नवउन्मेषशालिनीदेवी शारदेच्या कंठात आलेल्या रत्नमालेतला, ह्रदयाशी सुशोभित झळझळता कौस्तुभमणी म्हणजे कालिदास.
निरभ्र आकाशात माध्यान्ही प्रौढ, प्रगल्भ सूर्य आणि शरदऋतूतला पुनवेचा चंद्र म्हणजे कालिदास…
अशा या महाकवीचा गौरव करत मराठी भाषेत “दीपशिखा कालिदास” ही कादंबरी शुभांगीताई भडभडे यांनी कालिदासाच्या जीवनाबद्दल फारशी माहिती नसलेल्या वाचकांना दिलेली ही साहित्य मेजवानी आहे.
कालिदासाच्या कंठात असलेल्या संदिग्ध आणि आजवर अज्ञात असलेल्या साहित्याला, त्यांच्या जीवनपटाला कादंबरी बध्द करुन वाचकांना एक खजिनाच उपलब्ध करुन दिलेला आहे, असं ही कादंबरी वाचताना वाक्यागणित वाटत रहाते.
कालिदासाचा काळ कुठला ? या प्रश्नापेक्षा
काळालाही मागे टाकत त्यांचं साहित्य संयोग आणि विरह रसांनी ओतप्रोत भरलेल आहे आणि आपल्या देशातच नाही तर जगात सगळीकडे ते पसंतीस येऊन त्यावर साहित्य निर्मिती झाली आहे हे महत्वाचे आहे. त्यांनी वेद, उपनिषदं, आरण्यके, आयुर्वेद, ज्योतिष्य, नाट्य शास्त्र, कामशास्त्र अभ्यासलेलं आहे.
या कादंबरीतून कालिदासाचे दर्शन आपल्याला घडत रहाते. त्यांच्या साहित्यातून प्रगटलेला शृंगार रस,
विरहरस, अर्थ, आशय, अलंकार, उपमा, प्रासादिकता, माधुर्य, ओज यांनी परिपूर्ण असल्याने त्यांच्या काव्याला द्राक्षारसपाक म्हटले गेले या अर्थाने ही कादंबरी म्हणजे परिपाक आहे, असे म्हणावे लागेल.
या कादंबरीतील प्रत्येक वाक्य, संवाद हे कालिदासाच्या महाकाव्याला आणि भाषेला शोभून दिसणारे म्हणजे लावण्यपूर्ण आणि आशयघनतेची जोड असणारे आहेत.
त्यांच्या साहित्याचा मागोवा घेताना लेखिका म्हणतात की “तो एक यक्ष नगरीतील शापित यक्ष असावा, जो पृथ्वीतलावर येऊन विरहात असणारी उत्कटता, स्मृतीगंधात व्यतित करणारा कालिदासच असावा.”
निबंधकाव्य, अनिबंध स्फूटकाव्य, खंडकाव्य आणि महाकाव्य कालिदासांनी हाताळलेले आहे असे लेखिका सूचित करतात.
राजा भोजला विद्योत्तमा नावाची राजकन्या होती का ? शास्त्रार्थ जिंकणाऱ्या पुरुषाशी विवाह करण्याचा तिचा प्रण होता का ? गो-पालक कालिदासाशी व्यूहरचना करुन तिचा विवाह होतो का ? विवाहाच्या पहिल्या रात्रीच ती त्याला “अस्ति कश्चिद वाग्विशेषः” असा प्रश्न विचारते का ? आणि पतीला नगराबाहेर हाकलून देते का ? मग कालिदास प्रज्ञावंत, बुध्दीवंत कसा झाला ? या दंतकथेतील प्रश्नांची उत्तरं आपल्याला या कादंबरीत मिळतात.
किंबहूना शृंगाराची उत्कट वर्णनं कालिदासाच्या साहित्यात आहेत.
शृंगाराची इतकी सुरेख वर्णने केलेली आहेत पण पुन्हा विवाह का केला नाही ? याचं उत्तरही या कादंबरीत आपल्याला मिळते.
भारताचा हा राष्ट्रीय महाकवी विविध साहित्यातून अमर झाला, चिरंजीव झाला पण त्याचे संपूर्ण जीवनचरित्र अंधारातच राहिले. फारसे कुठेही ते समग्र उपलब्ध नाही ते सर्व वाचकांपर्यत पोहोचवण्याचं काम या कादंबरीतून शुभांगी भडभडे यांनी केले आहे.

विक्रमादित्य राजाच्या दरबारात कालिदास परराष्ट्रमंत्री असावा असे त्यांनी मेघदूत मधे अत्यंत आत्मियतेने,
ओजस्वी शब्दात वर्णन केलेल्या भारतातील सौंदर्य वर्णनावरून वाटते असेही शुभांगी ताई म्हणतात.
मानवी जीवनातील स्थायीभाव प्रेम आणि विरह हेच मेघदूत आणि शाकुंतलमधे असल्याने दोन्ही खंडकाव्यांना न्याय मिळाला असे लेखिका म्हणतात.
शृंगारपरिपोष, उदगारलालित्य, निसर्ग चित्रणाला आध्यात्मिकतेची जोड, वृक्षवल्लीतही जीव, त्या जीवांची सुखदुःखे, संवेदना लेखिकेने सविस्तरपणे विशद करताना “कालिदासाच्या नाटकात खलनायक नसल्याने कालिदासाचा चांगुलपणावर प्रचंड विश्वास असावा” असे म्हटले आहे .
कालिदासाच्या साहित्यातील माधूर्य, शब्दलालित्य,
परिस्थितीजन्य गोडवा शब्दातच चितारण्याचा प्रयत्न शुभांगी भडभडे यांनी केला आहे. गणिकेलाही उदात्तता देणारा कालिदासचा एक पैलू अलवारपणे चितारलेला आहे. अनेक दुर्मिळ ग्रंथांच्या आधारे अभ्यासपूर्ण आणि शब्दलालित्यपूर्ण, शब्दसौंदर्याचा नजाकतीने, हळुवारपणे कधी शृंगारिक तर कधी संस्कृत श्लोकाच्या आधारे विचारपूर्वक, सखोल मांडणी असणारा त्या काळच्या भाषेचा गोडवा,
दरबारीबाज, शब्दाचे वजन आणि सौंदर्य वाक्यावाक्यात प्रतित करणारी कादंबरी म्हणजे दीपशिखा कालिदास होय.
वाचकांची उत्कंठा वाढविणारी, वाचनाचा उत्कृष्ठ अनुभुती देणारी इतिहासाचे दाखलेच नव्हे तर कालिदासाचा इतिहास जिवंत करणारी ही कादंबरी वाचकांनी अवश्य वाचावी..
– लेखन : सौ.मानसी मोहन जोशी
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800