१९८४ मधील विदर्भ साहित्य संघाचे विभागीय साहित्य संमेलन गडचिरोलीत घ्यायचे ठरले. या संमेलनाचे अध्यक्ष गझल सम्राट सुरेश भट (दादा) होते तर प्रमुख पाहुणे होते पंडित हृदयनाथ मंगेशकर! दादांच्या खास आग्रहाखातर ते मुंबईहून गडचिरोली या आदिवासी जिल्ह्यात यायला तयार झाले होते. दादांचे अध्यक्षीय भाषण तयार होत होते…. त्यांचा लेखनिक ताराचंद चव्हाण ते लिहित होता…. आणि दादांकडून भरपूर ऐकायला मिळेल या अपेक्षेने मी तिथे गेलो होतो.
विदर्भाच्या वैशिष्ठ्या पासून गझलच्या बाराखडी पर्यंत खूप कांही मला ऐकायला मिळालं, आणि गझल बद्दल दादांनी दिलेल्या माहितीमुळे ”कुटुंब रंगलंय काव्यात” हा माझा एकपात्री कार्यक्रम समृद्ध झाला. दादांची आणि माझी मैत्रीही येवढी द्रुढ झाली की त्यांच्या तयार झालेल्या कवितेची एक झेरॉक्स प्रत दादा स्वाक्षरी करून मला पाठवू लागले. अशा त्यांच्या फाईल भरून कविता माझ्या संग्रही आहेत.
नागपूरच्या सीताबर्डी येथे कार्यरत असलेल्या ‘मातृसेवा संघाच्या’ मदतीसाठी सुरेश भटांच्या गझलांचा एक कार्यक्रम जाहीर झाला. प्राचार्य राम शेवाळकर त्या कार्यक्रमाचे निरूपण करणार होते तर दादा त्यांच्या गझल सादर करणार होते. धरमपेठ कन्या विद्यालयाच्या प्रांगणात, दर्दी रसिकांच्या तुडुंब गर्दीत तो कार्यक्रम तूफान रंगला आणि मी तो प्रत्यक्ष अनुभवला. टाळ्यांच्या प्रचंड गजरात कार्यक्रम संपला. मातृसेवा संघाने दादा-वहिनींचा यथोचित सत्कार केला. घरात आर्थिक अडचण असून सुद्धा तिकीट विक्रीतून जमा झालेली सर्व रक्कम भटांनी मातृसेवा संघाला मदत म्हणून दिली.
दादांचा हा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी गावात राहणाऱ्या आशा जराते या मुलीच्या हार्ट आॅपरेशच्या मदतीसाठी माझ्या एकपात्री कार्यक्रमाचा एक प्रयोग मी आरमोरी गावात सादर केला होता. भूकंपग्रस्त.. पूरग्रस्तांच्या मुख्यमंत्री निधीच्या मदतीसाठी, कांही संस्थांच्या… वृद्धाश्रमांच्या मदतीसाठी कुटुंब रंगलंय काव्यातचे प्रयोग मी सादर केले आहेत.
मुंबई दूरदर्शन वर माझा एकपात्री प्रयोग १९८६ साली सादर झाला आणि ‘कुटुंब रंगलंय काव्यात’ ला सर्वदूर रसिक मान्यता मिळाली. ‘अभिजात रंगभूमी पुणे’ या संस्थेच्या मदतीसाठी ‘कुटुंब रंगलंय..!’ एक प्रयोग टिळक स्मारक मंदिरात सादर ठरले. या उद्घाटन माझे आई-बाबा दीप-प्रज्वलनाने करणार होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते नटश्रेष्ठ चित्तरंजन कोल्हटकर आणि प्रमुख पाहुणे होते गझल सम्राट सुरेश भट.!
माझा एकपात्री प्रयोग सुरू करताना मला थोडे दडपण आले होते. पण ‘या कुन्देन्दू…’ ची मराठीतील समश्लोकी मी सादर करताच पुणेकर रसिकांनी टाळ्यांचा कडकडाट करून दाद दिली आणि माझा कार्यक्रम उत्तरोत्तर रंगतच गेला. सर्वांनी कार्यक्रमाची भरभरून स्तुती केली. त्यानंतर बराच कालावधी गेला. नंतर एक दिवस मी भटांच्या भेटीसाठी गेलो असता दादा मला म्हणाले, “विसुभाऊ, तुझ्या एकपात्री कार्यक्रमात कुटुंब रंगलेले मी प्रत्यक्ष पाहिले आहे. तू तुझा कार्यक्रम चांगलाच सादर करतोस… मराठी कवितांना रसिकही भरभरून दाद देतात. तेंव्हा आता ‘गझलची धुराही’ तू तुझ्या खांद्यावर घ्यावीस ! मी तुला मार्गदर्शन करतो.” नंतर कांहीच महिन्यातच दादांना देवाज्ञा झाली. गझलचा कार्यक्रम करायचे सुरेश भटांचे स्वप्न, मी पूर्ण करू शकलो नाही, ही खंत आजही माझ्या मनाला बोचते आहे.

– लेखन : प्रा विसुभाऊ बापट, मुंबई
(सादरकर्ते- कुटुंब रंगलंय काव्यात)
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800