मी १० नोव्हेंबर २०१३ रोजी नेदरलॅंडच्या रामराज्यात प्रवेश केला. आज २०२२ मध्ये मागे वळून पाहताना येथील वास्तव्यातील आठवणींची पाने मनात फडफडू लागली. म्हणून काही लिहावेसे वाटते.
२००४ मध्ये एलिझाबेथ राणीच्या देशात मी प्रवेश केला होता. साडेतीन वर्ष वास्तव्य करून आले होते. परदेशी अनुभव आणि वातावरणाची कल्पना होतीच. परंतु ब्रिटनपेक्षा युरोपातील हा छोटासा देश जास्त भावला. इंग्लंडमध्ये इंग्लिश बोली भाषा असल्याकारणाने राहणे सोपे गेले. अर्थात् नॅदरलॅंडमध्येही हल्ली लोक इंग्लिश बोलतात.
सुरवातीला पहिली दोन वर्ष एका चाळवजा अपार्टमेंमध्ये राहिलो, घर छोटं होतं पण मार्केटमध्ये असल्यामुळे सोइस्कर होते. हळूहळू रमत होतोच त्यात एक दिवस मालकीणबाईंचा फोन आला. पुढच्या आठवड्यात घर रिकामे करा. अचानक आलेल्या कॉलमुळे चिंतेत पडलो की अचानक शिफ्टिंग कुठे करायचे ? शाळेचाही प्रश्न होता.
तेव्हा आम्ही आमच्या एजंटकडे धाव घेतली. नियमाने किमान २ महिन्यांची नोटीस अपेक्षित होती. इथे काही सोशियल फ्री ॲडव्हायजर असतात. त्यांच्या सल्यामुळे धीर आला. मुदत वाढवून मिळाली. गंमत अशी का मालकीणबाई म्हाताऱ्या असल्यामुळे घाबरल्या की, आम्ही वकीलाचा आधार घेऊ शकतो. हे कळून चुकले होते त्यांना एजंटमुळे. दैवाने साथ दिल्याकारणांनी एक छान अपार्टमेंट हाऊस मिळाले. मालकीण बाईंनी घरातील फर्निचर देऊ केले. आम्ही नविन घरात राहण्यास गेलो.
एक प्रसंग असाही आला होता जो पुर्वी कधीही अनुभवायला आला नव्हता. तो असा की एकदा माझ्या मिस्टरांच्या छातीत अचानक दुखू लागले होते. २२ डिसेंबरचा दिवस होता. आमच्या डाॅक्टर बाईंनी ॲम्ब्युलन्स बोलावून हॉस्पिटलमध्येच पाठवले. प्रथमच ड्रायव्हर शेजारी बसून इमर्जन्सी लेन मधुन जाताना घरातील लोकांची आठवण आली की बाहेर राहिल्यावर कधी कधी एकटे आहोत ह्याची जाणीव होते. नविनच रहायला गेल्या कारणानी ओळखी नव्हत्या. त्या अपार्टमेंटमध्ये एली आणि सुजान ह्या दोन छान शेजारणी मिळाल्या होत्या. एली कॅाफीला बोलवायची कधी कधी. सुजानचे दुसरे लग्न झाले होते. तिला दोन कॅन्सर झाले होते. पण ती खंबीर होती. प्रचंड पाॅझिटिव्ह होती. कधीही दुखाश्रू काढले नाहीत. केमोला ही एकटी जायची. ह्यांना चर्चमधून मदत मिळते. मी अपार्टमेंट सोडले संबंध संपले.
असेच एक आरम आजोबा ९० वर्षाचे होते. एकटेच राहायचे कुत्र्याला घेऊन. कुत्रही क्यूटच होते. नेहमी भेटले की म्हणायचे आय ॲम वेरी ओल्ड नाऊ. एकदा कॅाफीला मी त्यांना बोलावले होते. त्यांना खूप आनंद झाला होता. त्यांनी त्यांचे फॅमिली फोटोज दाखवायला आणले होते. वाईट वाटायचे किती एकटेपण हे म्हातारपणी. माझे गाव हिल्वरसम, छोट्या जंगलानी वेढलेले, नेदरलॅंड हिरवाईनी नटलेले आहे. जंगलात ३ वाटा असतात. १) चालण्यासाठी २) सायकलिंगसाठी ३) कुत्र्यांना फिरवण्यासाठी. इथे लोक फिटनेससाठी जागृक आहेत. आहार, विहार आणि व्यायाम.
ॲम्स्टरडॅम आणि काही शहरात छोटी तळी, कालवे खुप आहेत. तळ्यात बदके पोहत असतात. हिरवळीवर गाई चरत असतात. हिरवाई बघून डोळ्यांना थंडावा मिळतो. रात्रीचे ॲमस्टरडॅम खुप छान दिसते. पाण्यात इमारतींचे प्रतिबिंब दिव्यांच्या प्रकाशात सुरेख दिसते.
माझ्या मुलींची शाळा इंटरनॅंशनल स्कूल होती. ४० देशांची मुले एकत्र शिकत होती. डच भाषा शिकवली गेली होती. शाळेतील शिक्षक सुटाबुटात रूबाबदार दिसायचे. प्रत्येक वर्गाची क्लासरूम असायची. पालकांतर्फे रिप्रेझेंट करायची शाळेला.
प्रत्येक महिन्याला एक कॅाफी मॅार्निंग असायची. कधी कॅफेमध्ये किंवा कोणाच्या तरी घरी. माझ्या दूसऱ्या अपार्टमेंटमध्ये एक मिका नावाची स्वीट ७० तील शेजारीण मिळाली होती. खुप मदत करायची मला. एकदा खुप पायाचा तळवा दुखत होता तेव्हा घरी येऊन पाय मांडीवर घेऊन पायाला बॅंडेज बांधून दिला होता.
फ्रेड नावाचा एक छान मित्र देव स्वरुप भेटला. अपंग असुनही कायम मदतीला तत्पर, कायम चेहऱ्यावर प्रसन्नतेचे भाव. एकटा जीव सदाशिव. इथे लोक खुप ॲक्टीव असतात. सायकलिंग, रनिंग, खुप करतात. वयस्करही नीटनेटके आणि बऱ्यापैकी फिट असतात. आज्या सुद्धा नटून बाहेर जातात. जीपी ईथे शक्यतो मेडिसीन देत नाहीत फारसे. मेडिकल प्रोफेशन भारतीयांना झेपतच नाही. देश बऱ्यापैकी साक्षर आहे. मातृभाषेतच सर्व कारभार चालतात. लोकांना वाचनाची, म्यूजिकची आवड आहे. आर्ट म्युझियम्स आहेत.
डच उंच आणि हाडापेरानी रूंद असतात. भ्रष्टाचार खुपच कमी आहे. गुन्हेगारी कमी आहे. कायद्याला लोक घाबरतात.
एक आणखी अनुभव असा की मी एकदा बसडेपोत आले बससाठी .पण माझ्या समोरून बस न थांबता निघून गेली. समोर “नो सर्विस” ची बस उभी होती. मला त्या ड्रायवरने बोलविले आणि म्हणाला, बसा आत. मी सोडतो तुम्हाला! त्यांनी घरपोच सोडले मला. म्हणाला की, त्यांनी तुम्हाला बघुनही बस थांबवली नाही म्हणून तुम्हाला मी सोडले.
येथील लोकांना नेचरची खुप आवड आहे. संवर्धनाप्रती जागृक आहेत. बागकाम खुप करतात. उन्हाळ्यात बाल्कन्यांमध्ये छान छान फुलांच्या कुंड्या दिसतात. मातृभुमीबद्दल प्रेम आहे. राज्याच्या वाढदिवसाला घरावर झेंडे लावतात. राजाचा वाढदिवस २७ एप्रिलला देशभर साजरा करतात. त्या दिवशी ऑरेंज ड्रेस घालतात. आठवडाभर गावा गावात जत्रा असतात.
नेदरलँड रामराज्य अशासाठी की, कारभार बऱ्यापैकी सचोटीने आहे. लोक एकमेकांना आदराने वागवतात. विश्वासाचा कारभार, गुन्हेगारी कमी आणि शांतता प्रिय जनता. माझ्या भारताचे रूपांतरही पुन्हा एकदा रामराज्यात व्हावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

– लेखन : शलाका कुलकर्णी. नेदरलँड
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800
नेदरलँड एक रामराज्य ..एक छान लेख