आठवा तास संपला. शामसुंदर ने शाळा सुटल्याची घंटा दिली अन् सगळी मुलं जल्लोषात, हुर्रे ऽऽऽ म्हणत, पाठीवरचं दप्तर सावरत घराकडे पळाली.
मात्र सातव्या इयत्तेच्या वर्गात एक मुलगा आजच्या गृहपाठाची यादी वहीत लिहून घेत, अजून वर्गातच बसून होता. लिहून होताच, नीटनेटकेपणाने दप्तर भरून सावकाशपणे तो वर्गाबाहेर पडला.
निरंजन….निरंजन प्रभाकर कुलकर्णी. इतर मुलांप्रमाणे शाळा सुटल्यावर हा मुलगा घाई का करत नसेल घरी जाण्याची ? हाच प्रश्न रोज शामसुंदरला पडायचा. नेहमीप्रमाणे आजही शामसुंदरकडे पहात निरोपाचं स्मितहास्य करतं निरंजन शाळेबाहेर पडला. त्याची पावलं घराच्या दिशेने वळली.
शाळा ते घर अगदीच जवळ अंतर नसताना आणि त्याच्याकडे सायकल असतानाही तो चालत शाळेत येणं पसंत करायचा. येता-जाता त्याचे दोस्त भेटायचे नं त्याला !
पाठीवरचं दप्तराचं ओझं सावरत अन् समोर आलेल्या दप्तराच्या बंदांशी हाताने चाळा करत तो सावकाश घराची वाट चालू लागला. काही अंतर चालून होताच जोशी काकूंच्या फटकापाशी थबकला ! अलीकडेच जोशी काकूंच्या पाळलेल्या कुत्रीने, लीलिने पिल्लांना जन्म दिला होता. त्या गोंडस पिलांसोबत मस्त वेळ जायचा त्याचा. फाटकातून आत शिरल्या बरोबर ती चारही पिल्लं त्याच्या पायाभोवती फिरू लागली. जणू त्याच्या येण्याचीच ती वाट पहात होती !
त्याने दप्तरातून चार बिस्कीटं काढली अन् पिलांना भरवू लागला. काकू हे सर्व कौतुकाने पहात होत्या.
जरा वेळाने पिल्लांचा निरोप घेत आणि त्यांचा प्रेमळ संभाषणाच्या भाषेत उद्याच्या भेटीचं आश्वासन देऊन तो निघाला. पुलाखालच्या तळयातली बदकं पाहण्यासाठी. पूलाच्या कठड्याशी येऊन तो बदकांचं निरीक्षण करू लागला. पिवळ्या चोचीची शुभ्र बदकं मुक्तपणे पोहत होती. वाऱ्याच्या झुळूकीसरशी अन् पाण्यावर उठणाऱ्या तरंगासमवेत स्वैर विहार करत होती.
त्यांचा तो मुक्त विहार पहाण्यात तो गढून गेला.
पाठीमागून सायकलच्या घंटीचा आवाज येत होता. आवाजासोबतच, एक हात खांद्यावर येऊन थांबला अन् त्याबरोबरच निरंजन..ऽ..ऽ..ऽ अशी हाक कानी आली. दचकून त्याने मागे पाहिलं. तर… मागे सायकल हातात धरून अमेय उभा !
काय रे..काय करतोस इथे ?
अमेयने प्रश्न विचारला.
अंऽऽ…..काही नाही.
मग इथे का उभा आहेस असं ? आणि शाळा सुटून अर्धा तास होतोय. तू अजून घरी नाही गेलास ? आई ओरडत नाही का तुला ?
काही नाही. असंच पहात उभा होतो. निघतोय घरी.
तू कुठे निघालास ?
अरे मी तबला शिकतोय नं, तिकडेच निघालोय.
तुला तबला वाजवाता येतो ?
नाही रे. आत्ता परवाच लावला क्लास. आता शिकेल हळू हळू.
ती आमच्या शेजारची पल्लवी, माहीत आहे न तुला ?
अंऽऽ… हो… तीचं काय ?
ती म्हणे गायन स्पर्धेत पहिली आली. टीव्हीवरच्या एका शो मधे पण झळकली म्हणे ती !
हो का..?
हो. तेंव्हापासून आई सारखी मागे लागली होती अवांतर विषयातही गती हवी, म्हणून लावला मग.
चल रे ….येतो …उशीर होतोय.
हो, अच्छा बाय…
अमेयच्या येण्यामुळे त्याची तंद्री भंगली अन् तो पुन्हा घराच्या दिशेने चालू लागला. त्याच्या घराच्या अलीकडेच रोहनचं घर लागत होतं.
रोहन निरंजनचा घनिष्ट मित्र. दोघेही एकाच बाकावर बसायचे. रोहनच्या घराशेजारून जाताना त्याला घरातून कसलासा आवाज आला, अन् तो तिथेच थबकला. रोहन चे आई-बाबा रोहनवर ओरडत होते त्याला रागे भरत होते. गणितात रोहनला चार गुण कमी मिळाले म्हणून !
आत्ता निरंजनला आठवलं. सहामाही परीक्षेच निकाल लागला आज. त्यालाही घरी सांगायचा होतं.
तो सगळ्या मित्रांच्या भेटी घेत, शाळा सुटल्यावर जवळ जवळ पाऊण तासाने घरी पोचला !
घरी आजी वाती वळत छोट्या कर्तिकीला गोष्टी सांगत होती. निरंजनही आवरून गृहपाठ पूर्ण करत बसला.
नेहमीप्रमाणे साडेसातला आई बाबा कामावरून घरी आले.
स्वयंपाक करून आईने टेबलावर पान मांडली. रात्रीचं जेवण सगळ्या कुटुंबाने एकत्र घ्यायचं हा शिरस्ता. गप्पा मारत जेवण सुरू होतं.
बाबा, आज सहामाहीचा निकाल लागला, निरंजनने सांगायला सुरवत केली.
हं.
निरंजनऽऽ जेवण झाल्यावर बोलूया आपण यावर. असं म्हणत आईने त्याला थांबवल.
जेवण होताच पुन्हा निरंजन ने विषय छेडला.
बाबा, आज सहामाहीचा निकाल लागला.
बरं…
मला गणितात ८८ गुण मिळाले.
वा ..! छानच की.
बाबांच्या या वाक्यावर निरंजन चमकला ! त्याला बाबांनी रागावणं अपेक्षित होतं. पण तसं काहीच घडलं नाही.
रात्री खोलीत झोपायला गेल्यावर मात्र निरंजन विचारात पडला. रोहन पेक्षा कमी गुण मिळूनही बाबा किंवा आई कोणीच रागावलं नाही आपल्यावर. शाळेतून पाऊण तास उशिराने येऊनही आजीने हसत स्वागत केलं. उशिरा येण्याची कारणही विचारली नाहीत. अमेयच्या आई सारखी आपली आई कोणत्या शिकवणीसाठी, क्लाससाठी आपल्यापाठी तगादाही लावत नाही, या सगळ्या गोष्टींचं आश्चर्य वाटत होतं त्याला. पण काही वेळातच या आश्चर्याची जागा रागाने घेतली.
आपले आई-बाबा, आजी इतर मित्रांच्या आई-बाबा प्रमाणे आपल्याला रागावत नाहीत म्हणजे त्यांचं आपल्या कडे लक्षही नाही अन् आपल्यावर प्रेम ही नाही !
जसे दिवस पुढे जाऊ लागले. तो या गोष्टीमुळे अधिकच अस्वस्थ होऊ लागला. गेल्या आठ दिवसात त्याचं बोलणं, आई-बाबा, आजी सोबत संवाद साधणं, जेवण, या सगळ्याच गोष्टीवर परिणाम झाला होता आणि ही गोष्ट आईच्या नजरेतून सुटली नाही.
निरंजनला जवळ घेत आईने त्याला विचारलं. तेंव्हा निरंजन ने दिलेलं उत्तर ऐकून आई हैराण झाली.
आई तुमचं माझ्यावर प्रेम नाही,
तुमचं माझ्याकडे लक्ष नाही.
हे खरं ना..?
आई, मला कितीही गुण मिळाले, मी उशिरा घरी आलो. तरीही माझ्या इतर मित्रांच्या आई बाबा सारखं तुम्ही मला ओरडत नाही. रागावत नाही.
माझ्यापाठी कोणत्या शिकवणी आणि क्लाससाठी तगादा लावत नाही. माझ्या मित्रांना माझ्यापेक्षा कमी गुण मिळाले की जास्त ? याबाबतीत तुम्ही साधी चौकशीही करत नाही कधी. म्हणजे, तुमच्यावर माझ्या कोणत्याही कृतीचा काही परिणाम होत नाही.
तुमचं माझ्यावर प्रेमच नाही, होय ना ?
आता मात्र आईला त्याच्या अस्वस्थ होण्याचं कारण समजलं. आई त्याच्या डोक्यात टपली मारत आणि चेहऱ्यावर हसू आणत म्हणली, बाळ निरंजन, दोन दिवसानंतर तुझा वाढदिवस आहे, हो नं ? त्या दिवशी तुला तुझ्या मनातल्या सगळ्या प्रश्नांची योग्य उत्तरं मिळतील.
आता निरंजन वाढदिवसाची आतुरतेने वाट पाहू लागला. त्याला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवी होती.
तो दिवस उजाडला.
अजून निरंजनला जाग आली नव्हती.
आई खोलीत आली अन् हळूच तिने एक भेट आणि एक लिफाफा निरंजनच्या उशिजवळ ठेवला आणि ती निघून गेली.
जाग येताच त्याला आईने ठेवलेली भेट आणि त्या सोबतचा लिफाफा नजरेस पडला.
परंतु त्या भेटीपेक्षा त्याला त्याच्या प्रश्नांची उत्तरं हवी होती.
म्हणून तो तडक आई बाबांच्या खोलीकडे निघाला. मधेच आजीने त्याला शुभेच्छा देत, आई बाबा कामावर गेल्याच सांगितलं आणि आठवणीने तुझी भेट स्वीकार असा आईचा निरोपही दिला.
आज त्याला भेट नको होती तर उत्तरं हवी होती. खिन्न मनाने त्याने तो लिफाफा उघडला.
त्यात होत आईचं शुभेच्छा पत्र !
त्यासोबतच त्याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं.
अधीर होऊन तो वाचू लागला.
प्रिय निरंजन,
वाढदिवसानिमित्त आई-बाबा आणि आजी तर्फे उत्तमोत्तम आशीर्वाद आणि अनेक शुभेच्छा !
गेल्या आठ दिवसांपासून तुझ्या मनातील अस्वस्थता आणि तुझ्या वागण्यात झालेला बदल आणि त्याची कारणं परवाच्या बोण्यातून स्पष्ट झाली.
आमचं तुझ्याकडे लक्ष नाही. आमचं तुझ्यावर प्रेम नाही कारण इतर मुलांच्या आई वडीलांप्रमाने आम्ही तुला रागवत नाही, हा गैरसमज तू तुझ्या बालसूलभ आकलनातून करून घेतलास.
संस्कार करणं म्हणजे मुलांना बंदिस्त करणं, धाक दाखवणं, त्यांच्या मागे लकडा लावणं आणि मुळात आपल्या मुलाला केवळ आणि केवळ शालेय गुणपत्रिकेच्या आधारावर तोलणं हा अर्थ नाहीच मुळी !
सलीम अलिंबद्दलच पुस्तक वाचल्यानंतर तुझ्या मनात पक्ष्यांबद्दल निर्माण झालेलं प्रेम आणि जागं झालेलं कुतूहल, जखमी काबूतराच्या पिलाला वाचवण्यातून त्याची सुश्रुषा करण्यातून दिसून आलं. सकाळच्या दुधासोबत दोन ऐवाजी चार बिस्कीट मागू लागलास आता आणि ती कुठे जातात हे माहीत आहे आम्हाला. तुझ्यातला हा बदल सूक्ष्म असला तरीही दखल घेण्याजोगा आहे.
आपल्या कामवालीच्या मुलाला तुझी काही पुस्तकं भेट म्हणून देऊ केलीसच आणि त्याला अभ्यासात मदतही करतोस तू, हेही ठाऊक आहे आम्हाला.
तुझ्यामधल्या ह्या निसर्ग आणि समाजाप्रती असलेल्या संवेदनशीलता कुठल्याही गुणपत्रिकात दिसून येणार नाहीत.
तुझी स्पर्धा ही तुझ्याशीच असावी, तुझ्याच क्षमतांशी !
आणि तुझ्या मर्यादा क्षतिजापर्यंत रुंदावलेल्या! इतरांसोबत नव्हे. आम्ही ती करत नाही आणि ती तूही करू नयेस !
शालेय जीवनात गुण मिळवणं गरजेचं आहेच परंतु केवळ गुणापाठी धावणं चूक. आयआयटीतून पदवी घेतलेला एखादा व्यक्ती जेंव्हा आतंकवादी होतो. उच्चपदस्थ व्यक्ती आयुष्यातील साधे संघर्ष करू शकत नाहीत आणि आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलतो. तेंव्हा त्या गुणांच महत्व उरत नाही !
कुठल्याही क्लाससाठी तुझ्यापाठी लकडा लावण्यापेक्षा, तू स्वतःला घडवण्याची संधी देतोय तुला.
तुझे आवडते छंद जोपास तुझ्या मर्जीने. तुझ्या कल्पनेच्या कुंचल्यांनी तू तुझ्या आयुष्याचं मनाजोगत चित्र रेखाटावस आणि त्यात रंग भरावेस !
आजी सोबत भगवद्गीता म्हणतोस तू,
एखाद्या विचारवंताच्या विचारांनी प्रभावित होणं चांगलं परंतु आपली विवेक बुद्धी वापरून त्यातही काळानुरूप बदल करता यायला हवेत उदाहरणादाखल सांगते
ज्ञानेश्वर माऊली हे कृष्णभक्त. भगवद्गीता त्यांनी सामान्य लोकांपर्यत पोचवली.
परंतु…
परित्रणांच साधूनां विनाषयच दुष्कृताम् धर्मसंस्थपणार्थाय संभवामी युगे युगे l l
अर्थात चांगल्या लोकांना वाचवण्यासाठी आणि दुष्टांचा विनाश करण्यासाठी धर्मसंस्थापित करण्यासाठी मी पुन्हा पुन्हा जन्म घेईन. असं भगवंत म्हणतात.
पण माऊली त्या विधात्याकडे पसायदान मागताना म्हणातत,
जे खळांची व्यंकटी सांडो.
म्हणजे दुष्ट व्यक्तीतील केवळ दुष्ट प्रवृत्तीचा नाश होवो. तो व्यक्ती नव्हे, तर त्याच्यातील वाईट प्रवृत्ती नष्ट व्हायला हवी ! हा असा बदल केवळ विवेक बुद्धीतून साध्य होऊ शकतो.
ज्याप्रमाणे यश हे प्रयत्नांच्या धगीवर शिजंत ठेवावं लागतं.
त्याचप्रमाणं परिस्थितीच्या उबेवर संवेदनशील माणूस घडवावा लागतो!
बाळा, तू व्यवसायानं काय व्हावंसं याचं तुझ्यावर बंधन असणार नाही. पण तू समाजभान निसर्गाप्रती सजग आणि आणि आदर असणारा संवेदनशील माणूस व्हावंसं !
जंगलात वाघही धावतो आणि हरिणही धावतं.
परंतु वाघ धावतो ध्येयापाठी हरीण जिवाच्या भीती पोटी.
कोणी काय होऊन धवावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. परंतु माझ्या मते तू वाघ होऊन धावावस धेयापाठी!
वेडी माणसं इतिहास घडवतात आणि शहाणी वेड्यानी घडवलेला इतिहास वाचतात !
तर तू इतिहास घडवणारा वेडा माणूस व्हावंसं !
तुझ्यातला गुणांची दखल शाळेतील गुणपत्रिका घेऊ शकणार नाही पण आयुष्याच्या परीक्षेत माणूस म्हणून तू अव्वल ठरावस,
तू केवळ माणूस व्हावस !
तुझ्या सोबत नव्याने घडलेली…
तुझीच आई.
पत्र वाचून होताच निरंजन चे डोळे डबडबले. आई हे सर्व खोली बाहेरून पहात होती.
तो धावत खोलीबाहेर आला आणि आईला पाहून आश्चर्यचकित झाला.
तू घरातच होतीस ?
होय..
आईला मिठी मारत म्हणाला, माणूस होईल आई मी…मी माणूस होईल…!

– लेखन: सायली कस्तुरे. दूरसंचार अभियंता
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800
कथा मनापासून आवडली. शालेय शिक्षण आणि त्यातील प्रगती महत्त्वाची आहेच पण व्यक्तिमत्वाचा समग्र विकास होण्यासाठी अन्य पैलूही तितकेच महत्त्वाचे आहेत आणि त्यातूनच खराखुरा माणूस घडू शकतो हा संदेश वाचकांपर्यंत पोहोचवण्यास ही कथा यशस्वी ठरलीय.
नमस्कार सायली मॅडम !
तुमची कथा मनाला खूपच भावली. सतत मुलाच्या पाठीमागे लागणं हे चुकीचेच आहे पण त्याच्या वर नजर ठेवणं हे तितकेच महत्त्वाचे आहे. मुलाला सामाजिक भान आहे हे आईनं ओळखले म्हणून ती आपल्या मुलाला काहीच बोलत नव्हती.
सायली मॅडम नेहमी अशाच बोधप्रद कथा लिहित रहा.
धन्यवाद.
सायली कस्तुरे यांची माणूस व्हयचंय् तुला ही कथा अतिशय सुंदर संदेश देते.
आजच्या स्पर्धेच्या जगात ,माणूस माणूसपण गमावून बसलाय्..
पुढच्या पीढीवर चांगले संस्कार डोळसपणे करणे ही पालकांची जबाबदारी या कथेतून अतिशय सुंदर पद्धतीने मांडलीआहे..
मानसा मानसा कधी व्हशील तू मानूस…या बहिणाबाईंच्या प्रश्नाचं उत्तर या कथेत सापडतं,,.
सुंदर कथा…
खूप सुंदर बोधप्रद कथा!
खूप खूप आवडली.
खूप छान गोष्ट सांगितली सायली तू. फारच सकारात्मक वाटली. मी ही माणूस होण्याचा प्रयत्न करतो आहे. खूप शुभेच्छा