गानसम्राज्ञी लतादिदी मंगेशकर या नगर शहरातील वेदांतनगरमध्ये सद्गुरू श्री. रामकृष्ण क्षीरसागर महाराज यांच्या चरणी नतमस्तक होण्याकरिता येत असत.
लतादिदी आणि सद् गुरू श्री. क्षीरसागर महाराज यांच्या भेटीचा सोहळा पाहिलेल्या नगर शहरातील भाविकांनी त्या आठवणींचे स्मरण करत आपापल्या घरीच लतादिदींना शब्द सुमनांजली अर्पण केली.
श्रीदत्त देवस्थान ट्रस्टच्या वतीने १९९३ साली
सद् गुरू श्री. क्षीरसागर महाराज यांच्या ६० व्या वाढदिवस सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. श्रीदत्तक्षेत्रच्या प्रशस्त प्रांगणामध्ये “आनंदाचा घनू” ही ह्रदयनाथ मंगेशकरांच्या भक्तीगीत गायनाची मैफिल मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या मैफिलीसाठी आशा भोसले आणि प्रा राम शेवाळकर उपस्थित होते. रात्री उशीरापर्यंत उपस्थितांनी भक्तीरसात डुंबण्याचा आनंद लुटला. मंगेशकर कुटूंबाचे श्रीदत्त देवस्थानमधील हे पहिले आगमन होते. सद् गुरू श्री. क्षीरसागर महाराज यांच्या सहवासाने मंगेशकर कुटूंब फारच प्रभावित झाले.
१९९५ मध्ये ज्येष्ठ विचारवंत प्रा.राम शेवाळकर यांच्या सोबत लतादिदी सद् गुरू श्री. क्षीरसागर महाराज यांच्या दर्शनास प्रथम आल्या. सायंकाळची वेळ होती. नित्याचे पूजापाठ, महाआरतीची तयारी देवस्थानमध्ये सुरू होती. देवदर्शन करून प्रा.शेवाळकर आणि लतादिदी यांनी सद् गुरू श्री. क्षीरसागर महाराज यांचे चरणी नतमस्तक होत दर्शन घेतले. प.पू.श्रीगुरूदेवांनी त्यांना आता भोजन प्रसादाची वेळ झाली आहे. आपणही प्रसाद घ्या, असे सांगताना तुमच्या आवाजाच्या ईश्वरीय देणगीस पुरक असाच भोजनप्रसाद आहे, काळजी करू नका, असे म्हटले. अत्यंत श्रध्देने त्यांनी भोजनप्रसाद घेतला.
येथील प्रसन्न वातावरणातील सात्विक भोजन घेतल्याने आणि आपल्या सहवास लाभल्याने अनामिक ऊर्जा मिळाली, असे म्हणत लतादिदींनी प.पू.गुरूदेवांचे दर्शन घेतले. देवस्थानच्यावतीने प.पू.गुरूदेवांनी लतादिदींना साडी-चोळी देऊन सन्मानित केले. प्रा.शेवाळकर सरांनाही भरजरी कशिदा असलेली शाल व श्रीफळ देत कौतुक केले. प.पू.गुरूदेवांचा निरोप घेऊन लतादिदींनी प्रा.शेवाळकरांसोबत शिर्डीकडे दर्शनासाठी प्रस्थान केले होते.
१९९६ साली भारतीय साहित्य अकादमीचे अध्यक्ष व.दि.कुलकर्णी यांच्या सोबत लतादिदी प.पू.गुरूदेवांच्या भेटीस आल्या. गुरू-शिष्य संवाद कार्यक्रमासाठी व.दि.कुलकर्णी नेहमी येत असत. लतादिदींनी या भेटीमध्ये देवस्थानमध्ये बराच वेळ आनंदाने घालवला. त्या दिवशी एकादशी असल्याने प.पू.श्रीगुरूदेवांचे मौन होते. त्यांचे मौन असल्याने ते बोलणार नाहीत. मी त्यांच्याशी बोलेल असे म्हणत त्या प.पू.श्रीगुरूदेवांच्या पुढ्यात जाऊन बसल्या. गुरूदेव मौनात आणि लतादिदींचे बोलणे सुरू हा एक आगळाच प्रसंग उपस्थित शिष्यवृंदांना पहायला मिळाला. लतादिदींनी प.पू.श्रीगुरूदेवांची आज्ञा घेऊन देवस्थानच्या वेदांत विद्यापीठाच्या वेदपाठशाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याशी संवाद साधत प्रत्येक विद्यार्थ्याला वंदन केले. लतादिदींची ही संवाद भेट वेदाध्ययन करण्यात गढलेल्या सर्व विद्यार्थ्यांना भारावून टाकणारीच ठरली.
१९९७ साली पुन्हा लतादिदी “गुरू-शिष्य संवाद” कार्यक्रमानिमित्त व.दि.कुलकर्णी यांच्यासोबत देवस्थानमध्ये आल्या. या भेटीत त्यांना प.पू.गुरूदेवांचा उत्तम सत्संग लाभला. परमेश्वराने आपणास जो गळा दिला त्याचा उपयोग आपण श्रध्देने त्याचेच गुणगान करण्यासाठी राष्ट्रीय गीते गाण्यासाठी करता आहात ही विशेष प्रशंसनीय घटना आहे. राष्ट्रगीताच्या आणि भक्तीगीताच्या माध्यमामधून देवाची स्तुती करण्याची सेवा निरपेक्षपणे करणे ही एक साधनाच आहे, असे प.पू.गुरूदेवांनी त्यांना सांगितले. लतादिदी तल्लीन होऊन अगदी जीवाचा कान करून गुरूदेवांचे शब्द न शब्द ह्रदयात साठवत आहेत असे दिसत होते.
त्यानंतर डिसेंबर १९९८ मध्ये प.पू.श्रीगुरूदेव मुंबईमधील लिलावती हाॅस्पीटलमध्ये वैद्यकीय उपचार घेत असताना लतादिदी अगदी आवर्जुन भेटीस आल्या. या भेटीमध्ये त्यांनी संतांच्या चरित्रावर गुरूदेवांशी दिलखुलास चर्चा केली. संतांच्या चरित्रामधील गूढ उकलण्याचा प्रयत्न करताना आपलेही जीवन उजळून निघते असे प.पू.श्रीगुरूदेवांनी लतादिदींना सांगितले. आपण फार मोठा धागा माझ्या हाती दिला, असे म्हणत नम्रपणे गुरूदेवांना त्यांनी नमस्कार केला. गुरूदेवांच्या प्रकृतीची आपुलकीने चौकशी केली. डाॅक्टरांची भेट घेऊन प.पू.श्रीगुरूदेवांची सेवा करण्याचे भाग्य तुम्हाला लाभले आहे, असे म्हणाल्या. गुरूदेवांची आज्ञा घेऊन त्या संत गुलाबराव महाराज चरित्र प्रकाशन सोहळ्यास रवाना झाल्या होत्या.
लतादिदींच्या भेटीचा प्रसंग पहाणारे प.पू.श्रीगुरूदेवांचे शिष्यगण लतादिदींच्या नम्रता, निष्ठा, भक्ती, श्रध्दा, विश्वास, आदरभावना, आज्ञापालन, सत्संगाची आस या सद् गुणांचे स्मरण करत त्यांना भावपूर्ण शब्द सुमनांजली अर्पण करताना डोळ्यातील आसवांना वाट करून देत होते.

– लेखन : मिलिंद चवंडके
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800