खरं म्हणजे रविवारी आपल्या न्यूजस्टोरीटुडे पोर्टलला सुट्टी असते. पण कालची लता दिदींची एक्झिट… आभाळ कोसळावं अशी कोसळली. रविवारची सुट्टी जीवघेणी वाटू लागली. त्यातच उस्फुर्तपणे विविध मजकूर, कविता आपसूकच येऊ लागल्या. शेवटी न राहवून आपण कालचा विशेषांक प्रसिद्ध केला.
तरीही भावपूर्ण मजकूर येतच राहिला आणि अजूनही येत आहे. या वरूनच या स्वरलतेची महानता आणि जादू दिसून येते.
पोर्टलच्या मर्यादेमुळे इच्छा असूनही सर्व लेखन सविस्तर देता येत नाहीय. म्हणून ते संकलित करून पुढे देत आहे.
गानसम्राज्ञी
मनात जिद्द आणि मनगटात ताकद असेल तर अंगभूत कलेने आपण सर्वांच्या मनावर अधिराज्य करू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे लता दीदी.
अनेक पुरस्कारांच्या मानकरी ठरलेल्या विश्वविख्यात, पद्मश्री आणि भारतरत्न या सर्वोच्च पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या आदरणीय लता दीदी मंगेशकर यांनी वयाच्या ९३व्या वर्षी आपल्या सर्वांचा अखेरचा निरोप घेतला. त्यांच्या जाण्याने संगीत क्षेत्रात कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्या सुरांचे माधुर्य, ती स्वरांची जादू चिरकाल आपल्या सर्वांवर राहणार आहे. या थोर गानसम्राज्ञीला भावपूर्ण श्रध्दांजली😢
– प्रणाली म्हात्रे. मुंबई.
*###### प्रेस नोट ######*
ब्रह्माकुमारीज श्रद्धांजली
संगीत विश्वावर अधिराज्य गाजवणाऱ्या भारतरत्न, गानकोकिळा लता मंगेशकर ह्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील गायिका होत्या. त्यांच्या जाण्याने संगीत विश्वात पोकळी निर्माण झाली असून त्यांच्या आत्म्यास आपण राजयोगा मेडिटेशन द्वारे शांतीचे दान देऊया, असा आत्मा चिर काळासाठी आपल्या कार्यातून अमर होऊन जातो, अशा शब्दात नाशिक येथील मुख्य सेवाकेंद्र संचालिका राजयोगिनी ब्रह्माकुमारी वासंती दिदीजी यांनी आपले श्रद्धासुमन लता मंगेशकर यांना अर्पित केले. यावेळी ब्रह्माकुमारी गोदावरी दीदी, ब्रह्माकुमारी विनादीदी पुष्पादीदी ब्रह्माकुमारी मीरा दिदी, ब्रह्माकुमारी पुनम दीदी आणि ब्रह्माकुमारी संस्थेचे साधक उपस्थित होते.
– दिलिप बोरसे. नाशिक
लता म्हणजे ल- लयबद्ध .ता- तान. संगीत व लता म्हणजे चिरतरुण व चिरंजीव अद्वैत.आपण असू वा नसू, स्वर आहेत तो पर्यंत लता स्वर चिरंजीव राहणार आहेत. माध्यम काही असो, लता स्वर कानात घुमत राहणार .
– श्रीधर दामले. अमेरिका
भारतरत्न लता दीदी अमर रहे. दिदीना विनम्र भावपूर्ण श्रद्धांजली. 💐🙏😭
– सुनिता नाशिककर
निवृत्त पोलिस उपअधीक्षक, मुंबई
हेवा वाटला नियंत्यास
पाहून धरतीचा कोहिनूर
गानकोकीळा नेली स्वर्गी
ऐकण्यास स्वर्गीय सूर..
लता दीदींवरचे सर्व लेख सुंदर. दिदींना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏻🙏🏻
– सौ. मनिषा दिपक पाटील. पालकाड, केरळ.
The sad demise of Swarsamradni and Bharat Ratna , Lata Didi, is the end of journey of her sweet voice for almost last 8 decades .
Her melodious songs created happiness while in a sad moment, these voices touched everyone’s heart.
In war, in struggle, these same voices aroused enthusiasm and vigor
in defence forces by breaking many bonds like language, border, ethnicity and Religion.
She was Recognized as the
7 th miracle of world as her melodious voice was a blessing to the world who wants to comfort someone.
Latadidi was connected with every family wher her songs are being heard by millions of her fans.
Our heartfelt tribute to great Didi!
– D L Thorat
Retd. Joint Secretary (G o M)
दिदींची एक आठवण
लता दिदींची प्रत्यक्ष भेट हे माझे स्वप्न होते. नव्हे तर तो माझा ध्यासच होता.
जेंव्हा जेंव्हा श्री. प्रमोद सरकटे यांच्याकडे पंडीतजी ह्रदयनाथजी यांची भेट होत असे तेंव्हा तेंव्हा मी पंडीतजींना दिदींची भेट घेण्याची माझी इच्छा प्रगट करीत असे.
एकदा तरी प्रभुकुंज वर डोके ठेवता यावे असा माझा ध्यास होता.
एक सावरकरभक्त म्हणुन एका रात्री प्रमोदजींना पंडीतजीनी फोन करुन अरे ते भाऊ सुरडकर आहेत, त्यांना उद्या प्रभुकुंजला घेऊन या, असा निरोप दिला.
सकाळीच 6.30 वा. मला प्रमोदजींचा फोन आला तेंव्हा मी ज्योतीनगर येथील योग वर्गात योग वर्ग घेत होतो. तसाच घरी आलो. कपडे बदले पर्यंत प्रमोदजी मला घेण्यासाठी आले होते.
मनात विचाराने जणु काही थैमान घातले होते. कित्येक वर्षा पासुनची इच्छा आज पुर्णःत्वाकडे जात आहे. आनंदाच्या लहरी वेगाने पुढे पळत होत्या.
आज पंडीतजीचा वाढदिवस त्यानिमीत्त आम्हालाही ह्या स्वरसागरात बुडायाला मिळणार.
आणि आम्ही प्रभुकुंज वर पोहोचलो. पंडीतजी, वहिनी, राधाताई, उषाताई, मिनाताई, आशाताई……आणि दिदी ! साक्षात….परमेश्वर..
संपुर्ण कुटुंबच… स्वरसम्राट…
त्या घरातील एक एक वस्तु पहातांनी.. आणि ते देवघर ..मंगेशांची मनमोहक मुर्ती.. साईबाबाचा तसबीर …..सागवानात असलेले..देवघर…..
मनातील एका एका कप्यात एक एक गोष्ट साठवत पुढे ..पुढे..
अनेक पुरस्कार.. चित्रपटाच्या हजारो तबकड्या….
आज ह्या क्षणाला सहा वर्ष (26/10/2015) झालीत. माझ्या आयुष्यातील हा अनमोल ठेवा आहे
– भाऊ सुरडकर
अध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ, औरंगाबाद.
माझे थोर भाग्य
मला आज आवर्जून सांगावे वाटते की 2014 या वर्षी कर्नाटक संघ, माटुंगा वेस्ट इथे “रसिकांच्या दरबारात” हा लता दीदी व वसंत प्रभू यांचा दृकश्राव्य कार्यक्रम होता. लतादीदी व संगीतकार स्व.वसंत प्रभू यांची
जुनी गीते आम्ही निवडली होती.
त्या गीतांबरोबर माझी अल्बम मधील 3 गाणी समाविष्ठ केली होती. जवळ जवळ 1000 रसिक हजर होते. त्यावेळेस जेष्ठ संगीतकार अशोक पत्की यांनी माझा सत्कार केला. हे मी माझे जीवनातील थोर भाग्य समजतो.
ही केवळ आत्मस्तुती नाही, पण आज लता दीदीची ही आठवण विसरू शकत नाही !
माझेकडे संपूर्ण कार्यक्रमाचे चित्रण देखील आहे.
– शांतीलाल ननावरे. कवी, गीतकार. मुंबई.
दिदी गेल्याच नाहीत !
सागराच्या आक्राळविक्राळ हजारो लाटा किनार्यावर एकाच वेळी आदळून किनार्यावरील कातळाचा एका क्षणात भुगा करावा, तशी आज सकाळीच अनाहुतपणे भारतरत्न, गानकोकिळा, माजी खासदार आणि आमची ‘माय सरस्वती’ लतादीदी मंगेशकर गेल्याची बातमी कानावर धडकली. मन सुन्न झाले. कोट्यवधी काळजाचा थरकाप उडाला असेल. जगभर ही बातमी गेल्यानंतर अनेकांच्या ‘घरची माय’ गेल्याची, संगीतक्षेत्रातील सरस्वती गेल्याची दु:खद छाया पसरली आणि काही क्षणातच केंद्र सरकारने दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा घोषित करून दिदींना श्रद्धांजली अर्पण केली. राष्ट्राचा सन्मान असलेला तिरंगा ध्वज अर्ध्यावर उतरवण्यात आला, ही खरं तर त्या ‘माय सरस्वती’च्या साधनेची, तपश्चर्येची किमया ठरली.
दीदींचे लौकिकअर्थाने निधन झाले. देह सोडून त्या संगीतक्षेत्राच्या लोकात प्रवासाला निघून गेल्या. तिथंही त्यांचं स्थान वेगळं आणि मानाचं असल्याने स्वर्ग, पाताल, यमलोक, देवलोक वगैरे खुजे ठरतील म्हणून बह्मदेवाने नवं लोक तयार करून दीदींना ‘सप्तसुरांचे संगीतमय लोक’ नव्याने तयार केले असावे. त्यामुळे दीदी गेल्या नाहीतच. छे, कुणाचेच मन मानायला तयार नाही. दीदी चिरंजीवी आहेत, राहतील. केवळ संगीतक्षेत्रातील त्यांच्या तपश्चर्येमुळेच नाही, तर विश्वाची जननी झालेल्या गानकोकिळेने कर्णासारखेच दोन्ही हात वाहते ठेवले होते.
गळा गायचा आणि दोन्ही करकमळाने दीदी सामाजिक भान जपत दीन-दुबळ्यांसोबत सैनिकांची सेवा करायच्या. त्यांचा आध्यात्मिक पाया इतका मजबूत होता की, त्यामुळे त्या जराही आयुष्यात डगमगल्या नाहीत. मग आपल्या वाट्याला जे दुःख आभाळ बनून बरसत राहिले, त्या आभाळाची छटाही कुणाच्या जीवनात येऊ नये, अशी दिदींची सतत मनोकामना असायची. भारतरत्न हा सन्मानाचा किताब मिळाल्यानंतरही त्यांनी जराही नम्रता ढळू दिली नाही. तसे पाहिले तर मंगेशकर घराण्याची नम्रता, शालिनता आणि आपुलकीने प्रेमाचे दान हे दागिने राहिले आहेत. ही भावंडं मास्टर दीनानाथ आणि माई मंगेशकरांच्या उदरी जन्माला आली हा दैवयोग मानावा लागेल. त्यांना दैवत्वाचे लेपण देण्याचा प्रश्न नाही, परंतु, कधी-कधी वाटते की, हीच ती भावंडे पुन्हा आळंदी-पैठणची, पुनजर्न्मास आली असावीत का ? मनाला चपलखपणे हा प्रश्न पडतो. त्यात दिदी साईभक्त, तितकीच त्यांची कृष्णभक्तीही परमोच्च शिखरावरची. माऊली ज्ञानेश्वर आणि भावंडांच्या वाट्याला जशी सुरूवातीला हेटाळणी आली, तसे अपमानाचे घोट पचवून मंगेशकर घराण्याने विश्वात सन्मान प्राप्त करून घेतला तो स्वतःच्या हिंमतीवर.
लाखो गाणी गायली असतील दीदींनी, मराठी, हिंदी, गुजराथी, तेलगू, मल्याळम, तामिळ अशा विविध भाषा अंगिकारून त्यांनी गाणी गायली. त्या गाण्यात जीव ओतताना परआत्मा काया प्रवेशाची तपश्चर्या करत संगीताचा शक्तीपात घडवत त्यांनी संगीतक्षेत्राला नवे आयाम दिले. त्यामुळे पुन्हा लतादीदी होणे नाही, तसा कुणी प्रयत्नच करू शकले नाहीत. दैवी सूर आणि स्वरांचा अमाप मिलाप म्हणजे ‘दिदी’ होत्या. त्या कायमच्या चिरंजीवी बनून आपल्या सर्वांच्या सोबत आहेतच.
– कांतीलाल कडू.
संपादक. निर्भीड लेख, पनवेल
अविस्मरणीय संधी
भारतरत्न श्रीमती लता मंगेशकर यांचे कृष्णधवल व रंगीत फोटो काढण्याची मला महाराष्ट्र शासनाचा छायाचित्रकार म्हणून बऱ्याच वेळा संधी मिळाली.
राजभव येथे 1990 साली श्रीमती लता मंगेशकर यांना राज्यपाल श्री.सी सुब्रमण्यम, मुख्यमंत्री श्री शरद पवार यांच्या हस्ते महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. याच समारंभात प्रसिद्ध गायक पंडित भीमसेन जोशी यांच्यासमवेत व इतर मान्यवरांसमोर फोटो काढण्याची मला संधी मिळाली.
महाराष्ट्र शासनाने 1992 साली श्रीमती लता मंगेशकर यांच्या नावे विशेष लोकराज्यचा विशेष अंक काढला होता. या अंकासाठी त्यांचे विविध फोटो काढण्यासाठी आमचे प्रसिद्धी विभागाचे अधिकारी श्री दिवाकर गंधे साहेब यांच्यासमवेत त्यांच्या निवासस्थानी जाण्याचा योग आला.
गायक श्री सुरेश वाडकर यांच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री विलासराव देशमुख यांनी श्रीमती लता मंगेशकर यांचा सत्कार केला होता. त्याच वेळी याच कार्यक्रमात प्रसिद्ध ज्येष्ठ सिने अभिनेत्री श्रीमती रेखा या सुद्धा उपस्थित होत्या.
एच एम व्ही या रेकॉर्ड कंपनी च्या कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री विलासराव देशमुख ज्येष्ठ अभिनेते सुपरस्टार श्री अमिताभ बच्चन व इतर मान्यवरांबरोबर मला फोटो काढण्याचा योग आला. लतादिदींना भावपूर्ण श्रद्धांजली🙏
– गिरीश देशमुख.
निवृत्त छायाचित्रकार, मा व ज म. महाराष्ट्र शासन
आवाज काफी है.
आज प्रत्येकाच्या खिशात मोबाईल फोन असतो, पण ४० वर्षापूर्वीची परिस्थिती वेगळी होती. प्रत्येक घरात देखील फोन नसायचा. बरेचजण स्नेहसंबंध चांगले असतील तर आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्याचा नंबर PP असे म्हणून देत असत. माझा भाऊ अनिल बर्वेने मुंबईत दादरमध्ये एकवीरा अपार्टमेंट मध्ये flat घेतला होता आणि घरात फोन देखील होता. त्याच सोसायटीत सुशीलाताई कवळी रहायच्या. त्यांचे अनिल प्रेरणा यांच्याशी अगदी घरगुती संबंध.
सुशीलाताई आणि उषा मंगेशकरांची खास मैत्री होती. त्यामुळे त्यांचे सर्व मंगेशकर मंडळींकडे जाणं येणं असे. बरेचदा उषा मंगेशकर यांचा अनिलकडे सुशीलाताईंसाठी फोन यायचा, कधी कधी लतादीदींचा देखील. एक दिवस मी घरात असताना फोनची रिंग वाजली. मी फोन उचलला. “हेलो हा प्रेरणा अनिल बर्वे यांचा नंबर आहे ?” इतका चांगला आवाज मी आयुष्यात प्रथमच ऐकत होतो. मी ‘हो’ म्हणताच तिकडून “मी लता मंगेशकर बोलतेय, आपण सुशीलाला बोलवू शकाल का ? असं त्यांनी विचारलं.
त्यांना नाही म्हणण्याची कोण हिम्मत करू शकेल ? मी हो म्हणून ताबडतोब वरच्या मजल्यावर जाऊन निरोप दिला.
मी विचार केला लतादिदींनी मला तुमच्या घराचा मेन रोड क्रॉस केल्यावर समोर ‘गजानन जागीरदार’ यांच्या बंगल्यावर फोन लागत नाहीये, त्यांना निरोप द्याल का? किंवा त्याच्या मागच्या रस्त्यावर ‘प्रभाकर पणशीकर’ राहतात त्यांना तुम्ही बोलावू शकाल का ? किंवा तुमच्या घराजवळील आगर बाजारातील अमुक अमुक वस्तू मला हवी आहे ती मला आणून देऊ शकाल का? असा कोणताही सांगावा जरी असता तरी मी त्याला आदेश मानून त्वरित ‘हो’ म्हणालो असतो कारण त्यांचा “आवाज काफी है”.
– चंद्रकांत बर्वे. निवृत्त संचालक. दूरदर्शन
महानिर्वाण
ज्ञानेश्वरीत वर्णन केले ‘माऊलींनी माघ, उत्तरायण, सूर्योदय, रवि दिनी यावा मृत्यू मिळेल मोक्ष शुभक्षणी याचीच वाट पाहिली भीष्मांनी’
दीदी तुम्ही सारेच साधलेत.
शुभमुहूर्त वसंत पंचमी
दीर्घ झुंज कोरोना, निमोनिया
यमालाही झुलत ठेवलेत
घाबरत होता तोही
अखेर शुभमुहूर्तावर केलेतच प्रमाण
तुमच्या आगमने, स्वर्गात आनंदी आनंद
गुलाबाच्या पायघडया
स्वागता उभी वीणावादिनी
येणार आज सूर सम्राज्ञी , गानसम्राज्ञी भारतरत्न लता ।
सकाळ ते रात्र जगाला रिझवले
सुमधुर मधाळ सुरांनी
दीदी तुम्ही तर इथेच आहात
आता नाही ढाळणार अश्रू
तुम्ही साक्षात स्वर्गात आरोहण केले
सतत तुमचे सूर ऐकून मन शांतवू
त्याग, संघर्ष , विनम्रता आठवू
दीनानाथांचा कल्पवृक्ष
तुम्ही फुलवला
बघायला बाबा आले नाही
म्हणून तुम्हीच गेलात भेटायला
कृतार्थ जन्म केला ॥
🙏🙏🙏
– सुलभा गुप्ते. सिडनी
लता दीदी आणि संगमनेरकर
भारतीय संगीत क्षेत्रात अतुलनीय योगदान देणाऱ्या गानसम्राज्ञी लता दीदी आज आपल्यातून गेल्या. मागील काही दिवसांपासून त्यांच्या तब्येतीच्या बाबतीत वेगवेगळ्या बातम्या येत होत्या. आणि आज ती दुःखद बातमी आली.
भारतातील एकही गाव किंवा एकही माणूस असा नाही की ज्यांची या नावाशी निगडित एकही आठवण नाही. मात्र संगमनेरकर आणि लता मंगेशकर यांचा एकत्रित विचार करताना दोन तीन आठवणी लगेच डोळ्यासमोर आल्या.
पहिली आठवण म्हणजे साडेतीन चार दशकांपूर्वी लता मंगेशकर यांनी आजोळची गाणी या नावाने गाण्यांचा एक स्वतंत्र अल्बम तयार केला व त्यात काही गाणी सादर केली. सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया तेंडुलकर यांनी लता मंगेशकर यांच्याशी गप्पा मारीत त्यांच्याच तोंडून काही आठवणी जागवल्या होत्या. या अल्बममध्ये एक लावणी होती. लता मंगेशकर यांनी अनेक प्रकारची गाणी गायली मात्र लावणी हा सांगितिक प्रकार त्यांनी अतिशय अभावाने गायला आहे.
आजोळची गाणी या अल्बममध्ये त्यांना एक लावणी गायची होती मात्र या लावणीच्या सादरीकरणाचे चित्रीकरण करताना गुलाबबाई संगमनेरकर यांनी अदाकारी करावी अशी इच्छा लता मंगेशकरांनी व्यक्त केली. ही लावणी होती, ‘राजसा जवळी जरा बसा’
पुण्याच्या विश्रामबाग वाड्यात या गाण्याच्या शूटिंगसाठी जय्यत तयारी झाली. गुलाबबाई संगमनेरकर आणि त्यांची 14-15 वर्षाची कन्या वर्षा संगमनेरकर यांनी या लावणीवर अप्रतिम अदाकारी केली. आजच वर्षाताईशी बोललो तेव्हा त्यांनाही आयुष्यात आपल्या हातून लता मंगेशकर यांच्या मूळ गाण्यावर अदाकारी करण्याची संधी मिळाल्याचे समाधान जाणवले.
यानंतर त्यांची दुसरी आठवण म्हणजे, मागच्या काही महिन्यांपूर्वी संगमनेरच्या सारंग भालके याने झी टीव्हीच्या सारेगमप लिटिल चॅम्प या कार्यक्रमात ‘गगन सदन तेजोमय’ हे गाणे गायले. या कार्यक्रमाला उषा मंगेशकर पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी या गाण्याबद्दल दीदींनी सांगितले आणि दीदींनी आपण सारंगचे गाणे ऐकणार असल्याचे उषाताईंच्या मार्फत झी टीव्हीला कळवले. त्यानुसार दीदींनी सारंगचे गाणे आवर्जून बघितले आणि त्या सारंगच्या आवाजाने प्रभावित झाल्या.
लता मंगेशकर यांची तिसरी आठवण म्हणजे सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी नाशिकच्या कैलास मठाच्या वतीने दिला जाणारा पुरस्कार लता मंगेशकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला होता.
– डॉ संतोष खेडलेकर. संगमनेर
लता मंगेशकर माझ्या अत्यंत आवडत्या गायिका. त्यांच्या आवाजाच्या जादुनेच मी पाच वर्षापुर्वी गायनाकडे आकर्षित झाली .
आज माझी आसवांची ओंजळ भरुन वहात आहे. निशब्दपणे माझ्या आजीच्याही स्मृती जाग्रुत झाल्या . मी कुठेही न शिकता पहिले गीत शिकली ती आजीच्या कुशीत.ती रोज न चुकता रेडिओ वर लता मंगेशकर यांची गाणी ऐकत असे. या आजीसाठी आणि या गान कोकीळेसाठी काय लिहावे,ते सुचत नाही. ही अश्रुपुर्ण ओंजळच त्यांच्या चरणी मी अर्पण करते आणि साश्रुपुर्ण नयनांनी श्रद्धांजली अर्पण करते
– निलिमा देशमुख. अमरावती
आठवणीतल्या लतादीदी
मी साधारण चौथीमध्ये असेन. वय वर्षे दहा. दिवाळीचे दिवस होते. रस्त्यावर गर्दी होतीच. संध्याकाळची वेळ. अंधारून आलेलं होत.
कोल्हापूर मध्ये बिंदू चौकात खादी ग्रामोद्योग भांडार आहे तिथे मम्मी सोबत थांबलो होतो. पप्पा काहीतरी कामानिमित्त ऑफिसमध्ये गेले होते. त्यावेळी मोबाईल नसल्याने बाजूला कॅप्टन स्पोर्ट्स मध्ये खेळाचे साहित्य पाहणे, दगडांशी खेळणे, गाडीच्या काचेवर बोटाने लिहिणे असे नसते उद्योग चालायचे.
अशातच समोर एक मोठी गाडी थांबलेली दिसली. आजूबाजूला काही माणसे थांबून दबक्या आवाजात चर्चा करत होती. गाडीच्या आतमध्ये चालू असणाऱ्या ए.सी. मुळे काचेवर दव जमा झालं होत. गाडीच्या आत मधलं काहीच दिसत नव्हत. मी बाल सुलभ मनाने गाडीच्या काचेवर दिसणाऱ्या दवावर रेघोट्या मारत होतो. काचेवर दव कमी होईल तस आतील प्रतिमा स्पष्ट दिसत होती. पाठीमागच्या सीटवर थोडंसं अंग चोरुन पांढऱ्या रंगाच्या साडीमध्ये काळेभोर केस अगदी नीटनेटके बांधून उतारिला झुकलेल्या एक बाई विचारमग्न बसलेल्या होत्या. खिडकीच्या काचेवर होणारी हालचाल त्यांना जाणवली म्हणून त्यांनी खिडकीकडे पाहिले. एक क्षण आमची नजरा नजर झाली. माझे डोळे विस्फारले. तोच समोरच्या व्यक्तीने तोंडावर बोट ठेवलं. परंतु मी किंचाळलो होतोच, मम्मी लता मंगेशकर ! माझा आवाज ऐकुन रस्त्यावर एकच गलका उडाला. आजूबाजूची माणसं मलाही ढोसण्या मारून बाजूला करू लागली. लतादिदी माझ्याकडे बघुन नेहमी सारख्या दिलखुलास हसल्या. अगदी आपण फोटोमध्ये बघतो तशाच.
त्यांनी ड्रायव्हरला इशारत केली. काहीच क्षणात गाडी निघाली. मी मात्र गाडीकडे बघतच राहिलो.
आज जवळपास वीस वर्षे झाली असतील पण तोंडावर बोट ठेवून गलका करू नये खुणावणाऱ्या लतादीदी अगदी जशाच्या तशा आठवतात. माणसांची गर्दी होताना कदाचित त्यांना निघाव लागलं. कदाचित याचा त्यांना त्रासही झाला असेल पण यामुळे त्रासिक होऊन किंवा वैतागून न जाता कौतुक आणि प्रेमभराने हसणाऱ्या लतादिदी चिरकाल स्मरणात राहतील. कदाचित त्यांचं असं साधं राहणं, प्रेमळ वागणं अगदी सहज असेन. म्हणून तर लतादिदींनी आपल्याशी कनेक्ट करूंन गेलं असेल.
आज माझ्यासारखं लाखो लोकांना अन्न गोड लागत नसेल, कशातच मन रमत नसेल आणि राहून राहून डोळ्यांची कड पणावल्याची जाणवत असेल.
– अमेय पोतदार. कोल्हापूर
मर्मबंधातील ठेव
आपले वडील दीनानाथ मंगेशकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भारतरत्न लता मंगेशकर यांनी पुणे अत्याधुनिक वैद्यकीय सेवा सुविधा असलेले दीनानाथ मंगेशकर रुग्णालय उभारण्याचे ठरविले होते. त्यासाठी जागेची पाहणी करण्यासाठी त्या स्वतः व उषा मंगेशकर आल्या होत्या.

तत्कालीन जिल्हाधिकारी व विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांच्या समवेत जिल्हा माहिती अधिकारी म्हणून उपस्थित राहण्याचे भाग्य मलाही लाभले होते. दिदींच्या जाण्याने ही आठवण जागी झाली. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली💐
– सुधाकर तोरणे. निवृत्त माहिती संचालक
ह्रद्य आठववणी..
स्वरलतेचे सूर अमर आहेत…