प्रा. डॉ. भालचंद्र नेमाडे यांची “हिंदू” कादंबरी नेहमी चर्चेत असते. मँजेस्टिक प्रकाशनातर्फे २०१८ साली “हिंदू कादंबरी लेखन स्पर्धा” आयोजित केली होती. या स्पर्धेसाठी जेष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णीक, प्रा. रंगनाथ पठारे आणि प्रा. डॉ. विलास खोले हे परीक्षक होते. प्राध्यापक अविनाश कोल्हे यांच्या ‘पंगतीतलं पान’ या कादंबरीला पहिलं आणि एकमेव पारितोषिक मिळाले.
ही कादंबरी २०२० साली प्रकाशित झाली. या कादंबरीला विदर्भ साहित्य संघाचा सर्वोत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला. आता ही कादंबरी ‘स्टोरी टेल’तर्फे ध्वनी पुस्तक रूपात लवकरच येत आहे. ‘स्टोरी टेल’ साठी या कादंबरीचे वाचन प्रसिद्ध गीतकार संदीप खरे यांनी केले आहे.
‘अल्प परिचय’ मुंबई येथील प्रख्यात रुपारेल महाविद्यालयातुन राज्यशास्त्राचे प्राध्यापक म्हणून निवृत्त झालेले प्रा.अविनाश कोल्हे गेली अनेक वर्षं मुंबईत होणा-या अमराठी नाटकांची परीक्षणं करत आहेत. २०१६ साली मुंबईच्या लोकवाड:मय प्रकाशन गृहाने यातील निवडक परीक्षणं पुस्तक रूपाने ‘रंगदेवतेचे आंग्लरूप’ प्रकाशित केली. २०१७ साली कोल्हे सरांचा दीर्घ कथांचा संग्रह ‘सेकंड इनिंग’ प्रसिद्ध झाला. या संग्रहाला महाराष्ट्र सरकारचा ‘सर्वोत्कृष्ट संग्रह’ हा पुरस्कार मिळाला.त्याचसाली सरांची “चौकट वाटोळी’ ही कादंबरी प्रसिद्ध झाली. या कादंबरीला वर्धा येथील दाते पुरस्कार मिळाला.
– देवेंद्र भुजबळ.9869484800.