माझ्या मुंबई दूरदर्शन मधील नोकरीत मला अनेक दिग्गज व्यक्तिमत्वाना भेटता आलं. जवळून पाहता आलं.
24 एप्रिल 2004 हा दिवस मुंबई दूरदर्शनच्या इतिहासातलं एक सुवर्णपान. या दिवशी मुंबई दूरदर्शन केंद्रात भारतरत्न लतादिदी मंगेशकर मॅडम आल्या होत्या. निमित्त होतं मुंबई दूरदर्शन केंद्राच्या सह्याद्री नवरत्न पुरस्कार वितरण समारंभ. आदरणीय दिदी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या होत्या. माननीय लतादीदींनी या कार्यक्रमाला यावं अशी तेव्हाचे केंद्र संचालक श्री मुकेश शर्मा यांची इच्छा होती. ही इच्छा सफल झाली ती केवळ नाट्यनिर्माते स्वर्गीय मोहन वाघ यांच्यामुळेच.
लतादिदींनी कार्यक्रमाला यायला हवं ही सर्वांची इच्छा होती. पण प्रभूकुंज पर्यंत पोहोचायचं कसं ? हा प्रश्न होता. अचानक स्वर्गीय नाट्यनिर्माते मोहन वाघ साहेब यांची आठवण झाली. श्री वाघ साहेब आणि लतादिदींचे कौटुंबिक ऋणानुबंध होते. मी मोहन वाघ साहेबांना फोन केला. संचालकांचा निरोप आणि इच्छा व्यक्त केली. श्री वाघ साहेब नेहमीप्रमाणे म्हणाले, काम होऊन जाईल. दिदी दूरदर्शन केंद्रात याव्यात ही तुमची इच्छा आहे ना ? ती पूर्ण होईल.
त्यानंतर श्री वाघ साहेबांनी या कार्यक्रमासाठी दिदींची भेट घेतली. दिदी सह्याद्री नवरत्न पुरस्कार समारंभाच्या अविस्मरणीय संध्याकाळी मुंबईत वरळीच्या दूरदर्शन केंद्रात पोहोचल्या. तो दिवस उपस्थित सर्वांनाच, विशेष करून दूरदर्शन परिवाराला आनंद पर्वणीचा होता. लतादिदींच्या पीए कडून आधीच निरोप मिळाला होता, की त्या फक्त अर्धा तास कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रम सुरू झाला. दिदींच्या हस्ते समारंभाचे उद्घाटन झालं. आणि पुढे अर्ध्या तासाऐवजी त्या संपूर्ण तीन तास सह्याद्री नवरत्न पुरस्कार समारंभ होईपर्यंत थांबल्या. त्यांनी दिलखुलासपणे पूर्ण कार्यक्रमाचा आनंद घेतला. जाताना दूरदर्शनच्या संचालकांच्या केबिन मधल्या अभिप्राय नोंदवहीत आपल्या हस्ताक्षरात सुंदर अभिप्राय लिहिला. आज तो अमोल ठेवा आहे.
दिदींच्या जाण्याने सभोवताल शोकाकुल आहे. त्या दिवशीची त्यांची स्मरणीय भेट आणि त्यांच्या सोबतचे छायाचित्र माझ्यासारख्यासाठी ऐतिहासिक ठेवा आहे. आदरणीय लतादिदींना भावपूर्ण आदरांजली

– लेखन : जयु भाटकर
निवृत्त सहायक संचालक. दूरदर्शन
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800