गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं आज निधन झालं.
या निमित्ताने त्यांना कवितेतून वाहिलेली श्रध्दांजली
१.
सुरांची तू दिदी होतीस
सुरांची तू साम्राज्ञी होतीस
तुझा आवाज आश्वासक होता
तुझा आवाज मनातला होता
प्रत्येकाची भावना तुझ्या स्वरात होती
तुझ्या सुरांनी जगण्याची उमेद दिली
आज मौनात गेला तुझा सूर
दिदी तूच सांग
कसा व्यक्त होऊ
तुझ्या सुराविना
– रचना : प्रसाद मोकाशी
२.
हरपले सुर….
हरवले सुर ताल
शब्द विरले दुःखात..
शोक होई अनावर
स्वर विरे अनंतात..
नाद मधुर स्वरांचा
साज हरपला आज..
स्मरणात चिरकाल
राही स्वर्गीय आवाज..
आठवांत स्वरमोती
गानकोकिळेची धून..
अधिराज्य जगावर
केले संगीताचे ऋण..
निद्रा घेत अखेरची
जाई सम्राज्ञी सुरांची
कैसी भरावी कळेना
पोकळी ही संगीताची….😔😔
– रचना : प्रणाली
३.
|| लता ||
श्वासातला सा हृदयात जिच्या ती लता
ओठांतली वाऽऽ साद देई जिला ती लता
धाकात सारे सूर वेगळाच तरी नूर
भक्तीचा पूर स्वरा जिच्या ती लता
कंठातल्या समेवर ये सप्तकातला सूर
डोलेे धिंऽधा लयीत जिच्या ती लता
गंधार गळ्याच्या तानेस तान्हे आभाळ
आसुसला चंद्र ऐकण्या जिला ती लता
देवळात पडक्या भक्ताचा झुकता माथा
भेटे देव दूरस्थ आर्तात जिच्या ती लता
आरोह ऐकुनि ईश्वरा लाभली एकाग्रता
सूरमाला अर्पिली गळा जिच्या ती लता
– रचना : सुधीर शालिनी ब्रह्मे
४.
गानसाम्राज्ञी
कुठे हरवली गानकोकिळा
गेले शब्दही मूक बणोनी,
स्वरसाम्राज्ञीचा विरह सहेना
विधात्या निष्ठुर तव करणी।
मला ज्ञात रे स्वरा मोहुनी
निमंत्रुणी तिजला,
निष्ठुरपणे तू च बणविले
भग्ण चि रे मजला।
स्वरविभवाने नटुनी होती सजली
कवणाच्या प्रांगणी,
अप्राप्य केली तू च आम्हाला
अद्वितीय ती स्वरमोहिनी।
प्रेम असो वा विरह असुदे
अथवा शौर्याची आरती,
स्वरविलास तो स्वर्गिय होता
जणु अमृतपानच रे पुढती।
आसवे येती दाटुनी नयनी
श्रवता ती अद्वितीय स्मृती,
सुखे विहर तू स्वर्गामाजी
अर्पितो श्रद्धांजली ही तुजप्रती।
– रचना : डाॅ.श्रीकांत औटी
५.
गेली आज लता
समई निमाली देवघरातील
निशब्दशी शांतता
देवही रडती ढसाढसा रे
गेली आज लता !! धृ !!
वसंत ऋतूची रयाच गेली
आम्र मोहोर गळला
सूर जयाचा गेला गोठून
कोकीळ रडवेला
रंग गंध ती फुले हरवती
वृक्षी निष्पर्णता
देवही रडती ढसाढसा रे
गेली आज लता !! १ !!
सप्तसुरांची राज्ञी जी ती
आज कुठे हरवली ?
बेसूर झाले सकल सूर अन्
तालही बेताली
मधुरामृत सरले गाण्यातील
कुंभची झाला रिता
देवही रडती ढसाढसा रे
गेली आज लता !! २ !!
रंग उडाला मेंदीच्या त्या
हळव्या पानावरला
मावळतीचा दिनकर देखील
स्तब्ध खिन्न गहिवरला
ज्ञानदेव अन तुकोबाही रे
दिसती डोळे पुसता
देवही रडती ढसाढसा रे
गेली आज लता !! ३ !!
ब्रह्मदेवही हताश होऊन
ओंजळ आपुली पाही
ज्या हाताने निर्मीयले तिज
जगी आज नाही
अशक्य केवळ पुन्हा घडविणे
लतासारखी सुता
देवही रडती ढसाढसा रे
गेली आज लता !! ४ !!
गणराज रंगी उदास बसला
खिन्न तशी सरस्वती
हातीची मम म्हणते वीणा
मुकीच झाले पुरती
बाजे मुरलीया आता थांबली
खिन्न कृष्ण होता
देवही रडती ढसाढसा रे
गेली आज लता !! ५ !!
काळनागिणी मृत्यू देवता
वैरीण जी आमुची
नेई तुज ग पैलतीरावर
होसी दृष्टीआडची
चुकचुकली बघ पाल एक ती
काल चक्र थांबता
देवही रडती ढसाढसा रे
गेली आज लता !! ६ !!
सुगंध तव गीतांचा ऐसा
सुवास उदबत्तीचा
भाग्यच माझे मीही एक तो
साक्षी लता युगाचा
शत शत माझे प्रणाम चरणी
माई दिनानाथा
देवही रडती ढसाढसा रे
गेली आज लता !! ७ !!
साश्रूनयनांनी निरोप तुजला
पुढील जन्मी भेटू
असशील जेथे तेथे येऊन
आम्ही तुज गाठू
युगानुयुगे ऐकू तुजला
हीच जीवा स्वस्थता
देवही रडती ढसाढसा रे
गेली आज लता !! ८ !!
– रचना : प्रमोद मनोहर जोशी
६.
देव सारे बोलू लागले
स्वर्गामध्ये वसंत फुलला
गान कोकीळा तेथे गेली
स्वर्ग बागेमधील साऱ्या
डोलू लागल्या लता वेली
अमृत आता झरु लागले
अत्तराचा बरसे पाऊस
देव सारे बोलू लागले
नको लता कुठे जाऊस
सप्तसुरांची लेणी तेथे
आली पूर्ण आकाराला
ब्रम्हदेवाचे स्वप्न आता
आले तेथे साकाराला
रफी मुकेश आदि सारे
सुरारतीसह तेथे जमले
मैफिलीत आनंदघनाचे
पार्श्वसंगीत सूर लागले
इथले निवले अवघे आर्त
निघून गेली पार रया
भक्ती साधना झुरु लागली
अजेय लतास्वर किमया
– रचना : बापू दासरी, उमाग्रज
सर्व कविता छान आहेत…