आज १४ फेब्रुवारी. वॅलेंटाईन डे ! पूर्वी ती फक्त डेज ऐकून होती. कॉलेजमध्ये ना कधी “रोज” मिळाले ना कधी “प्रपोज” केले, की साधे चॉकलेट मिळाले.
परंतु, वयाच्या पंचेचाळीशीला आल्यानंतरचा आजचा डे तिच्यासाठी स्पेशल होता. बऱ्याच वर्षानंतर आज खऱ्या अर्थाने स्पेशल डे होता.
बऱ्याच वेळा ती नेहमी खिन्न असायची. सगळे होते घरात. दोन छान मुले, उच्चशिक्षित नवरा, कसलीच कमी नव्हती. परंतु प्रेम व आदर मात्र कधीच मिळाले नव्हते. घरातल्या रोजच्या आरडा ओरडा, धिंगाणे अपमान याला मुक्ता कंटाळली होती. आनंद आणि मुक्ता म्हणून बंगल्याला मुक्तानंद नाव दिले होते. परंतु मुक्ता मुक्त कधीच नव्हती. आणि आनंद हा फक्त नावा पुरताच आनंद होता. बाकी सगळाच नो… आनंद. शिक्षण हे फक्त पैसे कमवण्यासाठीच घ्यायचे, एवढ्याच मतावर तो स्थिर होता. बाकी शून्य. मुक्ता खुप हौशी, प्रेमळ, लाघवी. परंतु लग्नानंतर गेल्या वर्षात सगळेच आयुष्य फक्त वैराग्य आल्या सारखे जात होते.
अशातच एका मैत्रिणीच्या हौशी कलाकार ग्रुपची पार्टी अटेंड करताना नाजूक मनाच्या मुक्ताची ओळख पन्नाशीच्या अजयशी झाली. हळू हळू ओळख वाढू लागली, परंतु एक छान मित्र ह्यापलिकडे कधी पाहिले नव्हते.
लग्न झालेल्या चांगल्या सुसंस्कारित कुळातील महिलेला मुक्त होता येत नाही. हळूहळू फोनवर वैयक्तिक मेसेजेस सुरु झाले. मैत्रीचे रूपांतर प्रेमात होत होते. हे दोघांना कळलेच नाही.
अजय एका फार्मचा मालक होता. त्याचा छोटा कारखाना होता. फार जबाबदाऱ्या नव्हत्या. लग्न झालेले होते. परंतु पत्नीचे काही वर्षापूर्वीच निधन झाले होते. मुले बाळे नव्हते. तो खऱ्या अर्थानी मुक्त होता. अत्यंत शांत प्रेमळ सखोल विचार करणारा होता. खऱ्या अर्थाने आनंदी-कलासक्त गाण्याची आवड असल्यामुळेच मुक्ताची हौशी कलाकार ग्रुपमध्ये ओळख झाली.
महिन्यातून एकदा ग्रुपचे गेट टू गेदर व्हायचे. मुक्तालाही मैत्रिणीकडून आमंत्रण यायचे. हळूहळू जशी अजयशी ओळख वाढू लागली तशी गेट टू गेदरची वाट बघण्याची ओढ वाटू लागली. अजयने तिच्यातील सर्व सुप्तगुणांची ओळख करून दिली. हरवलेला आत्मविश्वास परत येऊ लागला.
त्यानंतर काय, हळूहळू ते मनाने जवळ येऊ लागले. पण एकत्र यायचे कसे हा मोठा प्रश्न मुक्ताजवळ होता. मुले मोठी झालेली होती. घरातील आनंद हा नावाचा आनंद होता आणि बाहेरील आनंद हा मुक्ताचा आनंद होता.
मुक्ताला अजयने आज फोनवर प्रपोज केले होते. तिला म्हणाला की तूच माझी सोलमेट आहेस. आज मुक्ता प्रचंड आनंदी होती. पूर्वी तरुणपणी तिचे आवडते गाणे ती नेहमी गुणगुणायची. स्वप्नात साजणा येशील का ? तो साजण आज स्वप्नातून खऱ्या आयुष्यात आला.
आज दुपारी घरातील सर्व आटोपून ती अजयबरोबर डेटवर गेली. अजयच्या खांद्यावर डोके ठेवून मनसोक्त सुख दुःखाचे अश्रू वाहू दिले. अजयने ही तिला मुक्त होऊ दिले.
तिच्या दैविकतेने तिच्या सोलमेटची भेट घडवून आणली. आनंदने आजपर्यंत दोष आरोप, अपमान हेच केले होते. आणि अजयने फक्त सकारात्मक बाजू पाहिल्या. दुसऱ्यातील चांगले गुण पाहण्यासाठी आत्म्याची सुंदरता असणे फार महत्वाचे असते, हेच खरे…

– लेखन : सौ. शलाका कुळकर्णी. नेदरलँड
– संपादक : देवेंद्र भुजबळ. 9869484800
💦 शलाका ताई..🙏
*सोलमेट..* …. शिर्षक आणि ,”मुक्ता आनंद” हि पात्र.. प्रसंग.. आणि कथेचा आशय धावता पण कमीतकमी शब्दात.. अगदी खुबीने मांडला आहे.
सुंदर लिखाण.
सलाम लेखणीला..✒️
🙏🌹🙏
अप्रतिम लेख.
प्रेम हे दुबळं करणारं नकोच. कणखर बनवणारं आत्मविश्वास जागवणारं हवं.