Saturday, March 15, 2025
Homeसाहित्यमाय मराठी : काही कविता

माय मराठी : काही कविता

१)  माय मराठी
मऊ मुलायम मला भासते माय मराठी
कोजागिरीच्या घट्ट दुधाची साय मराठी

आईच्या मायेने आम्हा ती जोजविते
कुणास अपुली जागा देईल काय मराठी ?

रंग नव्याने लेवत असते वेळोवेळी
काळासंगे होत देखणी जाय मराठी

गरीब सोशिक सालस आणिक आखुडशिंगी
परदेशीच्या पुढती ठरते गाय मराठी

हाय हलो ने पुढे मारली अशी मुसंडी
बाणेदारच म्हणती आता बाय मराठी

पुढ्यात असुनी मुले वाटती दूर कुठेशी
मोकलून ती रडते आहे धाय मराठी

चढविलास तू साज आमुच्या अस्तित्वाला
ऋणी राहतो, तुझे धरीतो पाय मराठी

– रचना : डाॅ. स्वाती घाटे. जयपूर, राजस्थान

२)  मायबोली मराठी
वारकऱ्यांच्या गर्दीत
दंगते मायबोली मराठी
दऱ्याखोऱ्यातूनी वाहते
आमची मायबोली मराठी

तलवारीत मावळ्यांच्या
गर्जते मायबोली मराठी
तिलक होऊनी शिवबांचा
शोभते मायबोली मराठी

पदर घेऊनी नऊवारीचा
मान राखते मायबोली मराठी
तार नक्षीदार मोरपंखीचे
जोडते मायबोली मराठी

ज्ञानदेवाच्या ज्ञानेश्वरीतून
बोलते मायबोली मराठी
टाळ-मृदंगांच्या तालावरती
होऊनी तुका नाचते मायबोली मराठी

पहिले द्वार शिक्षणाचे
उघडते मायबोली मराठी
अनमोल वारसा संस्कृतीचा
जपते मायबोली मराठी

अशी ही अनमोल मराठी
मिळूनी सर्वजण जपूया
ओळख आपल्या मायबोलीची
जगास साऱ्या देऊया

– रचना : पुनम सुलाने.

३)   🌳 “माय मराठी”🌳
_माय मराठी गाऊ गुण गान !_
_शब्द सुमनांची मोठी खाणं !!_
_माय मराठी आमची शान !_
_मनी पेटवी भाषाभिमान !!_

_साऱ्या धर्माचे एकच स्थान !_
_माय मराठी असती महान !!_
_गुणी माय मराठीचा बहुमान !_
_सारे भारतीय करी सन्मान !!_

_मराठी आमचा स्वाभिमान !_
_उरी जागवी देश अभिमान !!_
_साऱ्या धर्माचे आदर स्थान !_
_मराठी भाषाच शोभे छान !!_

_मराठीचा असे अभिमान !_
_लोक सेवेचे मिळे वरदान !!_
_माय मराठी आमची महान !_
_आम्ही माय मराठीचे संतान !!_

_आम्ही भारतीय घेतो आन !_
_मराठी आमुची स्फूर्तीस्थान !!_
_माय मराठी आमुचा प्राण !_
_श्वासात मराठी पंचप्राण !!_

_साऱ्या जगात पेटवू एकच रानं !_
_मराठी भाषाच असे गुणवान !!_
_भाषा रक्षीण्या देऊ बलिदान !_
_निष्प्रभ करु कट कारस्थान !!_

_माय मराठीचे बहू संतान !_
_संत महंत रूप जन्मे महान !!_
_माय मराठी असे शीलवान !_
_सूर्य चंद्र सुद्धा दिसे लहान !!_

_बळी तुडवतो सारे रानं !_
_मराठीस देऊनी सन्मान !!_
_गाऊनी मराठीचे गोड गान !_
_जय जवान, जय किसान !!_

– रचना: जी. पी.खैरनार. नाशिक

४)   माय मराठी
माय मराठी आपुली
तिला अमृताची गोडी
पंचपक्वान्नांचे ताट
गोड आंब्याच्या रे फोडी ।।१।।

किती संपन्न श्रीमंत
तिच्या समॄद्ध त्या बोली
भारदस्त तिचे शब्द
त्यांची अथांग ती खोली ।।२।।

शब्दालंकारांनी पहा
कशी सजली नटली
अनुपम ते सौंदर्य
साऱ्या जगाला पटली ।।३।।

तिचा महिमा तो थोर
करू किती गुणगान
संपन्न तो इतिहास
ऐश्वर्याची मोठी खाण ।।४।।

ठायी सूर्याचे ते तेज
चंद्राची ती शीतलता
काळ्याभोर आकाशात
चमकावी विद्युल्लता ।।५।।

तिचा पसरे सुगंध
पिंगा घालती भ्रमर
तिला वाचवू जगवू
तिला करू रे अमर ।।६।।

सदा संवाद तिच्यात
आणू लेखनाला रूप
नऊ रसांनी भरली
गच्च काठोकाठ कूप ।।७।।

संदेशात देऊ तिला
उच्च मानाचे ते स्थान
गाऊ तिची गीते सदा
करू डोळे जीभ कान ।।८।।

लिहू कथा कादंबरी
काव्य प्रवास वर्णन
वैचारिक चिंतनात
ललितात ते दर्शन ।।९।।

ऐकू लिहू वाचू बोलू
माध्यमांतून वापरू
तीच कामधेनू गाय
तिचे आम्ही रे वासरू ।।१०।।

घेऊ हातात तो हात
वाढवू रे तिची कीर्ती
साऱ्या मनांत ठशीन
मग तिचीच रे मूर्ती ।।११।।

– रचना : प्रा मोहन ज्ञानदेवराव काळे

५)  मराठी राजभाषा गौरव दिन
महाराष्ट्र गौरव गीत

  महाराष्ट्र माझा
मावळ मातीचा
शूर जातीचा
तलवारीच्या पातीचा
महाराष्ट्र माझा ॥१॥

जाणता राजा शिवछत्रपतीचा
वीरपुत्र शिव शंभूराजांचा
शिवपुत्र छत्रपती राजारामाचा
महाराष्ट्र माझा ॥२॥

राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंचा
न्यायप्रिय होळकर अहिल्यांचा
स्वराज्यासाठी लढणार्‍या ताराबाईचा
महाराष्ट्र माझा ॥३॥

झाशीची राणी लक्ष्मीबाईचा
कतृर्त्ववान रमाई भिमाईचा
विद्येची सरस्वती सावित्रीचा
महाराष्ट्र माझा ॥४॥

सह्याद्रीच्या कड्या कपारीचा
सातपुड्यांच्या उंच रांगांचा
गड, तट बुरुजांचा, इतिहासांचा
महाराष्ट्र माझा ॥५॥

हातात पोत घेणार्‍या पोतराजांचा
कवड्यांच्या माळा घातलेल्या आराध्यांचा
हर हर महादेव चा गजर करणार्‍या मर्दाचा
महाराष्ट्र माझा ॥६॥

कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचा
कोल्हापुरच्या आई अंबेचा
जेजुराच्या खंडेरांचा
महाराष्ट्र माझा ॥७॥

ताठ मानेचा
राकट बाणेचा
पोलादी मनगटांचा
महाराष्ट्र माझा ॥८॥

काळ्या मातीचा
मर्दानी छातीचा
सळ सळत्यां रक्ताचा
महाराष्ट्र माझा ॥९॥

पैठणच्या नाजुक पैठणीचा
कोल्हापूरच्या पैलवानांचा
सातार्‍यांच्या गुलछडींचा
महाराष्ट्र माझा ॥१०॥

क्रांतीसुर्य महात्मा फुलेंचा
राजर्षि शाहू महाराजांचा
महामानव डाॅ.आंबेडकरांचा
महाराष्ट्र माझा ॥११॥

स्वातंत्र्य, समता, बंधुतेचा
पुरोगामी प्रबोधनकारांचा
लोकशाही जागविणारा
महाराष्ट्र माझा ॥१२॥

– रचना : पंकज राजेंद्र कासार-काटकर

६)    माझी मराठी
माय मराठीची गोडी
अमृताचा जणू कुंभ,
अशी मिठास तिच्यात
भरे गोडवा तुडुंब.!!

राजभाषा मराठी ही
तिज कशाची ना तोड,
अशी लाघवी, मधाळ
मकरंदासम गोड.!!

थोर साहित्यिक ज्यांनी
दिले साहित्याचे दान,
केले समृद्ध भाषेस
वाढविला तो सन्मान.!!

मायबोली माझी ऐसी
काय महती वर्णावी,
वाणी मधाळ मराठी
पैज अमृते जिंकावी.!!

दिले श्रेष्ठत्व भाषेस
लेखनात ते प्राविण्य
रत्न साहित्यिक थोर,
कुसुमाग्रज अग्रगण्य.!!

शान वाढो मराठीची
आज साऱ्या जगतात,
माय मराठीचा डंका
वाजो साऱ्या त्रिखंडात.!!

– प्रणाली म्हात्रे. विक्रोळी, मुंबई.

७)   मराठी दिन
माय अमुची मराठी ,
महावंदनीय अमुची भाषा ,
दऱ्याखोरी लाल माती ,
माऊली अमुची मराठी ॥

संतांची पावन भूमी ,
साहित्यिकांची विशाल धरती ,
मुखे जनाईच्या ओवी ,
लाभली माऊली जन्मी ॥

वीर शिवबांची तलवार ,
कणखर मावळ्यांची छाती ,
धीट सावरकर जन्मले ,
महराष्ट्र धरती वर ॥

कडेकपारीत हिरवे रान ,
सात नद्यांच्या संगमात ,
तटस्थ गड सागरात ,
कोकण माझा अभिमान ॥

जगभर अथांग भाषा ,
मराठी माझी वाणी ,
मराठी माझा प्राण ,
मी मराठी, माझी भाषा ॥

– रचना : सौ. वर्षा महेंद्र भाबल.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments