जय भवानी, जय शिवाजी.
महाराष्ट्रात म्लेच्छांनी धुमाकूळ माजवला
कोणाचा पायपोस कोणाच्या पायी
नाही उरला
अत्याचारांना अंत
नाही उरला
स्त्रियांची अब्रू राखणारा कोणी नाही
कोणत्या क्षणी कुठून येतील
अब्रू लुटून,
पळवून नेतील
उभी पिके कापून नेती
गावेच्या गावे
बेचिराख करती
जबरदस्तीने धर्मांतर करती
कोणी वाली नाही उरला
भयभीत जनता घाबरून
जीव मुठीत घेऊन
कडेकपारी जीव मुठीत घेऊन
गर्भगळीत होऊन
चोरा सारखे जीवन जगत होती
आई भवानीला
साकडे घालत होती
“उदो गं अंब उदो उदो”
भवानी माते हाती तलवार घे,
प्रगट हो, महाराष्ट्राचे रक्षण कर🙏
शिवनेरीवर जिजामातेला
डोहाळे लागले होते,
घोड्यावर 🐎 स्वार व्हावे,
हाती तलवार🗡️ घेऊन लढावे
म्लेंच्छांचा नायनाट करावा
एक ध्यास, एकच स्वप्न
महाराष्ट्र धर्म वाढवावा
श्रींचे राज्य व्हावे ॥
अनेक पिढ्यांचे स्वप्न पूर्ण झाले
भवानी प्रसन्न झाली
साधु संताचे आशिर्वाद फळले
जिजामाता प्रसूत शिवनेरी वर झाली
यशवंत, गुणवंत पुत्ररत्न जन्मले
जगती आनंदी आनंद झाला
बाळ शिवाजी जन्मला ॥
भविष्य उज्वल झाले
तो स्थापील महाराष्ट्
गडागडावर भगवा फडकेल🚩
रक्षील मराठी राज्य
सुख शांती आनंद नांदेल
मराठा तितुका मेळवावा
मराठी धर्म वाढवावा ॥
जय शिवाजी, जय शिवाजी
जय भवानी, जय भवानी
– रचना : सुलभा गुप्ते. ऑस्ट्रेलिया
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
l l आमचे राजे ।।
आला जन्माला जिजाऊचा बाळ
करण्या महाराष्ट्र शत्रू मुक्त
बनला सार्या शत्रूंचा कर्दनकाळ
जिजाऊ शहाजीचा हा पुत्र ।।
बाळ राजे चालले डौलात
तेव्हापासूनच अंगात भिनले
स्वराज्याचे बाळकडू प्याले
हाती तलवार अन जिगर अशी
पाहिजे तेव्हा शत्रूला भिडले ।।
मुठभर मावळ्यांसह शत्रूला नडले
बलाढ्य शत्रुसैन्याला पुरुनी उरले
चुटकी सरशी गनिमीकाव्याने जिंकले ।।
सुरुवात विजयी पताका तोरण
चढविले तोरणा किल्ल्यावरी
आगेकूच करतच गेली हि स्वारी
पूर्ण स्वराज्य हेच तयांचे धोरण
मग जिंकले असंख्य किल्ले
विजयी फडकले पताका तोरण ।।
करुनी सळो-की-पळो शत्रू सैन्यास
पूर्ण स्वराज्याचा घेवून ध्यास
शत्रूंचे मनसुबे लावता धुळीस
पाऊल पुढे टाकत स्वराज्यास ।।
असा हा आमचा शिवबा
सगळ्या रयतेचा हा राजा
ज्यांनी स्वराज्याची ठेवली निव
करू त्यांचा जन्म दिन साजरा
त्यांसी आमचा मानाचा मुजरा
त्यांसी मानाचा मुजरा ।।
– रचना : सौ प्रणिता अजित बिलोलीकर.
जमशेदपूर, झारखंड.
पोवाडा
शीर्षक :- ‘धन्य धन्य मराठी राजा’
पहिले नमन हिंदवी स्वराज्याला आ..आ..आ…..आ…..
आई भवानीला……
माय जिजाऊला…..
वीर शिवबाला……
जाणता राजा मराठा सरदार… जी..जी…जी..जी…जी….
शिवशाहीचा शिवसूर्य तळपला
स्वराज्य स्थापनेचा मंत्र दिधला
साथ होती शूर मावळ्यांची
घेतली शपथ रायरेश्वराची
झळकली भवानी मातेची तलवार … जी…जी…..जी….जी….
प्रतापगडाच्या पायथ्याशी
ठरली भेट अफझलखानाशी
खानाने आलिंगन दिले कपटाने
वार केला राजाच्या कुशीत कट्यारीने
पण..चिलखत ठरले तारणहार…
जी…जी…जी..जी…..
राजांनी बिचवा खानाच्या पोटात खुपसला
अफजलखान खाली कोसळला
ऐकुनी बडा सय्यद आत आला
शिवरायांवर वार त्याने केला
शिवासाठी जिवाने वार झेलला अंगावर …
जी..जी…. जी….जी…..
पन्हाळ्याच्या वेढ्याची ती युक्ती
खानाची बोटे तोडूनी दिली मुक्ती
औरंगजेबाच्या हाती दिल्या तुरी
स्वराज्याचे स्वप्न ठसले होते उरी
मराठ्यांचा राजा असा कर्तबगार…
जी…जी….जी…जी…
रायगड राजधानी ठरविली
राज्यभिषेकाची योजना आखली
किर्तिवंत तो करारी बाणा
धन्य धन्य तो मराठी राणा
अशा क्षत्रिकुलावतंस राजाचा जयजयकार… जी…जी…जी ..जी…
– रचना : सौ.संजना विद्याधर जुवाटकर. कळवा, ठाणे.
‘जनतेचे राजे’..…
जनतेचे राजे । शिवछत्रपती ।
मावळे सोबती । त्यांचे सदा ।।
स्वराज्याची इच्छा । तिव्र हृदयात ।
लढले रणात । याचसाठी ।।
आई जिजाऊंच्या । संस्काराची जाण ।
स्त्रियांचा सन्मान । त्यांनी केले ।।
जिद्द आणि शौर्य । त्यांची आभूषणे ।
रणात जिंकणे । स्वप्न हेचि ।।
जनतेचे प्रिय । थोर प्रशासक ।
शत्रूंना वचक । शिवाजींचा ।।
गडकिल्ले राजे । राहिले जिंकत ।
आईपुढे नत । राही मात्र ।।
विचार तयांचे । करू आत्मसात ।
नका करू घात । विश्वासाचा ।।
गरीब, श्रीमंत । समान जाणूया ।
राजांना स्मरूया । नित्यनेमे ।।
अजु गुणगान । नित्य करणार ।
नित्य स्मरणार । शिवाजींना ।।
– रचना : अजय रमेश चव्हाण. दारव्हा
पोवाडा
‘शिव छत्रपती’
सह्याद्री पायथ्यापाशी…
बाळ जन्मले एके दिवशी…
तो दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला. शके १६३०. १९ फेब्रुवारी …
किल्ले शिवनेरी वरी,
दिस तो १९ फेब्रुवारी….
स्वराज्य तोरण बांधण्या दारी..
मुग्लांची पळती भुई थोडी केली..
इतिहास घडविला जगी.. जी .जी..
नाव त्यांचे आहे छत्रपती… जी .. जी..
मानाचा मुजरा तव चरणी.. जी.. जी.. #१#
जाधवांची
कन्या वेरुळी …
भोसल्यांची सून ती झाली..
घडवाया राजा हुरहूननारी…
स्वराज्य बीज रोविले मनी…
आई होती गुरू पहिली…
शिवबाची माऊली. ती.. जी.. जी..
नाव त्यांचे जिजाबाई . जी.. जी.. #२#
गिरवूनी
धडे शौर्याचे ….
श्रीकृष्ण अन् अर्जुनाचे …
ढाल, तलवार अन् दांडपट्टा…
दोडोजिंचा हस्त मोठा…
म्हणूनच.. केला काबीज तोरणा.. जी जी.
अहो.अवघ्या सोळाव्या वर्षी.. जी.. जी..#३#
स्वराज्याची
पताका फडकली….
भगव्याची लाली चमकली….
घेऊनी मावळे किती??
अगणित खंबीर पाठी…
मोगलांची दैना झाली…. जी.. जी..
वाजली विजयाची तुतारी … जी.. जी..
शिवराय झाले छत्रपती.. जी.. जी… #४#
शिवरायांचे
आठवावे रूप… शिवरायांचा
आठवावा प्रताप…
रसिक हो… शिवराय बद्दल किती आणि काय काय बोलावे.. त्यांनी केलेला पराक्रम ऐकून छाती अभिमानाने भरून येते आणि मान आदराने झुकते .. पण ह्या अशा महान छत्रपाती ना घडवणारी माऊली थोरच… जिजाऊनी जर छत्रपतींच्या मनात स्वराज्याच बीज रोवेले नसते तर आज आपण मोकळा श्वास घेऊ शकलो नसतो.. म्हणून त्या माऊलीला कोटी कोटी प्रणाम… #५#
इतिहास घडविला ज्यांनी….
जिजाऊंच्या मर्द मराठ्यनी..
मानाचा मुजरा तव चरणी.. जी.. जी.. जी.
मानाचा मुजरा तव चरणी.. जी.. जी.. जी
– रचना : सौ. प्रियांका रत्नेश निनगुरकर, पुणे
पाळणा शिवबाचा
जिजाऊ पोटी शिवबा जन्मले
शिवनेरीवर झेंडे फडकले,,,,
बाळ राजांचे कवतिक झाले
दास दासी गाणं गाऊ लागले
जो बाळा जो जो रे,,,, ।।1।।
जिजाऊचा आनंद गगनात मावेना
शहाजी राजे होते कर्नाटकाला,,,
दूत सांगावा घेऊन राजाकडे गेला,,,
शहाजी राजे आले युवराज बघायला
जो बाळा जो जो रे जो ।।2।।
हत्तीवरून साखर वाटली
शिवनेरीवर साजरी दिवाळी
दिव्यांनी चमकली शिवनेरी नगरी
बाया बापड्या बाळराजांना ओवाळी
जो बाळा जो जो रे जो ।।3।।
बारश्याचा दिस उगवला
माणिक मोत्यांनी पाळणा
सजला बाळ राजांचा महालात
गाऊ लागल्या दोरी धरून पाळणा
जो बाळा जो जो रे जो ।।4।।
नाव ठेवले शिवाजीराजे
सनई चौघडे वाजू लागले
गगनात नाव शिवाजी घुमले
बाळ राजे खेळू लागले,,,,
जो बाळा जो जो रे जो ।।5।।
कलेकलेने बाळ वाढले
हाती जिजाऊंनी शस्त्र दिले
राम कृष्णाच्या कथा सांगितल्या
आईने संस्कारी बाळ घडवले
जो बाळा जो जो रे जो ।।6।।
– रचना : सौ. वृंदा गंभीर, अहमदनगर