नवयुग विद्यालयात झालेल्या ‘ओंकार काव्य दर्शन’ या माझ्या शालेय कार्यक्रमाला चांगली प्रसिद्धी मिळाली. शिवाय तिथे रेकॉर्डिंग करून तयार झालेली कॅसेट संघ शाळांमध्ये पोहोचविल्याने महाल विभागातील नवयुग विद्यालयात माझा दुसरा शालेय कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर लोकांची शाळा, हडसर विद्यालय, सीताबर्डीची भिडे कन्या शाळा, सेवासदन हायस्कूल, धन्तोलीतील सुळे हायस्कूल, अशा शाळांमध्ये माझे शालेय यशस्वी झाले.
महालातील नवयुग विद्यालयात सौ.महाबळेश्वर मॅडम मराठी शिकवत होत्या. ‘गदिमांच्या अनेक अपरिचित कविता माझ्याकडे मी संकलित संकलित केलेल्या आहेत!’ असे सांगून सादर केलेली “माहेरची ओढ” कविता असलेली माझ्या शालेय कार्यक्रमाची कॅसेट महाशब्दे मॅडमनी त्यांच्या घरातील सर्व रसिकांना ऐकवली. त्यांचे चिरंजीव अमर आणि सूनबाई श्रद्धावहिनी दुसऱ्याच दिवशी सकाळी सकाळी मला शोधत गोपाळ कृष्ण लॉजवर आले. आमचे चहापाणी झाल्यावर अमरभाऊ मला म्हणाले, ‘बापटसर, तुमच्या शालेय कार्यक्रमाची कॅसेट आम्ही ऐकली. त्यातील गदिमांच्या अपरिचित कविता तुमच्या संकलनात असल्याचे तुम्ही सांगितले आहे. त्या अपरिचित कविता आम्हाला द्याल कां ? कारण माझी पत्नी श्रद्धा गदिमांच्या कवितांवर पीएचडी करते आहे. त्यासाठी त्या कवितांचा उपयोग होणार आहे.’ रात्रीच्या
जेवणासाठी निमंत्रण देऊन ते निघून गेले.
रात्री खास वर्हाडी पद्धतीने महाशब्दे कुटुंबियांनी माझे स्वागत केले. ‘मंदिर उभविणे हेच आमुचे शील।
असु आम्ही सुखाने पत्थर पायातील।।’ ही कविता लिहिणारे बापू महाशब्दे म्हणजे पितृतुल्य व्यक्तिमत्त्व.! त्यांचे हस्ताक्षर अप्रतीमच होते. त्यामुळे हस्तलिखिताने ‘स्टेन्स कट करून प्रिंटिंग करून देणे, हा त्यांचा व्यवसाय होता. सुंदर हस्ताक्षराची देणगी अमरभाऊना बापुंकडूनच मिळालेली होती. शिवाय मराठी भाषेचा विशेष अभ्यास असल्याने दै. नागपूर पत्रिकेत पत्रकार व प्रुफरीडर म्हणून अमर नोकरी सुद्धा करीत होते.
सौ.श्रद्धावहिनी सक्करदरा येथील एका अध्यापक विद्यालयात (डी.एड्. कॉलेज) प्राचार्य पदावर काम करीत होत्या. त्यांच्या पीएचडी साठी माझ्या संग्रही असलेल्या गदिमांच्या सर्व कविता मी श्रद्धावहिनींना दिल्या. त्या दिवसापासून मी महाशब्दे कुटुंबाचा भाग बनलो.
अमरभाऊंमुळे नागपूर पत्रिका व नागपूर टाइम्सच्या कार्यालयात माझे जाणे येणे वाढले. तेथील मुख्य संपादक गद्रे साहेबांपासून शरद देशमुख, प्रवीण बर्दापूरकर, अनील महात्मे पर्यंत सर्वांबरोबर माझा घट्ट परिचय झाला. या सर्व मित्रांच्या सहकार्याने दै.नागपूर पत्रिकेच्या कोजागरी निमित्ताने जादुगार भावसार यांच्या जादूच्या प्रयोगांबरोबर माझा “कुटुंब रंगलंय काव्यात” हा एकपात्री कार्यक्रम मला अमरभाऊंमुळे सादर करायला मिळाला. माझ्या एकपात्री कार्यक्रमाचा नागपूर मधील तो पहिला प्रयोग संपन्न झाला. नागपूर पत्रिके प्रमाणेच नागपूर टाइम्स या इंग्रजी वृत्तपत्रातही माझ्या एकपात्र कार्यक्रमाची भरपूर प्रसिद्धी झाली. त्याचा उपयोग झाल्याने नागपूरातील माझे एकपात्री प्रयोग सहजपणे ठरण्यासाठी मला मदत झाली.

– लेखन : प्रा विसुभाऊ बापट, मुंबई
(सादरकर्ते- ‘कुटुंब रंगलंय काव्यात’)
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800