूर्णीया हे त्यांचं पहिलं पुस्तक आणि माझं आवडतं पुस्तक. त्यांत त्यांनी बिहारचं अंतरंग उलगडलय्. तिथली समाजव्यवस्था, जमीनदारी, अस्पृश्यता,
वेठबिगारी, कंगाली यांचं वर्णन वाचून अक्षरश: हादरायला होते.
ते संवेदनशील आणि मनमोकळे होते. लोकांमधे वावरणारे होते. ते नि:संशय मराठीतले महत्वाचे लेखक ठरतात. त्यांनी आयुष्यभर मिशनर्यांसारखं,
वंचितांचं, गरिबांचं, कष्टकर्यांचं, जगणं, समाजासमोर आणण्याचं काम केलं.
आणि हे सर्व लिखाण प्रत्यक्ष बघून, फिरून, बोलून !लोकांमधे वावरून केलं आहे. त्यामुळे त्यांत रुक्षपणा, बोजडपणा, अजिबात नाही. जणू वाचकाचं बोट धरून त्यांना काही दाखवावं असं त्यांचं लेखन… मोकळं मुक्त… जसं बोलणं तसं लिहीणं… त्यामुळे अनिल अवचट यांच्याशी प्रत्यक्ष ओळख नसली तरी ते कधीही अनोळखी वाटले नाहीत…
धागे आडवे उभे, वाघ्या मुरळी, प्रश्न आणि प्रश्न,
वेध, छेद, संभ्रम, कोंडमारा, माणसं, अशा कित्येक पुस्तकांतून हा पैलुदार साहित्यिक भेटत राहिला… त्यांच्या विचारातला लवचिकपणा, तसा ठामपणाही सतत जाणवला. अस्तित्व टिकवणारी साहित्य निर्मिती असंच मी म्हणेन…
दलीत पँथर, छात्र युवा संघर्ष वाहिनी, भूमीसेना, हमाल पंचायत वगैरेंशी त्यांचे संबंध होते. नामदेव ढसाळ, राजा ढाले, कुमार सप्तर्षी यांसोबत ते काही काळ या चळवळीत राहिले. पण कार्यकर्त्याचा आपला पिंड नाही हे जाणून ते त्यातून बाहेर पडले पण एकाचवेळी लेखनाच्या माध्यमातून जोडलेले ही राहिले.
“मुक्तांगण” व्यसनमुक्ती केंद्र ही त्यांची महत्वाची
सामाजिक ओळख !
या त्यांच्या कार्याला पुलंसारख्या आणि अनेक नामांकीत श्रेष्ठींनी हात दिले. गेल्या पस्तीस वर्षात त्यांनी कितीतरी हजार व्यसनी लोकांना व्यसनमुक्त करून त्यांचे पुनर्वसन केले. मात्र याचे सर्व श्रेय त्यांनी आपली पत्नी सुनंदाला दिलं.
“मी फक्त व्यसनी लोकांच्या जगण्यावर लिहिण्यापुरता…” असे ते म्हणत.

‘ओरिगामी’ या कलाछंदांतून ते जगभरच्या
बालविश्वाशीही जोडले गेले. त्यांची कित्येक डिझाईन्स ही स्वनिर्मीत होती… अनेक रुपातले मोर, गणपती, पक्षी, हत्ती घोडे, विदूषक, सांताक्लाॅज्.. त्यांनी स्वत: कागदातून बनवले.. जपानमधे ती कायमस्वरुपी प्रदर्शनातही ठेवली आहेत…
ते सुंदर बासरीही वाजवायचे…चित्र काढायचे..
असा हा बहुयामी, साहित्यिक कलावंत मुक्त मोकळा आणि एक सच्चा माणूस….आता नाही..
विसर्जीत झाला..
त्यांच्याच शब्दांत सांगायचं तर…
“कागदावरच्या प्रत्येक ठिपक्यात पारदर्शक
विसर्जनाचे क्षण तरंगत असतात.
जंगलात, ऋतुचक्रात हे सामावलेले असते..
झाडाचे पिकले, पिवळेपान फांदीवरून निसटते.
हवेत तरंगत, मौनाच्या प्रार्थना सारखे जमिनीवर अलगद टेकते…विसर्जित होते. अगदी हळुवारपणे.
विसर्जन ही एक मौलीक गिफ्ट आहे…!!”

साहित्य विश्वातले एक सुवर्णपान गळाले…
ज्यांनी जगणे उजळले…
सर्व साहित्यप्रेमींतर्फे या संवेदनशील व्यक्तीमत्वाला प्रेमपूर्वक वंदन…

– लेखन : राधिका भांडारकर. पुणे.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800
ताई, खूपच सुंदर शब्दांत बाबांबद्दल लिहिलंय…
राधिकाताई, छान लेख
या व इतर सर्वांच्या लेखातून डाॅ अनिल अवचट यांच्या जिवनाचा, लिखाणाचा सुंदर आढावा वाचायला मिळाला. साहित्यिक, कलावंत, समाजसेवक असं त्यांच अष्टपैलू जिवन होतं. या माध्यमातून ते सर्वांच्या मनांत, जिवनांत अजरामर राहातील. माझी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
थोडक्यात राधिकाताईने डाॅ.अनिल अवचट यांचे संपूर्ण व्यक्तिमत्व वाचकांसमोर उभे केले.
या बहुआयामी व्यक्तिमत्वाला मानाचा मुजरा!
ईश्वर मृतात्म्यास चिरशांती देवो.
भावपूर्ण श्रद्धांजली!
अनिल अवचट यांचे निरीक्षण सूक्ष्म होते, त्यांनी वंचितांच्या,उपेक्षितांच्या वेदनांना शब्दबध्द केले, त्यांच्या समवेत मी विडी कामगारांच्या कारखान्यात,घरात गेलो 80 ते 85 समता आंदोलनात आम्ही एकत्र होतो.
लेखक,कार्यकर्ता, कलाकार या सगळ्या अंगाने डॉ. अवचट खूप मोठे होते.त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन