फोन वाजला तसा पलिकडून आवाज आला, “रोमी..मी सॅम अंकल बोलतोय…!” सॅम अंकल रिटा मावशीचे मिस्टर..!
“मावशीची तब्येत जरा खराब आहे…तुला भेटायला बोलावलं आहे..!”
“काय झालं अचानक..!” रोमी ने काळजीने विचारलं..!
“एवढं काही नाही ग ..! थोडा फिवर आहे..!”
“तिला फोन देता का ?”
“झोप लागलीए तिला”
“बर..! येते मी..!”
तेवढयात जेवण आलं..! दोन घास खाऊन, आराम कर, मी फोन करते परत, अस म्हणून रोमी मावशीच्या घरी जायला निघाली.. सासूबाईंना फोन करून कळवलं..!
फार नाही थोडासा ताप होता रिटा मावशीला..!
तिला पाहून ती नको नको म्हणताना उठून बसली..!
“चहा, पाणी काही नको, तू आराम कर” अस रोमी तिला म्हणाली..!
तिने रोमीला कपाट उघड अस सांगितलं आणि त्यातली एक पेटी आणायला सांगितली..!
लाकडाची कोरीव नक्षी केलेली ती सुरेख पेटी होती..! वर निळे, लाल खडे होते लावलेले..!
रिटा मावशीनी ती पेटी उघडली आणि त्यातून जुन्या पद्धतीचा हार काढला..! चेन आणि मधे मधे फुल होती छोट्या आकाराची नाजूक..!
तो हार तिने रोमीच्या पुढे धरला..! “तुझ्या आईने तिची आठवण म्हणून लग्नात द्यायला सांगितलं होता..!
तुझ्या वडलांनी नक्की ओळखला असता म्हणून तेव्हा दिला नाही..” जाताना त्याने लेकीची माफी मागितली म्हणून रिटा मावशी मवाळ झाली होती..! तसही माणूस गेल्यावर त्याच्या बद्दल वाईट बोलू नये अस म्हणतात च..! म्हणून ती चांगल्या शब्दात बोलत होती..! माणूस गेल्यावर राग ही जातोच आपोआप…!
“अग..! तू माझं एवढं केलंस..! आज जे काही यश मिळवलंय ते फक्त तुझ्यामुळे..! नाही..! नाही..! मी मुळीच घेणार नाही हा हार..!”
“लिसन.. ! बेबी…! तुझ्या आईने अजूनही काही दागिने दिले होते मला..! त्यातले काही मी तुझ्या शिक्षणासाठी मोडले..! माझ्याकडे तेव्हा कुठे होते एवढे पैसे..? आता मुलं सेटल झाली, तेव्हा पैसे आले बऱ्यापैकी..! तुला हे सगळं सांगायचं होतच किती दिवसापासून..! भीती ज्याची होती तो गेला..!
“तुझी आई खूप धोरणी होती..! नोकरी करून दर महिना सेव्हिंग म्हणून ती सोनं घ्यायची..! पैसे साठवले की तुझा फादर तिला मारून, दारू प्यायला घेऊन जायचा ते पैसे..!
मग तिने सोन्यात गुंतवले पैसे..! दागिने बनवले आणि माझ्याकडे ठेवले..! मला म्हणाली, मी राहिले, नाही राहिले तरी रोमीसाठी ठेव हे…! तिच्या शिक्षणासाठी वापर..! तिला शिकव..! आणि मुख्य म्हणजे आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी कर..! स्त्रीने आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असलंच पाहिजे..!”
“जिंदा असताना मला सांगायची की तू घालत जा हे फंक्शन ला..! स्वतः मात्र काही घालायची नाही..! मी घातल्या वर म्हणायची की किती सुंदर दिसतेस..! Golden hearted sister ..! स्वतःच्या कष्टाने बनवलेल, तरी स्वतः घालू शकायची नाही आणि मोठया मनाने दुसऱ्याला द्यायच आणि कौतुक ही करायचं..!
Not so easy ..! My great sister..! Where are you ?”
इतक्या हुशार, धोरणी बहिणीला मानसिक रुग्ण ठरवलं ग त्याने..!”
दोघीही तिच्या आठवणीने व्याकुळ झाल्या..! थोड्या वेळाने शांत झाल्या आणि तिच्या साठी प्रार्थना केली..! थोडं मन शांत झालं…!
“आईची मेमरी म्हणून हे ठेव..! ऐक..!”
रोमीने रिटा मावशीच्या भावना जाणल्या आणि हार घेऊन घरी निघाली..!
मनात मिताली चे विचार होते..!
कशी मदत करणार होती ती ?”
क्रमशः

– लेखन : प्रतिभा चांदूरकर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800