आठवणीत वर्तमान
माझ्या जीवन प्रवासाचे जहाज, सोसाट्याच्या वाऱ्याला झेलत तर कधी उसळलेल्या समुद्रातील लाटांना अचूक भेदत, आपले धेय्य गाठण्यासाठी, किनार्यालगत संथपणे येऊ पाहत होते. लाटांप्रमाणे धावपळीचा वेग कमी करत, किनाऱ्याला पोहचून विसावारुपी प्रवासाच्या लयीत, माझा प्रवास सुरू झाला होता.
खूप आठवणी हृदयाच्या कप्प्यात जपून, मी माझा प्रवास संथपणे व वर्दळमुक्त प्रसंगातून पुढे चालू केला होता.
कित्येक वर्षांपासून, मला ईलेक्शन ड्युटी करण्यास मिळावी, अशी सुप्त इच्छा मनी होती. ही जनसेवा माझ्या कडून एकदा तरी आयुष्यात व्हावी ! असे मनापासून खूप वाटे. मनी यावे नि तसेच घडावे !
सन २०१४ मध्ये, मला इलेक्शन ड्युटीचा अनुभव घेता आला होता. त्यावेळी मला अंधेरी सेंटरला ड्युटी लागली होती. त्या दिवसाचा तो अनुभव, माझ्यासाठी एक जनसेवेचा भाग होता. तेथे सर्वांची काम करण्याची तत्परता, मतदारांची होत असलेली चुळबुळ आणि पोलिसांची संरक्षण यंत्रणा, सारेच शिस्तबद्ध होते.
बीकेसी कॉल सेंटरच्या महासागरात, काही कडक निर्बंधांमुळे स्टाफच्या कामात नियमितपणा होता. कामाचे टार्गेट, येण्या-जाण्याच्या वेळा (पंचिंगमुळे) नियमात होत असत.
आठवडाभर प्रशिक्षण घेवून, खऱ्या अर्थाने मी कामाला सुरुवात केली होती. मी सकाळी आठची ड्यूटी करू लागले होते. आठवड्यातून एकदा, दुपारी ०१.०० वाजताची ड्यूटी करावी लागत असे. संध्याकाळी साडे सात वाजता, निघताना बीकेसी रस्त्यावरील ट्राफिक व अनेक कार्यालयातून घरी जाण्यास निघालेला कामगार, अश्या गर्दीमुळे तो मार्ग, तुडुंब भरून जात असे. त्यात तो कुर्ल्यातील गजबजलेला अफाट बाजार ! यातून मार्ग काढत, कुर्ला रेल्वे स्टेशन गाठणे, एक मोठे दिव्य असे.
हया प्रसंगावर तोडगा म्हणून, मी फिक्स नाईट ड्युटी करण्याचे ठरवले होते. प्रत्येक आठवड्याला तीन दिवस डबल नाईट ड्युटी करताना, अनुभवलेले अनेक किस्से, आज तसेच डोळ्यासमोर उभे राहतात.
ड्यूटीचा कालावधी सायंकाळी ०५.४० ते दुसऱ्या सकाळी ०८.०० वाजे पर्यंत असे. माझ्या स्वतःच्या ग्रुप प्रमाणे, महिन्यातून माझी एक नाईट असे तर, बाकी दोन नाईट (पेड नाईट) असत. माझ्या ग्रुपमध्ये अमृता, शुभदा, जयश्री, स्मिता, वंजना अश्या अनेक मैत्रिणी मला मिळाल्या होत्या. आमची नाईट ड्युटी फारच मजेत जात असे. हया साऱ्या जणी कामामध्ये अपटुडेट होत्या. शिवाय अमृताचे मार्गदर्शन मला वेळोवेळी लाभत असल्याने, मीही त्यांच्या प्रमाणे कामात चांगली पारंगत झाले होते. इतर नाईट ड्युटीला वेगवेगळे ग्रुप सोबतीला असत. कित्येकदा नाईट ड्युटीला पार्टीचे आयोजन केले जात असे. अगदी साधा मसाले भात, कोशिंबीर आणि एक छान मोदक ! तर कधी रविवार दिवस साधत, बिर्याणीचा बेत आखला जात असे. असा मिळालेला आनंद आयुष्याचा एक ठेवा ठरला आहे.
अचानक, महिन्या नंंतर माझी प्रिय मैत्रीण मंगल नलावडे बीकेसीला आली होती. त्यावेळेस आम्हा दोघींना झालेला आनंद, शब्दात वर्णन करणे कठीणच ! तिच्या ग्रुप मधील संगीता, रेशमा, मंदा, पुष्पा अशा अनेक मैत्रिणी भेटल्या होत्या. प्रत्येकीच्या डब्यातील वेगवेगळया पदार्थांनी (ठरवून दिले जात असत) थाळी भरून जात असे. जेवणाच्या वेळेत, गप्पांच्या ओघात वेगवेगळे पदार्थ चाखण्यात एक वेगळीच मजा येत असे.
बघता बघता हे ही दिवस पुढे जात होते. आणि अचानक एके दिवशी, जीएम गाडे सरांच्या सेवानिवृत्तीच्या निरोप समारंभाला, आम्हा सर्वांना उपस्थित राहण्याचे आमंत्रण मिळाले होते. बरेच महिने उलटले होते आणि मला त्या दिवशी समजले होते की, आमच्या वरळीचे एसडीई गाडे सर, ह्याच कार्यालयात आहेत. हया वरून तुम्हाला कल्पना येऊ शकते, की ही व्यक्ती किती शांत स्वभावाची असावी, स्टाफला सांभाळून घेणारी असावी !
बीकेसीच्या अफाट महासागरात दबदबा होता तो म्हणजे, डीजीएम उषा मॅडमचा ! मला आजही त्या दिवसाची आठवण येते. मी ज्या बोर्डवर काम करत होते, त्या बोर्डचे ऑबझर्वेशन झाले होते. स्वतः उषा मॅडम हे काम करत असत. असेच एकदा मलाही त्यांच्या केबिनमधे पाचारण झाले होते. बऱ्याच स्टाफला हया गोष्टीचा अनुभव आलेला असावा. पण हया मुळेच ग्राहकाला सुनियोजित मार्गदर्शन करणे, हे आम्ही चांगले शिकलो होतो.
नियमबद्ध डीजीएम उषा मॅडम यांची बदली होऊन, त्यांच्या जागी माझ्या वरळी कार्यालयातील, प्रायव्हेट वायर सेक्शनचे एसडीई श्री. कमलहंस सर, डीजीएम म्हणून रुजू झाले होते. ते ओळख देण्यासाठी आमच्या सेक्शन मध्ये आले तेव्हा, अचानक मला पाहून ते म्हणाले होते, “मॅडम, मै आज से यहा आया हूँ ।
आप यहाँ कब आए ? अच्छा हैं, नया काम आप सिखोगे ।आपके काम का परिचय तो, मुझे पहलेसेही हैं ।” असे ऐकून, मला माझ्या नोकरीच्या कामाचे प्रशस्तीपत्र मिळाले होते. साधा-सरळ स्वभावाचा हा माणूस, कामाच्या बाबतीत वक्तशीर, अशी हि व्यक्ती, त्यांना भेटून वरळीच्या आठवणी जाग्या झाल्या होत्या.
बीकेसीतील नाईट ड्युटीमुळे घरी राहण्यास मिळणारा एक दिवस, खूप हायसा वाटे. मग त्या दिवशी कुठेतरी फिरून यावे, अश्या इच्छेपोटी आम्ही त्या दिवशी रायगडला जाण्याचा बेत केला होता. नुकतीच आम्ही फोर व्हीलर गाडी घेतली होती. त्यामुळे ऑफिसातून येऊन झटपट न्याहारी आटोपून, आम्ही दुर्वाला घेऊन सकाळी साडे नऊला निघालो होतो. मॅपवर लोकेशन टाकून माझे पती त्याप्रमाणे गाडी चालवत होते. मुख्य रस्ता सोडून गाडीने, आडवळणाचा मार्ग दाखवला होता. रस्त्यात मोठमोठाले दगड, उतरणीचा भाग, तर कधी चढणीचा रस्ता लागत होता. आजूबाजूला माणूसही दिसत नव्हता. त्यावेळी आम्ही दोघे खूप घाबरलो होतो. अचानक विरुद्ध दिशेने, दोन-तीन बाईकस्वार तेथे भेटले होते. घाबरतच ह्यांनी गाडी थांबवून, त्यांना हात दाखवत थांबवले होते. देवाची कृपा ! त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केले आणि त्या अवघड प्रवासातून सुखरूप बाहेर पडण्याचा मार्ग दाखवला होता.
बीकेसी मध्ये नोकरीचे, दीड वर्ष कधी संपले, कळलेच नव्हते. पुन्हा एकदा कानावर ट्रान्सफरची बातमी येऊ लागली होती. सप्टेंबर २०१५ पर्यंतचा स्टाफ लवकरच ट्रान्सफर होणार, हे ऐकून मनाला खूप आनंद झाला होता. एकापाठोपाठ एक-एक ग्रुप बाहेर पडू लागला होता. शेवटी माझाही नंबर लागला होता. मीही बीकेसी मधून बाहेर पडले होते.
बेलापूर कॉल सेंटरला, डिसेंबर २०१७ मधे, मी रुजू झाले होते. आता मात्र अगदी कमी अंतर असलेला प्रवास, जुईनगर ते बेलापूर, जेमतेम वीस ते पंचवीस मिनिटांचा सुरू झाला होता.अंदाजे ५०-६० स्टाफ असलेले बेलापूर कॉल सेंटर, कौटुंबिक वातावरणाने भावू लागले होते. आपुलकीपणाचा लळा लागू लागला होता. ब्रॉडबँड सेवेचे प्रशिक्षण पुनश्च एकदा लाभले होते. थोडे दिवस, सकाळी आठची ड्युटी केली होती. त्यावेळी माझे पती न कंटाळता, मला गाडीने बेलापूर कार्यालयात सोडायला येत असत. त्यांच्या खूप चांगल्या गुणांचे, किस्से, मी नक्कीच पुढील भागात घेवून येईन. तर कधी अकराचीही ड्युटी केली होती. नवीन ऑफिस नवे रुल ! असा सर्रास प्रत्येक कार्यालयाचा पायंडाच असतो !
घरगुती समस्यांवर तोडगा म्हणून, शेवटी मी १२.४० च्या ड्यूटीवर शिक्कामोर्तब केला होता. माझ्या अगोदर बीकेसी मधून आलेल्या, अमृता, शुभदा, जयश्री, स्मिता पुन्हा भेटल्या होत्या. अमृता सोबत काम करताना बऱ्याच नवीन गोष्टी मला शिकण्यास मिळाल्या होत्या. धन्यवाद ! अमृता. हळूहळू खूप चांगले अनुभव मिळत होते.
खूप वर्षांनी, डी मार्ट मधे, वरळीमधील सर्व उपक्रमात सक्रिय असलेली, माझी मैत्रीण अलका भुजबळ भेटली होती. तेव्हा तिच्या कडून बेलापूर कॉल सेंटर बद्दल खूप छान माहिती ऐकली होती. तेव्हा ती इथेच कार्यरत आहे हे मला ठाऊक होते. माझी नजर तिला शोधू लागली होती. न दिसल्याने मी तेथे तिची विचारणा केली होती. तेव्हा कळले, ते खूपच भयंकर वाटले होते. ती कँसरच्या विळख्यात सापडली होती. त्यामुळे ती बरेच महिने सुट्टीवर होती आणि आता तिला सानपाडा एक्स्चेंजला पाठविले आहे.
त्यामुळे अलकाची व माझी म्हणावी तशी गाठभेट झाली नव्हती. पण ऐकून होते की, तिच्या नेतृत्वदायी स्वभावाने, बेलापूर कॉल सेंटरला अन्यायाविरुद्ध वाचा फोडली होती. तिने आज हया भयाण व्याधीवर मात करून, नव्या जीवनाची नवीन वाटचाल सुरू केली आहे. तिने लिहिलेले “कॉमा” पुस्तक, सर्वांनाच प्रेरणादायी ठरेल. आज ती “न्यूज स्टोरी टुडे” पोर्टलची सहसंपादक आहे. तिचे पती श्री. देवेंद्र भुजबळ सर,निवृत्त माहिती व जनसंपर्क संचालक, समाजसेवक व संपादक यांनी लिहिलेले “समाजभूषण” हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे.त्यांनी एका मुलाखतीत सांगितलेला त्यांचा जीवनप्रवास, वाचकांस नक्कीच प्रेरणादायी आहे.एकमेकांना पूरक व एकमेकांना सावली देणारी ही पती-पत्नी जोडी, वटवृक्षाप्रमाणे नवीन पारंबी उदयास आणण्याचे, महान कार्य करत आहेत. माझ्यासारख्या अनेक नवोदित लेखकांना व कवींना, भुजबळ उभयतांनी प्रकाश झोतात आणले आहे. माझ्याही जीवनप्रवास लेखनास, भुजबळ उभयतांच्या पोर्टलचे, मोठे पाठबळ लाभले आहे. तुमच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा !
बेलापुरहून काही जुना स्टाफ, ट्रान्सफर होणार होता. त्यामुळे युनियन कमिटी, नवीन तयार व्हावी हया उद्देशाने, वैशाली सावंत (बेलापूर कॉल सेंटर युनियनची चिटणीस) हिने कामगार संघाची, नवीन युनियन कमिटी तयार केली होती. पुन्हा एकदा मला युनियनमध्ये काम करण्याची संधी लाभली होती. वाटले होते, नवीन ठिकाणी येऊन परकेपणाचा त्रास सहन करावा लागेल. पण बेलापूर कॉल सेंटरला पुन्हा एकदा माहेरवाशीण झाल्याचा आनंद मिळू लागला होता.
माणुसकीच्या वर्दळीत वावरलेले मन, वारंवार वडाळयाकडे धावत असे. तेथील आठवणी मनाला अस्वस्थ करून जात असत. त्यामुळे आमचे वरचेवर तिथे जाणे होत असे. हळूहळू समजले की दूरूनच डोंगर साजरे वाटतात ! माझ्या कुटुंबाला पुन्हा एकदा, माझ्याकडून पुरेसा वेळ देण्याचा योग जुळून आला होता. संथ गतीने चाललेला, नवी मुंबईतील आमच्या संसारात, मनाला शांतता मिळू लागली होती.
नवी मुंबईतील गावच्या टीममधून खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट स्पर्धेत, माझ्या पतीना त्यांच्या संघाच्या नियमानूसार, हवे तसे स्पर्धक सामने खेळण्यास मिळत नसत. खेळाच्या सरावावर व अंतर्गत स्पर्धेत भाग घेऊन, आनंद मानावा लागत असे. पण त्यांच्या मनास हे पटत नव्हते. सूर्योदय व्हावा तसा, त्यांच्या जीवनात सूर्योदय झाला होता. त्यांचा मित्र दत्ता पोसम यांना, ह्यांच्या खेळाची शैली चांगली ठाऊक होती. शिवाय गाबीत क्रिकेट संघातून, हे दोघे नेहमीच खेळत आले होते व आजही खेळत आहेत.
माझ्या पतीनी सन २०१७ मधे, ” रॉयल 40+ सानपाडा” संघामध्ये प्रवेश केला होता. इथूनच त्यांच्या खेळाला, सुसाट परफॉर्मन्स मिळू लागला होता. वयाच्या पन्नाशी नंतर, खेळाचे दमदार प्रदर्शन पाहून, विरुद्ध संघातील खेळाडू संभ्रमात पडत असत. ते त्यांच्या वयावर शंका घेत असत. त्यांची पडताळणी करण्यासाठी त्यांच्या आधारकार्डवरील, त्यांच्या जन्मतारखेची पडताळणी करत असत. मैदानावर घडणारे किस्से यांच्या संघातील खेळाडूंकडून मला कळत असत. मलाही फार कुतूहल वाटत असे.
‘खरंच ! ग्रेट आहात तुम्ही ! तुमच्या खेळात जोश आहे.’ असे म्हणून मीही त्यांचे खूप कौतुक करते. कधीतरी मीही त्यांना विचारते, ‘तुमची जन्मतारीख नक्कीच खरी आहे ना !’ तेव्हा त्यांचे उत्तर असते, ‘may be, पण, सारे श्रेय मी तुला देतो.’
आयुष्यात आणखीन काय मिळणे बाकी राहिले ?
त्यांना मिळणारा माझा पाठिंबा ! मी घेत असलेली त्यांची काळजी ! आणि महत्त्वाचे, दोघांच्या मनात राहिलेल्या अपूर्ण इच्छेस, मिळालेली एक नवी उमेद ! हे त्यांच्या तारुण्याचे खरे सार आहे !

– लेखन : सौ. वर्षा महेंद्र भाबल
– संपादन : अलका भुजबळ. 9869484800
खूपच छान लिहिले आहेस वर्षा. अलकाचे पण मला खूप कौतुक वाटते.एवढ्या मोठ्या व्याधी वर मात करून अलका चे जे कार्य करत आहे त्याला माझ्या खूप खूप शुभेच्छा
धन्यवाद, वृंदा ! अलका खूप छान कार्य करत आहे. नेहमी उद्योगी असणारा जीव.