Wednesday, September 17, 2025
Homeसाहित्यओठावरलं गाणं...

ओठावरलं गाणं…

नमस्कार 🙏 “ओठावरलं गाणं” या कार्यक्रमात सर्व रसिक श्रोत्यांचं भरभरून स्वागत. रेडिओवर ज्या वेळेस एखादं सुंदर गाणं लागतं त्यावेळेस त्या गाण्यातला भाव गायकाच्या गळ्यातून इतक्या तल्लिनतेने प्रगट होतो कि गाणं संपल्यावरही क्षणभरासाठी भान हरपून आपण फक्त त्या गाण्यामध्ये जगत असतो, भिजत असतो, रमत असतो. कविवर्य नितीन आखवे यांचं नाव आलं कि ज्या गाण्याचे सूर गाण्याच्या आधी आपल्या ओठांवर येतात ते आजचं गाणं आहे –

मी राधिका, प्रेमिका
तन शाम, मन शाम प्राणसखा घनश्याम
रंगले जयाचे रंगी

यशोदेचा कान्हा, गोपिकांचा कृष्ण कन्हैया आणि माझ्या जीवाचा नंदलाल असलेला माझा मुरलीधर माझ्या रोमरोमात तर भिनला आहेच पण माझा प्राणप्रिय घनश्याम जर दृष्टीआड झाला तर मी कावरीबावरी होते, सैरभैर होते. चित्त थाऱ्यावर रहात नाही, डोळे यमुनेच्या काठावर किंवा कदंब वृक्षाखाली त्याला शोधत रहातात. मग कुठूनतरी मुलीचे सूर कानावर येतात आणि मुरलीच्या सुरांच्या नादाने पुन्हा पुन्हा मुरलीधराला पहाण्यात मी रंगून जाते.

अपरात्री कुंजवनी सूर मधुर जाग मनी
कळेना सुचेना माझी मी उरेना साहवेना
मीलनासी आतुरले
मी राधिका, प्रेमिका

माझा मुरलीधर जर मला भेटला नाही तर माझं कुठल्याही कामात लक्ष लागत नाही. माझी ही अवस्था त्याला कळते कि नाही कुणास ठाऊक पण त्याच्या आठवणींमध्ये रममाण झालेली असतानाही कुंजवनात छेडल्या जाणाऱ्या मुरलीचे सूर माझ्या ह्रदयापर्यंत अगदी व्यवस्थितपणे पोचतात. मग मी माझी रहात नाही, काय करावं ते मला कळत नाही कि काही सुचत नाही. फक्त एकच गोष्ट माझ्या लक्षात येते ती म्हणजे मला मनमोहनाचा विरह सहन होत नाहीए आणि मनाने मी त्याची झाली असले तरी कृष्ण सख्याच्या भेटीचा ध्यास आणि मीलनाची आस हेच सांगते आहे कि कृष्ण भेटीसाठी राधिका आतुर झाली आहे, प्रेमिका आकृष्ट झाली आहे.

शामरंग, शामसंग मीलनात चित्त दंग
सुखाच्या क्षणीही मोहूनी वाजे ही मनवीणा
मंत्रमुग्ध मोहरले
मी राधिका प्रेमिका

“मी राधा मीच कृष्ण एकरूप झाले” अशी या राधेची अवस्था झाली आहे जी शरीराने कुठेही असली तरी मनाने नेहमीच श्रीकृष्णाच्या जवळ असते आणि श्रीकृष्णाच्या नील रंगाशी ती एकरूप झालेली असते. कृष्णसख्यासह मीलनात दंग झालेली असतानाही, मीलनाचे सौख्य क्षण झेलत असताना देखील मनीची वीणा झंकारत रहाते आणि मग तीचा नाद ऐकताना तल्लीन होऊन राधेच्या शरीरावर सुखाचे, आनंदाचे रोमांच उभे रहातात ज्यामुळे शरीर तर मोहरून जातंच पण या एकरूपतेचीही एक नशा सतत मागे रेंगाळत रहाते.

येई भान, तृप्त गात्र, गोकुळी पहाट मात्र
कुणा हे सांगू मी, कसे हे सांगू मी उमजेना
शामक्षण जगले
मी राधिका प्रेमिका

मुरलीधरासोबत प्रेमक्रिडा करताना त्याला देखील ओठावरच्या बासरीचा विसर पडतो हे विशेष! आणि खरं सांगायचं तर मीलनानंतरच्या तृप्तीमधून जाग येते तेंव्हा तर बाहेर पहाट झालेली असते. हा मीलनाचा क्षण मी त्याच्यासोबत जगले एवढंच त्यानंतर माझ्या लक्षात रहातं. त्यानंतर लौकिकार्थाने प्रश्न एवढाच मागे रहातो मी जगलेला अत्युच्च सुखाच्या ह्या मीलनक्षणाविषयी कुणाला सांगायचं आणि कसं सांगावं या विषयीचा संभ्रम मनाला पडतो आणि हा गुंता कसा सोडवायचा ते काही केल्या मला समजत नाही. लक्षात रहातं ते म्हणजे मी राधिका आहे आणि कृष्ण कन्हैय्याची प्रेमिका आहे.

राधाकृष्णाच्या मीलनाचं, नि:सिम प्रेमाचं नातं व्यक्त करणारं हे गाणं संगीतकार श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलं असून आरती अंकलीकर टिकेकर यांच्या दर्दभऱ्या आवाजातून हे गाणं मनाच्या कप्प्यात खोलवर जाऊन बसतं.

विकास मधुसूदन भावे

– लेखन : विकास मधुसूदन भावे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800

RELATED ARTICLES

5 COMMENTS

  1. श्रीधर फडके यांनी संगीत दिलेल्या अनेक उत्कृष्ट गाण्यांपैकी हे एक सुरेल गाणे. या गाण्याचे कवी नितीन आखवे आहेत हे अनेकांना माहीत नाही. आरती अंकलीकर टिकेकर यांनी ते अतिशय सुंदर आवाजात सादर केले आहे. अशा सुंदर गाण्याचे सुरेख भाषेत रसग्रहण करून आपण जुन्या स्मृतींना उजाळा देत आहात. देवेंद्र भुजबळ विकास भावे यांना हे सदर चालू केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Manisha Shekhar Tamhane on झेप : ३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा
सुबोध शशिकांत महाबळे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं