हल्लीच्या सोशल मिडीया आणि ब्रेकिंग न्यूज च्या काळात पत्रकारांना खूप संशोधन करून, भरपूर पायपीट करून लिखाण करण्यात स्वारस्य नसते. तसे लेखन प्रसिद्ध करण्यात संपादकाला आणि प्रकाशकाला स्वारस्य नसते असा सार्वत्रिक समज आहे.
या समजाला छेद देणारे आपल्याच समाजात थोडे तरी लोक आणि संस्था आहेत हे सिद्ध करणारे
“कांद्याची रडकथा” हे पुस्तक नुकतेच वाचायला मिळाले याचा आनंद वाटतो.
योगेश प्रकाश बिडवई या लासलगावचे भूमिपुत्र असलेल्या मराठी पत्रकाराने हा आनंद दिला आहे. कांद्याच्या रडकथेने शेतकऱ्याच्या आणि संसारी महिलांच्या डोळ्यांत दर वर्षी केव्हा ना केव्हा पाणी येतच. त्यामागचा कार्यकारण भाव कष्टपूर्वक सातत्याने घ्यावा असे आजतागायत पत्रकार आणि संपादकाला वाटले नाही ही वस्तुस्थिती आहे. श्री योगेश बिडवई यांना तसे करावेसे वाटले, लोकमतच्या संपादकानी प्रोत्साहन दिले हे नक्कीच स्वागतार्ह आहे.
त्यापेक्षा जास्त कौतुक वाटते ते युनिक फाउंडेशन या संस्थेच्या भूमिकेचे. शेअर बाजाराच्या निर्देशांकापेक्षाही मोठी अनिश्चितता कांद्याच्या बाजारपेठेत आहे. कांदा उत्पादनाच्या बाबतीत जगात चीनचा पहिला तर भारताचा दुसरा नंबर लागतो. अशी परिस्थिती असलेल्या विषयाचा अभ्यास करण्यासाठी खरं तर शासनाने किंवा एखाद्या मोठ्या आंतरराष्ट्रीय संस्थेने हाती प्रकल्प घेऊन सखोल अभ्यास करायला पाहिजे. परिस्थिती बदलण्यासाठी काय करायला पाहिजे या बाबतच्या शिफारशी सादर केल्या पाहिजेत. पण तसे झालेले नाही.
एवढे महत्त्वाचे काम हाती घेतले आहे ते युनिक फाउंडेशनने. याबद्दल त्यांचे अभिनंदन केलं पाहिजे ते अशा साठी देखील की पुस्तकाचा प्रकल्प संशोधनानंतर गेल्या तीन साडेतीन वर्षात पूर्ण केलेला आहे.
महाराष्ट्रात व आशिया खंडातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजार पेठेत सतत अनिश्चितता निर्माण होते. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न, साठवणुकीतील अडचणी, साठेबाजी, आणि व्यापाऱ्यांची मक्तेदारी, महिलांचे श्रम, भावातील चढ-उतार, हवामान बदल, शासनाची भूमिका, शिवार ते बाजारा पर्यंतच्या अर्थकारणाची चर्चा असा खूप मोठा विस्तृत आवाका या पुस्तकामध्ये त्यांनी घेतला आहे.
शासन आणि कृषी क्षेत्रातील आवश्यक त्या सर्व स्रोतांचा आकडेवारीसाठी पुरेपूर वापर केला असल्यामुळे हे पुस्तक महत्त्वाचे दस्तावेज (डॉक्युमेंट) ठरते. पन्नास वर्षातील अनुभव आणि त्यांचे दुःख त्यांनी आस्थापूर्वक पण तरीही तटस्थपणे मांडले आहे हे वैशिष्ट्य विशेष आहे
फक्त शेतकऱ्यांच्या किंवा व्यापाऱ्यांच्या बाजू यात मांडलेल्या आहेत असे नाही तर या क्षेत्राशी संबंधित असलेल्या प्रत्येक घटकाशी त्यांनी संपर्क साधला आहे. माहिती जुजबी, तात्पुरती अशी नाही. शेती, शेतकरी आणि शेतमजूर यांच्या बरोबरच मंत्री, विधानमंडळ आणि संसद सदस्य, व्यापारी, अडते, अशा सर्व घटकांची माहिती त्यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन गोळा केली आहे. कांद्यासाठी पिशव्या शिवणाऱ्या महिलेची सुद्धा व्यथा देखील त्यांनी मांडली आहे.
हे पुस्तक मराठीत आहे एवढीच मर्यादा आहे. याचे इंग्रजी आणि हिंदी भाषेत तरी भाषांतर प्रसिद्ध झाले तर शासन, मुख्यतः माध्यम क्षेत्रातील पत्रकारांना संदर्भासाठी मोठा स्रोत उपलब्ध होईल असा विश्वास वाटतो.
वर्तमानपत्रात आणि टीव्हीवर सांगोपांग, सविस्तर, सर्व बाबींचा विचार होण्यासाठी असे पुस्तक सर्व संबंधितांच्या संदर्भासाठी उपलब्ध असले पाहिजे असे आग्रहाने नमूद करावेसे वाटते.

– लेखन : प्रा किरण ठाकूर.
विश्वकर्मा विद्यापीठ, पुणे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800
डाॅ.किरण ठाकूर यांनी कांद्याची रडकथा या पुस्तकाच्या परिचयाच्या निमित्ताने शेतकर्यांच्या महत्वाच्या प्रश्नाला ऐरणीवर
आणले आहे हे नक्कीच..सामाजिक कर्तव्याच्या जाणीवेतून
हे पुस्तक खरोखरच घरोघरी पोहचले पाहिजे..
असे मनापासून वाटते..