विश्वास जयदेव ठाकूर या तरूणाने वयाच्या २७ वर्षी
अखंड परिश्रम करीत नासिकच्या बँकिंग जीवनात प्रवेश करून विश्वास सहकारी बँंकेची स्थापना केली. गेल्या २५ वर्षाच्या काळात या बँकेचा लौकिक वाढतच चालला आहे.
विश्वासजी यांनी अर्थ क्षेत्रात एक मोठे बस्तान आपल्या अविरत कार्याने बसविले आहेच परंतु त्या बरोबरच सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील कामगिरीतून एक आगळावेगळा ठसा उमटविला आहे. एक सच्चा समाजव्रती, माणसं आणि पुस्तकं असं दुहेरी वाचन करणारा साहित्यप्रेमी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. राजकारणात रमणारा, कारणाशिवाय माणुसकीच्या नात्याने प्रेम करणारा, विविध सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक संस्थाना आपल्या वैशिष्ट्यपूर्ण भूमिकेतून नवी ओळख देणारे म्हणून ठाकूर यांनी चांगले यश संपादन केले आहे.
माणसं जोडून ठेवण्याच्या मानवतेच्या भूमिकेतून त्यांनी लिहिलेले ‘नात्यांचे सर्व्हिसिंग’ हे अप्रतिम पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. या पुस्तकामुळे ते एक सिध्दहस्त लेखक आहेत हे शिक्कामोर्तब झाले आहे. या पुस्तकास साहित्य विश्वातील अग्रणी असलेले जेष्ठ व श्रेष्ठ साहित्यिक श्री. मधु मंगेश कर्णिक व श्री वसंत आबाजी डहाके यांचे आशिर्वाद लाभले आहेत.
‘नात्यांचे सर्व्हिसिंग,’ या पुस्तकात विश्वास ठाकूर यांनी वेधक कथांच्या माध्यमातून काही सुखद, दुःखद अनुभवांचे उत्तम प्रकारे कथन केले आहे. यातील बहुसंख्य कथा या नाडलेल्या, हतबल, हताश, दुःखी, गैरफायदा घेऊ इच्छिणाऱ्या, स्वार्थ साधणार्या अशा विभिन्न व्यक्तींच्या आहेत.
या पंचवीस कथांतून मानवी स्वभावाचे आणि वर्तनाचे अनेक नमुने पहावयास मिळतात. त्यांच्याशी बँकेच्या निमित्ताने माणसं आणि नाते जोडण्याचा प्रयत्न विश्वास ठाकूर यांनी या पुस्तकात केला आहे. माणसं न तोडता जुळून ठेवण्याचे आणि त्यांना उभे करण्याचा जीवन मंत्र विश्वासजींनी आपल्या बँकिंग क्षेत्रातील अनुभवातून अतिशय उत्तम लेखन कौशल्याने पुस्तकातील प्रत्येक कथेत ग्रथित केला आहे, हे मी या पुस्तकाचे मोठे वैशिष्ठ्य समजतो..
या पुस्तकाच्या माध्यमातून बँकिंग क्षेत्रातील व्यक्तीने आपल्या अनुभवाची सम्रुध्दता मराठी साहित्यात आणली आहे. काही वेदनामय, क्लेशदायक घटना
विश्वासजींनी काही कथेत व्यक्त केल्या आहेत. त्याचबरोबर माणसाला जोडण्याची, चुकलेल्या माणसाला प्रेमाने जवळ केल्याची उदाहरणे या कथासंग्रहात आहेत. संकटाला समर्थपणे सामोरे जाण्याची किमया, जिद्द काही कथात लेखकात आवर्जुन दिसून येते. सगळ्याच कथा बँकेच्या आर्थिक व्यवहाराच्या कायदेशीर निर्णयावर, बाबींवर अवलंबून असतात. आपल्या बँक कर्मचाऱ्यांशी शिस्तीशी बांधिलकी ठेऊन अतिशय मोकळे पणाने वागणूक दिल्याचे आणि त्यांना कार्यप्रवण करण्यासाठी या संग्रहातील कथेतून माणुसकीचे दर्शन ही लेखकाने घडविले आहे.

बहुतेक कथा या आपल्या ओळखीचा फायदा घेऊन कर्ज मंजूर करण्यासाठी आलेल्या आणि बँकेच्या नियमात न बसणाऱ्या व्यक्तींशी गोड बोलून विनम्रपणे, नाकारतांना नाते जोपासण्याची घेतलेली भुमिका असो किंवा कर्जाची थकबाकी झाली असतील व काही प्रकरणात न देण्याचा उद्देश असलेल्या समाजातील उच्चभ्रु मंडळींना, नेते मंडळींना त्यांची जागाही या कथेतून बिनधास्त पणे दाखवून दिली आहे.
बँकींगच्या क्षेत्रात असल्याने मानवी स्वभावाचे इरसाल नमुने या कथांतून स्वतः अनुभवले असल्याने या एकंदरीत सत्यकथाच झाल्या आहेत.
या पुस्तकात आणखी एक अप्रतिम ठेवा आहे. मधु मंगेश कर्णिक यांनी ‘शुभास्ते पंथानः’ या लेखकाला आशिर्वादपूर्ण भुमिकेत साहित्य विषयावर फार छान मते मांडली आहेत.
साहित्य म्हणजे जीवनाची समीक्षा. मानवी जीवन जितके गहन, व्यामिश्र, अतर्क्य, अनाकलनीय, तेवढी ह्याची लेखकीय समिक्षा महत्वाची आणि जोखमीचीही ! त्यासाठी लेखकाने इतरांबरोबर स्वतःचा शोध अंतर्मुखतेने आणि संवेदनशील घेतला पाहिजे साहित्य लेखनाला आत्मशोधाची आहुती दिली, तरच त्याला यज्ञरुपापर्यंत समिधांच्या मार्गाने पोचता येते.अन्यथा ते साहित्य न होता ‘मजकूर’ होतो.’
कर्णिकांचा हा मतप्रवाह मला अत्यंत मोलाचा वाटतो.
यातील प्रत्येक कथेतील विश्वास ठाकूर यांची सकारात्मक भूमिका मला स्तिमित करणारी वाटते. नकारात्मक अनुभवांकडेही ते सकारात्मक चष्म्यातून पाहतात.त्यांच्या संवादात्मक वेधक कथनशैलीमुळे मानवी जीवनाचे बहुरंगी पैलू लक्षात येतात. विशेष म्हणजे या सत्यकथा सांगण्याची ठाकूरांची पध्दत छान पैकी उत्कंठा वाढविणारी आहे नातं हा या सर्व कथांचा गाभा आहे आणि तो टिकविण्यासाठी प्रेमाशिवाय कुठलाही अन्य हेतू असू नये ही लेखकाची भुमिका प्रत्येक कथेतून निदर्शनास येते.
या पंचवीस कथा वाचून आणि मानवी जीवनाचे इरसाल नमुने पाहून थक्क होते. अर्थात ही सत्य वस्तुस्थितीची किमया विश्वास ठाकूर यांच्या असाधारण लेखन शैलीनेच कथाबध्द केली आहे असे म्हटले तर वावगे होणार नाही.
विश्वास ठाकूर यांनी यापुढेही अशा अनुभवसंपन्न कथालेखन नियमितपणे करावे अशी अपेक्षा केली तर तिचे मराठी वाचक निश्चितच स्वागत करतील.आता तर त्यांचे क्षेत्र फारच व्यापक झाले आहे. समाजकारण, राजकारण या क्षेत्रातील अनुभव संपन्न कथांची या ‘नात्यांचे सर्व्हिसिंग’ कथा पुस्तकामुळे आम्हा वाचकांची अपेक्षा आणि उत्सुकता खुप वाढली आहे.त्या पुस्तकाच्या प्रतिक्षेत आम्ही वाचक आहोत हे या पहिल्याच पुस्तकाने विश्वासजींनी निश्चितपणे सिध्द केले आहे.

– लेखन : सुधाकर तोरणे. निवृत्त माहिती संचालक
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800
तोरणे सर,
नेहमी प्रमाणे उत्तम परिक्षण. लेखकाच्या लेखनाची नाडी एखाद्या अनुभवी वैद्यांनी परीक्षा करावी तशी आपण नात्यांचे सर्व्हिसींग ह्या श्री विश्वास ठाकूर यांच्या पुस्तकाचे परिक्षण रुपाने केली आहे.
जसे एखाद्या पक्वान्नाची चव चोखंदळ व्यक्ती पारखतो तसे विश्वास ठाकूर यांच्या पुस्तक रुपी पक्वान्न आपण चाखले आहे.
अभिनंदन