आणीबाणी व पत्रकार
पुण्याचे ज्येष्ठ पत्रकार दैनिक केसरी चे माजी संपादक श्री अरविंद व्यं गोखले यांनी आणीबाणी संबंधीच्या भाग 21 वर प्रतिक्रिया पाठवली आहे. त्यावेळी ते केसरी च्या संपादकीय विभागात कार्यरत होते.

पंचवीस जून १९७५ च्या रात्री ते संपादकीय विभागात रात्रपाळीचे काम आवरून घरी जायला निघाले होते. पहाटेच्या सुमारास ती बातमी वृत्तसंस्थेच्या इंग्रजी दूरमुद्रितावर आलेली त्यांनी पाहिली. ती वाचून ते थबकले. दिल्लीच्या ‘मदरलँड’ या इंग्रजी दैनिकाचे संपादक के. आर. मलकानी यांना अटक झाली, अशी ती बातमी होती.
त्या पूर्वीचे काही दिवस राजकीय अस्वस्थतेचे होते. त्यामुळे काही तरी अघटित, महत्त्वाचे घडले आहे हे त्यांच्या लक्षात आले.
अंकाची छपाई सुरु न करता त्या बातमीचा मजकूर घाईघाईत थोडक्यात तयार करून ही बातमीदेखील अंकात समाविष्ट करून मगच छपाई विभागाला प्रिंटिंग सुरु करायला त्यांनी हिरवा कंदील दिला. घरी जाऊन उशीरापर्यंत झोप घ्यायची असे ठरवून ते झोपले.
सकाळच्या आकाशवाणीच्या बातम्या ऐकून आईने उठविले. आणीबाणी लागू झाल्याच्या बातम्या होत्या. जातीच्या पत्रकाराला मग झोप कशी लागणार ?
सकाळचे आवरून ते केसरीत तडक कामाला निघाले.
माझा मजकूर वाचून त्यांच्याही आठवणी जागा झाल्या. त्यावरची त्यांची प्रतिक्रिया:
“ठाकूर सर, आपला लेख वाचला आणि आवडला सुद्धा. एका गोष्टीचा मुद्दाम उल्लेख करायला हवा म्हणून हा लेखन प्रपंच.
२६ जून रोजी प्रकाशित झालेल्या सकाळ आणि तरुण भारतचे अग्रलेख कोरे ठेवण्यात आले होते असे आपण म्हटले आहे. पण केसरी, प्रभात सह सर्व वृत्तपत्रांचे अग्रलेख कोरे होते. तरुण भारतचा अग्रलेख कोरा नव्हता, पण तो वाचता न येण्याजोगा म्हणजेच अधली मधली वाक्येच्या वाक्ये राऊट करून म्हणजे खरवडून काढलेली होती. हे काम शिशाची प्लेट मशीनवर चढण्यापूर्वी केले गेले होते.
सांगायचा मुद्दा हा की त्यावेळी अग्रलेख कोरे ठेवण्याची ही कल्पना पुण्यातील कोणत्याही संपादकाने दुसऱ्याशी चर्चा न करता अमलात आणलेली.
दुसरी आठवण दिल्लीचे दैनिक मदरलँड चे संपादक के. आर. मलकानी यांच्या संबंधीची. त्यांना अटक करण्यात आल्याची बातमी २६ जूनच्या पहाटे २.३० च्या सुमारास आली, तेव्हा काहीतरी गडबड आहे असे वाटून ती बातमी छपाई मशीन थांबवून मी प्रसिद्ध केल्याचे आठवते.

तो सगळा आणीबाणी चा काळ संघर्षाचा होता, पण कोणाही पत्रकाराने राजीनामा देऊन या संघर्षात उडी घेतल्याचे आठवत नाही. एखादा अपवाद असू शकतो.”
अशी देखील नोंद गोखले सरांनी केली आहे.
शासनाच्या विरोधात पत्रकारांनी नोकऱ्या सोडायची अशी भूमिका पत्रकार संघटनांनी घेतली नव्हती, हे खरेच आहे. यु एन आय मधल्या माझ्या काही सहकाऱ्यानी फोनवर थोडी चर्चा केली. आपण आपले काम चालूच ठेवायचे असा निर्णय केला असेच मी नमूद केले आहे. याची समाजाला देखील कल्पना होती.
आणीबाणी उठल्यानंतर भारतीय जनता पार्टी चे सरकार सत्तेवर आले. लालकृष्ण अडवाणी माहिती व नभोवाणी मंत्री झाले. आणीबाणी मध्ये पत्रकार कसे वागले याविषयी त्यांनी केलेले विधान खूप गाजले. काँग्रेस सरकारने “पत्रकारांना वाकायला सांगीतलं, तर ते रांगायला लागले”. असं ते म्हणाले. जिव्हारी लागेल असं ते विधान होतं. पण प्रत्येक पत्रकाराने आपली सद्विवेक बुद्धीनुसार निर्णय घेतले. हे नमूद करणं मला आवश्यक वाटल.
गोखले सर यांचा प्रत्येक मुद्दा बरोबरच आहे. केसरी आणि पुण्यातील (आणि देशातील अनेक) वृत्तपत्राच्या संपादकांनी अग्रलेखाची जागा रिकामी ठेऊन निषेध नोंदविला होता. सगळ्या संपादकांनी उत्स्फूर्तपणे इतर संपादकांशी सल्ला मसलत न करता तो त्यांनी घेतला होता.
या आधी म्हटल्याप्रमाणे प्रमाणे “बातमीदारी करताना” हे या मालिकेतील छोटे लेख एका वृत्तसंस्थेच्या वार्ताहराच्या आठवणी आहेत. देशातील पत्रकारितेचा सर्वंकष, सर्वसमावेश इतिहास नाही. त्रोटक आहेच आहे. त्रुटी, मर्यादा आहेत. कोणताही अभिनिवेश न ठेवता लिहिलेले प्रांजळ कथन आहे.
गोखले सरांनी आणि दुसरे ज्येष्ठ पत्रकार सुरेशचंद्र पाध्ये यांनी या निमित्ताने पत्रकारितेच्या विद्यार्थ्याना वृत्तसंस्था पत्रकारितेची तोंडओळख होईल असे सांगत मला लिहिते केले. त्यामुळे हे साप्ताहिक सदर सुरु झाले.
गोखले सरांसारखे ज्येष्ठ व्यासंगी पत्रकार ते नियमित वाचतात आणि लिहायला मला उत्तेजन देतात याचेच खूप अप्रूप आहे !

– लेखन : प्रा डॉ किरण ठाकूर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800