मानव चंद्रावर उतरला
जुलै 15, 1969. या दिवशी मी दैनिक सकाळच्या संपादकीय विभागात अर्ध वेळ शिकाऊ उमेदवार, “उपसंपादक” म्हणुन जाऊ लागलो. दुपारी चार वाजता कामाला सुरुवात झाली. पण प्रत्यक्ष माझ्या हातात काही काम नव्हते. पुणे विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागात विद्यार्थी म्हणून त्या या आधी, पंधरा दिवसापूर्वी प्रवेश घेतला होता. त्यामुळे मला फार काही येत देखील नव्हतं.
सकाळ मधील ज्येष्ठ उपसंपादक लिंबुटिंबु म्हणून काहीतरी थातुरमातुर काम सांगायचे. दुपारी चार ते रात्री आठ अशी कामाची वेळ होती. माझे ज्येष्ठ सहकारी मान खाली घालून खूप काम करायचे. काय ? नाही माहित ! कुणी मुद्दाम सांगत नव्हता असं नाही, परंतु ते सर्व खूप बिझी होते. काय करत आहेत हे मला कळलंच नाही हे खरं. आठवडा उलटला.
सोमवार दिनांक 21 जुलै रोजी त्या दिवशीच्या सकाळचा अंक हातात पडला, तेव्हा स्तिमित झालो, पहिल्या पानावरील मथळा पाहून. तो असा होता:
मानव चंद्रावर उतरला
असा एवढ्या मोठ्या टाईप साईज मध्ये मथळा मी पूर्वी कधीही पाहिलेला नव्हता. ज्येष्ठ सहकाऱ्याला विचारलं तेव्हा एवढेचं कळलं की एवढा मोठा फोन्ट साईज पहिल्यांदाच वापरला होता.
सकाळच्या जन्मापासूनचा म्हणजे 1932 पासून ते 21 जुलै 1969 च्या एवढ्या कालखंडात तो सर्वात मोठा फॉन्ट होता.
पुण्यातील इतर दैनिकात सुद्धा एवढा मोठा मथळा नव्हता. सगळ्यांनी आठ कॉलमी शीर्षक दिले होते. पण जास्तीत जास्त बहात्तर पॉईंट साईटचे.
त्यावेळच्या टेक्नॉलॉजीमध्ये एवढा मोठ्या टायपाचा वापर शक्यच नव्हते. त्यासाठी अशी कल्पना कोणाला सुचली नसावी. त्या साठी निर्णय घेण्याचे अधिकार इतर दैनिकात कोणा कडेही नसावेत.
त्यावेळचे ज्येष्ठ उपसंपादक असलेले आणि मुख्यत: संध्याकाळी उशिरा रात्रपाळी संपादक म्हणून जबाबदारीची भूमिका असलेले (आता निवृत्त होऊन कित्येक वर्ष झालेले) श्री एस के कुलकर्णी यांनी कल्पकता लढवून हा चमत्कार घडवून आणला होता. नंतर ओळख झाली तेव्हा त्यांनी वृत्तपत्र विद्याविभागात या संबंधी चर्चा केली. हा अंक काढला कसा हे त्यांनी सांगितले. एकेक गोष्ट समजत गेली.
त्याकाळी मेटलचा (धातूचा) फॉन्ट वापरला जायचा. साधारण दहा – अकरा साईज पासून मोठ्यात मोठा पॉईंट साईज ला ७२ वापरून आठ कॉलमी बॅनर होत असे. अमेरिकेचे चंद्रयान चंद्रावर उतरले तर ही अभूतपूर्व घटना होणार होती. म्हणून पत्रकारितेमध्ये सुद्धा वेगळा प्रयत्न करायला पाहिजे या कल्पनेने कुलकर्णी सरांनी लाकडाचा फॉन्ट बनवून घेतला. तो वापरण्यासाठी प्रयोग केले हे सगळे गुप्तपणे; कोणालाही कल्पना न देता. वृत्तपत्र क्षेत्रात असलेल्या स्पर्धेमुळे अशा प्रकारची गुप्तता पाळावीच लागते.
एव्हड्या मोठ्या फॉन्ट ची कल्पना लढवली खरी. पण त्यात एक अडचण आली. नानासाहेब परुळेकर हे संपादक सोपं मराठी चा आग्रह धरायचे. त्यामुळे “मानव चंद्रावर उतरला” यातील ‘मानव’ हा शब्द कठीण, संस्कृत असल्यामुळे तो न वापरता “माणूस” चंद्रावर उतरला असं व्हायला पाहिजे होते. एकशे वीस फॉन्ट साईज चा लाकडी फॉन्ट तयार करायचा म्हटला तर मराठी मध्ये माणूस मधल्या “माणूस” हा शब्द देखील लाकडी करणे भाग होते. यातील ‘णू’ हे अक्षर अडचणीचे होते. त्यातील णू ला “ऊ” दीर्घ असल्यामुळे या “ऊ”कारच्या घडणीमुळे पूर्ण मथळ्याचीच खालची जागा मोकळी जात होती. त्याऐवची ‘मानव’ शब्द वापरला तर जागा वाया जात नव्हती. म्हणून मानव शब्द निश्चित झाला.
इतका बारकावा वाचकांना किंवा इतर ठिकाणच्या पत्रकारांना देखील माहीत असण्याचे कारण नव्हते.
या संपूर्ण पानाचा आणि आतल्या इतर पानांचा मजकूर लिहिणे हे सोपे नव्हते. अमेरिकेच्या युसिस संस्थेकडून पोस्टाने जाड जुड पाकिटात इंग्रजीत लेख यायचे. चांद्रयान आणि अवकाशयात्री यांची तयारी याविषयी रंजक माहिती असायची. पण ती इंग्रजीत. मजकूर निवडायचा, मराठीत भाषांतर करायचे, मजकुराची जुळणी करायची, मुद्रित संशोधन करायचे, फोटो निवडून त्यांचे ब्लॉक बाहेरच्या ब्लॉक मेकर कडून करवून आणायचे, पानाचा ले आउट करायचा हे काम खूप आधी पासून चालू होते. अशी आठ पाने एकवीस जुलै च्या संध्याकाळी तयार होती. मथळे तयार होते. मोहिमेस यश आल्यास आणि अपयश आल्यास मथळे आणि मजकूर कोणता असेल ते तयार होते. भारतीय वेळेनुसार रविवारी रात्री १.४७ वाजता अपोलो ११ चांद्रयान चंद्र भूमी वर उतरले. त्यातून अवकाश यात्री नील आर्मस्ट्रॉंग, मायकेल कॉलिन्स आणि आल्ड्रिन यांनी चांद्र भूमी वर पाय ठेवले.
या अंकाच्या निर्मितीत माझा सहभाग काहीच नव्हता. पण अंक निघाल्यानंतर त्याचे खूप कौतिक झालेले मी पाहिले. थोड्याच दिवसात अंक कसा काढतात, आधीपासून तयारी कशी करून ठेवता येते याच ज्ञान मला झालं, हे देखील महत्त्वाचं होतं !

– लेखन : प्रा डॉ किरण ठाकूर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800