पुस्तकं सीमारेषा ओलांडतात भूगोलाच्या, इतिहासाच्या. भला माणूस घडवण्यासाठी रात्रंदिवस आटापिटा करतात. आपल्या सर्वांच्या आयुष्यात माणसाला माणूसपण बहाल करणाऱ्या पुस्तकाला अनन्यसाधारण असे महत्व आहे.
दिवसेंदिवस तंत्रज्ञान वाढत आहे मात्र पुस्तकाला अजूनही पर्याय उपलब्ध झालेला नाही. आजच्या पिढीला घडवण्यासाठी, ग्रंथांचे थोरपण जपण्यासाठी, वाचनाचे महत्व अधोरेखित करण्यासाठी व्यास क्रिएशन्स व सरस्वती मंदिर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने, भाषा संवर्धन पंधरवड्याचे निमित्त साधून दि. १० ते १३ फेब्रुवारी या कालावधीत ठाणे येथील सरस्वती विद्या मंदिराच्या नवीन प्रशस्त वास्तूमध्ये
‘वाचू आनंदे‘ या अभिनव महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
सरस्वती मंदिर ट्रस्टच्या संस्थापिका श्रीमती विमलताई कर्वे यांचे यंदा जन्मशताब्दी वर्ष आहे, आणि हा सुंदर योग साधून विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पुस्तक प्रदर्शन, विक्री, वाचनाचे महत्त्व सांगणाऱ्या प्रदर्शनी, लेखक आपल्या भेटीला, पालकांशी संवाद अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन या चार दिवसात केले होते.
पहिल्या दिवशी म्हणजे १० फेब्रुवारी रोजी या महोत्सवाचे उदघाटन ‘खेळूया शिकूया‘ या मालिकेतील बाल कलाकारांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरस्वती विद्या मंदिर ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त सुरेंद्र दिघे, ऍडव्होकेट अनुराधा आपटे, सरस्वती विद्या मंदिर ट्रस्टचे विश्वस्त पुरूषोत्तम आगवण, व्यवस्थापक दीपक सहानी, ज्येष्ठ लेखिका डॉ. सुमन नवलकर, व्यास क्रिएशन्स् चे संचालक नीलेश गायकवाड उपस्थित होते.
यावेळी विश्वस्त श्री सुरेंद्र दिघे यांनी विद्यार्थ्यांना, शिक्षकांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले “ज्याप्रमाणे पोटाची भूक भागविण्यासाठी आपण जेवण करतो, छान छान खाऊ खातो, त्याचप्रमाणे आपल्या विचारशक्तीची वाढ होण्यासाठी पुस्तक वाचन महत्त्वाचे आहे. पुस्तक वाचनानेच सर्वांगीण प्रगती होत असते.” तर व्यास क्रिएशन्सचे संचालक श्री निलेश गायकवाड यांनी व्यास क्रिएशन्सचा एकूण प्रवास विशद करीत ‘मराठी भाषा टिकवायची असेल तर आताच्या मुलांच्या हातात पुस्तकच दिले पाहिजे, मुलांचा बौद्धिक विकास करण्यासाठी त्यांना वाचनाची गोडी लावण्यासाठी पालक आणि शिक्षक यांची महत्त्वाची भूमिका असली पाहिजे. सरस्वती मंदिर ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त सुरेंद्र दिघे यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा महोत्सव वाचन संस्कृतीच्या वृद्धीसाठी महत्त्वाचा आहे’ असा मोलाचा विचार आपल्या मनोगतातून व्यक्त केला.
सरस्वती विद्या मंदिर ट्रस्टच्या पूर्व प्राथमिक, प्राथमिक, आणि माध्यमिक शाळेने वाचनाचे महत्त्व सांगणारे अनोखे प्रदर्शन भरवलं होतं. मराठी साहित्यातील कविता, नाटक, लोककथा याचे महत्त्व सांगणारी भित्तिचित्रे, पोस्टर, विश्व् ग्रंथालय या संकल्पने अंतर्गत मुलांच्या बौद्धिक क्षमतेनुसार एक छोटे विविध पुस्तकांचं एक ग्रंथालयही तयार केले. वाचन कसं असावं, वाचनाची पूर्व तयारी, पुस्तकं कशी टिकवावी याची प्रतिकृती हे सारंच अनुभवण्यासारखं होतं.
उदघाटन समारंभानंतर लगेच ‘लेखक विद्यार्थ्यांच्या भेटीला‘ या कार्यक्रमाअंतर्गत सुप्रसिद्ध लेखिका, अभिनेत्री सौ मेघना साने, ज्येष्ठ लेखक श्री महेश गुप्ते, बालसाहित्यिका डॉ. सुमन नवलकर, निवेदिका आणि अभिनेत्री पल्लवी वाघ – केळकर यांनी मुलांशी छानसा संवाद साधला.
लेखिका सौ मेघना साने यांनी ‘आली परीक्षा आली परीक्षा अभ्यास करायची सर्वांना शिक्षा‘ हे स्वरचित गाणे गाऊन दाखवल्यावर समोरील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे या ओळी गाऊन सुंदर असा प्रतिसाद दिला. त्यानंतर ‘मोठ्या माणसाची स्वाक्षरी‘ ही कथा त्यांनी मुलांना सांगितली.
पल्लवी वाघ आणि डॉ सुमन नवलकर यांनी वाचनाचे महत्व सांगत छानशा स्वरचित गोष्टी सांगितल्या.
तर लेखक महेश गुप्ते यांनी आग्र्याच्या कैदेतून शिवाजी महाराज कसे सुखरूप बाहेर पडले याची गोष्ट, आणि त्यातील प्रसंग विद्यार्थ्यांना सांगताच मुले भारावून गेली.
दुसऱ्या दिवशी ११ फेब्रुवारी कवी, चित्रकार श्री रामदास खरे, ज्येष्ठ लेखिका प्रा. मेधा सोमण आणि ज्येष्ठ लेखक, प्राचार्य अशोक चिटणीस सर यांनी विविध तुकडीतल्या मुलांशी संवाद साधला.
श्री रामदास खरे यांनी वाचनाची दहा वैशिष्ट्ये सांगून त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘गोष्टीरूप गांधीजी‘ या पुस्तकातल्या काही गोष्टी सांगितल्या. तसेच ‘शिवा काशीद‘ या शिलेदाराची कथाही सांगितली.
प्रा मेधा सोमण यांनी भारतीय पद्धतीत, आपल्या कालगणनेत, पंचांगात दर्शविलेले १२ मराठी महिने, तिथी, सणवार आणि सहा ऋतूंची एकमेकांशी कशी सुंदर सांगड घातली आहे यांची अनोखी माहिती विद्यार्थ्यांना दिली. तसेच त्या त्या ऋतूमध्ये, सणांमध्ये काय खावे, काय वर्ज्य करावे याबद्दलची देखील माहिती दिली.
तर ज्येष्ठ लेखक प्रा. अशोक चिटणीस सरांनी विद्यार्थ्यांपुढे आपली दिवंगत कन्या मुग्धाने विविध शाळेत केलेल्या कथाकथनाच्या काही आठवणी जागृत केल्या तसेच वाचनाचे महत्व सांगितले. या दोन्ही दिवसाच्या कार्यक्रमांना विद्याथ्यांचा आणि शिक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभला.
शनिवार दि. १२ फेब्रुवारी आणि रविवार दि. १३ फेब्रुवारी रोजी पुस्तक प्रदर्शन आणि विक्री खास पालकांसाठी खुले ठेवले होते. आधीच्या दोन्ही दिवशी विद्यार्थ्यांनी त्यांना आवडणाऱ्या पुस्तकांची नावे त्यांनी त्यांच्या वहीत टिपून ठेवली होती. या दोन्ही दिवशी पालकांनी मोठ्या संख्येने पुस्तक प्रदर्शनाला भेट दिली आणि त्यांच्या मुलांना आवडलेली पुस्तके मोठ्या प्रमाणावर ग्रंथ खरेदी केली. विशेष म्हणजे अनेक पालक त्यादिवशी आपल्या मुलांना देखील प्रदर्शनाला घेऊन आले होते. ऐतिहासिक आणि वैज्ञानिक पुस्तके मोठ्या प्रमाणावर पालकांनी खरेदी केली. तसेच प्रेरणादायी कथा, चरित्रे अशाही पुस्तकांची चांगली विक्री झाली.
अखेरच्या दिवशी ‘रात्रीस खेळ चाले‘ या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्री प्राची निल यांनी भेट दिली. सरस्वती विद्या मंदिर आणि व्यास क्रिएशन्स् यांनी आगळ्यावेगळ्या संकल्पनेतून तयार केलेल्या प्रदर्शनाचे यांनी कौतुक केले. व्यास क्रिएशन्स संचलित राज्ञी वुमन वेल्फेअर असोसिएशन च्या कार्यकारी संचालिका वैशाली नीलेश गायकवाड आणि समन्वयिका गायत्री डोंगरे यांनी प्राची नील यांचे पुस्तक भेट देऊन स्वागत केले.
व्यास क्रिएशन्सचे संचालक निलेश गायकवाड आणि सरस्वती मंदिर ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त सुरेंद्र दिघे यांनी या चार दिवस चालणाऱ्या ‘वाचू आनंदे‘ महोत्सवाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आणि विद्यार्थ्यी-पालकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केले.
– टीम एनएसटी. 9869484800
ग्रंथ हेच गुरु असुन समाजाला ज्ञान,विद्या,कला, शास्त्र, विज्ञान,मनोरंजन माहिती आणि सर्व प्रकारच शिक्षण देण्याची प्रभावी साधन आहे. ” इये मराठीचिये नगरी !ब्रम्हविद्दे्चा सुकाळु करी ! घेणे देणे सुखचिवरी होऊ देई या जगा! असा ब्रमहज्ञानाचा स्रोत म्हणजे मराठी भाषा आणि मराठी ग्रंथ आहेत. म्हणून आपण सर्वांनी मराठी भाषेतील कोणत्याही ग्रंथाचं एक तरी पान नियमितपणे वाचल्यास आपणा सर्वांना मराठी भाषा आणि मराठी ग्रंथाची महती कळुन येईल. मराठी भाषेत इंग्रजीच्या हजारो पटीने जास्त शब्द आहेत आणि आणि प्रत्येक शब्दात अर्थ, माधुर्य,संगीत, शास्त्र,ज्ञान, विज्ञान आणि आरोग्य उपचार आहेत. परंतु यासाठी मराठी ग्रंथ वाचन करायला हवे. मला ग्रथवाचनामुळे साहित्य, व्याकरण,नाटक -गडकरी, इतिहास यदुनाथ सरकार, काव्य विशेषता प्रेम काव्य – भा.रा. तांबे पासुन प्रविण दवणे, डॉ शाहु रसाळ, उच्च कोटीची अध्यात्म विद्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या सहीत सर्व संतांचे काव्यरुपातील अदभुत अध्यात्म विज्ञान म्हणजे जगातील सर्वोत्तम जीवन जगण्याचं सर्वश्रेष्ठ व्यवस्थापन शास्त्र आहे. या आणि अशा अनेक उत्तमोत्तम ज्ञान मिळवण्याची बहुआयामी साधने म्हणजे मराठी ग्रंथ आहेत . त्यासाठी असे नवे नवे उपक्रम आवश्यक आहेत. राम खाकाळ ,
माजी निर्माता दिग्दर्शक मुंबई दूरदर्शन आणि संकल्पक
मिशन एक गाव एक परिवार-यशस्वी गावकऱ्यांचा सुत्रधार
आणि
मिशन विषमुक्त शेती हीच खरी शेतकऱ्यांची आणि देशाची शक्ती.
9969254051 .