भारतरत्न गान कोकिळा लतादिदिंच्या
पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन🙏
१.
गंधर्वकन्या
भारतरत्न गंधर्वकन्या
विलीन जाहली अनंतात
स्वर सम्राज्ञीच्या वैकुंठागमनाने
बुडाले रसिकजन शोक सागरात
अमृतमय मधुर स्वर
विसावले कायमचे
युगान्त जाहला सप्तसुरांचा
बांध फुटले अश्रूंचे
लता दीदिंच्या निधनाने
आबालवृद्ध हळहळले
सामान्य वा असामान्य
सर्वांचेच नेत्र पाणावले
करोडो भारतियांच्या ह्रुदयात
बांधले दीदिने घर
चंद्र सूर्य असेतो गुंजतील
तिन्ही लोकी गान कोकिळेचे स्वर
संगीत विश्वातला ध्रुवतारा
पडला अकस्मात निखळून
चित्रपट विश्वातली पोकळी
कधी न निघणार भरून
दीदिंच्या रुपाने गात होती
साक्षात् सरस्वती
सात दशके अव्याहत
वाहात होतं सुरांचं अमृत ओठी
दूर होती व्यथा
गाणे लतेचे ऐकता
देवांना रिझवाया आता
गेली स्वर्गलोकी स्वर लता
आले देवाचे बोलावणे
वसंत सुरू होता
धरेवरचे थांबले सूर
सून्न जाहली भारतमाता
कंठ दाटून आला
ओघळती अश्रू घळघळा
पुन्हा कसा फुलेल आता
सप्तसुरांचा मळा
कधी न सरती अश्रू
कधी न दीदी तुला विसरू
प्रत्येक भारतियासाठी होतीस तू
चिंतामणी कामधेनू कल्पतरू
तुझा गोड आवाज ऐकत
ताल धरायचा वारा
तुझी दुःखद बातमी ऐकून
वाहायचं थांबला झरा
गाणं होतं तुझा ध्यास
गाणं होतं तुझा श्वास
गाणं तुझं ऐकण्यासाठीच केला
देवाने तुला नेण्याचा अट्टाहास
कोण म्हणतो असं
दीदी आमची गेली
अब्जावधी रसिकांना लळा लावून
लता दीदी अजरामर झाली
अश्रूभरल्या नयनांनी अर्पितो
लाडक्या दीदींना भावपूर्ण श्रद्धांजली
ती बघा दीदींच्या स्वागताला
चक्क देवी सरस्वती पुढे आली
– रचना : राजेंद्र वाणी
२.
स्वरलता..
कधी शौर्यता ज्वलंत होतंसे स्वरांनी..
कधी शांत-शीतल झरतंसे अंगाई..
कधी बालगीते- कधी संतवाणी..
कधी प्रेमगूंजन- कधी विरहविराणी..
जिने माळियेली ही हृद्य भावसुमने..,
अशी स्वरलता आता न होणे..
दरवळावा तिचा षड्ज उगवत्या दिसाशी..
मध्यान्ही मिळावी साथ पंचमाची..
निषादीय चांदण्यांची मनां धुंदी यावी..
सप्तकांनी सजावी रोज दैनंदिनी..
जिच्या स्वरशृंखलांची आसमानी तोरणे..,
अशी स्वरलता आता न होणे..
तिचा स्वरनिनाद घुमतसे वंद्यस्थानी..
एकजूट – एकसंध राष्ट्राभिमानी..
जिची गानप्रतिभा ही एकचि अनंते..,
अशी स्वरलता आता न होणे..
– रचना : चारुश्री वझे.
३.
प्रिय लतादिदी….
आवाजाच्या माध्यमातून
उंचावली भारताची शान
भारतरत्न पुरस्कारानी
त्यांना दिला जगी मान….१..
साधी राहणी निर्मळ मन
रूपात साक्षात सरस्वती
जबाबदारी पेलली सामर्थ्याने
त्यागाची ही सौंदर्य मूर्ती..२…
साठ वर्षाचा प्रदीर्घ काळ
जनमानसांवर केले राज्य
सुंदर कंठातील मंत्रमुग्ध स्वर
यावर त्यांचे अधिराज्य …३…
स्वर आणि सूर
राहतील तुमचे अमर
किर्ती गान साम्राज्ञीची
जगतात अजरामर….४..
सप्तसुरांचे दैवत
अश्या लता दिदी
झाले बहु होतील बहु
परी न यासम कधी…५…
– रचना : प्रीती भिसे, बेंगलोर