नमस्कार, वाचक हो.
केरळच्या अनेक गोष्टींबरोबर अजून एक गोष्ट आपणास भुरळ घालते. आज आपण त्याविषयी थोडेफार जाणून घेणार आहोत.
केरळची शाकाहारी आणि मांसाहारी खाद्यसंस्कृती आपण पाहिली आहे. खाद्य प्रेमींना वेड लावणारे असेच सारे इथले पदार्थ.. पण ज्या गोष्टींमुळे हे पदार्थ खास ठरतात ते म्हणजे केरळचे विशेष असे मसाले. संपूर्ण देशातच नव्हे तर जगभरात केरळचे मसाले प्रसिद्ध आहेत. निसर्ग सौन्दर्याने पर्यटक आकर्षित होतातच पण मसाल्यांच्या उत्पन्नामुळे व्यापारीही आकर्षित होतात.
केरळमध्ये अगदी पूर्वी पासूनच मसाल्याच्या व्यापार जलमार्गी होत होता. परदेशात मसाले जात होते आणि अजूनही जात आहेत. कदाचित यामुळेही केरळला मसाल्यांची भूमी – Land of spices किंवा Queen state of spices असे म्हणतात.
काळे मिरे, लवंग, वेलची, दालचिनी, तमालपत्र, जायफळ, जायपत्री किंवा चक्रीफूल असे महत्वाचे आणि खास मसाले आपणास केरळ मध्ये मिळतात.
गुणवत्तेच्या बाबतीत शंभर टक्के खरे उतरणारे हे मसाले असतात. पाहून नजरेत तर भरतातच पण सुगंधानेही वेड लावतात.
प्रत्येक मसाल्याचा स्वतःचा असा एक खास गुणधर्म, खास वैशिष्ट्य आहे जे आपणास रोजच्या आहारात वापरताना आरोग्यदायी फायदाही देतात.
आपला भारतीय आहार मसाल्याशिवाय अपूर्ण आहे. मसाल्यांचा सुगंध, रुचकरपणा, तिखटपणा, विविध चवी जेवणाची लज्जत वाढवत खूप फायदेशीर ठरतात.
आकाराने अगदी छोटे पण गुणांची खाण असणारी काळी मिरी जेवणात चव वाढवते. त्याचबरोबर सर्दी खोकल्यापासून आराम देत इतरही फायदे देते.
काळ्या मिरी प्रमाणे पांढरी मिरी पण असते बर का.
मसाल्यांची राणी नाजूक सुगंधी हिरवी वेलची. प्रत्येक गोड पदार्थ हिच्या शिवाय अपूर्णच .. इतर मसल्यांपेक्षाही वेलची महाग आहे यावरूनच तीचे मोल आपणास कळतात.
विविध पदार्थांमध्ये स्वाद आणि सुवास देणारे जायफळ तर नाजूक, सुंदर, लालसर गुणकारी जायपत्री रंग, रूपाने मोहात पाडते.
चक्रासारख्या चक्री फूलमध्ये अ आणि क व्हिटॅमिन मोठ्या प्रमाणात असते. याबरोबरच सर्दी आणि खोकल्यावरही चक्रीफूल उपयोगी पडते.
सदाहरीत वृक्षाच्या खोडाची साल म्हणजे दालचिनी. गोड आणि तिखट पदार्थांमध्ये याचा वापर केला जातो. शरीरात वाढणारी साखर असो वा हृदविकार – दोन्हीही रोगात दालचिनी फायद्याची ठरते. तसेच मध घालून केलेला दालचिनीचा चहा वजन संतुलित राखण्यास मदत करतो. याशिवाय अजूनही बरेच दालचिनीचे फायदे होतात.
याच दालचिनीच्या झाडाची पाने म्हणजे आपले तमालपत्र. मंद सुगंध असणारे तमालपत्र पदार्थ रुचकर बनवतात. याचे आरोग्यासाठी फायदेही भरपूर आहेत. पित्त,अपचन यासाठी उपयोगी पडते तर झोप चांगली येण्यासाठी, वेदनेवरती तमालपत्राचे तेल फायदेशीर ठरते.
प्रत्येक मसाला आपल्याआपल्यातच विशेष आहे, अद्वितीय आहे. चव आणि आरोग्यास साजेसा असा मसाल्याचा डबा आपल्या प्रत्येक घरात असतो. आपले पूर्वज मसाल्यांचे गुणधर्म जाणून असल्यामुळे दैनंदिन जीवनात त्याचा उपयोग पूर्वीपासूनच केला जातो. यातच मसाल्यांचे महत्व दिसून येते.
मग.. केरळला आल्यावर मसाल्याची मनसोक्त खरेदी करणार ना ?

– लेखन : सौ. मनिषा दिपक पाटील
पालकाड, केरळ.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800