आपल्याला मिळालेले आयुष्य क्षणभंगुर असते हे प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे. अहो आज चे आयुष्य उद्या असेलच असे नाही. मग तुम्हीच सांगा की जेवढा काळ आपल्याला मिळतो तेवढे जास्तीत जास्त चांगले वागण्याचा प्रयत्न करायला हवे की नाही ? मग आपण कोणत्याही भूमिकेत असू.
जसे…आई, बहीण, बायको, सखी, नणंद, भावजय, एक साहित्यीक मैत्रीण अशा अनेक भूमिकेत वावरताना एकमेकांविषयी मनात किलमिश न ठेवता स्वच्छ मनाने … मी मनाने म्हणते कारण मन स्वच्छ असेल तरच समोरची व्यक्ती ही आपली वाटते, म्हणून अशा स्वच्छ, आपुलकीच्या नात्यांनी एकमेकींशी वागले तर किती सुंदर नाते तयार होईल.
एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला सांभाळून घेण्याची गरज आहे. तिथे चढाओढ, राग रुसवे, हेवेदावे अशा गोष्टींना महत्व देऊ नये.
एक लक्षात ठेवा आयुष्यात आपल्या कडील एखादी वस्तू कोणाला देऊन टाकली तर आपल्याकडे ती कमी होते, पण प्रेम, माया, आपुलकी ह्या गोष्टी जर समोरच्याला दिल्या तर ते समोरच्या कडून दामदूपट्टीने आपल्याला परत मिळते, ह्याचा आनंद आपल्या चेहऱ्यावर उठून दिसते. एक समाधान चेहऱ्यावर झळकते.
चला तर मग, कोणाच्या सुरवातीची वाट न बघता स्वतःपासून सुरवात करा, एकमेकांना ,..मग ते घरात असो की बाहेरच्या जगात ..सांभाळून घ्या.
तू आणि मी या दोन शब्दात जर चमचेगिरी करणाऱ्या च ला बंद करा. म्हणजे तू च मी आणि “मी” च “तू”, सारे एकरूप….
नात्यांच्या शर्यतीत जिंकण्यापेक्षा हरण्यात मजा आहे कारण स्वार्थी आयुष्य जगण्यापेक्षा समर्पण आयुष्य जगण्यात जास्त मजा आहे.
समोरच्याच्या भावनांना प्रतिक्रिया देऊन कुठेतरी त्याच्या भावनांचा भागीदार होता आले पाहिजे. कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी इतरांचा सल्ला घेण्यापेक्षा आपल्या मनाचा कौल घेतला पाहिजे.
माणसाला सगळ्यात मोठा शाप कोणता तो म्हणजे स्वार्थाचा! माणसाला सर्वात क्रूर करतो तो त्याचा स्वार्थ ! भुकेने व्याकुळ झालेला सिंह आपली भूक शमविण्यासाठी एखादा प्राणी मारून खातो. पण तो कधीच दुसरा सिंह मारून खात नाही.
स्वार्थानं व्याकुळ झालेला माणूस मात्र एक नाही लक्षावधी माणसं मारण्यासाठी मागेपुढे पाहत नाही. स्वतःसाठी जगतो तो माणूस कसला ? काही काही प्रसंगच माणसाच्या संयमाचे बांध फोडण्यासाठी नियतीनं योजलेलं असतात.
प्रत्येक व्यक्तीचं त्याचं स्वतःच असं ख़ास स्वातंत्र्य असतं. ते त्याच त्यानच उपभोगायच असतं. दुसऱ्या कुणी या स्वातंत्र्यात ढवळाढवळ करु नये किंवा कुठल्याही अधीकाराने त्या स्वातंत्र्याचा अधिक्षेप करू नये. त्या प्रयत्नांत केवळ संघर्षच उभा राहतो. माणसाला केवळ भावनावर जगता येत का ? साऱ्याच गोष्ठी नियतीवर सोपवून चालत नाही. जी गोष्ठ माणसाच्या स्वाधीन नाही त्याबद्दल खेद करुन काय उपयोग?माणसानं वास्तवाच भान ठेवून आपल्या मर्यादा विसरु नये. काही वेळा माणूस एखादी गोष्ठ कशासाठी करतो हे त्याच त्यालाच समजत नाही.माणसाची जात त्याच्या कर्तृत्वावर ठरवायला हवी, ती जात म्हणजे माणुसकी !. स्वार्थापायी मनुष्य काहीही करतो. नीती- अनीती, पाप-पुण्य कसलाच विचार करीत नाही.
स्वार्थापुढे माणूस स्वतःला हरवतो, स्वतःला विसरून बसतो. माणसाच्या मनातील कोमल भावनांची राखरांगोळी होते. क्रिया तशी प्रतिक्रिया हा निसर्गाचा नियम आहे. हाच नियम आपण नित्य करत असलेल्या कर्मचरणांच्या बाबतीत आहे. आपल्याला मिळालेले काम हे आपली ज्या ठिकाणी जी भूमिका असते त्या नुसार आपण पार पाडत असतो. मग ते संसारत असो, किंवा बाहेरील जगात वावरताना असो. आयुष्यात प्रत्येक वेळी यश मिळेलच असे नाही ना ? हारजीत होतच असते, उनसावली मिळतच असते. पण जेव्हा यश मिळते तेव्हा त्या यशामध्ये चांगल्या वाईट मार्गाने केलेल्या प्रयत्नांचा भाग किती आहे, खरे खोटे किती आहे याचा जर डोळस पणे विचार केला तर त्याला कधीही यशाची धुंदी चढणार नाही. गर्व अहंकार होणार नाही.
माणसाला सर्वच गोष्टींचा हव्यास असतो त्यामुळे कधी कधी त्याच्यात स्वार्थी वृत्ती निर्माण होते. हे जग फक्त माझ्या सुखासाठी आहे असे समजून निर्माण झालेली ही अहंकारी, स्वार्थी व दुराग्रहाने ग्रासलेली व्यक्ती इतरांच्या भावनांचा विचार करण्याची क्षमता गमावून बसतो. येनकेन प्रकारे यश मिळवणे हाच विचार असल्याने यातूनच मग जीवघेणी स्पर्धा आणि कायम संघर्ष निर्माण होतात. याच स्वार्थीपणामुळे त्याच्या सद् विवेक बुद्धीवर स्वार्थाचे आवरण चढते. त्यामुळे अविवेकबुद्धी त्याच्यावर स्वामित्व गाजवत असते.
जो कोणी निःस्वार्थीपणे आपले कर्म करत असतो त्या व्यक्तीला स्वार्थी माणसांनी भरलेल्या समाजाला तोंड द्यावे लागते ही मोठी खंत आहे. पण कितीही कटू प्रसंग आले तरी निःस्वार्थी माणसाने आपले स्वधर्म कर्म हे आपले नित्य यज्ञकर्म समजून आपले कर्म करीत रहावे.

– लेखन : सौ.अनिता नरेंद्र गुजर
अभामसाप ठाणे जिल्हा अध्यक्षा
– संपादन : अलका भुजबळ. 9869484800
खूपच मार्मिक आणि हृदय परिवर्तन करणारे विचार आहेत.वास्तविकतेचे दर्शन आहे.
अति सुंदर