Wednesday, March 12, 2025
Homeलेखपहिलं प्रेम

पहिलं प्रेम

विदर्भ राजकन्या रुक्मिणीने प्रेमपत्र लिहूनच प्रिय श्रीकृष्णा वरील आपले प्रेम व्यक्त केले होते ही पौराणिक कथा सर्वश्रुतच आहे.

त्या पत्रात तिने “हे द्वारकाधीशा ! मी मनाने तुला वरले आहे, तुझ्याशी विवाह करण्यास उत्सुक आहे, तरी तू येथून मला घेऊन जा अशी विनंती केली होती.”
पुढील भाग आपणास माहीत आहेच….

रुक्मिणी प्रमाणेच दमयंतीचे नलास पत्र, शकुंतलेचे दुष्यंतास कमलपत्रा वर लिहिलेले पत्र ह्या व इतरही पौराणिक प्रेमपत्र कथा प्रसिद्धच आहेत. थोडक्यात काय तर प्रेमपत्र लिहून प्रेमाचा संदेश प्रियतमा पर्यंत पोचवणे हे अनादि कालापासून प्रचलित आहे.

जगाच्या प्रत्येक देशात, प्रत्येक भाषेत रोमांचक प्रेमकथा लिहिल्या गेल्या आहेत. शेक्सपियरचे रोमियो – ज्युलिएट, लैला – मजनू, पंजाब मधील हीर – रांझा ही काही प्रसिद्ध अजरामर उदाहरणे !

कविवर्य पाडगावकरांनी म्हटलेच आहे..
“प्रेम म्हणजे, प्रेम म्हणजे, प्रेम म्हणजे काय असते ?
तुमचे आमचे सेम असते.”
एकूण काय तर प्रेम ही भावना प्रत्येकाच्या जीवनात असतेच. त्यातून तारुण्याच्या उंबरठ्यावरील प्रेमाची मजा तर औरच !

मी जरी रुक्मिणी नाही, राजकन्या नाही तरी विदर्भकन्या आहे. त्यामुळे रुक्मिणीने दाखवलेली प्रेमपत्र संदेशाची वाट मी सुद्धा तारुण्यात प्रवेश करताच अनुभवली.

माझा प्रियकर सुद्धा कोण्या देशीचा राजा/राजपुत्र नव्हता. आम्ही दोघेही अगदी साध्या मध्यम वर्गातील. आम्हा दोघांमध्ये फक्त चार घरांचे अंतर होते. पण ..
“दूरियाँ मजबूरियाँ थी” !
त्यावेळी फोन किंवा स्मार्टफोन व्हिडिओ कॉल काही नव्हते हो😔
पण प्रेमी जन सर्व अडचणीतून मार्ग शोधतातच.

त्याचे असे झाले —
मी कॉलेजच्या चौथ्या वर्षाला होते. माझ्या खिडकीतून रस्त्यावरून जाणारे येणारे दिसत. तसाच एक दिवस तो दिसला, सायकल वरून ऑफिसला जाणारा !
मी बागेत गुलाबाच्या रोपाजवळ उभी राहून गुलाब बघत होते. (कारण मला माझ्या लांब वेणीवर रोज गुलाबाचे फूल घालायला आवडत असे.) मी गुलाब बघत होते आणि तो माझ्याकडे. जेमतेम १५ सेकंद. आमची नजरानजर झाली. तेवढ्या वेळात त्याची उंची, भरदार शरीर यष्टि, देखणे रूप आणि पीळदार मिशा माझ्या नजरेत भरल्या. गालावर गुलाब फुलले आणि मी लाजून नजर खाली वळवली . हेच प्रेम असेल का ?
तेवढ्या १५ सेकंदात त्याच्या तीक्ष्ण नजरेने ते हेरले. गालांवरील त्या लबाड गुलाबांनी जणू पावतीच दिली. त्याने मिशीला पीळ दिला.
“आँखो ही आँखों में इशारा हो गया !.”
दोघे १५ सेकंदात एकमेकांच्या प्रेमात ‘पडलो.

काही दिवस हा नित्यक्रम चालला.
मी गुलाबाचे फूल बघणे, त्यानी सायकलचा वेग हळू करून १५ ऐवजी २० सेकंद माझ्या घरासमोरून, मिशीवर पीळ भरत जाणे. हे रोजचे झाले. भेटण्याची, बोलण्याची तीव्र ओढ वाटू लागली.

पण पुढे काय ? कॉलेजच्या अभ्यासक्रमात रुक्मिणी स्वयंवर शिकत होते. तिथून प्रेरणा मिळाली.
ठरले, पत्र लिहायचे ! शकुंतले सारखे कमल पत्र नव्हते, साधा गुलाबी कागदही नव्हता. मग वहीत ले मधले जोड पान हलकेच काढले. (म्हणजे पान काढलेले कळत नाही. केवढी सावधगिरी !)
पत्र लिहीणे हे प्रचंड आव्हान होते. मी जरी टेबलाशी बसून अभ्यास करत असे (खिडकीतून बाहेर पहात) तरी आई, बाबा, मोठा भाऊ ह्यांचे येता जाता मी काय करते इकडे लक्ष असायचे. आईने एकदा विचारलेच,
“इतके काय लिहिते आहेस ?”
मी : “आई अगं कॉलेजच्या मॅडमनी रुक्मिणी स्वयंवर कवितेच रसग्रहण लिहायला सांगितले आहे . त्यात मला पहिला नंबर मिळवायचा आहे.”
आई : “हो अशीच मन लावून अभ्यास कर ! नक्की मिळेल पहिला नंबर !”

पाठचा भाऊ, बहीण हे तर आईचे जणू गुप्तहेरच ! एकदा वहीत फुलपाखराचे चित्र काढले तर लगेच आईपर्यंत चुगली पोचली.
“ताई अभ्यास करत नाहीय. वहीत चित्रे काढतीय” ! झाले ! आईकडून लक्ष लावून अभ्यास करण्याची दटावणी आणि पहारा थोडा वाढलाच ! असो.
आजूबाजूला कोणी नाही असे पाहून रोज ४.४ ओळी पत्र लिहिणे सुरु केले. पहिलाच प्रॉब्लेम !
नाव काय त्याचे🤔
मायना काय लिहायचा ?
कशी सुरवात करायची ?
असो…

प्रिय, प्रियकरा, राजसा, लाडक्या अशी विशेषणे गाळून सरळ पत्रलेखन सुरु …
“मला तू खूप आवडला आहेस. भेटण्याची, बोलण्याची ओढ आहे. मी अमुक कॉलेजात शिकते. कॉलेजच्या विस्तीर्ण लॉनवर सहज भेटूया. अमुक दिवशी. तू की तुम्ही ? ऑफिसला जाताजाता कॉलेजच्या आवारात या. (बापरे केवढी हिंमत माझी ?)
पत्राच्या शेवटी सही काय करणार ? इतर कोणाच्या हातात पडले तर ?
मग मायना नाही, सही नाही असे पत्र पूर्ण करून साध्याच पोस्टाच्या लिफाफ्यात बंद करून पाठवले . पत्राला प्रेमाचा सुगंध म्हणून अत्तर सुद्धा लावले नाही. मन गात होते..
“लपविलास तू हिरवा चाफा,
प्रीत लपवुनि लपेल कां ? सुगंध त्याचा लपेल कां ?” तो कुठे नोकरी करतो ते मैत्रिणी कडून शोधून काढले होते.  धडधडत्या अंतःकरणाने पत्र पोस्ट केले आणि ठरल्या दिवशी, कॉलेजच्या लॉनवर त्याची वाट बघत बसले. एरव्ही गुप्त हेर वाटणाऱ्या धाकट्या बहिणीला बरोबर नेले होते. तरुण – तरुणीने एकटयाने भेटणे कोणाच्या नजरेत येऊ नये म्हणून बहीण बरोबर.
दोन पत्र पाठवले, त्याआधी ८ दिवस मी १८ वर्षांची पूर्ण होण्याची वाट पाहिली कारण ८ दिवसांनी माझा वाढदिवस होता. कायद्याने सज्ञान होण्याची खबरदारी !कारण —

पत्रात सूचित केले होते…
“पृथ्वीराज राजाने संयोगितेला जसे घोड्यावर बसवून, पळवून नेले होते, तशी तुझ्या सायकलवर पुढे बसून, पळून जाण्याची माझी तयारी आहे. न जाणो, तसेच काही घडले तर ? निदान बहिणीला माहीत असेल.
किती खबरदारी घेतली होती म्हणून सांगू ?
लॉनवर बसून वाट बघता बघता गुणगुणत होते,
“प्यार किया तो डरना क्या ?
प्यार किया, कोई चोरी नही की !”
आणि तो क्षण आला. कंपाऊंडच्या बाहेरच सायकल वरून खाली उतरला. दमदार पावले टाकत आम्ही बसलो होतो तिथपर्यंत हळूहळू (मुद्दाम ??? ) चालत आला. चक्क खाली बसला. त्याला ऑफिसला उशीर होऊ नये म्हणून तसेच वेळेचे नियोजन, अर्थात मी केले होते.
माझ्या छातीत जोरजोराने धडधडत होते. तो बोलू लागला, मी कानात प्राण आणून ऐकू लागले,
“नमस्कार ! तुमचे पत्र मिळाले. पण ……
“मी : देवा ! पण काय ? तुमचेही माझ्यावर प्रेम आहे नां ? मी पळून यायला तयार आहे हो ! आत्ता ह्या क्षणी तयार आहे. ‘तुमच्या नोकरीची कल्पना आहे. मी जन्मभर नोकरी करून संसाराला हातभार लावीन.
“थांबा ! थांबा थोड्या !
तुमचे पत्र काल मिळाले. एकच दिवस उशीर झाला कारण परवाच मी अमरावतीला मुलगी पाहायला गेलो होतो आणि त्यांना होकार देऊन आलो. (🤦🤦🤦 तीही विदर्भ कन्याच ! पण माझे भाग्य हिरावून घेणारी ! सवत माझी काल्पनिक)
त्यामुळे — – – त्याच्याही डोळ्यात अश्रू होते. तो मागे वळून न पाहता अधिकच जड पावलांनी हळूहळू सायकल कडे गेला. मी हुंदके देऊन रडत होते, धाकटी बहीण माझे डोळे पुसत होती.

मी रडून, रडून डोळे सुजवून घेतले. बहिणीने खूप समजावले. पण काय ? शेवटी घरी आलो. आईने माझा चेहरा पाहताच विचारले,
“काय झाले गं ? रुक्मिणी स्वयंवर रसग्रहणात पहिला नंबर नाही मिळाला कां ? की परीक्षेत नापास झालीस ?” मी रडत रडत सांगितले, “दोन्ही ! पहिला नंबर नाही, आणि नापास पण !”
इतके बोलून खोलीचे दार बंद करून बसले.

त्यानंतर मी कायम उदासच असायची. आईला इतकेच लक्षात आले की माझे “काहीतरी बिनसलेय !”
आईने बाबांच्या मागे लकडा लावला, “ही सारखी उदास असते. बी ए ला नापास पण झाली. पुन्हा परीक्षा देणार नाही म्हणते.  हिच्यासाठी ‘स्थळे’ बघायला सुरुवात करू या. लग्न झाले की बरे !

आईबाबांच्या पसंतीचे स्थळ मिळण्यात दोन वर्षे गेली . मी २१ व्या वर्षात पदार्पण केले आणि एकदाचे त्यांच्या मनाजोगते स्थळ मिळाले.

मला कशातच इंटरेस्ट नव्हता . तो सायकल स्वार नव्हता की घोड्यावरून आला नव्हता.
“शुभमंगल” झाले. सासरी आले. सामान्य मध्यम वर्गीय जीवन गाणे सुरु झाले. सासू – सासरे, दीर, नणदांची सेवा, सगळ्यांची मर्जी संभाळणे, सासूबाईच्या हाताखाली घरकाम करणे, काळ सरकत होता.

यथावकाश दोन मुले झाली. ती मोठी झाली. शिकली. खूप मोठी होऊन परदेशी उडून गेली. त्यांचीही लग्ने होऊन, त्यांची मुले म्हणजे माझी नातवंडेही आता मोठी झाली. जो तो स्थिरस्थावर होता.

माझ्या आयुष्याचे वाळके पान, वाऱ्या बरोबर इकडून तिकडे भरकटत होते. मी सुखी होते कां ?
‘ नाही ‘ कसे आणि का म्हणू ? सगळेच तर होते माझ्याकडे ! प्रेमळ, समजूतदार पती, मुले, सुना नातवंडे . आर्थिक सुबत्ता इ.इ.
पण १८ व्या वर्षी झालेली जखम आत, खोल कायम ताजी होती . व्हॅलेंटाईन डे ला उफाळून वर येते .
पन्नास वर्षांचा चित्रपट पुढे सरकला होता.

मग ठरवले आणि पुन्हा माहेरच्या त्याच गावी गेले. टॅक्सी ठरवली आणि आमचे जुने घर पाहण्याच्या निमित्ताने त्या भागात गेले. आमचे घर पार बदलून गेले होते. बैठ्या घराचे दुमजली झाले होते. ४ बंगले पुढे असलेल्या “त्याच्या” बंगल्या समोर टॅक्सीतून उतरले. जराही बदलले नव्हते.🤔
तोच जुना बंगला, मळकट लाल रंग, झाडे मात्र खूप उंच झालेली .
किरकिर आवाज करणारे, गंजलेले फाटक उघडून सरळ आत गेले. आता सोबतीला बहीण आणली नव्हती कारण आम्ही दोघे आता सीनियर, सीनियर सिटीझन झालो होतो. बिनदिक्कत भेटू शकत होतो.

दाराची कडी वाजवली. बेल नव्हतीच. जुने, जुनाट अंधारलेले घर, मळके पडदे !
दार ‘त्यानेच’ उघडले.
ती मिश्कील नजर नव्हती, पीळदार मिशी नव्हती.  (वयानुसार पांढरी झालेली)
चाल मंदावलेली !
त्याने दार उघडताच आमची नजरा नजर झाली. झर्रकन ५० वर्षे मागे गेलो मनाने. त्याचे ते सावकाश वीस सेकंद माझ्या घरासमोरून सायकलने जाणे, ती नजरानजर , माझ्या गालांवर गुलाब फुलणे, नजर लाजून खाली वळणे सार्‍याची क्षणात उजळणी झाली. (कदाचित आताही नजर खाली वळली असेल, गाली गुलाबही फुलले असतील !🤔)
” या ” म्हणत त्याने बायकोला हाक मारली . मुलगा, सून ( आता मध्यम वयीन ) तरुण नातू सगळ्यांना बोलवले . ओळख करून दिली .
” पन्नास वर्षांपूर्वी ह्या आजी आपल्या शेजारी रहात होत्या बरे कां ! ”
सूनबाई चहा कर गं ! ”
सून फारच चुणचुणीत चटपटी होती . चहा , पोहे तर आणलेच . ‘ ‘त्याच्या ‘ बायकोने तर जेवणाचा आग्रह करून थांबवूनच घेतले. सासू – सुनेनी छान जेवण बनवले . तोवर आम्ही दोघानीच ५० वर्षांची कहाणी शेअर केली .

जेवणाचा सुगंध दरवळत होता . बायको अन्नपूर्णा असावी . तिने आम्ही जुने मित्र – मैत्रीण म्हणून दोघानाच जेवायला वाढले . पानाभोवती रांगोळी , उदबत्तीचा मधुर वास . शेजारी बसून जेवलो . इतरांची जेवणे झाल्यावर संध्याकाळ पर्यंत त्याच्या कुटुंबियांशी अवांतर गप्पा झाल्या .

ज्या घरात माप ओलांडून उंबरठ्याच्या आत यायचे स्वप्न पाहिले होते त्या घरात आज ५० वर्षांनी उंबरठ्याच्या आत पाऊल तर टाकले पण …माप ओलांडून नव्हे ! सुग्रास जेवणही झाले. पण त्या घरची अन्नपूर्णा मी नव्हते , दुसरीच होती .

संध्याकाळ झाली म्हणून त्याच्या पत्नीने देवापुढे निरांजन लावले . मला कुंकू लाऊन ओटी भरून निरोप दिला.
मावळतीची वेळ झाली तसे मला निघणे भाग होते . ती कातरवेळ !
मी निघाले तसा तो दोन पावले पुढे गेला .बागेतले गुलाबाचे फूल🌹
हातात घेऊन फाटका जवळ उभा होता . निःशब्द निरोप दिला . नजरेला नजर देणे टाळले त्याने . आता त्याची नजर खाली झुकली होती . अपराधी असल्यासारखी !😪
मीही झट्कन टॅक्सीत बसून दूर दूर नजरेआड झाले .

जुन्या जखमेवर खपली धरली . प्रेमाचा झरा अखंड आहे हदाची खात्री पटली .
आता मी सुखी आहे कां?
उत्तर ” हो ” आहे .
आमचा व्हॅलेंटादिन डे साजरा झाला. गुलाबाच्या साक्षीने आता मी व्हॅलेंटाईन डे साजरा करत नाही. वेणीवर गुलाबाचे फूल घालत नाही. बालवयातले हे असफल प्रेम विसरू शकत नाही .
“विसरशील तू सहज मला
विसरू कशी रे प्रिया तुला ? “😪
असा माझ्या पहिल्या प्रेमाचा, पहिल्या आणि शेवटच्या प्रेमपत्राचा दर्दनाक शेवट .
❤️ का खिलौना हाय टूट गया !😭

सुलभा गुप्ते

– लेखन : सुलभा गुप्ते. सिडनी, ऑस्ट्रेलिया
(काल्पनिक भरारी प्रेमपत्राची)
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800

RELATED ARTICLES

3 COMMENTS

  1. अतिशय सुंदर फुलपांखरी कथा सुलभाताई
    प्रांजळ भावपूर्ण…
    दुरुन येणार्‍या झुळुकेसारखी हळुवार..सुगंधी

  2. छान कथा लिहिली आहे सुलभाताई तुम्ही. ईमोजींमुळे शब्दांना आणखी उठाव आला आहे. पहिल ते सगळंच, पहिल प्रेम, पहिल प्रेमपत्र, पहिल्या मुलाचा जन्म, सगळ अविस्मरणीय असत. धन्यवाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिल्पा कुलकर्णी on स्नेहाची रेसिपी ५
शितल अहेर on कविता
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on महिला गाडीग्रुप : अनोखे संमेलन
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on जिचे तिचे आकाश… १
गोविंद पाटील on महिला दिन : काही कविता
प्रोफेसर डॉ सुवर्णा गुंड-चव्हाण on “सुवर्णधन” सन्मानित